आभास भाग -३ {अंतिंम भाग }

Submitted by आदीसिद्धी on 11 May, 2018 - 23:56

आभास भाग - 1
https://www.maayboli.com/node/66101

आभास भाग- 2
https://www.maayboli.com/node/66109
●●●●●●
त्या दिवशी अधराने ईशानला बोलावून घेतलं..कारणही तसंच होतं...तिच्या लाडक्या अक्षुचा आज वाढदिवस होता.. असंही ईशानला अक्षुला एकदा भेटायचं होतं..मग वाढदिवसाच्या निमित्ताने भेटणंही होईल म्हणून तीने आग्रहाने त्याला बोलवलं..हल्ली अक्षु जरा रागीट वागायचा..पण अधरा त्याला समजावून शांत करायची..मग तो नाॅर्मलला यायचा..पण मागच्या काही दिवसात तो छोट्या छोट्या गोष्टींनी चिडून हातही उगारायचा...आणि मध्येच एकदम विचीत्र हसायचा..भयानक..

त्या दिवशी दुपारीच ईशान अधराच्या घरी आलेला..नेहमी ते बाहेर भेटायचे..पण आज पहिल्यांदाच तो तिच्या घरी आलेला.. संपूर्ण घर तीने सजवलेलं.. आज ते तिघंच सेलिब्रेट करणार होते..ईशान अक्षुची वाट पाहत होता..

संध्याकाळी सहा वाजता अधराची हाक ऐकू आली.."ईशान बेल वाजतेय..दरवाजा उघड ...अक्षु आला असेल बघ.."

ईशान हसत हसत म्हणाला.. "काहीही काय बडबडतेस अधरा..कुठे बेल वाजलीये..उगीच आपलं काहीही .."

"काय रे ईशान...किती तो उठायचा कंटाळा..मुद्दाम करतोयस ना..आळशी कुठला एक नंबरचा.." अधरा दार उघडायला येता येता म्हणाली..

तीने दार उघडलं..;" ये रे अक्षु ..आज वेळेत आलास बघ..छान दिसतोयस हं..आत ये.."

"ईशान..हा बघ रे अक्षु... आणि अक्षु हा ईशान दादा..माझा मित्र ..खास तुला भेटायला पुण्यातून मुंबईला आलाय.. तुम्ही दोघं गप्पा मारत बसा ..मी खायला घेऊन येते.." किचनमध्ये जाता जाता अधरा म्हणाली.

ईशान हे सगळं आश्चर्यचकीत होऊन बघत होता..

तितक्यात अधरा आली . तिने बाॅक्समधनं केक काढला.. नेमकी केक कट करायला आणलेली सुरी तीला सापडत नव्हती.. ती पटकन किचनमध्ये गेली..आणि सुरी घेऊन आली..ईशान तिच्या सगळ्या हालचाली जागीच खिळून बघत होता..

तिने अक्षुच्या हातात सुरी दिली..आणि त्याला केक कापायला लावला..पण सुरी हातात येताच अक्षुच्या चेहेर्यावरचे भाव झरझर बदलू लागले...मगाशी प्रसन्न दिसमारा अक्षु आता तिला खुनशी दिसत होता... त्याच्या चेहेर्यावर ते हृदय गोठवणारं भयानक हास्य पसरलं.. हातातली सुरी घेऊन तो एकेक पाऊल पुढे येत होता..अधरा आता भीतीने थरथरत होती...

"अक्षु काय करतोयस हे..भीती वाटतेय मला...जीव घेणारेस का माझा..का छळतोयस..प्लीज थांबव..ईशान ..अरे बघ हा काय करतोय...अरे थांबव ना त्याला...नाही अक्षु नाही..ईशान वाचव...ईशान.." असं किंचाळत अधरा बेशुद्ध होऊन पडली...

ईशानने तिला पटकन उचललं आणि तो हाॅस्पिटलमध्ये घेऊन आला..त्याला फार काळजी वाटत होती तिची..दोन दिवस झाले तरी ती शुद्धीत आली नव्हती...ईशानने तिच्या घरी कळवलेलं... तिचे आईबाबा धावतपळत आले...ईशाननेही आपल्या घरी सांगितलं...
तिसर्या दिवशी अधरा शुद्धीवर आली..डाॅक्टरांनी तिला काही गोळ्या लिहून दिल्या....ईशान अधराच्या रूममध्ये गेला..तिला असं बघून त्याच्या डोळ्यातनं झरझर अश्रू वाहू लागले..त्याच्या अधराला असं हाॅस्पिटलच्या बेडवर त्याला बघवत नव्हतं...त्याने अलगद तिचा हात हातात घेतला..

अधरा म्हणाली ; " वेड्या रडतोस काय असा..जिवंत आहे मी...तुच वाचवलस की मला...अक्षुने पोटात सुरा खुपसल्यावर मी मेल्यातच जमा होते..पण थॅन्क्स फाॅर सेव्हींग माय लाईफ.."
ईशानला हे ऐकून पुढचं बोलवेना..त्याने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला.. अधराचे आई वडील समोर बसून तिच्याशी बोलत होते....थोड्या वेळाने औषधांच्या इफेक्टने तिला झोप लागली...

ईशान रूमच्या बाहेर आला. त्याने फोन करून बाबांना बोलावून घेतलं..त्यांच्या ओळखीतले एक चांगले डाॅक्टर पुण्यात होते.. त्यांच मोठं हाॅस्पिटल होतं...अधराच्या आईवडीलांची परवानगी घेऊन तिला तिथेच शिफ्ट करायचं ठरवलं... सगळे पुण्यात यायला निघाले...
=============================
आठ महिन्यांनी.....

आज अधरा खूप खूष होती... इतक्या दिवसांनी तिला बाहेरच्या मोकळ्या जगात जायला मिळणार होतं..सारखं ह्या हाॅस्पिटलच्या एकाच रूममध्ये पिंजर्यातल्या पक्ष्यासारखी अवस्था झालेली तिची...फक्त एका खिडकीतनं येणारा सूर्यप्रकाश आणि आजूबाजूची झाडं...एवढाच काय तो निसर्गाचा सहवास..तेच तेच बघून उबग आलेला तिला....पण फायनली आज ती तिच्या दुनियेत जायला मोकळी होणार होती...
ईशान तिला घ्यायला येणार होता...
=====================

त्या दिवशी ईशान आणि अधराचे आई बाबा पुण्यातल्या त्या स्पेशालिस्ट डाॅक्टरांना भेटायला गेले...त्यांनी तिची हिस्ट्री जाणून घ्यायचा प्रयत्न केला...या आधीची लहान असतानाची फाईल त्यांनी वाचायला सुरूवात केली..अधराच्या बाबांना सविस्तर माहिती विचारली..ते बोलू लागले...त्यानंतर कळलं ...

लहान असल्यापासन एकुलती एक असल्यामुळे अधरा नेहमी एकटीच असायची ... तिसरीत नवीन शहरात असल्यापासनं संध्याकाळी गार्डनमध्ये जायची..सुरूवातीला एकटी खेळायची..आई बाबा दिवसभर कामात असायचे... पण नंतर तिला नेहमी एक मुलगी दिसायची.. आदिती नाव होत तीचं..सहा सात महिन्याच दोघी बेस्ट फ्रेंड झालेल्या एकमेकींच्या..रोज या दोघी गार्डनमध्ये एकत्र खेळायच्या ..एके दिवशी आईला सुट्टी असल्यामुळे ती पण अधरा बरोबर गार्डनमध्ये आली...आल्या आल्या अधरा अदितीच्या दिशेने धावत गेली...तिने खेळायला सुरूवात केली.. तिच्या आईला काहीतरी विचीत्र वाटलं..अधरा समोर कोणीही नसताना एकटीच कोणाशीतरी बोलत ; हसत खेळत होती..आईने तिला विचारल्यावर तीने तिच्या बाजूला हात करून दाखवलं..आई ही अदिती..माझी बेस्ट फ्रेंड..मी तुला सांगितलेली बघ...हीच ती..

आई सर्द होऊन तिच्याकडे बघत राहीली..तीने पटकन तिला जवळ घेतलं आणि सांगितलं...अगं बाळा तिथे कोणीच नाहीये...आज आदिती आली नसेल...मला पण काम आहे...चल लवकर घरी जाऊया...तरीही अधराने अदितीला बाय केलं आणि ते तिथून निघाले.. रात्री घरी आल्यावर तिच्या आईने बाबांना हा प्रकार सांगितला..दोन दिवसांनी डाॅक्टरांची अपाॅईंटमेट घेऊन ते तिला घेऊन गेले..डाॅक्टरांनी तिला आणि तिच्या आईबाबांना बरेच प्रश्न विचारले.. नंतर त्यांनी तिला स्क्रीझोफ्रेनिया आजार असल्याचं निदान केलं...अधराला दिसणारी अदिती ही प्रत्यक्षात नव्हतीच..तिला होणारा तो एक भास होता..

याला कारण तसंच झालं.. ती लहान असताना ती आणि तिचे आई बाबा त्यांच्या गावच्या घरी रहायचे.. तेव्हा तिची निशा नावाची एक मैत्रीण होती.. दोघीही दिवसभर एकत्रच असायच्या.. पण नंतर ती तिसरीत असताना ते शहरात शिफ्ट झाले..आणि अधरा एकटी पडली.. तिथे निशा सोबत नव्हती.. काहीतरी विरंगुळा म्हणून तीला बाबांनी पुस्तकं आणून दिली..वाचता वाचता त्या कथाच तिचं विश्व केव्हा बनल्या हे तिचं तिलाही कळलं नाही..आणि यातूनच जन्म झाला अदितीचा.. अदिती हे पुस्तकातलं एक पात्र होतं.. एका गोष्टीतली ती एक मुलगी होती.. नकळत ती अधराच्या आयुष्यात आली..अधराचा एकटेपणा आता दूर झाला होता..संध्याकाळी खेळताना निशाची जागा आता अदितीने घेतली होती..त्यामुळे अधराही हल्ली आनंदात होती..आपली मुलगी इथे रमलीये म्हणून आई बाबाही खूष होते.. पण सहा सात महिन्यांनी मात्र त्यांचा हा भ्रम दूर झाला.. अधराची ट्रीटमेंट सुरू झाली..तिच्या आईनेही आता नोकरी सोडून पूर्ण वेळ घरी रहायचं ठरवलं.. औषधांमुळे आणि आपल्या माणसांचं प्रेम मिळाल्यामुळे अधरा लवकर बरी झाली.. लहान असल्यामुळे हे प्रसंग तिच्या विस्मरणात गेलेले..नंतरच्या काळात अभ्यासामुळे अधराला जास्त मोकळा वेळ मिळत नसे..बारावी झाल्यावर मात्र तिने पुढे शिक्षणासाठी मुंबईतच रहायचं ठरवलं..पण कामाचा पसारा वाढल्यामुळे तिचे आई आणि बाबा दोघंनाही तिथे नेहमी रहाणं शक्य नव्हतं..शेवटी आठवड्यातनं एक दोन दिवस आई येऊन राहील असं ठरलं..आणि फायनली ती मुंबईत दाखल झाली..लहानपणापासूनचं तिचं इथे यायचं स्वप्न पूर्ण झालं..हळूहळू ती तिथे रूळली..दिवसातला बराचसा वेळ तिचा काॅलेज आणि अभ्यासात जायचा..पहिली दोन वर्ष शांता काकू तिच्यासोबत संध्याकाळपर्यंत असायच्या..पण नंतर त्या ही लवकर घरी जाऊ लागल्या.. इथूनच तिला अक्षु दिसायला सुरूवात झाली..संध्याकाळच्या वेळी एकटी घरी असताना तिला तो दिसायचा...तिच्याशी गप्पा मारायचा..तिला तिच्या लहान भावासारखा होता तो.. हल्ली सात आठ महिन्यांपूर्वी तिची ईशानशी ओळख झाली.. त्याच्या बोलण्याने तिला छान वाटायचं..म्हणून रोज रात्रीची ती त्याची ऑनलाईन येण्याची वाट बघायची..कधीकधी जुने मेसेज वाचत बसायची..नंतर लग्नामध्ये त्यांची ओळख झाल्यावर फोनवर गप्पा सुरू झाल्या..मधे मधे ते भेटायचेही...संध्याकाळच्या वेळी मात्र हल्ली रोजच अक्षु यायचा..त्यानंतर त्याच्या वाढदिवसा दिवशी त्याने तिला मारून टाकलं असं तिला वाटत होतं..

ईशानच्या वडीलांचे मित्र डाॅ . सहानी यांच्याकडे तिला ईशान घेऊन आला.. सगळी हिस्ट्री कळल्यावर डाॅक्टरांनी बोलायला सुरूवात केली..ते म्हणाले ;

"अधराच्या जुन्याच आजारान पुन्हा एकदा डोकं वर काढलय.. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मध्यंतरी दोन वर्ष ती एकटी होती..हल्ली सात आठ महिन्यांपूर्वी मि. ईशान तुमच्याशी तिची ओळख झाली.. पण त्या आधी जवळपास वर्षभर तिच्याजवळ कोणी नव्हतं..तुम्हीही तिला प्रत्यक्षात हल्लीच भेटलात..त्यामुळे नकळत हा आजार पुन्हा बळावला..तुम्ही मला तिच्या वाचनातली पुस्तकं आणून दाखवलीत..त्यातली बरीचशी गुन्हेगारी किंवा रहस्यकथांची होती...तिचा तो छंद होता..पण पूर्वीचा इतिहास पुन्हा रिपीट होत अक्षु नावाच्या एका कॅरेक्टरने तिच्या आयुष्यात प्रवेश केला..एका पुस्तकात अनिल नावाचं एक लहान मुलाचं पात्र होतं..त्याने त्या पुस्तकात एका मुलीचा खून केला आहे असं दाखवलेलं..तसंच सेम अक्षु नावाचं कॅरेक्टर तिला दिसू लागलं..तिच्या म्हण्याप्रमाणे तो रोज तिला संध्याकाळी भेटायचा..त्यामुळे संध्याकाळी विरंगुळा म्हणूत ति त्याच्याशी गप्पा मारायची..याबद्दल फक्त ईशान तिने तुम्हालाच सांगितलेलं...त्याचं केलेलं वर्णन ऐकून तुम्हालाही ते खरं वाटून गेलं..पण त्या दिवशी तुम्हाला अक्षु अस्तित्वात नाहीये हे कळलं..पण दुर्देवाने अधराचा आजार लवकर कळला नाही म्हणून तिलाही अक्षु हा तिचा भास आहे हे पटत नव्हतं..म्हणून सुरूवातीला बरेच दिवस सांगूनही तिचा विश्वास बसत नव्हता..पण ईशान त्या दिवशी तुम्ही तिचा मोबाईल तिच्या हातात दिलात आणि तिला अक्षुबरोबरचे तिचे फोटो दाखवायला लावलेत..तेव्हा त्या फोटोतही ती एकटीच होती..हे तिच्या लक्षात आल्यावर हळूहळू तिला आमच्यावर विश्वास बसला आणि ट्रीटमेंट वेगाने पूर्ण झाली.. आणि आता अधरा बरी झालीये..पण आता यापुढे मात्र एक लक्षात ठेवा तिला एकटं ठेवू नका..सोबत कोणीतरी असू द्या..बाकी ही काही औषधं आहेत ती तिला देत जा..

=========================
ईशान अधराच्या रूममध्ये आला तेव्हा ती खिडकीबाहेर एकटक बघत बसलेली. त्याने पटकन मागून जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती दचकला..दोघंही हसायला लागले..अधराने पटकन आवरलं..सामान घेऊन ते घरी जायला निघाले..गाडीत बसल्यावर अधराला एकेक गोष्ट आठवायला सुरूवात झाली..एकदा ती अक्षुबरोबर घरी येताना समोरच्या काकू तिच्याकडे विचीत्र नजरेने बघत होत्या.. ईशानही त्या दिवशी अक्षुला विश करायचं सोडून ब्लॅन्क होऊन माझ्याचकडे बघत होता.. आश्चर्यचकीत भाव होते त्याच्या चेहेर्यावर.. तीची तंद्री तुटल्यावर तीने ईशानकडे पाहिलं..तो समोर बघून गाडी चालवत होता..
तीने हळूच त्याले हाक मारली..

अधरा - ईशान..
ईशान - हम्म बोल..ऐकतोय मी..
अधरा - थॅन्क्स..
अधरा - कशासाठी??
अधरा - मागचे इतके महिने माझ्यासाठी जे जे काही केलस त्या सगळ्यासाठी..
ईशान - गप्प बस..आता तु बरी झालीयेस ...मला माहितीये तु हे विसरू शकणार नाहीयेस...पण तरीही हा सगळा पॅच एक वाईट स्वप्न म्हणून विसरायचा प्रयत्न कर..आता याचा विचार सोडून द्यायचा...मला माझी पूर्वीची अधरा परत हवीये...आजपासून नव्याने लाईफ सुरू कर...
अधरा - हो..पण आता आपण कुठे चाललोय??
ईशान - तुझ्या घरी चाललोय..मुंबईत..आई बाबा पण येतायत ...
अधरा - हम्म...
थोड्या वेळाने तिला झोप आली..
संध्याकाळी सहा वाजती तिला जाग आली...गाडी समुद्राशेजारून जात होती...तिने ईशानला विचारून खिडक्या उघडायला लावल्या...बाहेरनं येणार्या खार्या वार्याचा वास तिने मनात भरून घेतला...बरोब्बर आठ महिन्यांनी तिला इतकं आल्हाददायक वाटत होतं...

ईशानने गाडी सिद्धीविनायकासमोर थांबवली..गाडी पार्क करून तो उतरला..अधराच्या इथलाही दरवाजा उघडून तिला उतरवलं...अधराला आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला...चक्क कधी नव्हे तो ईशान देवळात आलेला..तिने पटकन देवासमोर हात जोडले...ईशाननेही देवापुढे मनोभावे हात जोडले आणि "माझ्या प्रेमाला; अधराला दीर्घायुष्य दे अशी मनोमन प्रार्थना केली"...देवाच्या पाया पडून दोघंही निघाले..मंदीराबाहेर आल्यावर ईशान तिला समुद्रावर घेऊन गेला..आज तिचा मूड खूप छान होता..दिवसाचा शेवटही गोड व्हावा म्हणून त्याने समुद्रकिनारी एका शांत जागी थांबवून "आय लव्ह यू " म्हणून त्याच्या प्रेमाची कबुली दिली..अधराच्या गालावर लाजेने लाली पसरली..समोर तिच्या आवडीचं स्माईल घेऊन ईशान निरागसपणे तिच्याकडे बघत होता...शेवटी तीनेही तिचं त्याच्यावरचं प्रेम मान्य केलं...आजचा दिवस तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस होता... ...थोड्याच वेळात ते घरी आले...रात्री काही वेळाने तिचे आई - बाबाही घरी आले ..त्यांचा निरोप घेऊन ईशान निघाला...
===========================
ईशान आता अधराची खूप काळजी घ्यायचा...दर दोन तीन दिवसांनी तीला येऊन भेटून जायचा..आल्यावर कुठे ना कुठे फिरायला नाहीतर पिक्चरला घेऊन जायचा...बर्याचदा ते समुद्रावर एकमेकांशी गप्पा मारत बसायचे...अधरा आता पूर्ण बरी झाली होती..एके दिवशी ईशानने तिला काॅलेजबद्द्ल विचारलं...तिनेही आता राहीलेली शेवटच्या वर्षाचा परीक्षा द्यायला होकार दिला...दुसर्या दिवशी तीने तसं काॅलेजमध्येही सांगितलं..तीन महिन्यांनी तीची परीक्षा असणार होती..अधरा आता अभ्यासाला लागली..काॅलेजमध्ये जाऊन तिने राहीलेलं सबमिशन दिलं...तीन महिन्यांनी परीक्षाही झाली...सगळे पेपर चांगले गेल्यामुळे खूष होती..महिन्याभराने तिचा रिझल्टही लागला..चांगले मार्क्स मिळवून पास झाली होती ती..तीने सगळ्यात आधी ईशानला फोन करेन ही खुशखबर सांगितली ..त्यालाही मनापासून आनंद झाला..चार दिवसांनी तो मुंबईत आला..काहीतरी ठरवलं होतं त्याने मनाशी...अधराच्या घरी आल्यावर त्याने तिच्या आईवडीलांसमोर तिला आपल्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली...जेणेकरून तिला पुन्हा तो जुना एकटेपणा सतवणार नाही...आणि दिवसभर आपल्या डोळ्यासमोर असली तर तिची काळजी वाटणार नाही...तिच्या आईवडीलांनाही ईशानवर विश्वास होता..ईशानची अधरा बरी होण्यासाठी चाललेली धडपड ; तिची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेणं त्यांनी जवळून बघीतलं होतं..तिच्याविषयीचं त्याचं प्रेम त्याच्या डोळ्यात आणि कृतीतही दिसून यायचं..म्हणून त्यांनी तिला परमीशन दिली..महिन्याभराने अधरा पुण्यात आली...ईशानने तिला आपलाच एक फ्लॅट रहाण्यासाठी दिलेला..तिच्याबरोबर आपल्या बहीणीला त्याने रहायला पाठवलेलं..पहिले दोन महिने अधरा हळूहळू काम शिकत होती...पण पुढच्या सहा महिन्यात ती सराईतपणे दिलेलं काम पूर्ण करू लागली..ऑफीसमध्येही तिने सर्वांना आपलंस करून घेतलेलं...ईशानही तिच्यातला बदल बघून आनंदात होता..दीड वर्षपूर्वीची अधरा आणि आताची अधरा यात जमीन अस्मानाचा फरक होता..एक आत्मविश्वास तिच्या प्रत्येक कामात दिसून यायचा..सगळं अगदी छान सुरू होतं...

त्या दिवशी अधराचा वाढदिवस होता..ईशानने तिच्या आईवडीलाना आपल्या घरी बोलावून घेतलं..संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर तो तिला घरी सोडून तिला तयारी करून रहायला सांगून गेला...ईशान आणि अधराचे आईवडील ठरलेल्या ठिकाणी आधीच पोहोचले होते..थोड्या वेळाने ईशान अधराला घ्यायला आला..मस्त पीच कलरच्या ड्रेसमध्ये ती अफाच सुंदर दिसत होती..ईशान दोन मिनीटं भान हरपून तिच्याकडे बघत राहीला. तिने हसत त्याच्या डोळ्यांपुढे हात फिरवला..तसा तो हसत हसत पुढे निघाला..
तिला घेऊन तो त्या ठिकाणी आला..ते छोटंस गार्डन छान लायटिंग करून सजवलं होतं.. तिथे आल्यावर एके ठिकाणी ईशानने तिला थांबवलं. तिच्यासमोर गुडघ्यावर बसुन तो म्हणाला.".अधरा तुला माझ्या आयुष्यात सामावून घ्यायला अधीर झालोय मी...माझी लाईफ पार्टनर होशील का??"
..अधराला असं काहीतरी होईल याचा अंदाज आलेला...तिच्या डोळ्यासमोरून त्यांच्या तीन वर्षातल्या सगळ्या आठवणी झरझर तरळून गेल्या..तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...आतापर्यंत ईशानने तिला सुखात ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले..त्यामुळे आता तो आपल्याला आयुष्यभर आनंदात ठेवेल यात तिलाही अजिबात शंका नव्हती..ईशान म्हणाला "अगं नुसतीच रडू नको ..पटकन काहीतरी बोल...पाय कामातनं गेले माझे...हवं तर नंतर स्पेशल रडायचा कार्यक्रम ठेवूया आपण तुझा..."
अधराने हसतच होकार दिला...तितक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला...तिने दचकून मागे बघीतलं तर ती ईशानची आई होती...तिने तिला जवळ घेऊन डोक्यावरनं हात फिरवला...अधरा तिला आधीपासनंच आवडत होती...सगळ्यांशी प्रेमाने वागून तिने प्रत्येकाचं मन जिंकलं होतं...मागच्या तीन वर्षात प्रत्येक प्रसंगात ईशान तिचा भक्कम आधार बनलेला...प्रत्येक सुखदुःखात सावलीसारखा बरोबर होता...त्यामुळे दोन्ही घरचे सगळे खूष होते...केक कापून झाल्यावर ईशानच्या आईने त्याच्या हातात एक बाॅक्स दिला...त्यातली अंगठी काढून त्याने तिच्या हातात घातली...अधरा त्याच्याकडेच बघत होती...ईशान आणि अधरा कायमचे एकमेकांशी जोडले जाणार होते....अधराच्या आयुष्यात आजपासून ईशान नावाच्या नवीन पर्वाला सुरूवात होणार होती....

समाप्त...
--- आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाॅर्ट आणि स्विट कथा.
जाता जाता एखादा ट्विस्ट देता येईल का? उदाहरणार्थ त्यावेळी अक्षू लांबून बघत सुखाने हसला.

अरेच्च्या!! मलाही ईशान काल्पनिक आहे अस. पुढे येईल असं वाटत होतं हे सगळं गोड्गोड पॅराग्राफ्स वाचुन.

अॅक्च्युली ही कथा आज लिहीली नाहीये... 28 एप्रिलला लिहीलेली... एका स्पर्धेला पाठवायची होती म्हणून... तेव्हा परीक्षा असल्यामुळे फक्त अर्ध्या दिवसात लिहून पाठवलेली... इथे टाकताना जरा बदल करून टाकायचा विचार केलेला.. पण नंतर आहे अशीच टाकायचं ठरवलं... नवीन शेवट सुचवल्याबद्द्ल सर्वांचे आभार.... तेव्हा जास्त विचार न करता लिहीलेली.. .. Happy

मस्तच जमलीय तुला ही कथा. मुळात वेगळा मुलुख उत्तमपणे हाताळलायेस.. मानलं पाहिजे तुला. पुलेशु. Happy

धक्कादायक शेवटाच्या कथांचं आजकाल पिक आलय सर्वत्र. म्हणून वाचकही कथेच्या सुरुवातीपासूनच अनुमान काढत बसतो. पण खरी मजा येथेच आहे जेंव्हा स्वीट एंड किंवा नॉर्मल अखेर होतो कथेचा आणि सनसनाटीची सवय लागलेले आपण बुचकळयात पडतो.
एक सांगू ? मला कथा आवडली ।

धन्यवाद अधांतरी; onam; आनंददादा; अभिजीत
@विचार... तुमचा विचारही आवडला...धन्यवाद..