पाटील v/s पाटील - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 10 May, 2018 - 03:32

भाग १
https://www.maayboli.com/node/66082

पुढे....
'श्रीपाद, अरे वेड्या मनोरुग्णाचा वैद्य होऊन तू काय साध्य करणार आहेस?'
'शिरप्या, येड्याचा डॉक्टर होऊ नको. तू येडा व्हशिल. त्यापेक्षा तू हाडाचा डॉक्टर हो.'या आपल्या गावात लै मारामाऱ्या होतात. लै हाड मुडतात. धंदा बेष्ट.'
माझ्या आई बाबाच्या या भाषिक, स्वाभाविक आणि कशाकशाच्या संकरातून मी जन्माला आलो होतो.
तरीही मी माझ्या या अतीव ध्यासापायी (माझ्या वडिलांच्या भाषेत चार एकर फुकुन) मानसोपचार तज्ञ झालो.
माझ्या सत्कार समारंभात बोलताना न राहवून अख्या पब्लिकसमोर माईकवर 'चार एकर फुकली भाड्यानं' असा प्रेमळ उल्लेख वडिलांनी केला होता.
काहीही होवो, गावातला मी एकमेव मानसोपचार तज्ञ होतो, याचा मला सार्थ अभिमान होता.
आता मात्र मी माझ्या एका बाजूला दुष्काळातला पाणघोडा आणि दुसऱ्या बाजूल अवर्षणातील गेंडा असेल, अशा लोकांमध्ये सीटवर बसलो होतो.
सीट बेल्ट नसतील गाडीला म्हणून माझे हात पाय दोरीने बांधले होते. आणि माझ्या हजरजबाबीपणापुढे बोलल्यास फजिती होईल हे बघून त्यांनी माझ्या तोंडात बोळा कोंबला होता.
"डॉक्टर. बोळा काढतोय. जास्त बोललात तर कायमचं तोंड बंद करेन." इति गेंडा.
"हा डॉक्टर वाटतोय तुला? आईची इच्छा होती पोरगी जन्माला यावी, बापाची इच्छा होती पोरगा जन्माला यावा, आणि हा जन्माला आला, अस झालंय याचं." इति पाणघोडा.
बाकी सगळे या जोकवर हसले असलेत तरी, मी या जोकवर अजिबात हसण्यासारखा नव्हतो.
यादरम्यान काय घडलं ते सांगतो. पटापट....
ताई आली. सोनी रडली. आजीही आलीये. मग ताई सोनीला घेऊन घरी निघाली. सोबत ३-४ गाड्या होत्या. हा डॉक्टर सोनिवर उपचार करणार हे बघून त्यालाही गाडीत उचलण्यात आलं. दवाखाना बंद करण्यात आला. आणि आता आम्ही सोनीच्या घरी निघालो होतो.
सोनीच्या घरी पोहोचल्यावर मला एकच कळलं, की आजपर्यंत गावच्या निम्या लोकांच्या गप्पाचा विषय अण्णा पाटील हा का असायचा.
अण्णा पाटलाचा बंगला, का महाल का वाडा, लै भारी होता. लै मोठा. अण्णा पाटलाने खूप पैसा ओतलेला दिसत होता.
म्हणजे ही सोनी अण्णा पाटलाची कुणीतरी असावी, मी तर्क केला.
"डॉक्टर उतरा."
आम्ही परेड करत चालू लागलो. पुढे चार धोतरधारी अजस्त्र मानवरूपातील जनावरे. त्यामागे ताई आणि सोनी. आणि मागे आम्ही तिन्ही.
अण्णा पाटलाचा लोखंडी गेट उघडला गेला. तर समोर साक्षात अण्णा पाटील उभे.
"सोने, काळजी वाटली तुझी, केव्हाची गेली होतीस तू."
"आबा, डॉक्टरने उशीर लावला."
"म्हणूनच त्याला बरोबर आणला अण्णा."
"चांगलं, घरात चल. बोलूयात." अण्णा निघाले.
अण्णा पाटील, डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेलं गावातील भारदस्त व्यक्तिमत्व. स्वच्छ पांढरा शर्ट घातलेला. तेवढाच पांढरं धोतर. खांद्यावर पंचा, काळा गॉगल, पायात कोल्हापुरी चप्पल. हातात सोन्याचं घड्याळ, गळ्यात सप्तशृंगी देवीचं लॉकेट. 
अण्णा पाटील पाटीलवाडीचा हिरा होता. सगळी पाटीलवाडी मानायची पाटलाला. पाटील म्हणजे परफेक्ट माणसाचा परफेक्ट नमुना. पाटलाला लोक देव मानायचे, तसं राक्षसही... पाटील सावकार होता. पाटील हॉटेलवाला होता. पाटील ट्रान्सपोर्टवाला होता. पाटील बिल्डर होता. जो धंदा जास्त परतावा देईल त्यात पाटलाची इन्व्हेस्टमेंट होती.
...पण तरीही पाटील माणूस पाहून मदत करायचा. वेळ पाहून हात सैल सोडायचा.
म्हणजे अण्णा पाटलाची मुलगी सोनी, त्याची मोठी मुलगी ताई, आणि....

....आणि अण्णा पाटलाची आई, सोनी, ताईची आजी... त्या नराधमाबरोबर गेलेली....
....अंबा पाटील...   
अण्णा पाटलाचा दरारा जेवढा नसेल, तेवढा अंबा पाटलीनीचा दरारा होता. सगळं गाव अंबाला घाबरायचं. थरथर कापायचं. 
अंबा पाटलीन अंबा नव्हती, जगदंबा होती. मूर्तिमंत भीती होती. 
गोल कलिंगडासारखा चेहरा, मोठे पाणीदार डोळे. कपाळावर ठसठशीत कुंकू. भरगच्च केसांचा अंबाडा. स्थूल शरीर. सावळा वर्ण. तिखट तर्रीसारखं बोलणं. ते बोलणं काळजात घाव घालायचं.
वादविवाद करण्यात, समोरच्याला रडवण्यात अंबेचा हात कुणीही धरी शकत नव्हतं. आणि धरणार तरी कसा, अंबेने तो हातच कापला असता...
"डॉक्टर, सोनीला काय झालंय." साक्षात अण्णा पाटील माझ्याशी बोलत होते.
मी भारावून वगैरे गेलो होतो. पण तस न दाखवता मी बोलायला सुरुवात केली.
"सी धिस इज केस ऑफ..."
"प्लिज स्पिक इन मराठी, ओदरवाईज धिस पिपल विल सी युवर एव्हरीथिंग..." अण्णा पाटलाच्या जोकवर सगळं घर फिदीफिदी हसलं.
इथे डॉक्टर नावाच्या जमातीला काही किंमतच नव्हती.
मग अण्णा पाटलांना मी जमेल तेवढं मराठीत सांगितलं. 
"धन्यवाद... महिनाभरात होईल सगळं?"
"नक्की होईन." मी म्हणालो...
"भारी...मग आजपासून डॉक्टर महिनाभर या  घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. गणपत, डॉक्टरचा दवाखाना इकडे आन. आणि हे पन्नास हजार...फी म्हणून....."
डॉक्टर झाल्यापासून एवढी रक्कम मी पहिल्यांदा बघत होतो.
"आणि डॉक्टर, जर घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केलात, तर लक्षात ठेवा, जगातला एकही डॉक्टर तुम्हाला वाचवू शकणार नाही."
"आबा, आजी तुम्हाला बोलावतेय...डॉक्टरलाही बोलवा...."वरच्या खोलीतून ताईने आवाज दिला..
अण्णा पाटील वेड्यासारखा वरच्या खोलीत धावत सुटला.... आणि मलाही दोन जण उचलून घेऊन त्यामागे धावत सुटले.
 कशाचीही कशाला संगत लागत नव्हती.
आता तीन गोष्टी स्फटिकासारख्या स्वच्छ होत्या. 
एक. मी या नराधमांच्या तावडीत सापडलो होतो.... महिनाभर....
दोन. अंबा पाटलीणीच्या जबड्यात माझा घास घातला जाणार होता.....
तीन. हे सगळे येडे होते...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला भाग अगदीच TP वाटलेला, आता थोडी ग्रीप येते आहे,
कदचीत २ भाग एकत्र केलेत तर जास्त इंगेजिंग वाटेल गोष्ट,
थोडे मोठे भाग टाका प्लीज Happy

माझ्या सत्कार समारंभात बोलताना न राहवून अख्या पब्लिकसमोर माईकवर 'चार एकर फुकली भाड्यानं'
>>> हाहहह