आँधी...तुम आ गये हो....

Submitted by राजेश्री on 9 May, 2018 - 01:07

08-54-09-Aandhi-Tum-Aa-Gaye-Ho-Nur.jpgतुम आ गए हो, नूर आ गया है....

गुलजार यांचा आँधी सिनेमा आजही प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या कारणांनी मनाला स्पर्शून जात असतो.कुणाला संजीव कुमार,सुचित्रा सेन यांची जुळलेली केमिस्ट्री आवडते,तर कुणाला ही आपलीच कथा पडद्यावर चित्रित होतेय अस वाटत असत.कुणाला या सिनेमातील गुलजार यांनी लिहिलेल्या गीताचे बोल आवडतात तर कुणाला संगीत आवडत.कुणाला किशोर लताजींच्या आवाजातील गाणी सुखावतात.तर कुणाला राहुलदा यांच संगीत भावत.
सत्तर च्या दशकातील एक सकस,सर्वच अर्थांनी स्वयंपूर्ण असा आँधी सिनेमा गुलजार यांच्या मनस्वी मनाचा आरसाच होय.यातील गाणी किती भावस्पर्शी आणि अर्थपूर्ण अशी आहेत .शिवाय ही गाणी चित्रित करीत असताना प्रत्येक गाण्यात लोकेशनलाही तेवढंच महत्त्व दिलं आहे.आँधी मधील तुम आ गए हो तो ...हे गाणं नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात चित्रित झालं आहे आणि तितकच सुरेल संगीत आणि अर्थपूर्ण शब्दरचनेमुळे रसिकांना आनंदानुभूती देते.यामधील संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांचा संयत अभिनय तर लाजवाबच....
तुम आ गए हो, नूर आ गया है
नहीं तो चरागों से लौ जा रही थी
जीने की तुमसे, वजह मिल गई है
बड़ी बेवजह ज़िन्दगी जा रही थी

एखाद्या व्यक्तीच आयुष्यात येणं आणि तिच्या/त्याच्या आगमनाने पूर्वीच आयुष्य आणि आता झालेला बदल सांगताना नही तो चरागों से लौ जा रही थी ...हे ऐकल की मला तिन्ही सांजेला देवासमोर लावलेल्या समईची ज्योत आठवते.ती ज्योत लावली की थोडी प्रकाशित करत असताना हलक्या हाताने ती थोडीसी पुढे सरकवत असताना आपला श्वासही किंचित रोखून धरावा लागत असतो. कारण श्वासाच्या हलक्याश्या हुंकाराने देखील ती ज्योत थरथरते.अशी विझू विझू आलेली ज्योत दोन्ही हाताच्या आश्वस्त ऊब किंवा दिलास्याने पुन्हा प्रकाशमान होते तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातही नेमका हाच बदल झाला आहे.जगण्याचे कारणही मिळालंच तुझ्या येण्याने नाहीतर हे असंच संथ आणि कोणताही तरंग न उठणाऱ्या नदीप्रमाणे माझं आयुष्य चाललं होतं.

कहाँ से चले, कहाँ के लिए
ये खबर नहीं थी मगर
कोई भी सिरा, जहाँ जा मिला
वही तुम मिलोगे
के हम तक तुम्हारी दुआं आ रही थी

हे जगणं म्हणजे असच कोणत्याही प्रवाहात मिसळायच ध्येय नसलेल्या नदीसारख संथ एकाच ठिकाणी वाहण असताना तुझं माझ्या आयुष्यात येणं आणि त्या ठिकाणी तुझं मला भेटणं म्हणजे माझ्या दैवयोगाची ती खूणच होती बहुदा किंवा मग असही असेल की तुझ्या मनातील लहरी माझ्या मनातील स्पंदनापर्यंत पोहचली असतील आणि आपली या टप्प्यावर नियतीनेच आपली भेट घडवून आणली असेल.यासाठी तू ही प्रार्थना करीत असशीलच आणि ती नकळत माझ्याही मनापर्यंत पोहचली असेल म्हणूनच आपली भेट साक्षात घडून आली असेल..

दिन डूबा नहीं ,रात डूबी नहीं
जाने कैसा है सफ़र
ख़्वाबों के दिए, आँखों में लिए
वही आ रहे थे
जहाँ से तुम्हारी सदा आ रही थी

सरून चाललेल्या काळाच कोणतंच भान नसलेलं हे आयुष्य..उगवणाऱ्या आणि मावळणार्या दिवसाच गणितही लक्षात न ठेवता त्याच्याच कलाने सरत असताना नेमकं इथेच येऊन पोहोचल की जिथे तुझ्या प्रार्थनेचे तरंग मला घेऊन आले.
तू भेटल्यामुळे माझ्या मनाच्या दिव्यातील निराशारूपी काजळी दूर झालीय आणि माझं आयुष्य पुन्हा प्रकाशमान झालंय...खरच तुम आ गए हो तो नूर आ गया है........

गीतकार : गुलज़ार, गायक : लता - किशोर, संगीतकार : राहुल देव बर्मन, चित्रपट : आंधी (१९७५)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलंय पण पहिल्या दोन ओळींचा अर्थ थोडा वेगळा आहे.
तुम आ गए हो, नूर आ गया है
नहीं तो चरागों से लौ जा रही थी
नूर म्हणजे प्रकाश! म्हणजे तू आल्यामुळे माझ्या आयुष्यात प्रकाश आला आहे नाहीतर फक्त दिव्याची (चराग) ज्योत (लौ) जळत होती पण तरी प्रकाश नव्हता (आयुष्यात अंधार होता).

छान.

जिज्ञासा, तुम्ही सांगितलेला अर्थ शब्दशः बरोबर वाटतो.
पण लेखिकेने शब्दशः अर्थ सांगण्या ऐवजी त्या ओळीतले चिराग नि लौ हे शब्द वाचून त्यांच्या मनात काय विचार आले ते लिहीले असावे.

आता काय ऐकून, वाचून कुणाच्या मनात काय अर्थ येतील ते कशावर अवलंबून असते? तर भावपूर्ण, हृदयाला भिडणारे शब्द ऐकून, वाचून, मनाच्या पाकळ्या जसजश्या विकसित होत जातील, तसतसे त्यातूनच वेगळे वेगळे विचार मनात येतात. कधी कधी अगदीच वेगळे.

मला हे कायम तुम आ गये हो मूड आ गया है... असे ऐकू आलेय. त्यामुळे पुढच्या ओळीचा अर्थ, दिव्याच्या वातीवर काजळी धरत होती असा लावलाय मी. तू आलास, त्यामुळे मूड आलाय, नैतर काजळी धरलेल्या मंद दिव्यासारखे आयुष्यही मंदावलेले.... हे संस मला एकदम फिट वाटले होते.

जिज्ञासा, तुम्ही सांगितलेला अर्थ भाषेच्या दृष्टिकोनातून एकदम योग्य वाटतो. बाकी, ज्याला जे भावेल ते.. नंदयाशी सहमत.

हो मलाही जिज्ञासा यांच्यामुळे हा अर्थ कळला.नूर म्हणजे प्रकाश हे माहीत होतं.लौ म्हणजे ज्योत.charagonse म्हणजे दिवा .त्या दिव्याची ज्योत जात होती अस वाटत.
काजळी हा शब्द इथे नाहीच.ती मी कल्पना केली होती.

नंद्या४३, खरंय! दर्जेदार काव्य हे प्रत्येकासाठी नवीन अर्थछटा घेऊन येतं.. तुम्ही छान लिहीलंय!

मस्त!

लेख वाचला नाही.
कारण आंधी ची गाणी घासून गुळगुळित झाली आहेत. एक काळ असा होता की अर्थ साथ साथ आणि आंधीची कॅसेट घरोघरी असे(च).
मला व्यक्तिशः आंधी ची गाणी अज्जिबात आवडत नाहीत Sad
गाणी श्रवणीय आहेत यात वाद नाही, पण अतिपरिचयात अवज्ञा झाली त्यांची.

उत्कृष्ट रसग्रहण. मलाही या चित्रपटातील गाणी त्यांच्या अर्थासकट खूपच आवडतात. खर म्हणजे आँधी मला आवडणार्‍या पहिल्या पाच चित्रपटातील एक आहे. कितीही वेळा पाहू शकतो.
सुंदर.

<मला तिन्ही सांजेला देवासमोर लावलेल्या समईची ज्योत आठवते.ती ज्योत लावली की थोडी प्रकाशित करत असताना हलक्या हाताने ती थोडीसी पुढे सरकवत असताना आपला श्वासही किंचित रोखून धरावा लागत असतो. कारण श्वासाच्या हलक्याश्या हुंकाराने देखील ती ज्योत थरथरते.अशी विझू विझू आलेली ज्योत दोन्ही हाताच्या आश्वस्त ऊब किंवा दिलास्याने पुन्हा प्रकाशमान होते तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातही नेमका हाच बदल झाला आहे.जगण्याचे कारणही मिळालंच तुझ्या येण्याने नाहीतर हे असंच संथ आणि कोणताही तरंग न उठणाऱ्या नदीप्रमाणे माझं आयुष्य चाललं होतं.>
वाह! सुरेख!