योग आणि व्यसनमुक्ती - सौ. जयश्री शुक्ल

Submitted by अतुल ठाकुर on 4 May, 2018 - 07:45

मध्यंतरी ठाणे पाठपुराव्याला गेलो असताना सर्वप्रथम जयश्रीताईंची ओळख झाली. त्यांचं "योग आणि व्यसनमुक्ती" विषयावर भाषण ठेवलं होतं. विषयाचा आवाका प्रचंड होता आणि वेळ फारच थोडा. तेवढ्या वेळातही जयश्रीताई जे बोलल्या ते फार आवडलं आणि पटलं देखील. त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेत त्यांचे विचार नीट समजून घेता आले. आणि त्याच वेळी वाटले की यांची मुलाखत आनंदयात्रीसाठी घेणे आवश्यक आहे. मुक्तांगणमध्ये योग हा व्यसनमुक्तीवरील उपचारांचा एक भाग म्हणून वापरला जातो. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट म्हणजे मोठ्या मॅडम यादेखील योगाभ्यास करीत असत. अनेकदा असं पाहिलं आहे की योग विषयावर जी मंडळी बोलतात त्या सर्वांचाच योगाचा सराव असतो किंवा योग तत्त्वज्ञानाचा अभ्यास असतो असे नाही. काही माणसे अंदाजा अंदाजाने बोलत असतात. मात्र येथे जयश्रीताई या योगशिक्षिकाच आहेत असे नव्हे तर त्या कॅन्सर पेशंटनाही योग शिकवण्याचे काम करतात. त्यांचे स्वतःचे योग वर्ग अनेक वर्षे चालत आहेत. डॉ. आनंद नाडकर्णींच्या आयपीएच संस्थेमध्ये "मैत्र" हेल्प लाईनचे काम त्या पाहतात. शिवाय योगाचा त्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करतात. योगातील अनेक परंपरा त्यांना माहित आहेत कारण अनेक परंपरांमधून आलेल्या शिक्षकांकडून त्यांचे शिक्षण झाले आहे. तज्ञांकडून त्यांनी पातंजल योगसूत्राचा अभ्यास केला आहे. योगाभ्यास करतानाच त्यांनी संस्कृतशी नाळ जोडत दर्शनांचाही अभ्यास करणे सुरु केले असून सध्या त्या शंकराचर्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात गुंतल्या आहेत. भारतीय प्राचीन गुरुपरंपरेला अनुसरून बिहार स्कूल ऑफ योग या जगप्रसिद्ध संस्थेचे स्वामी निरंजनानंद यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले आहे. अशा तर्‍हेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीची ओळख आमच्या माधव सर आणि माधवीताईंमुळे झाली यासाठी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानावेसे वाटतात. जयश्रीताईची मुलाखत त्यांच्या घरी जाऊन घेतली. घर हे त्यांच्या शांत व्यक्तीमत्वाला साजेसे असेच होते.

त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या दारातच भेटल्या. शांत, हसतमुख, सडसडीत शरीराच्या जयश्रीताईंना पाहिल्यावर या व्यक्तीचा योग विषयाचा इतका प्रचंड अभ्यास आहे असे पटकन लक्षात येत नाही. मात्र त्या बोलू लागल्यावर ते कळू लागतं. अशा जबरदस्त अभ्यास असलेल्या व्यक्तींच्या तर्‍हेवाईकपणाचा मला बर्‍यापैकी अनुभव असल्याने मला सुरुवातीला तरी मोकळे होता येत नाही. मात्र ठाण्यालाच जयश्रीताईंशी बोलताना त्यांचा असाधारण नम्रपणा लक्षात आला होता. त्यामुळे माझ्यावर देखील दडपण नव्हते. मी त्यांनाच प्रथम बोलू दिले. कारण मला त्यांचे विचार कळून घ्यायचे होते. त्यानंतर आवश्यकता वाटेल तसे मी प्रश्न विचारत गेलो. योग आणि व्यसनमुक्तीचा संबंध त्यांनी थेट आयुष्यातील शिस्तीशी जोडला. हा मुद्दा मला अतिशय महत्त्वाचा वाटला. त्या म्हणाल्या की व्यसनात असताना माणसे बेशिस्त झालेली असतात. शरीराची काळजी घेणे कधीच थांबलेले असते. जेवणाखाण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. झोपेचे तंत्र बिघडलेले असते. काम करणेही थांबलेले असते. मनात सतत व्यसनाचे विचार असतात. आणि व्यसनाने शरीराला पोखरायला सुरुवात केलेली असते. व्यसनामुळे मनाचेही आरोग्य शरीराप्रमाणेच बिघडू लागलेले असते. एकंदरीतच शरीर आणि मनामधले संतूलन ढळलेले असते. जयश्रीताई पुढे म्हणाल्या की योगाभ्यासाचा उपयोग व्यसनमुक्तीसाठी इथपासूनच होऊ लागतो. जेव्हा आसनांचा सराव सुरु होतो तेव्हा हे बिघडलेले तंत्र ताळ्यावर येण्यास सुरुवात होते. आसने म्हणजे शिस्त. त्यात पाय कसे वर करायचे, हात कुठे ठेवायचे, नजर कशी असेल, मान कशी वळवायची अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. आसनांचा लक्षपूर्वक अभ्यास करणार्‍याला बेशिस्तपणे वागताच येणार नाही. आणि त्यामुळे मन आणि शरीराचे ढळलेले संतूलन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होते.

जयश्रीताईंचा दुसरा मुद्दा हा योगाभ्यास केल्याने वाटणार्‍या "फिल गुड" फॅक्टरचा होता. आसने, प्राणायाम केल्याने शरीर, मनाला येणारं स्थैर्य, विचारांची स्पष्टता यामुळे छान वाटतं. आसनांमध्ये योग्य तितका शरीराला तणाव देणे, शरीराच्या विविध अवयवांवर पडणारा धन आणि ऋण दाब, प्राणायाम, त्याचे विविध प्रकार, त्यांचे होणारे सूक्ष्म परिणाम यामुळे माणसाला बरं वाटतं. शवासनासारखे आसन केल्याने तणावमुक्त होता येतं. या सार्‍यांमुळे जो एक "फिल गुड" फॅक्टर निर्माण होतो त्याचा व्यसनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं कारण वर सांगितल्याप्रमाणे व्यसनामुळे शरीराची नासधूस झालेली असते. काही आजार झालेले असतात. नैराश्य आलेले असण्याची शक्यता असते. आजार अनेक असले तरी योगाचा दृष्टीकोण मात्र एकेका आजारासाठी वेगवेगळी आसने असा नसून शरीर मनासाठी सर्वसमावेशक असा असतो. त्यामुळे सर्वसाधारण योगाभ्यास केला तरी त्याचे फायदे मिळु लागतात आणि हा फिल गुड फॅक्टर अनुभवास येऊ लागतो. जयश्री ताईंनी तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा भारतीय दृष्टीकोणाचा मांडला ज्याचा व्यसनाशी अतिशय जवळचा संबंध आहे असे मला वाटते. त्या म्हणाल्या की आनंद बाहेरून अनुभवास येतो हा पाश्चात्य दृष्टीकोण आहे. व्यसनातदेखील माणसे निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ घेऊन बाहेरून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आनंद आतूनच मिळतो हा भारतीय दृष्टीकोण आहे. योगाद्वारे हा आतील आनंद अनुभवण्यास मिळावा असे वाटत असेल तर योगाच्या सरावाने शरीर आणि मनाचे संतूलन साधणे आवश्यक आहे. ते जर साधले तर दारुकडे लक्ष राहणार नाही असे ताई म्हणाल्या.

आसनांचा उपयोग रोग नाहिसे करण्यासाठी होऊ शकतो हे लोकांना आता ठावूक झाले आहे. मात्र त्यात सातत्य राखणे अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय काहीही होणार नाही हा मुद्दा जयश्रीताईंनी मांडला. याचा संबंध पुन्हा शिस्त याच विषयाशी होता असे मला वाटले. कारण धरसोड वृत्ती हा व्यसनाचा स्वभावच आहे. व्यसनात असताना व्यसन सोडून कसलेही सातत्य नसते. ध्यानीमनी फक्त व्यसनच असते. योगाभ्यासातून आरोग्यप्राप्ति करायची असेल तर सातत्याला महत्त्व आहे. योगातील राजयोग या मार्गात मनावर भर असतो तर हठयोगात शरिरावर भर राहतो. हठयोग हा शरीर एखाद्या साच्यात घालून घडवावं त्याप्रमाणे "मोल्ड" करतो. तर राजयोगात मनाच्या आधारे शरीरावर सकारात्मक परिणाम साधता येतो. एकंदरीतच जयश्रीताईंचा भर हा हठयोग आणि राजयोगाच्या समन्वयावर होता. पुढे जयश्रीताईंनी आसने करताना मनाची स्थिती कशी असावी याचे विवेचन केले. ते तर मला व्यसनमुक्तीच्या मार्गावर असणार्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचे वाटले. लेट गो म्हणजे "सोडून देणे" ही सोडून देण्याची सवय आसने करताना मनाला लागली पाहिजे. व्यसनी माणसाच्या मनात निरनिराळे विचार असतात. त्यातील बहुसंख्य विचार हे व्यसन कसे मिळवावे याबद्दल असतात. व्यसन सोडून दिल्यावर पुन्हा भूतकाळाचे विचार येऊ लागतात. हे सर्व बाजुला सारायचे असेल तर आसनाचा अभ्यास करतानाच मनातील विचार सोडून देण्याची सवय लावणे आवश्यक आहे. जयश्रीताईंच्या या सांगण्याचा व्यसनमुक्तीच्या दृष्टीने मी लावलेला अर्थ असा की माणसाने आसनात स्थिर असताना तेवढ्यापुरता तरी आसनावर, श्वासावर लक्ष द्यावे आणि आपल्या काळज्या, चिंतांपासून दूर व्हावे. अशा तर्‍हेच्या अभ्यासाची सवय झाल्यास त्याचा शरीरावर देखील चांगला परिणाम होतो असे ताई म्हणाल्या. योगाचा मार्ग हा स्वतःमध्ये बदल घडविण्याचा मार्ग आहे. बदल घडविणे ही गोष्ट सोपी नसल्याने माणसे त्याकडे लगेच वळत नाहीत. जयश्रीताई आरएबिटी सुद्धा शिकल्या आहेत. मानसशास्त्रातील समुपदेशनाच्या या प्रक्रियेचे त्यांना योगाशी खुप साम्य आहे असे वाटते हा मुद्दाही मला मननीय वाटला.

पुढे व्यसनमुक्तीच्या पथावर असणार्‍या माणसाला कुठल्याप्रकारचा योगाभ्यास शिक्षकाने द्यावा यावर जयश्रीताईंनी आपले विचार मांडले. अनेकदा असं दिसून आलं आहे की व्यसनात बुडालेली माणसे नैराश्यातदेखील बुडून गेलेली असतात. अशांना योगाभ्यास शिकवताना ध्यान अथवा शवासन शिकवणे धिकादायक ठरु शकते. शरीर आणि मनाचे संतूलन घडेल अशा तर्‍हेने योगाभ्यासाची योजना असावी. योगशिक्षकाने व्यसनमुक्तीच्या पथावर चालणार्‍या माणसांची शारिरीक क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे. कदाचित नुकत्याच व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचे शरीर व्यसनाच्या दुष्पारिणामांमुळे अनेक रोगांनी पोखरलेले असण्याची शक्यता असते. हे सांगत असतानाच योग शिकवण्यात अनेक वर्षे घालवलेल्या जयश्रीताईंनी योगशिक्षकांसाठीही काही गोष्टी सांगितल्या. त्याने नेहेमीच सभ्य वागणे आवश्यक आहे. अहंकाराची बाधा त्याला होऊ नये. कदाचित आपण व्यसनात बुडालेल्या लोकांना शिकवत आहोत त्यामुळे त्यांच्या बद्दल तुच्छतेची भावना शिक्षकाच्या मनात येण्याचा संभव जयश्रीताईंना वाटला असावा. पुढे मनःशांती राखण्यासाठी पतंजलींनी सांगितलेल्या सुप्रसिद्ध चित्तप्रसादन या उपायाबद्दल ताई बोलल्या. जेथे सुख दिसेल तेथे मैत्रिची भावना करावी, दु:ख दिसेल तेथे करुणा बाळगावी, शुभ असेल तेथे आनंद मानावा आणि अशुभाची उपेक्षा करावी. अशा तर्‍हेने वागल्याने मनाची शांती राहते आणि मनाच्या शांतीमुळे वातावरणातही आनंदाच्या लहरी वावरतात. या चित्तप्रसादनाला जयश्रीताईंनी अतिशय योग्य अशी चंदनाच्या लेपनाची उपमा दिली. शितल आणि सुगंधी असे लेपन. सुखदायी आणि मन प्रसन्न ठेवणारे. योगातील ब्रह्मचर्याचा अर्थ जयश्रीताईंनी मनोनिग्रह असा लावला. आत्मसंयमन कुठे ढळतंय हे जर कळू लागलं तर त्यावर उपायही सुचतो असे त्यांचे म्हणणे होते. मनोनिग्रहाचे महत्त्व आमच्या व्यसनमुक्त मित्रांना वेगळे सांगण्याची गरज नाहीच.

मुलाखतीच्या शेवटी जयश्रीताई करुणा या गुणविशेषाबद्दल विशेषत्वाने बोलल्या. हे खासकरून सहचरींसाठी होते अशी माझी समजूत आहे. माणसाने व्यसनकरून चुकीचे काम केले हे खरे पण त्याला आयुष्यभर शिक्षा केली तर सर्वांनाच त्रास होईल. सर्वांवर वाईट परिणाम होईल. त्यापेक्षा आता जुन्या गोष्टींची उपेक्षा करावी. त्यातून बोध घेऊन त्याचा पुढचे जीवन सुंदर करण्यासाठी उपयोग करावा. पतीपत्नी अनेक वर्षे एकत्र राहतात, व्यसनातही पत्नी त्याला सोडत नाही ते परस्परांबद्दल प्रेमभाव आहे म्हणूनच ना? त्यावर लक्ष द्यावे. जयश्रीताईं हे बोलत असतानाच त्यांनी स्वतः अंगिकारलेला करुणाभाव माझ्या लक्षात येत होता. व्यक्तीगत जीवनात अनेक वादळांना तोंड देऊन जयश्रीताईंनी मनाची शांती ढळू दिलेली नाही ती या करुणाभावामुळेच. योगासारख्या विषयांवर सुरेख आणि ओघवत्या शैलीत बोलणारी, लिहिणारी माणसे कमी नसतील. मात्र त्याप्रमाणे आचरण करणे महत्त्वाचे. जयश्रीताईंच्या वागण्या बोलण्यात हे आचरण जाणवत होते. पूर्वायुष्यात अगदी नृत्यापासून ते निरनिराळ्या तर्‍हेचे कपडे घालण्यापर्यंत आयुष्याच्या अनेक बाबींमध्ये रस असलेल्या जयश्रीताईंचा आता योग हा ध्यास झाला आहे. जयश्रीताईंकडून निघताना त्या मला अगदी रस्त्यापर्यंत सोडायला आल्या होत्या. या मुलाखतीतून मला बरंच काही शिकायला मिळालं होतं. निव्वळ थियरी नव्हे तर प्रत्यक्ष वागण्यातून योग जगणार्‍या जयश्रीताईंसारख्या व्यक्तींचा योगासाठी असलेला समर्पण भाव काही अंशाने तरी माझ्यामध्ये उतरावा असेच मला वाटले.

अतुल ठाकुर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सकारात्मक लेख. _/\_
अशासाठी परत परत मायबोलीवर यावेसे वाटते........ SAME HERE . VERY POSITIVE. I READ IT TWICE. THANK ATULJI ----_/\_