जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_ 11

Submitted by अन्नू on 1 May, 2018 - 04:20

फाटक्या माणसानं चंद्राची अपेक्षा ठेऊ नये.. त्याच्याकडे चंद्राच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच हाती येत नाही!

प्रेम करावं ते मुली गटवण्यात हुशार असलेल्यानं, धंदेवाईक तोंडावर गोड बोलून स्तुतीसुमनं उधळून फ्लर्टींग येणार्‍यानं! मनात खरं प्रेम बाळगणार्‍या साध्या लोकांनी नाही. कारण आज ना उद्या त्यांचं हरणं निश्चित असतं!

मॉलमध्ये तिला इनडायरेक्टली प्रपोज करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. यासाठी नाही की तिला ते आवडलं नाही पण यासाठी की तसं करुन मी तिला सगळ्यात जास्त दुखावलं होतं.
संपूर्ण प्रवासात ती घुम्यासारखी एकटी बसून होती. माझ्याकडे साधं बघायलाही ती तयार नव्हती.

काय विचार करत असेल ती आपल्याबद्दल? किती हलक्या दर्जाचा मुलगा आहे? की किती नालायक टपोरी मुलगा आहे?

छे! झालं तेच मुळी अनपेक्षित होतं.

एकवेळ ती नाही बोलली असती तर परवडलं असतं, पण अशी वागणूक? क्षणात एक गलिच्छ विचाराचा झालो होतो मी!
पण त्याहीवेळी ती काय विचार करतेय यापेक्षा ती आपल्यामुळे अशी हर्ट झाली याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं.
माझ्या मुर्खपणामुळे तिचं चेहर्‍यावरचं सगळं चैतन्यच हरवलं होतं. ती गंभीर उदास झाली होती, आणि हे मी विसरणं कधीच शक्य नव्हतं!

मी तिला घरापर्यंत सोडायला गेलो. तिला सॉरी वगैरे म्हणालो, पण एकदा फिस्कटलं ते फिस्कटलंच!
नंतर काही दिवस तिला फोन वगैरे करुन, कधीमधी भेटून

“काय उगीच विचार करतेस, मी मित्राचं सांगत होतो” वगैरे बोलून तिचं मन वळवण्यात यशस्वी झालो.

हे बोलताना अनंत यातना झाल्या पण..
ते दु:ख असंच.. मनातल्या मनात झाकून टाकलं. यावेळी सतत तिच्यासमोर हसमुख राहण्यासाठी पराचे कष्ट पडत होते.
पण काय करणार? पुरुष न आम्ही त्या वेदना सहन करुन त्याचा लवलेशही कधी चेहर्‍यावर येऊ दिला नाही.
काही दिवसांनी ते खरंच माझ्या मित्राचीच कहानी होती अशी खात्री पटून ती नॉर्मल झाली. आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेलं प्रेम मी मनातच कुठेतरी जीवंत गाढून टाकलं!

एके दिवशी अचानक तिच्याशी भेट ठरली. आता तिचे योगायोग, दैववाद याबद्दल विचार करणं मी सोडून दिलं होतं.
“आमचं पॅचअप झालं!” ती सहज स्वरात उद्गरली. मी काहीच बोललो नाही. काही वेळ इकड तिकडच्या गप्पा मारल्या शेवटी थोडं थांबून मी बोललो,

“मी लेख लिहितोय तुझ्यावर”

“हो? आणि काय लिहिणार? मी कशी आहे ते!” ती हसली

“आपली भेट कशी झाली. तुझ्याबाबतीतले माझे कोइंन्सिडन्ट...

एक भाग ऑनलाईनला टाकलाय, बाकीचे लिहितोय. कधी बघितलंस तर बघ- वर्डप्रेसवर तो लेख आहे आणि ऑनलाईनला माझं नाव अन्नू म्हणून आहे”

“अन्नू?” तिला ते नाव जरा विचित्र वाटलं

“माझं पेट नेम आहे ते- घरचं”

तिनं समजल्यासारखी मान डोलावली.

“लेखात तुझी इन्ट्री चौथ्या भागात होईल कदाचित, कधी काळी लेख बघितलास तर जरुर वाच- तो तुझाच आहे!”

“ह्म” ती नुसतीच हुंकरली.

बस्स.
तीच तिची शेवटची प्रतिक्रीया. पुढे तिनं जास्त काही विचारलं नाही. मी सांगितलं नाही.
यादरम्यान ऑनलाईनच्या माझ्या कथेमध्ये खूप जास्त गॅप पडायला लागले होते. चालू केली त्यावेळी दर दिवशी एक भाग पुर्ण करायचो. पण आता एका भागालाच वीस- पंचवीस दिवसांचा गॅप पडायला लागला होता. तिच्यावरच्या लेखाचीही वेगळी कथा नव्हती. त्यामुळे झटपट लिखाण उरकावं म्हणून मी लक्ष देत होतो.

त्या रात्री मी लेखामध्ये तिचं काहीतरी काल्पनिक नाव ठेवावं म्हणून विचार करत होतो. नाव तिच्या नावाच्या टोन्सशी मिळतजुळतं असावं म्हणून मी, अल्पा, अल्का, कल्पा अशी नावं निवडली. त्यातल्या त्यात कल्पा हे नाव योग्य वाटलं. वेगळं होतं आणि तिच्या नावाशी बरोबर साधर्म साधणारंही होतं. मी लगेच मोबाईलच्या नोट्समध्ये कल्पा नाव टाकून दिलं.

दुसर्‍या दिवशी बरोबर सकाळी दहाच्या ठोक्याला माझा फोन वाजायला लागला. मी झोपेतच तो मोबाईल डोळ्यांसमोर धरला. नंबर अननोन होता.
कोणाचा असेल? म्हणून मी कानाला लावला-

“हॅलो?”

“हॅलो मी कल्पा बोलतेय, प्रणित आहे का?”

कोण??

खाडकन् माझी झोप उडाली. मी नंबर पाहिला...

नाही. नंबर सेव्ह नव्हता. पण आवाज...
आवाज तर अगदी ओळखीचा होता आणि..

“हॅलो कोण बोलतंय?”

“अरे मी *** बोलतेय!” ती हसायला लागली,

“नाही ओळखलंस ना?”

“मघाशी कोणाचं नाव घेतलंस?”

“अरे ते असंच, नवीन नंबर आहे नं- तुला फसवत होते!” मी घट्ट डोळे मिटून घेतले.. योगायोग!
हे योगायोग माझा जीव नक्की घेणार होते!!!

“हॅलो, ए मंद- काय झालं?”

“अहं”

“अरे, संध्याकाळी नॅशनल डेअरीच्या इथे ये नं- मला तुला भेटायचं आहे..” ती बोलत होती आणि मी..
तिचं हे काल्पनिक नावही लेखाच्या यादीतून वगळण्याचा विचार करत होतो!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

हळूहळू उदासीचे दिवस बदलत गेले. परिस्थिती निवळली. ती अन मी पूर्वीसारखं(?) एकमेकांशी बोलायला लागलो.

हल्ली तिच्यात खूप बदल झाला होता. पहिल्यासारखे टिपिकल जुनकट छोटुकल्या मुलीसारखे कपडे सोडून, ती- चार चौघात उठून दिसेल अशा मॅच्युअर पंजाबी सलवार कमिजवर आली होती. अस्ताव्यस्त कुरळे केस, स्ट्रेटनिंग करुन मुक्तपणे रुंजी घालण्यासाठी गळ्याभोवती सोडले होते. फेशिअल करुन डल फेस क्लिनअप केला होता. त्यात दिवसभर ऑफिसमधल्या एसीत काम करत असल्याने रंगही उजळला होता. डोळ्यांवरचा काकुबाई टाईप चश्मा जाऊन त्याची जागा ब्लु लेन्सने घेतली होती. नथ गायब झाली होती. हातात स्काय ब्लू अ‍ॅन्ड व्हाईट कलरच्या मॅचिंग भरगच्च नाजुक बांगड्या आल्या होत्या. चप्पलची जागा ठोकळा हाय हिलच्या सँडलने घेतली होती. मुळातल्या नॅच्युरल ओठावर हॉट पिंक कलरच्या लिपस्टिकचा हलकासा थर आला होता. आणि कपाळावर तशीच हलकीशी एक चमचमणारी बिंदी आली होती. त्या दिवशी नॅशनल डेअरिच्या इथे तिने मला हेच बघायला बोलावलं होतं. मी आल्याबरोबर तिने विचारलं.

“प्रणित, मी कशी दिसते रे?”

“कशी म्हणजे?”

“अरे मी लेन्स लावलेय, तू बघितलं नाहीस का?”

“हो, कळलं मला ते”

“मग? कशी दिसतेय सांग ना, चांगलं दिसत नाही का?”

“चांगलं? तू पहिल्यापासूनच सुंदर आहेस!”

“ह्म्म..” तिने लाजुन हुंकार भरला,

“केस पण स्ट्रेट करुन घेतले. माहित्येय, पहिले किती इरिटेट वाटायचे आणि ते फेसपण...

ती बोलत होती. पण खरं सागायचं तर मी त्यावेळीही फक्त तिचं असणंच अनुभवत होतो. तिच्या बदललेल्या रुपाने किंवा सौंदर्याने मला जराही शॉक वगैरे बसला नव्हता. कारण हे रुप वरवर असलं तरी, ती यापेक्षाही सुंदर होती. हे मला...
इथून..
आतून कळलं होतं. खूप पुर्वीच. फरक इतकाच होता की तिला आत्ता त्याची जाणीव व्हायला लागली होती. त्यामुळे ती सातव्या आस्मानात होती. याच्या अगोदर तिने स्वत:ला कधी ओळखूनच घेतलं नव्हतं!

पुन्हा एकदा अगदी अशीच भेट ठरली. मी भेटायला गेलो. तर बोलत असतना तिनं सहजपणे बातमी दिली,
“मला दहिसरला जॉब मिळाला आहे”

“अरे वा! चांगलंय की मग!”

“चांगलं काय? मला ट्रेनमधलं काही कळत नाही”

“कळायचं काय आहे त्यात? चर्चगेटकडे जाणारी कुठलीही ट्रेन पकडायची, इथून दुसरं स्टॉप दहिसर!”

“नाही रे, मला नाही ते जमणार”

“मग?”

“मला रोज कोणीतरी गाडीने आणलं आणि पोहोचवलं पाहिजे”

“अरे वा! छान, मग तू कामाला जाणार का! आणि कोण करणार हे?”

“अफकोर्स तू”

‘अडलय माझं खेटार!!’ तोंडावर आलं होतं- पण तोंड आवरत गप्प बसलो, इतकंच म्हणालो-

“मला काय गरज?”

“तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना” (बॉयफ्रेंड गेला वाटत!)

“म्हणून मी यायचं का?”

“मग माझी काळजी तू करायला नको?” ती सहज बोलली असेल; पण ते बोलणं, मनाला चटका लावून गेलं- बोललो मात्र काही नाही!

“येशील ना?- माझ्यासाठी एवढं नाही करणार?” माझ्या चेहर्‍यावर खिन्न हास्य पसरलं

‘वेडे तुझ्यासाठीच तर इतक्या यातना सहन करुनही तुझे सगळे नकार पचवले ना!’

“चालेल, तू म्हणशील तसं- मी तुला रोज सोडेन आणि संध्याकाळी घ्यायलाही येईन”

“पक्का?.. बघं हं, नक्की ये”

“हो” मी उद्गरलो. ती खुश झाली.

हे तिलाही माहीत होतं... मलाही.
मी येणार नव्हतो अन... ती कधीच मला बोलवणार नव्हती- माझ्यासाठी थांबणार नव्हती! पण-
बोलण्याची एक पद्धत असते.
ती बोलली.
तिच्या त्या बोलण्यानेही मला बरं वाटलं.

काही दिवसांनी माझा ज्युनिअर कॉलेजचा एक मित्र भेटला- विशाल.
आम्ही खाडीकडे फिरलो, मस्त गप्पा मारल्या. त्याला भेटून मध्यंतरी खूप वर्षांचा कालावधी उलटला असल्याने आम्ही दोघेही खूप एक्साईट अन खुश होतो. काय बोलू अन काय नको असं झालं होतं. त्यावेळी कोणाकडेही फोन नव्हते; त्यामुळे कॉलेज सुटल्यावर, मला शोधायला त्यानं किती आणि कसे प्रयत्न केले, कसा माझा कॉन्टॅक्ट नंबर शोधून काढला वगैरे त्यानं ए टू झेड कथन केलं. ऐकून मी थक्क झालो, बरंही वाटलं- चला एक तरी जीवाभावाचा मित्र आहे- जो मला इतकं महत्त्व देतो!

मी सुस्कारा टाकला!
दहावीनंतर नवखे कॉलेजीयन दिवस डोळ्यांसमोर तरळले
च्यक्! काय दिवस होते ते. ज्युनिअर कॉलेजचे दोन वर्ष आम्ही एकाच बाकावर बसून शिकलो, एकमेकांचे चांगले दोस्त बनलो. मित्र म्हणून सुखदु:खे वाटली आणि आज?
इतके लांब गेलोय की एकमेकांना अगदी परकेच वाटायला लागलोय!

घरी बायको वाट बघत असेल म्हणून तो जायला उठला-
अरे हो, याचं लग्न झालंय नाही का? आता हा आपला कॉलेजचा एकटा विशाल राहिलेला नाही, त्याला संसार आहे- बायको आहे- त्याची जबाबदारी आहे!
मी उठलो. आम्ही दोघं स्टेशनच्या दिशेने चालत राहिलो. सहज त्याने माझ्याबद्दल विचारले. बोलताना तिचा विषय निघाला, माझ्या मनातलं सगळं मी त्याच्यासमोर बोलून दाखवलं. काही क्षण तो स्तिमित होऊन माझ्याकडे बघत होता.

“वळणावरच्या प्रत्येक मुलींना इतकं महत्त्व द्यायचं नसतं ---” तो सहज पण तितक्याच थंड स्वरात उद्गरला.
मी तसंच त्याच्याकडे पाहिलं- तो कोर्‍या चेहर्‍याने रस्ता तुडवत होता!

‘खरंय रे विशाल तुझं, मुली या जीवनातल्या वळणासारख्या असतात, आयुष्यात वळणं आली की माणसानं वळणाप्रमाणे वळावं- चालावं पण त्यात गुंतून पडून तिथेच आपलं आयुष्य थांबवू नये!’

एकेकाळी कॉलेजमध्ये हाही एका मुलीवर प्रेम करत होता. मुलगीसुद्धा याला पसंत करत होती. तिच्या वागण्यातून ते स्पष्ट दिसत होतं. पण याने स्वत:हून पुढाकार घेतला नाही, तीही कधी याला बोलायला आली नाही, दोघं एकमेकांच्या उत्तराची- योग्य वेळेची वाट पाहत राहीले, अन् शेवटपर्यंत दोघांत संभाषण असं झालंच नाही!
शेवटी ती कंटाळली अन दुसर्‍याचा हात पकडून त्याच्याबरोबर निघून गेली.
ज्यावेळी विशालला हे कळालं त्यावेळी त्याला खूप वाईट वाटलं, तो दुखावला गेला. सरतेशेवटी इतकंच म्हणाला-

“बरं झालं गेली ते, नाहीतर एखादं मुलगी किती वेळ वाट पाहणार? मीच वेड्यासारखं तिला झुरत ठेवलं होतं; पण आता ती आनंदात राहील!”

विशालचं मन विशाल होतं. त्यानं ती गोष्ट सहज पचवली. पण माझं मन तितकं विशाल नाहीये रे, मी एक साधा मुलगा आहे, दु:ख झालं तर मला वेदना होतात, त्यांना मी नाकारु शकत नाही.

“अजून तोच विचार करतोयस?”

“काय करु यार, खूप विसरण्याचा प्रयत्न करतोय- विसरता तेवढं येत नाही!”

मनावर उदासीची पुटं चढत असतानाच तो बाजुला सँडविच आणायला गेला.

मी बोलतच होतो-

“तुला माहीती आहे विशाल- या मुलीबाबत खूप विचित्र घटना घडत आहेत! मी सांगू शकत नाही कशा- का-...
पण ज्या-ज्या वेळी मला तिची आठवण येते किंवा मी मनापासून तिचं असं नाव काढतो त्या-त्या वेळी ती माझ्या... स मो र...”

माझं बोलणंच खुंटलं.. छातीत एकदम धस्स.. झालं. काही वेळासाठी तो पुर्ण क्षण तसाच गोठला गेला. सँडविच आणायला गेलेला विशाल- मी- आमच्या आजुबाजुची गर्दी- रस्ते- वाहनं- सगळे आवाज...

सगळं काही असं.. थांबलं गेलं. पाच किलोमिटर धावून आल्यासारखी माझ्या छातीची धडधड तिप्पट वेगाने होऊ लागली. मेंदवात झिणझिण्या आल्या. अगदी माझ्या दोन हात अंतरावरच...
ती चालत आली होती!
तिचं लक्ष नव्हतं.
दोन पावले पुढे येताच मी तिच्या डोळ्यांसमोर आडवा हात फिरवला-

“काय?”

“अरे तू? तू इथे कसा?” ती आश्चर्याने उद्गरली. इतक्यात बाजुला विशाल येऊन उभा राहिला-

“मी सांगत होतो न विशाल.... तिच ही! आणि...
हाच तो योगायोग!!”
विशाल आळीपाळीने माझ्या अन तिच्याकडे बघत होता....

विशालला मी तिची ओळख करुन दिली. खरं म्हणजे ओळख करण्याची गरजच नव्हती. काही सेकंदापूर्वी माझं तिच्याच विषयी बोलणं चाललं होतं. विशालही ते ऐकत होता अन अनपेक्षितपणे पुन्हा योगायोग साधत तिने त्या घटनांचा साक्षात्कार दिला होता!

“कशाबद्दल?” आमच्यातलं बोलणं माहीत नसल्याने तिनं विचारलं.

“मी विशालला सांगत होतो कि, आम्ही जीव तोडून एका मुलीवर इतकं प्रेम करतोय की- प्रत्येक ठिकाणी येता जाता ती दिसतेय, पण ती मुलगीच हे मानायला तयार नाही तर आम्ही काय करु? ती हो म्हटली तर आत्ता- इथे, लग्न करायला तयार आहोत! पण ती आमच्यातल्या प्रेमाला समजूनच घेत नाही!”

तिनं केसाची बट कानामागे अडकवत माझ्याकडे लाजून विचित्रपणे हसत बघितलं

‘हे काय नवीनच!’ ती नजरेनंच बोलली.

विशाल हसायला लागला-

“काहीपण बोलत असतो हा!” ती विशालला स्पष्टीकरण देत उद्गरली.

“अगं खरं तेच सांगतोय. बघ- तुला बघून छातीत किती धडधड व्हायला लागलेय ती!”

ती संकोचत पुन्हा लाजरं हसली.
“चल मी जाते”
“ह्म्म..”
मी नुसतीच मान डोलावली. (पालथ्या घड्यावर पाणी!)

“.. जा!”

ती गेली. पुन्हा एकदा माझं बोलणं हवेत विरुन गेलं होतं. कष्टी नजरेनं मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिलो-

“चल- मला स्टेशनपर्यंत घालवायला येतोस नं..” माझ्या खांद्यावर आधाराचा भक्कम हात टाकत विशाल उद्गरला....
=================================================================
क्रमश:

भाग=>> 12

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

छान!
सत्यकथा आहे का ही?

“वळणावरच्या प्रत्येक मुलींना इतकं महत्त्व द्यायचं नसतं ---” >> बरोबर आहे.

अन्नू आज एका दमात सगळे भाग वाचले....जबरदस्त...या कथेतले काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले आहेत.....योगायोग....!!!!