पश्चिमरंग - चित्रपट - द डार्क नाईट(The Dark Knight)

Submitted by भागवत on 30 April, 2018 - 07:09

२००८ ला एका संध्याकाळी माझा मित्र रूमवर आला आणि एका चित्रपटा बद्दल बोलताना सांगीतले की जोकरने पूर्ण चित्रपट खाल्ला आहे. त्या वेळेस मी चित्रपट बघितला नव्हता. “हा जोकर कोण” हा विचार मा‍झ्या मनात आला होता? ज्या वेळेस जोकर साकारणार्‍या कलाकाराला (हिथ लेजर/Heath Ledger) ऑस्कर मिळाला तेव्हा मी हा चित्रपट बघितला. मला खूपच आवडला. मी १५-२० वेळेस या चित्रपटाचे पारायण केली असतील. त्या पैकी १० वेळेस मी फक्त मध्यंतरा पर्यंतच पाहीलेत. हा चित्रपट मा‍झ्या यादीत पहिल्या पाच चित्रपटात आहे. बॅटमॅन चित्रपट मालिकेतला दुसरा भाग आहे. तरी पण पहिला न बघता दुसरा चित्रपट बघितला तरी विशेष अशी उणीव जाणवत नाही आणि पहिला भाग बघितल्यास उत्तमच. आणि क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) या अ‍वलियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नोलन यांचे चित्रपट अफाट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाला IMDb या साईट वर पहिल्या पाच चित्रपटात तिसरे मानांकन असून समीक्षा मूल्यांकन ९.० आहे.

एखादा चित्रपट तुम्हाला का आवडतो याची भरपूर कारणे असतात. तर मा‍झ्या साठी चित्रपट परत पाहण्या लायक असला पाहिजे. या चित्रपटात काय नाही? एक जबरदस्त खलनायक, एक अति आदर्शवादी नायक, दोघांच्या विचारसरणीचा संघर्ष, सगळ्यांचा अप्रतिम अभिनय, पटकथा, पार्श्वसंगीत, कथेवर केलेली कठोर मेहनत, तगडी स्टार कॉस्ट आणि सुंदर संवाद. हे सगळं “The Dark Knight” या इंग्रजी पटात आहे.

पार्श्वसंगीताचा सुंदर सदुपयोग या चित्रपटात केला आहे. हॅन्स झिमर(Hans Zimmer) यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाची सुरुवातच बँक लुटण्या पासून सुरू होते. पहिल्याच फ्रेम पासून संगीत तुमच्या थेट हृदयात उतरत जाते हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नायक, खलनायक यांच्या धडाकेबाज प्रवेशाला आणि समोरा-समोर येताना जबरदस्त संगीताचा उपयोग केला आहे. मला तर वाटते पार्श्वसंगीत चित्रपटा इतकेच काय किंबहुना जास्त सुप्रसिद्ध झाले असेल.

ख्रिस्तीयॅन बेल/Christian Bale याने बॅटमॅन/ब्रुस वेनेन साकारताना जीव ओतला आहे भूमिकेत. एक आदर्श वादी नायक, विविध शस्त्रानी सुसज्ज, धनाढय कंपनीचा मालक, रात्री शहरावर पाळत ठेवून, दिवसा ऑफिस मिटिंग मध्ये झोपणारा, प्रतिज्ञा आणि तत्व पाळणारा. बॅटमॅन सगळ्या गुंडांचे काळे धंदे आणि त्यांचे साम्राज्य खल्लास करतो. (District Attorny) निष्णात सरकारी वकीलाचा (हार्वे डेन्ट/Harvey Dent) प्रवेश झोंकात होतो. त्याचा या क्षेत्रात दरारा असतो. पोलीस तर गुंडावर, माफियावर टपून बसलेले असतात. गुंडांना रात्री तर सोडा दिवसा-ढवळ्या सुद्धा काळे धंदे करता येत नाहीत. त्यात नवीन सरकारी वकीलाचा, पोलीस, आणि बॅटमॅन हे तिघं मिळून त्यांच्या माफियाचे पैसे असलेल्या बँकेवर धाड टाकून माफियाच्या नाका-तोंडातून पाणी पळवतात आणि त्यात त्यांना एक सर्कशीतील दिसणारा जोकर बॅटमॅनला मारण्याच्या प्रस्ताव देतो.

या चित्रपटाचा खलनायक तर आत्ता पर्यंतच्या सगळ्या खलनायकाला पुरूनच उरला आहे. पण त्याचे नाव आहे जोकर. अत्यंत खुनशी, घातकी, मनोविकारी,आततायी, सर्कशीतल्या जोकर सारखा रंगवलेला चेहरा, अफलातून संवादफेक. जोकरला त्याच्या चेहर्‍या बद्दल प्रत्येक वेळेस नवीन कथा सांगावी वाटते. प्रत्येक कथा सांगताना एकतर तो मुलगा असतो किंवा नवरा असतो. “Why so serious?” प्रत्येक वेळेस हा संवाद वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतो. हा चित्रपट या खलनायकाने खाऊन टाकला आहे. काही संवाद तर अतिशय उत्कृष्ट आहेत, “If you're good at something, never do it for free.”, “I believe, whatever doesn't kill you, simply makes you... stranger”, ““As you know, madness is like gravity...all it takes is a little push.”, "Introduce a little anarchy. Upset the established order, and everything becomes chaos. I'm an agent of chaos...”

आल्फ्रेड पेनीवर्थ/Alfred Pennyworth हा बॅटमॅनचा बटलर आणि सल्लागार असतो. तो त्याला एक सांगतो की अफगाणिस्तान मध्ये एक डाकू हिरे आणि मानके चोरायचा आणि रस्त्यावर टाकून द्यायचा. तो सांगतो की काही लोकांना फक्त लुटणे माहीत असते आणि त्यांना लुटी मध्ये काही स्वारस नसते. बॅटमॅन आणि जोकर एकमेकांना पूरक असतात. बॅटमॅन अति आदर्शवादी आणि जोकर अनागोंदी कारभाराचा प्रतिनिधी यांच्यातील सामना बघणे संस्मरणीय असते. इथे बेताल अविचारी माणूस आणि तत्वाचा सामना असतो. बॅटमॅन समोर दोन पर्याय असतात एक तर सरकारी वकील किंवा त्याची प्रेमिका यांना वाचवायचे. बॅटमॅन वकीलाला वाचवतो. आणि हॉस्पिटल मध्ये जोकर वकिलाला त्याच्या प्रेमिकेला मारण्याचे स्पष्टीकरण देऊन म्हणतो मी नियोजन करणारा माणूस नसून मी अनागोंदी, अंदाधुंद कारभाराचे प्रतिनिधीत्व करतो. मग काय एका चांगल्या वकीलाचे बेधुंद माणसात रूपांतर होते आणि हार्वे अंदाधुंद आणि सूडाने पेटून उठतो. त्याचे ‘टू फेस’ असे नाव सार्थ होते.

गोथम या जरी काल्पनिक शहरात कथा घडत असली तरी गोष्ट जवळची वाटते. लुसियस फॉक्स/Lucius Fox या पात्राचा उल्लेख नाही केला तर चित्रपटाचा अपमान होईल. शांत, गंभीर, संयमी व्यक्तिरेखा साकारली आहे. फॉक्स वेनेन यांच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. बॅटमॅनला लागणारे सर्व शस्त्रं फॉक्स पुरवठा करत असतात. वेळोवेळी सल्ला, मसलत करत असतात. पोलीस जेम्स गॉर्डन यांच्या भूमिकेत गॅरी ओल्डमन/Gary Oldman आणि रॅचेल डेव्हस/ Rachel Dawes हिच्या भूमिकेत मॅगी जिलेनहाल/ Maggie Gyllenhaal यांनी सुंदर व्यक्तिरेखा उत्तम निभावल्यात. रॅचेल ही बॅटमॅनची पूर्वाश्रमीची प्रेयशी असते. पोलीस जेम्स हा हार्वेच्या अंधाधुंदीचा शिकार होणार असतो पण बॅटमॅन त्याला आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवतो.

हा चित्रपट आवडण्याचे माझे मुख्य कारण असे की बॅटमॅन आणि जोकरचा हा अटीतटीचा, नीतिमत्ता, आणि तत्वाचा सामना असतो. एक बेधुंद, मनोविकारी, अंदाधूंदी पसरवणारा, अति धूर्त माणूस आणि दुसरा मूल्य वादी, प्रामाणिक, आणि सुपरहिरो यांच्यातिल सामना असतो. त्याला उत्तम पार्श्वसंगीताची साथ, प्रखर संवाद, अति उत्तम अभिनय, भक्कम कथा, पटकथा यांची मोलाची साथ यामुळे चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जातो. शेवटी फॉक्स एका अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ते जोकरला पकडून देतात आणि संच नष्ट करतात. शेवटी बॅटमॅन तत्वत जिंकतो हे सांगणे न लागे. पण त्याला जिंकण्याची किंमत मोजावी लागते. मी पाहीलेला सर्वोत्कृष्ट खलनायक जोकरला म्हणेन. हिथ लेजर या अभिनेत्याने या भूमिकेला चार-चांद लावलेत. ही भूमिका वठविण्या अगोदर हिथ ने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले होते. त्याने या भूमिकेचा सखोल अभ्यास केला. शेवटी या भूमिकेशी हिथ इतका एकरूप झाला की अति-विचाराने आणि ड्रग्सने या कसलेल्या अभिनेत्याचा २२ जानेवारी २००८ या दिवशी द डार्क नाईट चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर जीव घेतला.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.

आम्ही स्पायडरमॅनचे फॅन आहोत पण बॅटमॅन ट्रायोलॉजी मधला हाच चित्रपट मला सगळ्यात जास्त आवडलेला.

मी बघितलेला सर्वोत्कृष्ट खलनायक जोकरला म्हणेन. >> मीपण

imdb ला आपली गुणांकन पद्धत बदलावी लागली होती कारण भक्तांनी याला नम्बर १ वर आणायला गठ्ठा मतदान चालू केले होते.
https://www.thecinemaholic.com/the-dark-knight-does-not-deserve-an-imdb-...
हा लेखदेखील वाचून बघा.

===
आत्ता परवाच १९८४ चा बॅटमॅन बघितला. त्यात जॅक निकोलसन जोकर आहे.

धन्यवाद अॅमी!!!
https://www.thecinemaholic.com/the-dark-knight-does-not-deserve-an-imdb-... ही नवीनच माहिती आहे माझ्यासाठी.
धन्यवाद!!! परंतु बऱ्याच top ten लिस्ट मध्ये या चित्रपटाचे नाव आहे. खरच आहे God knows.
आत्ता परवाच १९८४ चा बॅटमॅन बघितला. त्यात जॅक निकोलसन जोकर आहे ++१

नाव बदला, हा नाईट डॉर्क नसून डार्क आहे !!

डॉर्क चा अर्थ "a dull, slow-witted, or socially inept person." असा होतो Lol

पूर्ण लेखातील शुद्धलेखन तपासून घेण्याची गरज आहे. बर्‍याच लोकांच्या नावाचे मराठीकरणसुद्धा चुकलेले आहे.

एक बेधुंद, मनोविकारी, धूर्त, अंदाधुंद माणसाचे प्रतिक आणि दुसरा मूल्य वादी, प्रामाणिक, आणि सुपरहिरो यांच्यातील सामना असतो. >>>>>>

माझा या ओळी वर आक्षेप आहे.. जोकर अंदाधुंद विचार करणारा नव्हता. हे त्याच्या पहिल्या बॅंकचोरीने स्पष्ट होते..

प्रतिसादासाठी धन्यवाद 'धनि'!!!
नाव बदला, हा नाईट डॉर्क नसून डार्क आहे !! >> बदल केला आहे.
पूर्ण लेखातील शुद्धलेखन तपासून घेण्याची गरज आहे. बर्‍याच लोकांच्या नावाचे मराठीकरणसुद्धा चुकलेले आहे. >> मला मान्य आहे. त्यांच्या नावाचे मराठीकरण करणे थोडे अवघडच काम आहे.

धनि, दत्तू वगैरेंनी दाखवलेल्या त्रुटी असूनही छान लेख. मी ही सिरीज पाहिलेली नाही त्यामुळे चांगली ओळख झाली.

जिल्हा वकील हे district attorney चे भाषांतर दिसते. आपल्याकडे याच्या सारखे पद म्हणायचे तर पब्लिक प्रॉसीक्यूटर म्हणावे लागेल. त्याचा मराठी प्रतिशब्द माहीत नाही. सरकारी वकीलच पण विविध केसेस उभ्या करण्याचे काम तो करतो. कदाचित सरकारी वकील हेच असेल. काउण्टी चा असेल तर डीए, राज्याचा असेल तर स्टेट अ‍ॅटर्नी.

प्रतिसादासाठी धन्यवाद दत्तू !!!
एक बेधुंद, मनोविकारी, धूर्त, अंदाधुंद माणसाचे प्रतिक आणि दुसरा मूल्य वादी, प्रामाणिक, आणि सुपरहिरो यांच्यातील सामना असतो. >>>>>> बदल केलेला आहे. "एक बेधुंद, मनोविकारी, अंदाधूंदी पसरवणारा, अति धूर्त माणूस आणि दुसरा मूल्य वादी, प्रामाणिक, सुपरहिरो यांच्यातील सामना असतो."
जोकर स्वतः म्हणतो "I'm an agent of chaos..."

प्रतिसादासाठी धन्यवाद फारएण्ड !!!
जिल्हा वकील हे district attorney चे भाषांतर दिसते. >> हो. जिल्हा वकील बदलून सरकारी वकील असे समजणारे नाव टाकले आहे. इतर सुद्धा बदल केले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया लिखाण आणखी व्यवस्थित करण्यासाठी मदत होत आहे. धन्यवाद!!!

मला जर P.H.D करायची कधी इच्छा झाली तर ती जोकर कॅरेक्टर वर नक्कीच असेल.. >> Light 1 Light 1
मी जोकर सोबत प्रत्येक नवीन खलनायकाची तुलना करतो.