एकवीस वर्षांनी -भाग १

Submitted by आनंद. on 29 April, 2018 - 11:20

"एकवीस वर्षांनी ―भाग १"

.
.
.
.
.
"तीन वर्षांनंतर !"

त्या दोन शब्दांचा प्रतिध्वनी तीच्या कानांवर पुन:पुन्हा उमटत राहीला. डोळ्यांसमोरील त्यांची प्रतिमा तीच्यापासून दूर जात हळूहळू धूसर बनली आणि शेवटी बाहेरील काळोखात सामावून गेली. आपल्या डोळ्यांमधून खाली गालांवर ओघळलेल्या पाण्याच्या दोन थेंबांनी ती भानावर आली. स्वत:च्या नकळत तिनं खाली बघत आपल्या पोटावरून अलगद हात फिरवला आणि बाजूला बघितलं. आयसीयुच्या पारदर्शक बंद खिडकीतून नाकाला ऑक्सीजनचा मास्क लावलेला तो तीला दिसत होता. बराच वेळ ती त्याला एकटक बघत राहीली. हळूहळू तीच्या पापण्या जड होत चालल्या आणि ती शांत झोपी गेली !

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

दिवस मावळतीकडं झुकला होता. हळूहळू डोंगराच्या आड जाणारा सूर्य पश्चिम क्षितिजावर तांबड्या पिवळ्या रंगांची मुक्तहस्ते उधळण करत होता. अनंतरंगांनी उजळून निघालेल्या आकाशात पाखरांचे थवे आपापल्या घरट्यांकडे परतताना दिसत होते. डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या गर्द झाडीतून नागमोडी वळणं घेत लोकवस्तीकडं आलेल्या खळखळ आवाज करत वाहणाऱ्या ओढ्याच्या तीरावरील गावाकडच्या बाजूला असलेली स्मशानभूमी लोकांच्या गर्दीनं तुडुंब भरून गेली होती. तिथं जमलेली बाया माणसं शोक करत होती. तिथं आलेला प्रत्येकजण मनापासून हळहळ व्यक्त करत होता. गावातील कुणीतरी पुण्यात्मा त्याच्या अखेरच्या प्रवासाला निघाला होता. गावापासून स्मशानापर्यंत मिरवणूकीनं आणलेला हाराफुलांनी भरून गेलेला तो देह अग्नीज्वालांच्या स्वाधीन होत होता, अनंतात विलीन होण्यासाठी !

नि:स्तब्ध झालेला तो एकटक समोर जळणाऱया चितेकडं बघत राहीला, शून्य नजरेनं ! त्याच्या डोळ्यांमधून अविरतपणे अश्रूधारा वाहायला लागल्या. त्या वाहणाऱ्या अश्रूंमध्ये दिसत असलेल्या ज्वालांच्या पडलेल्या प्रतिबिंबामुळे तो बघणाऱ्याला विलक्षण भेसूर भासत होता. समोरील अग्नीज्वालांचं चाललेलं तांडव त्याला मूकपणे काही सांगू पाहत होतं, कदाचित एखादं काळाच्या उदरात गुडूप झालेलं आणि जगाला अज्ञात असलेलं गुपित...

'सदाशिवराव पाटील'
जोवळ्याचे पाटील !

गजबजलेल्या शहरी वातावरणापासून अगदीच अलिप्त असलेलं दूरवर सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेलं एक लहानसं खेडं असणारं जोवळे, पन्नासेक उंबरठ्यांचं गाव निसर्गाच्या सुंदर कुशीत लपलं होतं. गावाच्या तिनही बाजूंना पसरलेले तीन वेगवेगळे उंचच उंच डोंगर, लोकवस्तीपासून थोडासा दूर गावाच्या एका बाजूने वाहणारा एक बारमाही पाणी असलेला ओढा, त्याच्या पल्याड डोंगराच्या पायथ्याशी पसरलेलं घनदाट जंगल, गावातील जुन्या पद्धतीचे वाडे म्हणवून घेणारे खणाचे बांधकामं आणि गावातील लोकांचा शेतात असलेला राबता, मुबलक पाणी असल्यानं गावकऱ्यांच्या पदरी सुखाचं दान टाकणाऱ्या जमिनी हे सगळं जोवळ्याचं वैशिष्ट्य होतं. सुखी आणि स्वावलंबी जीवनमान असणाऱ्या या गावाला तेथील बड़या बुजूर्गांनी आपल्या सततच्या प्रयत्नांनी सामाजिक स्थैर्य मिळवून दिल्यानं तेथे बऱ्यापैकी एकोप्याचं समाजजीवन आणि शांतता नांदत होती.
याच गावाचे पाटील असणारे सदाभाऊ आज पहाटे गाढ झोपेत असतानाच एकाएकी निघून गेले. त्यांची जाण्याची पुसटशी चाहूलही कुणाला लागली नव्हती आणि जाण्याचं त्यांचं वयही नव्हतं. काल रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शंकरनानांशी नेहेमीप्रमाणे गप्पा मारून झाल्यानंतर ते घरी परतले होते आणि आज पहाटे शेजारच्या कुसुमवहिनीने रोजच्यासारख्या दिलेल्या आवाजाला आतमधून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून बघितलं असता सदाभाऊ गेल्याचं शेजाऱ्यांना समजलं होतं. लगोलग शेजाऱ्यांनी शंकरनानांना बोलावणं धाडलं. दहा पंधरा मिनिटांतच नाना हजर झाले. सदाशिवाचं समोर दिसत असलेलं निष्प्राण कलेवर बघून नानांचा भावनांचा बांध फुटला आणि 'सssदाssव्' अशी मोठ्यानं साद घालून त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. आपला लहानपणापासूनचा यार आपल्याला न सांगताच दूरवर निघून गेल्याचं बघून त्यांना वाईट वाटलं. कितीतरी वेळ ते सदाचं पार्थिव कवटाळून शोक करत होते. जमलेल्या गावकऱ्यांना सदाभाऊ आणि शंकरनानांच्या असलेल्या जिवलग मैत्रीचा अखेरचा प्रत्यय समोर चाललेल्या आकांतामधून दिसून येत होता. तेथे उपस्थित असलेला प्रत्येकजण नानांचा शोकालाप बघून सद्गदीत झाला होता. घडल्या घटनेनं एकाएकी उचंबळून आलेल्या भावनांचा ओघ जरा वेळाने थोडासा ओसरला आणि नानांना चैतन्यची आठवण झाली. त्यांनी जवळच उभा असलेल्या पिंट्याला चैतन्यला निरोप देण्यासाठी फोन करायला म्हणून आठ दहा किलोमीटर दूर घाटमाथ्यावर असलेल्या वाडीला पिटाळलं होतं.

'भाऊ अत्यवस्थ' भल्या सकाळीच फोनवर मिळालेल्या या बातमीनं चैतन्य एसटीचा आठ दहा तासांचा प्रवास करून गावाकडे परतला होता. तो येईपर्यंत सदाभाऊंच्या अंतिम संस्कारांची पुर्णत: तयारी करून झाली होती.
येथे आल्यानंतर ज्यावेळी भाऊ गेल्याचं चैतन्यला समजलं तेव्हा तो विमनस्क झाला.. काय करावं, काय बोलावं; त्याला काहीही सुचेनासं झालं होतं. नानांच्या गळ्यात पडून तो धाय मोकलून रडला होता, कितीतरी वेळ...

...आणि आता समोरच्या ज्वालांमध्ये तो आपल्या बापाची प्रतिमा शोधत होता, निर्विकार चेहऱ्यानं ! त्या लाकडांच्या तडकणाऱ्या आवाजामधून भाऊंचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता.

अंधार दाटायला सुरूवात झाली. चितेच्या ज्वालाही आता मंदावत चालल्या होत्या. चैतन्य अजूनही तेथेच उभा होता, तसाच शून्य नजरेनं समोर बघत. अचानक कुठूनसे भाऊ सामोरे येतील, 'चैतssन्यss' म्हणून मला हाक मारतील आणि मग मी दूडुदूडु धावत त्यांच्याकडे जाईल.. आणि... त्याला लहानपणीचे बाबा आठवू लागले.
'पान' लागल्याचं निमित्त होऊन आई सोडून गेली त्यावेळी तो फक्त अडीच वर्षांचा होता. आता त्याला ती आठवतही नव्हती. आई गेल्यानंतर सदाभाऊंनी त्याला कधीही तिची उणीव भासू दिली नव्हती. आई आणि बाबाची दुहेरी भुमिका पार पाडत भाऊंनी त्याला लहानाचं मोठं केलं होतं. त्याचा प्रत्येक हट्टं त्यांनी पुरवला होता. गावातलं चौथीपर्यंतचं शिक्षण संपताच त्यांनी त्याला हायस्कूलच्या शिक्षणासाठी तालुक्याला पाठवलं आणि दहावीनंतर दूर जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यानं शहरात जाऊन शिकावं यासाठी आग्रह धरणाऱ्या भाऊंनी त्याच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी आपल्या चार एकरातील दोन एकर जमीन विकून त्याला पैसे पुरवले होते पण आज लौकिक अर्थाचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधी ती बातमी ऐकायलाही ते सोबत उरले नव्हते.

"का ? का बरं सोडून गेलांत बाबा ?"
चैतन्य आपल्या मनाशीच प्रश्न विचारत होता.
लहान असताना आई गेली आणि आज आता एकाएकी बाबा.. आज खरोखरच तो अनाथ-पोरका झाला होता. जवळचं म्हणता येईल असं कुणीही आता त्याच्यासाठी या जगात उरलं नव्हतं, एक 'ती' सोडली तर... अशा परिस्थितीतही त्याला 'ती' आठवली !

बाबा गेल्यानं आता चैतन्यच्या जीवनात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली, जी केवळ असह्य होती. दु:खातीरेकानं जड झालेल्या पावलांनी तो लोकांच्या गर्दीबरोबर घरी परतला.
'मला एकटं सोडा' म्हणत त्यानं गावकऱ्यांना निघून जाण्यास सांगितलं तसं शंकरनानांनी तेथे जमलेल्या बायाबापड्यांना चालतं होण्यास फर्मावलं. नानांसमोर बोलण्याची कुणाचीच टाप नव्हती. लोकं आपापल्या घरी निघून गेले.

"पोरा, तू दु:खात आहे कळतंय रे पण.."
शून्यात बघत असलेल्या चैतन्यला थोड्या वेळाने नानांनी म्हटलं..

"पण काय नाना ?" बऱ्याच वेळानं त्यानं नानांना विचारलं.

"हे तेरा दिवस संपताच तू इथनं, या गावातून निघून जा..कायमचा." जड अंत:करणानं नाना म्हणाले.

"का ?"

"कारण... कारण तुझ्या बापाची तशी इच्छा होती. तू येथे, या गावात राहू नये असं त्याला वाटत होतं. "

"हम्म ! पण का... का वाटत होतं त्यांना तसं ?" त्यानं थंडपणे पण अधीरतेनं नानांना विचारलं कारण त्याला कळायला लागल्यापासून त्यानं जोवळ्यात रहावं असं भाऊंना कधीही वाटलं नव्हतं हे त्याला माहीत होतं. का ते आज त्याला नानांकडून जाणून घ्यायचं होतं.

"पोरा, काय करायचं तुला ते माहीती करून घेऊन ? तुझं येथून निघून जाणं हेच तुझ्यासाठी भल्याचं आहे."

"मला माहीतीय, भाऊंनी आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून काहीतरी लपवलेलं आहे.. मला काय ते आतातरी कळू द्या." चैतन्य नानांना विनंती करत म्हणाला..

"झोप पोरा.. झोप. उशीर झालाय. आपण नंतर बोलू." विषयाला टाळत नानांनी त्याला आराम करण्यास सांगितलं. त्यावर तो काहीही बोलला नाही.

घरासमोरच्या अंगणात टाकलेल्या बाजेवर जाड गोधडी अंगावर पांघरून तो पडून राहीला. रात्री उशीरापर्यंत तो या अंगावरून त्या अंगावर करत तळमळत होता. पहाटे कधीतरी त्याला गाढ झोप लागली.

क्रमश:

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

―₹/२९.०४.१८

Group content visibility: 
Use group defaults

छान सुरूवात.. पुभाप्र..
हळूहळू डोंगराच्या आड जाणारा सुर्य पच्छिम क्षितिजावर तांबड्या पिवळ्या रंगांची मुक्तहस्ते उधळण करत होता. >> इथे पश्चिम हवं ना?

मस्त आहे सुरूवात. वर्णन छान जमलंय. पुढे काय होईल उत्सुकता लागलीय.

'पान' लागल्याचं>>>> पान लागणं म्हणजे काय हो? श्यामच्या आईतही असं काहीसं वाचलेलं आठवतंय. बहुतेक रानात साप चावून मृत्यू असा अर्थ आहे का?

सायु, च्रप्स, जुई प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! Happy

@पान लागणे―
हम्म जुई ! पान लागणे म्हणजे साप चावून मृत्यू होणे.

पूर्वी साप चावला असता तो विषारी की बिनविषारी हे ठरवण्यासाठी दंश झालेल्या ठिकाणी विड्याचं पान लावून बघण्याची पद्धत होती. साप विषारी असेल तर पानाचा रंग काळसर पडायचा आणि बिनविषारी असेल तर रंग बदलत नसे असं ऐकलेलं आहे.(स्वत: बघितलं नसल्याने नक्की सांगू शकत नाही.) त्याच्यावरून हा शब्द प्रचलित झाला असावा..
रानात विळ्याने गवत कापत असताना तसेच खुरपताना साप चावण्याच्या घटना घडतात अशावेळी 'पान लागलं' असाच शब्दप्रयोग गावातील आजीआजोबामंडळी आजही करतात.

पूर्वी साप चावला असता तो विषारी की बिनविषारी हे ठरवण्यासाठी दंश झालेल्या ठिकाणी विड्याचं पान लावून बघण्याची पद्धत होती. साप विषारी असेल तर पानाचा रंग काळसर पडायचा आणि बिनविषारी असेल तर रंग बदलत नसे असं ऐकलेलं आहे.(स्वत: बघितलं नसल्याने नक्की सांगू शकत नाही.) त्याच्यावरून हा शब्द प्रचलित झाला असावा..
रानात विळ्याने गवत कापत असताना तसेच खुरपताना साप चावण्याच्या घटना घडतात अशावेळी 'पान लागलं' असाच शब्दप्रयोग गावातील आजीआजोबामंडळी आजही करतात. >>>>>>>>>>>>> अच्छा असं आहे होय. माहितीबद्दल धन्यवाद हं. Happy

पंडितजी, कुसुमिता१, अधांतरी, सिद्धी,कावेरी, विनिताताई, अक्की३२०, अधरा, राया प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.. Happy
शक्य तितक्या लवकर पुढचा भाग टाकतो.

छान सुरुवात केलीय. आवडलं.

शेवटी वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करून क्रमशः ची पाटी लावली. ही कल्पना आवडली. आता वाचक पुढचा भाग वाचनारच.