आमच्या कडे टीव्ही नाही-

Submitted by अश्विनी शेंडे on 25 April, 2018 - 22:31

आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...
आजही त्याला टीव्ही घ्यावासा वाटलेला नाही- त्याचं क्रिकेट तो starsports.com वगैरे साईट्सवर बघतो. हॉलिवूडच्या सिरीज, जागतिक चित्रपट आम्ही युट्यूब वरून पाहातोच... पाहणं बंद नाही झालं, पण काय पाहावं ह्याचा रिमोट ख-या अर्थाने आमच्या हातात आलाय.जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो.. दैनंदिन मालिका, कुठल्या पार्टीला कोणी काय घातलं होतं, काय घातलं नव्हतं सारखी gossips, प्रेमी ने की खुद्खुशी, प्रेमिका बनी हत्यारन अश्या प्रकारच्या उठवळ बातम्या, सवंग राजकारणाचे बेचव तवंग आणि कानाचा कॅन्सर होईल असं संगीत असलेली नवी गाणी... हे सगळं आमच्या घरात ऐकू येत नाही... आमच्याकडे ऐकू येतं निलाद्री, अमित त्रिवेदी, किशोर कुमार, कुमार गंधर्व, आशा ताई, खळे काका, यान्नी, कॅथरिन macfee, रेहमान, भाईंचं हार्मोनियम, रशीद खान, झाकीर भाई, Kaushal S Inamdar , Vaishali Samant, कोक स्टुडीओ, नाच रे मोरा, कबीर, अबिदा, अभंग तुकयाचे, तलत, बीथोवन.... हे सगळं आमच्या घरात सुरु असतं... पेपर मध्ये आज काय वाचलं, Umesh Vinayak Kulkarni ने कसला अप्रतीम लेख लिहिला आहे एफटीआय वर.. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक आणि आजचा दिवस कसा गेला, जेवण कसं झालंय इथपासून आज काय किस्सा झाला... हे सगळे विषय येतात बोलण्यात... हां, बोलणं होतं... संवाद होतो... एकमेकांशी... ऑफलाईन संवाद... जिथे स्मायलीज आणि emoticon एकमेकांच्या चेह-यावर पाहतो आम्ही...
मी लहान होते, डेली सोप तव्हा नुकतेच पाय रोवू लागले होते... रोज एका विशिष्ट वेळी टीव्ही समोर बसायची सवय सगळ्यांमध्येच रुजायला लागली होती... शाळेतून घरी येऊन मी “रिश्तों के भी रूप बदलते है...नये नये सांचे मे ढलते है...” अशी सुरवात होणारं क्योंकी सांस भी कभी बहु थी अत्यंत आवडीने बघायला बसायचे... ducktales, small wonders आणि एकूणच टीव्ही बघत जेवणे, जेवता जेवता टीव्ही बघणे माझ्या दिवसातला महत्वाचा भाग बनून गेलं होतं... आईला त्याकाळी (आणि अजूनही) मी सहज गुंडाळायचे... त्यामुळे तिला जुमानत नव्हते- अखेर तिने बाबांकडे फिर्याद नोंदवली-
माझे बाबा म्हणजे सॉलिडच आहेत... सेन्सिबल freedom देणारे... ते म्हणाले मी बघतो... आई म्हणाली बघू नका... तो टीव्ही बंद करून टाका...
बाबा म्हणाले, नाही, आपण टीव्ही बंद केला तर ती तो पुन्हा लावणार... तिनेच तो बंद केला पाहिजे...एनीवे, मी बोलतो...
ते माझ्यापाशी आले, त्यांनी इथल्या तिथल्या गप्पा मारल्या... माझ्या सोबत बसून टीव्हीसुद्धा पाहिला... मग ब्रेक लागल्यावर म्युट केलेल्या टीव्हीकडे बघून म्हणाले...’’ ह्या जाहिराती तू सुद्धा लिहू शकतेस.. मालिकांचे हे संवाद तू सुद्धा लिहू शकतेस... इतकंच कशाला ह्यात अभिनय सुद्धा करू शकतेस....आवडेल तुला?” मी उठून उडीच मारली... ते हसले.. म्हणाले... “ मग तूच विचार कर... तुला इथे, टीव्ही समोर बसायचंय की समोर टीव्ही वर जायचंय...” मी त्यांच्याकडे बघितलं. ते उठून रूम बाहेर जात ते म्हणाले, “तुला टीव्हीच बघायचा असेल तर तुझं उत्तम चालू आहे. पण लोकांनी तुला टीव्ही वर बघावं अशी तुझी इच्छा असेल तर मात्र तुला काहीतरी वेगळं करावं लागेल.. आणि ते टीव्ही बघत राहिलीस तर नाही होणार....”
......................
............आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे.......... ठरवून घेतला नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो..
>>
+१

प्रेमी ने की खुद्खुशी, प्रेमिका बनी हत्यारन
Biggrin

छान लेख आहे. बाबांची शिकवणही भारीच.

अर्थात प्रत्येकाचे विचार या बाबत भिन्न असू शकतात.

खरे तर सध्या टीव्हीशिवाय चालू शकते. कारण मोबाईल लॅपटॉप हायस्पीड ईटरनेट..
आमच्या ऑफिसमध्येही एकदोन जणांकडे घरी टीव्ही नाहीये. मी सुद्धा थोडावेळ लाईव्ह क्रिकेट सोडले तर टीव्हीवर काही बघत नाही. सध्या आयपीएल मॅच संपताच बिग बॉस थोडे बघतो तेच. कधी टीव्ही नसला तर काय असा विचार मनात येताच काही अडणार नाही हेच उत्तर मिळते.

पण हेच माझ्या आईला लागू नाही. ती मस्त आपली स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयुष्य टीव्हीवरचे डेलीसोप बघत जगतेय. टीव्ही चोवीस तास चालूच असल्याने तिचे काहीही फालतू सिरीअलही बघणे होते हे खरेय. पण एखाद्याच्या आवडीला काहीही ठरवणारे आपण कोण. ती एंजॉय करतेय, तिचे सुख.

पण एक चांगले आहे, आईला मोबाईल, स्मार्ट फोन, व्हॉटसप, फेसबूक, चॅटींग, फोटोशेअरींग ईत्यादी व्यसन नाही. कारण ते जमतही नाही Happy

आताच्या पिढीचा प्रॉब्लेम टीव्ही नसून स्मार्टफोन आहे असे मला वाटते.

आणखी एक म्हणजे मोबाईलच्या स्क्रीन मध्ये डोळे जास्त खराब होतात, टीव्हीच्या तुलनेत. त्यामुळे हल्ली पोरांच्या हातात पाटी द्यायच्या वयात टॅब देणारया पालकांचे मला कौतुक वाटते. त्यापेक्षा एकवेळ टीव्हीवर कार्टून लाऊन देणे परवडले.

हायवेजवर पाटी असते ना,
उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक !

त्याचप्रमाणे,
उत्तम रिमोट, मनाचा रिमोट Happy

ऋन्मेऽऽष,
मी आपल्या मताशी काही अंशी सहमत आहे. पण आताच्या पिढीचा प्रॉब्लेम टीव्ही नसून स्मार्टफोन आहे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.. हाहाहा..
बाकी, एक गडबड अशी आहे, की माझा टीव्ही या instrument ला विरोध नाहीये. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीकडे टीव्ही आहे पण केबल नाहीये. टाटा स्काय डीश किंवा तत्सम काहीही नाही, तिने तिचा टीव्ही वाय फायला कनेक्ट केला आहे. आणि जे या लेखात म्हटलं आहे तसं (म्हणजे जे मी मोठ्या laptop च्या स्क्रीनवर बघते ते आणि तसं) ती त्या टीव्ही वर बघते.
त्याने मुद्दा बरकरार राहतो, जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो..
तिच्या लहान मुलीने कितीवेळ आणि कोणतं कार्टून बघावं हे सुद्धा ती ठरवते कारण तिची मुलगी टीव्ही "जे दाखवेल" ते कार्टून बघत नाही, तर तिला जे आवडतील किंवा तिच्या आईला योग्य वाटतील ती कार्टून्स बघते..
आपण जपून बोललं पाहिजे याचं भान आजकाल कमी होत चाललं आहे तसं आपण जे बघतो ते सजगपणे, निवड करून बघितलं पाहिजे ही जाणीव लोप पावते आहे.
आणि आपल्या निवडीची जबाबदारी घ्यायची सवय आपल्याला असलीच पाहिजे.
ती व्हावी म्हणून ही गंमत इथे पोस्ट केली...
पण प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...

छान लेख आणि त्यापेक्षा छान विचार.
लग्न झाल्यावर भारतात रहात होतो तेंव्हा हाच विचार करून आम्हीही टीव्ही घेतला नव्हता आणि त्याबद्दल कधीही विचार बदलावा वाटला नाही. परदेशात आल्यावर बर्फाची वादळे होणार्‍या भागात रहायला लागलो तेंव्हा हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी म्हणून टीव्ही घेतला. त्यात स्वस्तात केबल कनेक्शन मिळाले आणि आमच्या नकळत भारतात आवर्जून जपलेले सगळे निर्णय कसे कोसळले ते कळलंच नाही. काही वर्षांपूर्वी आधी छापील वर्तमानपत्र बंद केले आणि काही दिवसांनी केबल ही बंद केली. आता फक्त हवेतून फुकट येणारे कार्यक्रम (त्यातही मुख्यतः हवामानाचा अंदाज पाहतो). टिव्ही नाही म्हणजे ईडीयट बॉक्स समोर बसत नाही असे मात्र झाले नाही. आता नेटफ्लीक्सचे व्यसन लागले आहे.

माझ्याकडेपण टीव्ही नाही. ठरवूनच घेतला नाही.

पालकांकडेपण मी होते तोपर्यंत साधा काळा पांढरा, फक्त दुर्दर्शनवाला टीव्ही होता...

अजय,

करेक्ट, netflix चे व्यसन आम्हालाही आहे.
पण पुन्हा तेच, आपण निवड करतो काय बघायचं आहे याची. शिवाय, सुरु असलेली गोष्ट, सिरीज, एपिसोड संपलं की पुढचे पाहायचे की नाही हेही आपल्याच हातात आहे.
माझा आक्षेप (आक्षेप घेणारी मी कोण म्हणा....) गळत राहाणा-या टीव्ही channels वर आहे. तिथे टीव्ही सुरु आहे म्हणून बघत बसतात लोक. म्हणजे ६७४ channels चेक करून त्यावर काहीही बघण्यासारखं नाहीये हे कळल्यावरही पुन्हा १ पासून सुरु करणारे, टीव्ही बंद करता न येऊ शकणारे लोक पाहिलेत मी...
असो. netflix उत्तमच आहे. हाहाहाहाहाहा

अॅमी, वाहवा....

पण आताच्या पिढीचा प्रॉब्लेम टीव्ही नसून स्मार्टफोन आहे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे..
>>>>
हो हे मान्यच. तो फोनचा विषय आपला मुद्दा काटायला काढला नव्हता. लिंक जुळली तसे लिहित गेलो ईतकेच.

तसेच,
जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो..
हे देखील पटलेच.
फक्त त्या अनुषंगाने काय पाहायचे आहे हे देखील ठरवता यायला हवे आणि त्याचेही व्यसन लागू नये हे महत्वाचे ईतके त्यात जोडले.

म्हणजे माझ्या एका मैत्रिणीकडे टीव्ही आहे पण केबल नाहीये. टाटा स्काय डीश किंवा तत्सम काहीही नाही, तिने तिचा टीव्ही वाय फायला कनेक्ट केला आहे. आणि जे या लेखात म्हटलं आहे तसं (म्हणजे जे मी मोठ्या laptop च्या स्क्रीनवर बघते ते आणि तसं) ती त्या टीव्ही वर बघते. >>> आमच्याकडे सध्या हेच आहे .
केबल असताना , बरेच पर्याय होते. हा सिनेमा नाही आवडला तर चॅनेल बदला , इथे जाहिराती चालू चॅनेल बदला .
आता बरेचदा तुनळी किन्वा काहितरी लाईव चॅनेल चालू असतात.
पण आता सतत टीवी चालू आहे असं काही होत नाही . काय लागलयं बघूया म्हणून उगाचच टीवी चालू केला जात नाही .

टीव्ही आणि इंटरनेट (डिजिटल) माध्यमातला फरक तुम्ही एखाद्या गोष्टीपर्यंत पोचणे नसून तुम्हाला किती पर्याय उपलब्ध आहेत यात आहे. दूरदर्शन व केबल टिव्हीमध्येही हाच फरक होता. दूरदर्शनमध्ये तुम्हाला पर्याय नव्हता, केबल टिव्हीने तुम्हाला ५०/१००/२०० पर्याय दिले. मग इंटरनेट आल्यावर आपल्याला केबल टिव्हीचे पर्याय अपुरे पडू लागले. अजून एक महत्त्वाचा बदल आहे तो कार्यक्रम (कन्टेन्ट) उभारणीत, त्याच्या संकल्पनेत. केबल टिव्हीवर अगदी निश सेगमेंट घेतले तरी किमान दहा हजार/लाखभर लोकांच्या पसंतीचा लसावि काढून कन्टेन्ट सादर केला जात होता. तुम्ही त्या लसावित बसाल पण तुमच्या आवडीला १००% तो कार्यक्रम मॅच होणार नाही. डिजिटल मेडियावर कन्टेन्ट अजून जास्त वैयक्तिक होत आहे. एखादा कन्टेन्ट प्रोवायडर फक्त १०० अगदी १० लोकांना रुचणारा कार्यक्रमसुद्धा निर्माण करत आहेत कारण ते या मध्यमात परवडते. एक थोडे टोकाचे 'असभ्य' उदाहरण द्यायचे तर पोर्न कन्टेन्ट बनवणारे निर्माने पर्सनलाइज्ड कन्टेन्ट देतात. एखादा पोर्नचा ग्राहक त्याचे नाव/आवड वगैरे पोर्न-निर्मात्याला (बरेचदा हे निर्माते म्हणजे त्यात काम करणार्‍या स्त्रीयाच असतात) पाठवतात. त्या ग्राहकाला उद्देशून संवाद, त्याच्या आवडीचा 'कन्टेन्ट' असणारी विडिओ फाइल ग्राहकाला मिळते.

भित्तीचित्रे, चामड्याला ताणून आवाज काढणे, बांबू फिरवून आवाज काढणे, दोन योद्धे लढवणे, दुसर्‍याच्या आयुष्यातल्या गोष्टींवर विचार करणे (गॉसिप), आजूबाजूला घडणार्‍या घटना ज्यांचे उगम समजत नाहीत त्यांना कल्पनेची साथ देऊन दैवी बनवणे, मग देवाची उपासना, रोज देवळात/मशिदीत/चर्चमध्ये जाणे, तिथे किर्तन/सर्मन ऐकणे, पुस्तके वाचणे, वर्तमानपत्र वाचणे, धृपद-धमार >> ख्याल >> सुगम >> सिनेमा >> नॉनफिल्मी आल्बम ऐकणे, नाटक-दशावतार-तमाशा, थेटरात जाऊन तमाशा, घरात बसून दूरदर्शन, मग केबल, आता डिजिटल वेब सिरीज अन नेटफ्लिक्स, पर्सनलाइज्ड पोर्न - एकाच माळेतील मणी आहेत.

वर तुम्ही उल्लेख केलेले किशोर कुमार अन अमित त्रिवेदींचे संगीत सपोजेडली सुमार/सवंग चित्रपटांच्या भोक्त्यांचा जीवावर तर पैदा झाले.

आमच्याकडे आई आणि सध्या आज्जी सिरीयल्स बघतात..आजोबा बातम्या नाहीतर ते आस्था चॅनल लावून बघतात. संध्याकाळी साडे सहा पासून नऊ वाजे पर्यंत झी मराठीने आमचा टिव्ही काबीज केलेला असतो.. कुठलातरी एपिसोड फार फाल्तु असला की "आता हि सिरीयल नाही बघायची" असं दोघीही ठरवतात...पण दुसर्या दिवशी काल केलेला निश्चय गळून पडतो आणि पुन्हा ती पात्र आमच्या टीव्हीवर अवतरतात....नंतर रात्री साडे अकरा पर्यंत आजोबा रामदेवबाबांचे ते जडीबूटींचे शोध/ प्रयोग + ब्रेकमध्ये बातम्या बघतात. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे कधीकधी लहान भाऊ दुपारी ते डोरेमाॅन लावतो. पण तेच तेच रिपिट असल्यामुळे दहा मिनीटात कंटाळून बंद करतो आणि पुन्हा वाचत बसतो...मी; बाबा आणि माझा भाऊ तिघांनाही टीव्हीवर मॅच सोडून काहीच बघायला आवडत नाही. सिरीयल; पिक्चर बघायचा प्रश्नच येत नाही. लहानपणापासून जेव्हा बाबांनी वाचायला शिकवलं तेव्हापासनं मला आणि भावाला पुस्तकं वाचायचं व्यसन लागलय ते अजूनही आहे. जेवतानाही बरेचदा आम्ही पुस्तक वाचत जेवतो. त्या बिनडोक सिरीयल बघण्यापेक्षा केव्हाही चांगलं वाटतं मला.
त्यामुळे टीव्ही असला काय आणि नसला तरीही आम्हाला तिघांना काहीच फरक पडत नाही.मी माझ्या रूममध्ये अभ्यास किंवा वाचन दोघापैकी काहीतरी करते. त्यामुळे टीव्हीशी माझा तसा काही संबंध येत नाही..बाबा नेटवर मॅच बघतात कधीकधी.... काल रात्रीच्या मॅचमध्ये धोनीचा शेवटचा सिक्स टीव्हीवर बघायचं भाग्य लाभलं तेव्हा आनंद झाला...

Cord cutter +1
पण युट्युब टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राईम इ. ला पैसे देतो. Lol
माबोवर बिगबॉस धागा वाचून आज आपली मराठीवर एक एपिसोड कास्ट करून बघितलाच. सो, केबल नाही.. पण टी व्ही प्रचंड बघतो.
टीव्ही वर काम करायची काडीची इच्छा नाही, तर मरेपर्यंत हा सगळा कंटेंट बघायला वेळ पुरेल ना याची भीती वाटते अनेकदा.
>>>जेवतानाही बरेचदा आम्ही पुस्तक वाचत जेवतो. त्या बिनडोक सिरीयल बघण्यापेक्षा केव्हाही चांगलं.>>> मिथ आहे हे. दोन्ही ही सारखच वाईट।

टीव्ही नसणे पण इतर माध्यमे मनोरंजनासाठी वापरणे ह्यात काही फारसं थ्रील वाटत नाही. त्यापेक्षा टीव्ही असुनही स्वत:वर कंट्रोल ठेवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

प्रतिसादा बद्धल सगळ्यांना धन्यवाद-
पण टीव्ही चांगला की वाईट, रिमोट आपल्या हातात मग कंट्रोल का नाही, टीव्ही नसणे पण इतर माध्यमे मनोरंजनासाठी वापरणे ह्यात काही फारसं थ्रील नाही, पुस्तक वाचत जेवतो हे चांगलं का वाईट आणि तत्सम चर्चेत एक महत्वाचा (आणि लेखात आलेला )मुद्दा आपण सगळे विसरता आहात तो म्हणजे आमच्यातला ओघवता संवाद..
पेपर मध्ये आज काय वाचलं, Umesh Vinayak Kulkarni ने कसला अप्रतीम लेख लिहिला आहे एफटीआय वर.. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक आणि आजचा दिवस कसा गेला, जेवण कसं झालंय इथपासून आज काय किस्सा झाला... हे सगळे विषय येतात बोलण्यात... हां, बोलणं होतं... संवाद होतो... एकमेकांशी... ऑफलाईन संवाद... जिथे स्मायलीज आणि emoticon एकमेकांच्या चेह-यावर पाहतो आम्ही...
हे... सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही हे बोलतो म्हणून सगळ्यांनी हेच बोलावं असं नाही. पण प्रत्येकाचे स्वतःचे आणि कुटुंबाचे जिव्हाळ्याचे विषय असतीलच. शिवाय २ तास टीव्ही (किंवा अन्य काहीही) बघून झोपायला जायच्या ऐवजी आम्ही एक तास बघून एक तास जे बघितलं त्यावर बोलतो....
माझ्या मते हे बोलणं महत्वाचं आहे.. बाकी सगळी चर्चा.... चालू दे!!!!

फक्त त्या अनुषंगाने काय पाहायचे आहे हे देखील ठरवता यायला हवे आणि त्याचेही व्यसन लागू नये हे महत्वाचे ईतके त्यात जोडले.
हे अगदी करेक्ट. ऋन्मेऽऽष .

आणि भित्तीचित्रे, चामड्याला ताणून आवाज काढणे, बांबू फिरवून आवाज काढणे, दोन योद्धे लढवणे, दुसर्‍याच्या आयुष्यातल्या गोष्टींवर विचार करणे (गॉसिप), आजूबाजूला घडणार्‍या घटना ज्यांचे उगम समजत नाहीत त्यांना कल्पनेची साथ देऊन दैवी बनवणे, मग देवाची उपासना, रोज देवळात/मशिदीत/चर्चमध्ये जाणे, तिथे किर्तन/सर्मन ऐकणे, पुस्तके वाचणे, वर्तमानपत्र वाचणे, धृपद-धमार >> ख्याल >> सुगम >> सिनेमा >> नॉनफिल्मी आल्बम ऐकणे, नाटक-दशावतार-तमाशा, थेटरात जाऊन तमाशा, घरात बसून दूरदर्शन, मग केबल, आता डिजिटल वेब सिरीज अन नेटफ्लिक्स, पर्सनलाइज्ड पोर्न - एकाच माळेतील मणी आहेत.
...???@#$????
हे अजिबात म्हणजे अजिबातच पटलेलं नाही टवणे सर.

टवणे सर +१ सर्व मनोरंजनाची साधने आहेत आणि सर्वांचे व्यसन लागू शकते!
लेख बराच absolete विषयावर आहे. किमान मायबोलीवर येणाऱ्या वाचकवर्गासाठी तरी. कारण या वर्गात तरी टिव्ही या माध्यमाचीच मक्तेदारी संपत चालली आहे.
संवाद/गप्पा या गोष्टी होणे न होणे हे केवळ टिव्ही नसल्याने किंवा असल्याने होईल असे नाही. तो वेगळाच मुद्दा आहे. समजा टिव्ही घरी नाही पण सगळे पुस्तकात किंवा मोबाईलमध्ये डोके खूपसून बसलेले असतील तरी संवाद होणार नाही.

टवणे सर , सेपियन्स हे पुस्तक वाचत असल्यामुळे मला तुमचं मत पटलं!

लेखाबद्दल म्हणायचं तर टीव्हीचं व्यसन नाही आणि ( प्रतिसादात लेखिकेने म्हटल्याप्रमाणे) नेटफ्लिक्सचं व्यसन आहे याचं लॉजिक कळलं नाही! मुळात व्यसनच का?

काही वर्षांपूर्वी 'हिंदू'मध्ये Doordarshan was our spinach अशा प्रकारचं शीर्षक असलेला लेख वाचला होता.
तुम्ही लेखात जो ' आपल्याला जे हवं आहे तेच बघण्याचा' मुद्दा मांडला आहे त्यावरून मला त्या लेखाची आठवण झाली. Spinach म्हणजे पालकाची भाजी, अनेकांना न आवडणारी, पण तब्येतीला चांगली. एकच वाहिनी होती, तेव्हा बातम्या, हिंदी आणि मराठी गाणी, कृषीविषयक कार्यक्रम, फॅशन शो, वैज्ञानिक माहिती देणारे कार्यक्रम, मनोरंजनपर मालिका, लहान मुलांसाठी कार्यक्रम हे सगळं एकाच वाहिनीवर लागायचं. यातले काही कार्यक्रम म्हणजे पालकाच्या भाजीसारखे, boring पण आवश्यक, काही pizza सारखे जंक पण चविष्ट, अशा प्रकारचा विचार त्यात मांडला होता.
दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपण 'वाढलेलं सगळं खायचं' या नियमानुसार आमची माती आमची माणसंही बघत होतो आणि चित्रहारही!

आता तसं नाही. वरच्या प्रत्येक विभागासाठी अनेक dedicated वाहिन्या आल्या. त्यामुळे आपण choice करायला लागलो काय बघायचं त्याचा. and it's good and bad. आपल्याला जे आवडत नाही किंवा कदाचित माहितच नाही, ती पालकाची भाजी ( boring पण पौष्टिक) असू शकते. आवडतं ते नेहमीच जंक असतं असं नाहीच, पण इतरही अनेक चवी try करून बघायला हरकत नसावी.

टिव्ही व्यसन आहे हे जरी एकवेळ मान्य केले तरी "टिव्हीचा प्रोब्लेम आहे की टिव्हीवर लागणार्‍या कार्यक्रमांचा प्रोब्लेम आहे?" हे नक्की होत नाही आहे. भांडखोर सांस बहु कार्यक्रम बघा, सतत किंकाळणार्‍या अँकर्सच्या बातम्या बघा, शिनचॅनचा उध्दटपणा मुलांना २४ तास दाखवत बसा अशी जबरदस्ती टिव्ही आपल्यावर करत नाही. ती जबरदस्ती आपण स्वतः आपल्यावर करत असतो. टिव्हीवर काय बघायचे किती बघायचे हे ठरवण्यासाठी रिमोट नावाचा "लगाम" आपल्या हाती असतो. समोर किंचाळणारा अँकर खोट्या नाट्या बातम्या , भडक हॅशटॅग लावून बोंबलत असेल तर त्याचा गळा दाबायला 'रिमोट' हाती असतो. परंतू आपल्याला त्याच्या भडक बातम्यांमधे जास्त इंटरेस्ट असल्यामुळे आपण चॅनल बद्लत नाही. तीच गत सांस बहु सिरिअलची आहे. तुलसीचे कितवे लग्न कितीजणांबरोबर केले वगैरे, कोमोलिका आज काय कारस्थान रचनार आहे यात जास्त रस असल्याने मालिका बघितली गेली. आणि खापर कुणावर फुटले ? टिव्हीवर...

मुळात तुमच्या मनावर ताबा नाही आहे. टिव्हीवर काय बघावे हे आपण ठरवायचे. माझ्या घरीपण टिव्ही सतत चालू असतो पण त्यावर काय दिसणार या गोष्टीवर मात्र ताबा आहे. डिस्कव्हरी, हिस्टी, नॅशनल जिऑग्रोफी, कॉमेडी टिव्ही, आय एम , इत्यादी बरीच चॅनल्स आहे जी दर्जेदार कार्यक्रम दाखवतात. ते नक्की बघावे.
कार्टुन्स पण बरीच चांगली आहे. टॉमजेरी, डोरेमॉन, अ‍ॅवेन्जर, स्पायडी इ. कार्टुन करमणूक करतात, आता त्यांच्यात जर तुम्ही "शिकवण" शोधत असाल तर मात्र कठिण आहे.

ताबा ठेवा

टीव्ही नाही आणि मग युट्युबसारखी इतर मनोरंजनाची साधनं वापरणं सारखंच आहे की.
काय पाहावं ह्याचा रिमोट ख-या अर्थाने आमच्या हातात आलाय>>>>>> हे तर टीव्हीच्या बाबतीतही होउ शकतंच. टीव्हीवरही आपल्याला जे बघायचंय फक्त तेच बघु शकतोच आपण.

त्या अनुषंगाने काय पाहायचे आहे हे देखील ठरवता यायला हवे आणि त्याचेही व्यसन लागू नये हे महत्वाचे>>>>>>>>> हे पटलं. पण हे टीव्ही आणि इतर इंटरनेट मनोरंजन माध्यमासाठीही लागु होतं.

टीव्ही नसणे पण इतर माध्यमे मनोरंजनासाठी वापरणे ह्यात काही फारसं थ्रील वाटत नाही. त्यापेक्षा टीव्ही असुनही स्वत:वर कंट्रोल ठेवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.>>>>>>>>>>> श्री, +१
आमच्याकडे टीव्ही नाही म्हणजे फार काही थ्रिल किंवा मोठेपणाची गोष्ट मलातरी वाटत नाही.

टिव्ही चॅनल्स काय आणि नेटफ्लिक्स अथवा यू ट्यूब काय मलाही सारखेच वाटते. गळणारी चॅनल्स असो किंवा नेटफ्लिक्स असो, तुम्हाला थांबण्याचा/ बंद करण्याचा चॉइस करता येत असेल तर हे काय नि ते काय काही फरक पडत नाही. सतत फोन वर ईमेल्स , सोशल मिडिया चेक करण्याचे व्यसन टिव्हीपेक्षा जास्त कॉमन आणि डिस्ट्रक्टिव पण जास्त वाटते.

मै, सहमत.
आम्ही टिव्ही पहात नाही (म्हणजे काय ते देवच जाणे) पण नेटफ्लिक्सवर बिंज वॉचिंग करणं हा आवडता उद्योग आहे. शिवाय स्मार्ट फोनमुळे सतत हे न ते बघणं, वाचणं सुरुच. म्हणजे स्क्रिन टाईम आधीपेक्षा दुप्पट जोरात चालूच आहे. मग टिव्ही न बघण्याचं एवढं काय ते? कुठल्याही स्क्रिनवर काहीही न बघता पुस्तकं वाचणं, बाहेर फिरणं, मैदानी खेळ खेळणं ही पूर्वीसारखी लाईफस्टाईल असेल तर सांगा.

>>आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे.......... ठरवून घेतला नाही...<<

हे वाक्य २० वर्षांपुर्वि ऐकायला ठिक होतं कारण त्यावेळेस इतर माध्यमं न्हवती. पण आता स्वतःच्या आवडिचे "इडियॉटिक कांटेंट्स" पहायला बक्कळ माध्यमं उपलब्ध आणि वापरात असल्याने एक तत्व म्हणुन आमच्याकडे टिवी नाहि या वाक्याला काहि अर्थ उरत नाहि...

मैत्रेयी, व सायो सहमत. त्यांना आम्ही केबल बघत नाही सतत असे म्हणायचे असावे का? माझ्या क डे प्लेस्टेशन गेम्स खेलायला आवश्यक म्ह णून टीव्ही आहे. पन केबल नाही. व्यसन आजिबातच नाही. कामावरून घरी आल्यावर सात ते सा डे आठ ने ट फ्लिक्स बघते. अमेझॉन प्राइम, यूट्यूब प्ले स्टोअर वरून विकत घेतलेल्या मूव्हीज हे सर्व आहे. मी काय बघायचे तो चॉइस माझा हे आता पार फॉर द कोर्स आहे अहो. त्यात नाविन्य काही नाही. माझ्या ने ट फ्लिक्स वर चार प्रोफाइली आहेत. प्रत्येक प्रेक्षकाचा चॉइस वेगळा . मुले काय बघतात ते मी आजिबात चेक करत नाही. वर्ग णी भरते निवांत. वैश्विक व लोकल विशयांवर चर्चा कायमच चालू असते. त्यात अधोन मधून इन्स्ताग्रामवर कुत्र्याम्चे फो टो पन बघून हू हा करतो.

तुम्ही सतत केबल लावून बसत नाही म्हणून इतरांना जज करायची गरज नाही. काही जण वयस्क एक टे आजारी, घराबाहेर पडू न शक णारे असतात. नुसत्या सोबती साथी पन मालिका लावून कामे कर नारे असतात. अंध व्यक्ती कपिलचा शो जेव्हा चांगला होता तेव्हा ऐकत व हसत असत. परित्यक्ता, घटस्फो टीत, विधवा महिलांना देखील भावोजी घरी अले आणी पैठणी दिली हा शो खूप आवड्तो.

रिवर्स का कायते चे शिकार होउ नका ताई

कुठल्याही स्क्रिनवर काहीही न बघता पुस्तकं वाचणं, बाहेर फिरणं, मैदानी खेळ खेळणं ही पूर्वीसारखी लाईफस्टाईल असेल तर सांगा.>>> सायो, अगदी पटलं. कुठल्याही स्क्रिनवर काहीही न बघता पुस्तकं वाचणं हे तर अगदीच नाहीतर आजकाल पुस्तकाच्याही हार्डकॉपी ऐवजी किंडल वर वाचणं प्रेफर करतात लोक्स... Wink
वर अमा म्हणतात तसे यांना केबल टीव्ही पाहत नाही असे म्हणायचे असणार कदाचित. ज्याप्रमाणे टीव्हीशिवाय इतरत्र काय पहावे याचा आपल्याकडे कंट्रोल असतो तसा टिव्हीवरही काय पहावे याचाही असतोच की!
तरीही प्रत्येकाची आवड आहे. आपण स्वतःहून आपल्या घरातील एक स्क्रीन कमी ठेवली आहे हे छान आहे.

समहाऊ टिव्हि समोर बसून जे समोर दिसेल ते तासनतास बघत राहाणे हे तितकंसं चांगलं नसून त्यापेक्षा आपल्याला हवं ते/आवडतं ते बघणे हे चांगलं असा काहीसा सुर जाणवतो लेखात.

वर टवणे आणि राज ह्यांनी लिहिलय तसं, पुर्वी टिव्हिवरच ऑप्शन कमी होते नंतर टिव्हि वर ऑप्शन भरपूर आले. आता पुढे नुसतं टिव्हि सोडून ऑनलाईन काँटेंटमुळे अगदी आपल्याला आवडेल तेच फक्त बघता येतं.
ह्या सगळ्या मध्ये कॉमन डिनॉमिनेटर शेवटी तुम्ही/आपण स्वतः किती वेळ हे काँटेंट (मग ते कुठलंही असेना) बघतो आणि त्याचा आपल्या क्वॉलिटि ऑफ लाईफ वर काय परिणाम होतो हा आहे.
एकंदरित माईंडलेसली बसून कुठल्याही प्रकारचं काँटेंट बघून शेवटी क्वालिटी ऑफ लाईफची वाट लागतेच. विशियस सायल सुरु होते. खुप काँटेंट बघून पुढे नैराश्य येतं आणि ते घालवायला परत माणूस आणखिन काहीतरी शोधायला लागतो. अ‍ॅडिक्शनच शेवटी ते सुद्धा.

सरतेशेवटी, लेखात सरवात महत्वाचं म्हणजे घरात ज्या काही चांगल्या सवयी लागत आहेत त्याचे श्रेय चुकून रिड्युस्ड स्क्रीन टाईमला (मग तो स्क्रीन कुठलाका असेना) न देता घरात टिव्ही नाही ह्याला दिलं जातय असं वाटतय.

"पण तुमच्याकडे रेडिओ कुठ्ठाय?" पासून "आमच्याकडे टीव्ही नाही" पर्यंत झालेला सामाजिक प्रवास पाहून गंमत वाटली.
जमाना बदलला, पण आपलं वेगळेपण जपण्यातलं कौतुक अजून तसंच आहे.

मला हे पूर्वीच वाचल्यासारखं वाटत होतं म्हणून सहज शोधलं तर २०१५ ची फेसबुक पोस्ट सापडली.
नवीन काहीतरी वाचायला आवडेल.

बाकी यी लेखाचा मुद्दा तेव्हाही पटला नव्हता आणि आजही पटत नाही. कारण या उतरंडीला अंत नाही.
म्हणजे कोणीतरी 'काय बै लोकं खुराड्यात बसून पुस्तकी चर्चा करत राहतात, आम्ही जरा वेळ मिळाला की लग्गेच निसर्गाच्या सान्निध्यात जातो / झाडं लावतो / गरीबांच्या मुलांना व्यवसाय शिक्षण देतो / (वर सायो यांनी लिहिल्याप्रमाणे) मैदाने खेळ खेळतो' वगैरे वगैरे काहीतरी वरचढ म्हणू शकतंच तुमचा लेख वाचून!
वर 'टीव्हीचं नाही, पण नेटफ्लिक्सचं व्यसन आहे' असंही तुम्हीच म्हणताहात. मग इतरांवर टिप्प्णी करण्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळतो?

त्या तुमच्याकडे ऐकू न येणार्‍या दैनिक मालिकांपैकी काहींची शीर्षकगीतं आणि काहींचे संवाद तुम्ही लिहिता ना?

"सवंग राजकारणाचे बेचव तवंग" वा, वा!
अश्या शीर्षकाची एक तरहि गझल लिहितील आता कुणितरी!

<< सतत फोन वर ईमेल्स , सोशल मिडिया चेक करण्याचे व्यसन टिव्हीपेक्षा जास्त कॉमन आणि डिस्ट्रक्टिव पण जास्त वाटते.>>
<<<मग टिव्ही न बघण्याचं एवढं काय ते? कुठल्याही स्क्रिनवर काहीही न बघता पुस्तकं वाचणं, बाहेर फिरणं, मैदानी खेळ खेळणं ही पूर्वीसारखी लाईफस्टाईल असेल तर सांगा.>>>
मैत्रेयी, सायो,
सहमत. दुजोरा, अनुमोदन!!
(माहित्तै? कित्येकदा भर दिवसा चार चार तासात मी एकदाहि फोन, टीव्ही, कॉम्प्युटर काही बघत नाही, नुसता पत्ते खेळत बसतो!)

प्रामाणिकपणे सांगायचे तर काही समजलंच नाही

आमच्याकडे टीव्ही आहे, तो सुरू असतो, आम्ही दोघे टीव्हीसमोर असतो आणि टीव्हीवर जे चाललेले असते ते सोडून सगळे बोलत असतो एकमेकांशी

दिवस कसा होता, जेवण कसं आहे , दैनंदिन बाबी व सर्व महत्वाच्या चर्चा ह्यात टीव्ही कुठेही मध्ये येत नाही

आम्ही टीव्हीवर जे चालले आहे त्यातील निवडक बघतोही

बातम्या, आय पी एल, क्राईम पॅट्रोल, तिला आवडणारी एखादी मालिका इत्यादी

टीव्ही बंदही ठेवला जातो, काही बघायचेच नसते तेव्हा

Pages