मनात रेंगाळणारा ‘गुलाबजाम’

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 19 April, 2018 - 02:35

तुम्हाला भारतीय स्वयंपाकातील सर्वात जास्त काय आवडतं? असं जर कोणी विचारलं तर मी तात्काळ सांगेन, सगळंच. अगदी पदार्थाच्या तयारीपासून(म्हणजे निवडणे, चिरणे, सोलणे इ.इ.) ; ते तो पदार्थ तयार करण्यापर्यंत, तिथून त्याचा ताटापासून पोटापर्यंतचा प्रवास, सगळंच
आवडतं मला. काल “गुलाबजाम” बघितला. तो बघतानाही असंच वाटलं, एक भन्नाट रेसिपी जमून गेलीय.

गोष्ट तशी जरा वेगळीच. मराठी जेवणावर प्रेम करणारे दोन लोक. एक मराठी जेवण जगाच्या व्यासपीठावर सादर करण्याच्या ध्येयाने झपाटलेला तरुण आणि एक हाताला अप्रतिम चव असणारी पण थोडी क्लिष्ट अशी बाई. या दोघांची हि गोष्ट. ते दोघे एकमेकांच्या साथीने आपापली स्वप्नं कशी साकार करतात त्याची मस्त गोष्ट. कथा काही मी इथे सांगणार नाही ती चित्रपटगृहातच अनुभवण्याची गोष्ट आहे.

पण एखादा सुंदर पदार्थ खाल्ल्यावर जशी त्याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते तसा हा गुलाबजाम मनात रेंगाळतो.

सोनाली कुलकर्णीने काम मस्त केलय. एक पस्तिशी पार केलेली, हाताला अफाट चव असलेली, थोडी हट्टी, क्लिष्ट पण मनाने नितळ आणि शिस्तीची राधा खूप सुरेख साकारलीय तिने. राधाच्या स्वभावाचे कंगोरे सुरेख टिपले आहेत. घाबरलेली, बाहेरच्या जगापासून अलिप्त राहणारी, आदित्यला तुझ्या पुरणपोळ्या कायम अगोड आणि करपलेल्या होतील असं म्हणणारी आणि मग हळूहळू उलगडत जाणारी मनस्वी राधा तिने सर्वार्थाने पेललीय.

तिला साथ दिलीय सिद्धार्थ चांदेकरने आदित्यच्या भूमिकेत. हायली पेड जॉब आपल्या स्वप्नापायी सोडून लंडनहून भारतात येणारा आदित्य जेंव्हा त्याच्या स्वप्नासाठी धडपडणं सोडत नाही तेंव्हा तो आजच्या जेन नेक्स्ट चा प्रतिनिधी वाटतो. जे करायचंय ना ते आज, धडपडलो तरी बेहत्तर पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडायची तयारी दाखवतो आदित्य. दिलखुलास, थोडासा बालिश पण आपल्या स्वप्नासाठी जीवाचं रान करणारा आदित्य सिद्धार्थने खूप छान उभा केलाय. त्याबद्दल त्याचं कौतुकच. सोनालीसारखी उत्तम अभिनेत्री समोर असतानाही त्याचा आदित्य वेगळा उठून दिसतो. भाज्यांशी बोलणारा, राधाला तिनेच शिकवलेले गुलाबजाम बनवून निरोप घेणारा आदित्य सच्चा वाटतो.

चित्रपटाचा लूक प्रचंड फ्रेश आहे. मला हा चित्रपट आवडण्याची जी अनेक कारणे आहेत त्यात
सोनाली - सिद्धार्थ चा अभिनय तर आहेच पण एक महत्वाचं कारण म्हणजे त्यात तयार करताना दाखवलेले पदार्थ. अहा...! ती सजलेली ताटं, त्या सुंदर पदार्थांचे ते रंग... हे सगळं पाहतांना माझ्या मनात त्या पदार्थाचा वास रुंजी घालत होता. अर्थात तो चित्रपटातून येऊ शकत नाही, पण प्रेक्षकाचं मन तो तयार करू शकतं.
जेंव्हा राधा आणि आदित्य सुरळीच्या वड्या करतात तेंव्हा तो खमंग फोडणी आणि ताज्या कोथिंबिरीचा वास माझ्या मनाला घेरून बसला होता. अर्थात हे मी मुळातच खवैया असल्यामुळेही असेल. पण ती किमया साधण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. या गोष्टीचं श्रेय मात्र सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग आणि ते पदार्थ तयार करणाऱ्या सायली राजाध्यक्ष यांना.

राधाचं स्वतःला पडलेले प्रश्न सोडवताना कासावीस होणं, आदित्यची पर्सनल आयुष्य कि स्वप्न याचा तोडगा काढताना झालेली तगमग हा चित्रपट व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचवतो.

चित्रपटाचा सर्वात सुंदर भाग आहे राधा आदित्यला बारकाव्यांसहित सगळा मराठी स्वयंपाक शिकवते तो. आपलं मराठी जेवण कधी ग्लॅमर मध्ये नव्हतंच.
आम्हा भारताबाहेर राहणाऱयांसाठी तर restaurant मध्ये जेवायला जाणे म्हणजे पंजाबी जेवण जेवणे. फार झालं तर साऊथ इंडियन. पण अस्सल मराठी जेवण restaurant मध्ये मिळणं तसं भारताबाहेर अवघडच. त्या बाबतीत एक भाबडा आशावाद का असेना पण या चित्रपटातून मिळतो की कोणीतरी असं असेल कि ज्याला असं मराठमोळं काही करावंसं वाटेल.

चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तशा काही उणिवाही. आदित्यची होणारी बायको आणि त्याच भांडण फार वरवरचं वाटत, अशीही तिची त्याच्यात गुंतवणूक आहे असं पहिल्यापासून वाटत नाहीच म्हणा.

एका गोष्टीमुळे मात्र हा चित्रपट वेगळा ठरलाय, तो म्हणजे याचा शेवट, जो मला खूप आवडला कारण logically पटण्यासारखा आहे तो. या शेवटाबद्दल दिग्दर्शक सचिन कुंडलकरांचं खरच कौतुक.
उगाच राधा आणि आदित्यच नातं त्यांनी cliche दाखवलं नाही. त्यांच गुरु शिष्याचं नातं पुढे सुंदर मैत्रीच्या आणि हक्काच्या काठावर येऊन थांबतं ते मला खूप भावलं. या शेवटाने गुलाबजामला आणखीनच चव आणली आहे.
मला विचाराल तर एकदा चित्रपटगृहात जाऊन बघावा असा नक्कीच आहे हा चित्रपट. त्यातच जस म्हटलंय तसं
“ किती दिवस लपून राहणार एखाद्या सुंदर पदार्थाचा दरवळ?”

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण.
ताई, तुझमे तेरा क्या है पुर्ण करणार का?

धन्यवाद जिज्ञासा, सस्मित Happy
आज खूप दिवसांनी माबोवर आले, खरतर वर्षांनी.
सस्मित, लिहायला घेतेच पुढचा भाग आज Happy

काही महिन्यांपासून बघायचा मनात होतच. काल तुमचा रिव्यु वाचला आणि मग फायन्ल पुश मिळाला बघायला. चांगला वाटला.
ते वेगवेगळे पदार्थ करतानाचे शॉट्स मस्त होते. स्टोरी वेगळी होती आणि एक फिक्शनल गोष्ट म्हणून ठीक वाटते कारण रियल लाईफ अँगल मधून राधाचा पुण्यात आल्या पासून ते अदित्य येऊ पर्यंतचा प्रवास तितका बिलिवेबल नाही वाटत. पण ठीक आहे.
सोनाली कुलकर्णी काम छान करतेच पण त्या चांदेकरनी पण चांगलं काम केलय. तो त्यातल्या त्यात नवखा असतो स्वयंपाक करण्यात त्यामुळे त्याच्या स्वयंपाक करायच्या पद्धती बिलिवेबल वाटतात. राधाच्या स्वयंपाकाची जी इमेज (अप्रतिम स्वयंपाक वगैरे) आहे त्या तुलनेमध्ये तिचे स्वयंपाकाचे स्किल्स म्हणजे एक प्रकारचा जो सराईतपणा असतो तो जाणवत नाही.
जरा वेगळी स्टोरी आणि पदार्थांमुळे बघायला छान वाटला मात्र.

धन्यवाद वैद्यबुवा.
>>>>
सोनाली कुलकर्णी काम छान करतेच पण त्या चांदेकरनी पण चांगलं काम केलय. तो त्यातल्या त्यात नवखा असतो स्वयंपाक करण्यात त्यामुळे त्याच्या स्वयंपाक करायच्या पद्धती बिलिवेबल वाटतात.>>> +१