माझी सैन्यगाथा (भाग १०)

Submitted by nimita on 19 April, 2018 - 02:04

Armed forces मधे काही customs पाळल्या जातात. जसं की- जेव्हा एखादा ऑफिसर युनिट सोडून बाहेरगावी जातो (posted out) किंवा दुसऱ्या गावाहून युनिट मधे येतो (posted in) तेव्हा युनिट मधले इतर ऑफिसर्स त्याला (आणि त्याच्या फॅमिली ला) आपापल्या घरी जेवायला बोलावतात. यामागे मुख्यत्वेकरून दोन उद्देश असतात-
युनिट मधे नवीन आलेल्या ऑफिसर आणि त्याच्या फॅमिलीला नव्या जागेत, नवीन लोकांमधे रुळायला मदत होते. They become a part of the unit family.
आणि युनिट सोडून जाणाऱ्यांच्या बाबतीत म्हणाल तर दोन तीन वर्षं एकत्र राहिल्यामुळे एक प्रकारचा ऋणानुबंध जुळलेला असतो एकमेकांशी. भविष्यात परत कधी भेट होईल की नाही याची खात्री नसते; त्यामुळे या अशा स्नेहभोजनाच्या निमित्तानी त्या मैत्रीच्या, प्रेमाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं जातं.
हे झालं भावनिक कारण! पण अजून एक प्रॅक्टिकल कारण ही आहे- बदली झालेला ऑफिसर आणि त्याची फॅमिली पॅकिंग करण्यात किंवा unpack करण्यात खूप busy असतात. त्या दिवसांमधे घराची अवस्था बघण्यासारखी (rather न बघण्यासारखी) असते. घरभर बॉक्सेस आणि पॅक किंवा unpack होणारं सामान यांच्या चक्रव्यूहात अडकलेलं असताना निदान kitchen front वरच्या लढाईतून तरी त्यांची सुटका व्हावी असा उदात्त विचार करून इतर लोक त्यांना जेवायला बोलावून indirectly त्यांच्या या mission मधे त्यांना मदत करतात.
Armed forces मधे अजून एक अलिखित नियम आहे.. you are supposed to return a meal. म्हणजे जर तुम्ही कोणाकडे जेवायला जाऊन आलात तर तुम्हीही त्यांना तुमच्या घरी जेवायला बोलावणं अपेक्षित असतं. आणि म्हणून च जेव्हा एखाद्या ऑफिसरची बदली होते तेव्हा generally घरातल्या सामानाची पॅकिंग सुरू करायच्या आधी युनिट मधल्या सगळ्यांना ते आपल्या घरी जेवायला बोलावतात.( कारण बाकी सगळे जण आळीपाळीने त्यांना बोलावणार हे अध्याहृत असतं.. आणि सामान पॅक झाल्यानंतर सगळ्यांना बोलावणं शक्य नसतं, म्हणून in anticipation आधीच बोलावतात सगळ्यांना !)
याच विचाराला अनुसरून आम्ही पण युनिट मधल्या तमाम ऑफिसर्स आणि त्यांच्या कुटुंबियांना आमच्या घरी डिनरसाठी बोलावलं.
त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून आम्ही पॅकिंग करायला सुरुवात केली. आमचं लग्न होऊन जेमतेम साडेतीन महिने झाले होते त्यामुळे आमच्याकडे खूप असं सामान नव्हतंच. आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रवासाचं अवघड स्वरूप बघता आम्ही अगदी मोजकंच सामान बरोबर आणलं होतं. त्यामुळे आम्ही लवकरच सगळं सामान पॅक केलं. आमचा नव्या नवलाईचा आटोपशीर संसार आता बॉक्सेस मधे सीलबंद होऊन नवीन बिऱ्हाडी जायला तयार होता. घराबाहेरच्या व्हरांड्यामधे सगळ्या बॉक्सेस एका ओळीत उभ्या होत्या, अगदी शिस्तीत! प्रत्येक बॉक्स वर समोरच्या बाजूला उजव्या कॉर्नर मधे stencil नी नितीनचं नाव आणि त्याखाली त्या बॉक्स चा नंबर लिहिला होता. सगळ्या बॉक्सेस एकसमान रंगाच्या आणि सारख्याच दिसणाऱ्या..... जणू काही युनिफॉर्म घालून त्यावर nameplate लावून कूच करायच्या तयारीत ! ते बघून मनात एक मजेशीर विचार आला- आर्मीची शिस्त ही त्यातल्या लोकांबरोबरच त्यांच्या वस्तूंमधेही उतरते वाटतं!
आणि त्यावेळी माझ्या मनात आलेला हा विचार काही वर्षांनंतर माझ्या एका मैत्रिणींनी पण बोलून दाखवला..आम्ही जेव्हा सिकंदराबाद ला होतो तेव्हा ती माझ्या घरी आली होती,त्या वेळी ती मला म्हणाली,” तुझ्या घरातल्या सगळ्या वस्तू पण एकदम शिस्तीत आहेत की गं! त्यांना पण training देता की काय? बघ ना, सोफ्यावरची सगळी cushions एकदम सरळ रेषेत आहेत, पडद्याच्या चुण्या पण एकदम कडक इस्त्री केल्यासारख्या…”तिच्या या अफाट कल्पनाशक्तीवर आम्ही दोघी मिळून खूप हसलो.
Anyway, सांगायचा मुद्दा हा की आता आम्ही लोहितपुर हुन प्रस्थान करायला तयार होतो. नितीननी मधल्या दिवसांत आमची तिघांचीही ( हो, बाबा पण येणार होते ना आमच्याबरोबर ) ट्रेन reservations करून ठेवली होती. आमची ट्रेन जर्नी तिनसुकीया पासून सुरू होऊन धरमनगर ला संपणार होती.
त्याकाळी (१९९२ सालची गोष्ट आहे ही) आगरतला पर्यंत रेल्वे जात नव्हती. धरमनगर पर्यंत ट्रेन नी जाऊन तिथून पुढे by road जावं लागायचं.
लोहितपुर ते आगरतला पर्यंतचा प्रवास देखील तीन टप्प्यात होणार होता. पहिला टप्पा ‘लोहितपुर ते रुपाई transit camp’. दुसऱ्या टप्प्यात वर सांगितल्याप्रमाणे तिनसुकीया ते धरमनगर हा ट्रेन चा प्रवास.. पण त्यात ही मधे लामडिंग ला ट्रेन change करायला लागायची.
आणि शेवटचा टप्पा होता धरमनगर ये आगरतला हा प्रवास (by road).
हे सगळं ऐकल्यावर मला आमचा लग्नानंतरचा ‘हैदराबाद ते लोहितपुर’ हा प्रवास आठवला. इतक्या लवकर लोहितपुर ला अलविदा म्हणायला लागेल असं स्वप्नातही नव्हतं वाटलं.पण एक मात्र नक्की होतं- यापुढे मी देशभरात कुठेही जाऊन राहिले तरी लोहितपुर च्या माझ्या घरात व्यतीत केलेले ते दोन अडीच महिने कायम माझ्या मनात, माझ्या आठवणींत राहणार होते!
आणि बघा ना, आज तब्बल २६ वर्षांनंतरही मला तेव्हाची प्रत्येक गोष्ट आठवतीये, अगदी कालच घडून गेल्यासारखी!
माझं हे लिखाण वाचणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं,” तुला इतकं सगळं तपशीलवार कसं लक्षात आहे? तू डायरी लिहितेस का सुरुवातीपासून?”
पण नाही हो, रोज बसून डायरी लिहिण्याचा patience नाहीये माझ्यात!
पण खरं सांगायचं तर मला हे सगळं कुठेही लिहून ठेवायची कधी गरज च नाही भासली. कारण त्या दिवसांचा नुसता विचार जरी केला ना तरी आपोआप सगळं काही डोळ्यांसमोर दिसायला लागतं- एखादी फिल्म चालवावी तसं… इतकं खोलवर रुजलंय माझं आयुष्य माझ्याच मनात!
जेव्हा finally लोहितपुर सोडायचा दिवस उजाडला तेव्हा मनात मिश्र भावना होत्या. कोणाचाही निरोप घेणं हे नेहेमीच त्रासदायक असतं.. मग ते आपलं घर असो वा मनात घर करून राहणारी आपली माणसं!
बोलता बोलता एक ऑफिसर म्हणाले,” मॅम, असं म्हणतात आणि मानतात ही, की जर तुम्ही एकदा ब्रम्हपुत्रा नदी पार केली तर आयुष्यात पुन्हा सहा वेळा नक्कीच ती तुम्हाला बोलावून घेते. त्यामुळे आत्ता जरी तुम्ही गेलात तरी कधी न कधी परत याल हे नक्की!” त्या क्षणी तो विचार खूपच सुखावह होता.
पण म्हणतात ना, ‘ The only permanent thing in life is CHANGE !’ त्या मुळे मी देखील या बदलाचं स्वागत करायचं ठरवलं आणि जड मनानी लोहितपुर चा निरोप घेतला.
आमच्या रोजच्या वाटेवरचा तो छोटासा धबधबा पार करताना एकच खंत होती-आणि ती म्हणजे ‘ हे तुषार हातावर झेलायची ही कदाचित माझी शेवटची वेळ आहे’.
तिथून रुपाई पर्यंतचा प्रवास म्हणजे एखादी फिल्म रिवाइंड करून बघितल्यासारखा होता. तेच डोंगर, त्याच दऱ्या, तेच नागमोडी वळणाचे रस्ते आणि तीच विशाल आणि अथांग ब्रम्हपुत्रा ! पण आता ते सगळं आपलं वाटायला लागलं होतं.
आम्ही रुपाई च्या transit camp मधे पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. दुसऱ्या दिवशी आमचा तिनसुकीया हुन पुढचा प्रवास सुरु होणार होता.पण रुपाईहून निघण्याआधी मला एक महत्वाचं काम करायचं होतं. म्हणजे आमच्या (लोहितपुरच्या) CO च्या बायकोनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती. रुपाई transit camp मधल्या VIP गेस्ट रूम मधे सगळी सोय नीट आहे ना याची खात्री करून घ्यायची होती. कारण आम्ही गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक खूप मोठ्या पोस्टवरचे सिनियर ऑफिसर आणि त्यांची बायको त्या गेस्ट रूम मधे थांबणार होते आणि तिथून पुढे लोहितपुर ला जाणार होते- official visit साठी.
मी जाऊन एकदा guest room बघून आले. तसं तर सगळं व्यवस्थितच होतं, पण थोडे personal touches द्यायची गरज होती. म्हणून मग मी बाहेरच्या बागेतून थोडी फुलं, पानं आणली आणि दोन तीन flower arrangements केल्या- एक डायनिंग टेबल साठी, एक सेन्टर टेबल साठी आणि एक बाथरूम करता. प्रत्येक vase मधल्या पाण्यात एक एक ऍस्पिरिन ची गोळी टाकली- त्यामुळे फुलं जास्त वेळ फ्रेश राहतात (ही tip मला आमच्या CO च्या बायकोनीच दिली होती.) त्या फुलांमुळे खोलीचा look एकदमच बदलून गेला. The flowers added colour and warmth to the room.
तिथली व्यवस्था मनासारखी झाल्यावर मग मी निश्चिन्त झाले.
दुसऱ्या दिवशी रुपाई हून आम्ही तिनसुकिया ला गेलो आणि तिथून पुढे ट्रेन नी लामडिंग गाठलं. तिथे ट्रेन change करायची होती. पण आमच्या बरोबरच आमचं सामान ही (boxes, स्कूटर वगैरे) पुढच्या ट्रेन च्या luggage van मधे शिफ्ट करायचं होतं. ते सगळं नितीननी manage केलं.
धरमनगर ला पोचेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता त्यामुळे आम्ही तिथे आर्मी गेस्ट रूम मधे राहिलो (अर्थात हे सगळं नितीननी आधीच प्लॅन करून ठेवलं असल्यामुळे आम्हाला प्रवासात कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही झाली.)
ती रात्र गेस्ट रूम मधे थांबून दुसऱ्या दिवशी by road आगरतला ला जायचं असा आमचा प्लॅन होता. पण तिकडे पोचल्यावर कळलं की तिथल्या local transport वाल्यांचा संप चालू होता आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी आगरतला ला जायला कुठलीच गाडी available नव्हती. आणि आमच्या बरोबर आमचं सामानही असल्यामुळे आम्हाला टेम्पो किंवा मिनी ट्रक शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्यामुळे संप मिटेपर्यंत आम्हाला धरमनगर मधेच राहणे भाग होतं. नितीननी तसं त्याच्या आगरतलाच्या ऑफिस मधे कळवलं आणि आम्ही संप मिटायची वाट बघत बसलो.
त्या रात्री जेवतानाचा एक मजेशीर किस्सा सांगते.. आम्ही दोघे आणि बाबा dining hall मधे जेवायला बसलो होतो. आणि तिथल्या mess staff पैकी एकजण आम्हांला काय हवं नको ते बघत होते. गरम पोळ्या आणण्यासाठी ते आत kitchen मधे गेले आणि बराच वेळ झाला तरी नाही आले. तेव्हा नितीन नी त्यांना हाक मारली,” थापा… “ आणि दुसऱ्या क्षणाला ते ‘थापा’ - “ आया साब….” म्हणत पळत बाहेर आले.
मी तर बसल्या जागी उडालेच! कारण आम्ही त्या ‘so called थापा ‘ ना आधी कधीच भेटलो नव्हतो आणि ते civil clothes मध्ये असल्यामुळे त्यांनी nameplate पण नव्हती लावली. मग नितीनला त्यांचं नाव कसं माहीत? मी त्याला विचारलं,”तू ओळखतोस का यांना?” त्यावर तो चक्क “नाही” म्हणाला. “ मग तुला त्यांचं नाव कसं माहीत?” माझा पुढचा प्रश्न! खरं म्हणजे किती साहजिक होता ना हा प्रश्न?
पण माझा हा प्रश्न ऐकून नितीनला मात्र खूप हसू आलं, तो म्हणाला, “ अगं, सोपं आहे. ही गेस्ट रूम ज्या युनिटची आहे त्यामधे north east चे जवान जास्त असतात. आणि गंमत म्हणजे, फक्त हाच नाही तर इथल्या अर्ध्यापेक्षा जास्त jawans चं आडनाव ‘थापा’ असेल!”
आणि खरंच की हो, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिथले सगळे जवान युनिफॉर्म मधे होते, तेव्हा बऱ्याच जणांच्या nameplate वर मला ‘थापा’ हे आडनाव दिसत होतं.
आता मला हळू हळू आर्मी ची ओळख व्हायला लागली होती.
पुढचे दोन दिवस वाट बघण्यातच गेले. संप चालूच होता. माझ्या मनात एक बेसिक प्रश्न आला,” हा जो काही प्रकार चालला आहे त्याला ‘संप’ हे नाव द्यावं असं कुणाला सुचलं असेल. ही म्हणजे -’ नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ अशी गत झाली! म्हणजे बघा ना, नाव आहे ‘संप’... पण तो ‘संपतच’ नाहीये !!!
शेवटी एकदाचा तो संप ‘संपला’. आम्ही आमचा तळ हलवायची तयारी सुरू केली. आमच्या सामानासाठी एक ट्रक तर् मिळाला पण आम्हांला जाण्यासाठी कुठलीही छोटी गाडी (जीप /कार वगैरे) काही केल्या मिळत नव्हती. सुरक्षेच्या कारणामुळे, rather असुरक्षिततेच्या भीतीमुळे कोणीच छोटी वाहनं operate करायला राजी नव्हते.
मग काय, आम्ही पण आमच्या सामानाबरोबर त्या ट्रक मधूनच जायचं ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर आमची सवारी अगरतालाच्या दिशेनी रवाना झाली. आम्ही दोघं आणि बाबा समोर ड्रायव्हर च्या केबिन मधे बसलो, मागे ट्रक मधे आमच्या सामानाच्या बॉक्सेस, क्रेट्स वगैरे सगळं लोड केलं आणि गेस्ट रूम च्या सगळ्या ‘थापा’ भैय्यांचे आभार मानून आम्ही निघालो…..‘विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीला अनुसरून (आमचं बिऱ्हाड अगदी शब्दशः पाठीच्या वर नसलं तरी पाठीच्या मागे तर होतंच).
बाबांना खूप मजा। वाटत होती. मला म्हणाले,” कधी वाटलं नव्हतं की ट्रक मधून प्रवास करतानाही इतकी मजा येईल म्हणून! आता उद्याच्या पत्रांमधून कळवीन सगळ्यांना हा अनुभव.”
प्रवासात बऱ्याच ठिकाणी लोकांचे घोळके जमा झालेले दिसत होते- काही ठिकाणी नारेबाजी चालू होती, म्हणजेच संप जरी मिटला होता तरी त्यांचे प्रश्न अजून सुटले नव्हते बहुतेक.
अचानक एके ठिकाणी छोटी छोटी मुलं स्वछ, शुभ्र कपड्यांमध्ये एक रांगेत चालत जाताना दिसली. मगाशी बघितलेल्या बेशिस्त नारेबाजी च्या अगदी विरुद्ध… मी काही बोलणार तेवढ्यात आमचा ट्रक ड्रायव्हर म्हणाला,” आज १४ नोव्हेंबर है ना। सब बच्चे चाचा नेहरू बनके निकले हैं। “
खरंच की, त्या दिवशी ‘ बाल दिवस’ होता. मागच्या काही दिवसांत इतकी धांदल, धावपळ चालू होती की तारीख, वार यांचं काही भानच नव्हतं.
आगरतला ला पोचेपर्यंत दुपार उलटून गेली होती. आमच्यासाठी एक temporary accomodation तयारच होतं. त्यामुळे आम्ही सरळ त्या घरातच आमचं सामान उतरवलं.
माझ्या मनात आलं,” लग्नाआधीची चोवीस वर्षं मी एकाच गावात, एकाच वास्तूत राहिले. पण गेल्या चार महिन्यांत आता हे माझं दुसरं घर !”
मी बऱ्याच वेळा एक वाक्य ऐकायची, खास करून माझ्या आजीकडून.. ती म्हणायची,” लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं!” काही अंशी खरंच होतं ते. इतर मुलींचं माहीत नाही, पण मला मात्र हा बदल खूप हवाहवासा वाटणारा होता. या सगळ्या विचारांतच मी माझ्या नवीन घरात प्रवेश केला.
ऑफिसर्स मेस मधून आलेला चहा पिऊन थोडे ताजेतवाने झाल्यावर मी आणि नितीन नी सामान unpack करायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख. याचे पुस्तक करायचे कृपया मनावर घ्याच. तुम्ही म्हणाल, यात काय नवीन आहे, हजारो आर्मी वाइव्ज आहेत वगैरे वगैरे. पण त्या हजारोंपैकी किती जणींनी पुस्तके लिहिली आहेत या जीवनावर? आणि तुम्ही इथे लिहीत आहात त्याचा प्रतिसाद पाहता या लिखाणाची लोकांत उत्सुकता आहे हे तुम्हाला जाणवत असेलच

हो, बऱ्याच जणांनी मला सांगितलं आहे पुस्तकाबद्दल. खरं म्हणजे मी जेव्हा हे लिहायला सुरुवात केली तेव्हा इतक्या उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. पण आता वाटतंय की खरंच याचं पुस्तक बनवावं.

खरंच पुस्तक तयार करा...खूपच सुंदर आणि पाॅझिटीव्हीटी दर्शवणारं लेखन आहे तुमचं....सगळ्यांनाच फार आवडेल असे अनुभव वाचायला....सुरेख लिहीता तुम्ही....चित्रदर्शी लेखन आहे....

फारच छान! आणि हे सगळं तुम्हाला केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर आठवतय हे तर __/\__!
खरंच या अनुभवांचे पुस्तक व्हायला हवे.
पुभाप्र!

छानच लेख हा पण. सिकंदराबाद कँट एकेकाळी आमचे दुसरे घर होते. तुमच्या रुपाने मला माझी नणंदच परत भेटते आहे. ती मागच्याच वर्शी कॅन्सरने वारली. तिचे मिस्टर आर्टीत होते. ते सीओ असताना आम्ही अलाहाबादला त्यांच्या घरी जाउन आर्मीचा पाहुणचार अनुभवला आहे. व मग ते सिकंदराबाद कँट मध्ये पण आले होते दोन तीन वर्शे. आज तिच्या मुलीचा जन्म दिन आहे. ही देव्ळाली एम एच मध्ये जन्मली. तुमचे वर्णन एकदम पर्फेक्ट आहे. विशे ष तः ते शिस्तीबद्दल पडदे एकसारखे वगैरे. अगदी अगदी झाले.
विश यू द बेस्ट.

अमा, माझ्या लिखाणातून तुम्हला तुमची नणंद परत भेटते आहे हे वाचून एक आंतरिक समाधान मिळालं. तुमच्या भाचीला माझ्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.
माझा नवरा पण artillery मधेच होता. त्यामुळे पुढच्या एखाद्या भागात तुम्हाला परत देवळाली चं वर्णन वाचता येईल, कारण आम्ही पण होतो तिथे. तुम्ही तुमच्या brother in law चं नाव सांगू शकाल का? कदाचित ते आमच्या परिचयाचे असतील.

सुंदर अनुभव रेखाटन ....

मिलिटरी विषयी काहीही वाचावेसे वाटते त्याच उत्सुकतेने लेख वाचायला घेतला .

बघ ना, सोफ्यावरची सगळी cushions एकदम सरळ रेषेत आहेत, पडद्याच्या चुण्या पण एकदम कडक इस्त्री केल्यासारख्या…”तिच्या या अफाट कल्पनाशक्तीवर आम्ही दोघी मिळून खूप हसलो. ?? +११ सुंदर लेखन....

खूप दिवसांनी लॉग इन केलं, अन हे सापडलं, मॅम खूप मस्त लिहिता तुम्ही. अन मुख्य म्हणजे एका आर्मी वाईफच्या नजरेतून आर्मी लाईफ हे वेगळेपण फारच उत्तम वाटते. लवकर लवकर पुढले भाग येऊ द्या Happy , पुन्हा कधी लॉग इन करायची संधी मिळाली तर असेच काहीतरी लिहून जाईन कॉमेंट मध्ये Happy

मस्त सुटसुटीत पण खिळवून ठेवणारा भाग झाला आहे हा! पु भा प्र!!!
एक विचारू का? माझं अस observation आहे की आर्मी मध्ये कोणालाही जेवायला बोलावणं हे खुप फॉर्मल असत म्हणजे क्रोकरी, serving bowls वगैरे तुम्ही

माझी वरची पोस्ट अर्धीच का दिसतेय काही कळत नाही.
माझा प्रश्न असा होता की तुमच्याकडे तेव्हा फारसे सामान नसतांना तुम्ही फॉर्मल dinner/lunch कसे manage केले?

वत्सला, तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. त्यावेळी आमच्याकडे जास्त crockery नव्हती. पण ऑफिसर्स मेस मधून आम्ही आवश्यक त्या वस्तू .. crockery, cutlery वगैरे त्या दिवसा पुरत्या घेतल्या होत्या.
माझ्या अकराव्या भागात खालच्या comments मधे मी माझ्या ब्लॉगची लिंक दिली आहे. त्यात बरेच photos share केले आहेत. Please visit my blog and leave your comments. Happy