शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

Submitted by shantanu paranjpe on 18 April, 2018 - 06:20

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.

केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही इंग्रजांनी लिहिलेले आहेत. मात्र या पुराव्यांमधून केवळ २ प्रकारची माहिती पुढे येते. एक म्हणजे ज्वर झाला होता अशी जी बहुतांश पुरावे थोड्या फार फरकाने सांगतात आणि दुसरी म्हणजे विषप्रयोग झाला अशी. यांमुळे या सर्व पुराव्यांची चिकित्सा करणे हे फार महत्वाचे ठरते. आपण प्रथम एका खाली एक लिखित पुरावे काय सांगतात ते पाहू म्हणजे त्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

१. सभासद बखर-

कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली. हा सभासद महाराजांच्या पदरीच कामाला असल्याने त्याने लिहिलेल्या बखारीची विश्वासार्हता ही इतर अनेक बखरीपेक्षा कैक पटीने जास्त आणि सर्वमान्य आहे. सभासद असे सांगतो की, “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो.

२. याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र, हे पत्र समकालीन आहे.

“Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it's said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.”

३. जेधे शकावली-

जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”

४. मराठ्यांची बखर- ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन

डफने ही बखर अनेक पत्रांचा आधार घेऊन लिहिली असल्याने अनेक जण याचा संदर्भ ,म्हणून वापर करतात परंतु ही तितकी विश्वासार्ह नाही. डफ म्हणतो,

“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा, शिवाजी रायगडी असतां त्याला गुढघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृध्धींगत होत चालला. मग त्याच्या योगेकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.”

५. श्रीमंत महाराज भोसले (शेडगांवकर) यांची बखर- मराठी रुमाल भाग १

“शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.”

६. ९१ कलमी बखर (भारतवर्ष)-

वाकसकर यांनी छापलेल्या या बखरीचा सुद्धा एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला जातो. त्यात लिहिले आहे की,
““नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”

७. Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)

निकोलाओ मनुची हा इटालीयन प्रवाशी होता. त्याने आपल्या पुस्तकात शिवाजी राजांची तसेच संभाजी राजांची व त्यांच्या कारकीर्दिची टिपणे काढून ठेवली आहेत. तो म्हणतो,

“तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला.”

८. मासिरे आलमगिरी-

साकी मुस्तैदखान हा मनुष्य औरंगजेबाच्या पदरी होता. त्याने मासिरे अलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो की,

“आमदानीचे २३वे वर्ष १०९१ हि.(मे १६८०) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली”

९. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६,डाग रजिस्टर १६८०

ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे.
“गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा”

१०. तारीखे शिवाजी (सर जदुनाथ सरकार प्रकाशित, अनुवाद वि. स. वाकसकर (९१ कलमी बखर) –

“as the maharajah's destined period of life had come to its end the queen's heart changed and she did an act (poisoning ?) Which made Shivaji give up his life”

११. History of Aurangzib (Vol. IV, Ssouthern India 1645-1689) -Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी केलेला उल्लेख हा इंग्रजांच्या पत्रावरूनच केलेला दिसून येतो.

“On 23rd. of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentery. The illness continued for twelve days. Gradually all hopes of recovery faded away, and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ....the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance, which imperceptibly passed into death.”

आता या सर्व उल्लेखांमधून निष्कर्ष काय निघतात ते पाहू,

१. वर दिलेल्या ९ संदर्भांपैकी ८ संदर्भ हे सांगतात की राजांचा मृत्यू हा आजारी पडूनच झाला होता. अर्थात नेमक्या कोणत्या आजाराने याबद्दलच्या तपशिलात फराज जाणवतो हे नक्की. परंतु त्यावेळी असलेले वैद्यकीय ज्ञान आणि दळणवळणाची साधने लक्षात घेता हा फरक होणे साहजिक आहे. दळणवळणाची साधने यासाठी की महाराष्ट्रात असणाऱ्या तत्कालीन परदेशी व्यापारांची पत्रे पहिली तर असे लक्षात येते की मृत्यू झाला का नाही याच्या बद्दलच त्यांच्या मनात शंका होती. जे इच्छूक आहेत त्यानी शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मध्ये लेखांक २२४९ ते २२५३,२२५८ ते २२६१ ,२२७५,२२८१,२२८६,२३०२,२३०७ इत्यादी पत्रे जरूर वाचावी.

२. अनेक जण हा मृत्यू विष पाजल्यामुळे झाला असा बिनपुरावी आरोप करतात आणि त्याचे खापर अष्टप्रधान मंडळातील लोकांवर करतात. यासाठी पुरावा म्हणून ते डाग रजिस्टरचा उल्लेख करतात. आता वर त्या पत्रातील उल्लेख आहे. ते पत्र सांगते की विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला. अर्थात हा तपशील सुद्धा चूकच आहे. कारण एक तर ही बातमी गोवळकोंडा येथून आली होती त्यामुळे तिची विश्वासार्हता किती असेल याबद्दल शंकाच आहे आणि दुसरे म्हणजे इतर कोणतीही साधने विष पाजल्याचा उल्लेख करत नाहीत. उलट ते हेच सांगतात की राजांनी मृत्यूशय्येवर असताना जाणत्या लोकांना बोलावून घेतले आणि चार उपदेशाचे शब्द सांगितले. यासाठी संदर्भ म्हणून सभासद बखर,चिटणीस बखर,९१ कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इत्यादी पाहू शकता.

३. तिसरा आरोप असा केला जातो की विषप्रयोग केला म्हणून संभाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना जीवे मारण्याची शिक्षा दिली. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की संभाजी राजांनी जानेवारी १६८० मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. यावेळी अष्टप्रधानात त्यांनी जुन्या सर्व लोकांना जागा दिली होती. पुढे अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला म्हणून त्यांना मृत्युदंड सुनावला. त्यामुळे जर शिवाजी राजांना विषप्रयोग झाला असता तर राजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी राजांनी या सर्वांना देहदंड लगेचच का नाही सुनावला आणि त्यावर कडी म्हणजे अष्टप्रधान मंडळात पुन्हा सर्वांना का जागा दिली हा प्रश्न पुढे उभा राहतोच.

४. भोसले बखर तसेच सभासद बखर यांमध्ये तर यादीच आहे की राजांच्या अंत्यसमयी कोण कोण उपस्थित होते अशी. ती वाचल्यावर दिसून येते की मोरोपंत, हंबीरराव मोहिते, अण्णाजीपंत दत्तो हे सर्व जण रायगडाच्या बाहेर होते. मृत्यूची वार्ता समजल्यानंतर ते रायगडी आले. अष्टप्रधान मंडळात ही तीन महत्वाची माणसे होती तीच अंतसमयी किल्ल्याच्या बाहेर स्वारीवर होती. त्यामुळे कट झाला असल्यास कधी झाला आणि कुणी केला हा एक प्रश्न पुढे उभा राहतो.

५. सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली असा उल्लेख तो करतो. आता महाराजांचे जेव्हा निधन पावले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरच होते त्यामुळे सभासदाने लिहिलेले जर चूक असते तर मग राजाराम महाराजांनी त्याला विरोध नक्की केला असता.

६. याव्यतिरिक्त सुद्धा अनेक पत्रे तसेच लेखक या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात करतात. मात्र विस्तार भयास्तव ती सर्व साधने इथे देणे शक्य नाही परंतु जे जिज्ञासू आहेत त्यांनी ‘History of Sevagi and his successor, recent Conquerors in India by Father Pierre Joseph d'Orleans’, शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मधील वर उल्लेख केलेली पत्रे, चिटणीस बखर, तारीखे शिवाजी, मराठी साम्राज्याची छोटी बखर, इत्यादी ऐतिहासिक पुरावे वाचूनच निष्कर्ष काढावा.

७. छत्रपती शिवाजी राजांचा मूत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे खरी आणि अशा घटनेवरून राजकारण केले जात आहे ही हे तर अतिशय धक्कादायक आहे. वर नमूद केलेल्या सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता. त्यामुळे सोयराबाई यांनी विषप्रयोग केला किंवा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी त्यांना मारले या बाजारगप्पांना काही अर्थ उरत नाही हेच खरे.

बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात त्यामुळे आपण पुरावे वाचून निष्कर्ष काढाल असे वाटते.

संदर्भ साधने-

१. एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
२. सभासद बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३. मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
४. जेधे शकावली
५. शिवकालीन पत्रसारसंग्रह
६. English records on Shivaji
७. History of Aurangzeb (vol. IV, southern India 1645-1689) -Sir Jadunath Sarkar
८. History of the Marathas-Grant Duff (मराठी अनुवाद- कॅ.डेव्हीड केपन साहेब)
९. Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci
१०. मासिरे आलमगिरी – साकी मुस्तैदखान

© 2017 www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्र टाईम्स मध्ये दिलेल्या लेखात चांगली माहिती होती पण शेवटच्या उताऱ्यात लेखकाने माती खाल्ली!! रामदास स्वामींचे अस्तित्व सभासद बखरीत नाव नाही म्हणून नाही असे असेल तर हास्यास्पद आहे ते लिखाण!!>>>
रामदास स्वामींचे अस्तित्व त्या लेखात नाकारलेले नाही. केवळ रामदास हे शिवाजीचे गुरू होते हा निखालस खोटारडा दावा नाकारला आहे.
रामदास शिवाजीचे गुरू होते हे 'सत्यसाईबाबा हे तेंडुलकरचे गुरु होते' म्हणण्याइतकेच मूर्ख आणि असत्य विधान आहे. तेंडुलकर स्वतः भले सत्यसाईबाबाला गुरू मानत असेल, पण उद्या कोणी 'सत्यसाईबाबा हा तेंडुलकरचा कोच होता' असे म्हणू लागला तर कसे चालेल?
इथे रामदासांची सत्यसाईबाबा या भोंदू माणसाबरोबर तुलना करायची नाही. पण 'समर्थ रामदासांना पुनःपुन्हा शिवछत्रपतींच्या गुरुस्थानी विराजमान करण्याचा दुष्ट प्रयत्न वर्णवर्चस्व अहंकारातून चालू असतो' या मताशी मी सहमत आहे. एवढ्यावरून लेखकाला तो लेख 'हास्यास्पद' वाटत असेल तर लेखकाच्या न्युट्रल भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

350, 400 वर्षांपूर्वी जे घडले (तेच आज चाललेले नसेल तर) त्यावरून आज निर्णय घेऊ नयेत ह्या महान वाक्यासाठी टाळ्या

हेच वाक्य दीडशे ते दोनशे वर्षे कमी केल्यावरही लागू होत असेल तर पुढच्या वर्षी भीमा कोरेगावला जाहीर सभा घ्या व बोला

रामदास स्वामींचे अस्तित्व त्या लेखात नाकारलेले नाही. केवळ रामदास हे शिवाजीचे गुरू होते हा निखालस खोटारडा दावा नाकारला आहे.
Submitted by π on 19 April, 2018 - 18:15
<<

समर्थ रामदास स्वामी किंव्हा दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे 'गुरु' नव्हते, हा तुमचा दावा सिद्ध करायला एकादा अस्सल ऐतिहासिक पुरावा तुमच्य्याकडे आहे का ? कि वरिल टळक केलेले विधान बिग्रेड आय मीन ब्रिगेडी इतिहास वाचून तुम्ही केले आहे.

एखादी गोष्ट नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा, असं आजच्या दिवसात दुसर्‍यांदा वाचायला मिळालं
(पहिल्यांदा फेसबुकवर - महाभारत काळात इंटरनेट नव्हतं हे सिद्ध करून दाखवा म्हणे)

एखादी गोष्ट नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा, असं आजच्या दिवसात दुसर्‍यांदा वाचायला मिळालं
(पहिल्यांदा फेसबुकवर - महाभारत काळात इंटरनेट नव्हतं हे सिद्ध करून दाखवा म्हणे)
नवीन Submitted by भरत. on 19 April, 2018 - 19:17
<<

नाही,
त्यांनी "रामदास हे शिवाजीचे गुरू होते हा निखालस खोटारडा दावा नाकारला आहे" असा दावा इतक्या छातीठोकपणे केला असल्याने त्यांच्याकडे काही ऐतिहासिक अस्सल कागदपत्रे असतील ह्या विचाराने मी त्यांच्याकडे पुरावा मागितला.

अरे व्वा

मुर्ख वाद उकरून काढणार्या हलकट्टेकरींचे पाय या धाग्यास लागले.

लेखकाने अभ्यास करून लिहीलेलं दिसत आहे. शुक्राचार्यासारखे सर्वे करून लिहीले नाही नशिब म्हणावे लागेल Wink
अभिनंदन

धाग्यास माझा प्रणाम..!!
जय शिवाजी, जय भवानी..

ते त्यांचे गुरू नव्हते'' हे सत्य आहे हे सिद्ध करून दाखवा अशी वाक्यरचना केली की मग त्यांना (फक्त वाक्यरचना) पटू शकेल.

आता सारवासारव करून उपयोग नाही हो. व्हायचं ते झालं.

त्या लेखकाकडे तुम्ही इथे शड्डु ठोकून पुरावा मागताय. त्यांना ते जिथे कुठे असतील, तिथे तुम्ही पुरावा मागितल्याचा साक्षात्कार होणार आहे का?

शिवाय बखरीच्या वस्तुनिष्ठतेसाठी ते शेजवलकरांची साक्ष काढताहेत, वस्तुनिष्ठ का त्याबद्दल चारपाच ओळी आहेत, त्यातली एकच तुम्हांला टोचलीय. बखरीत रामदासस्वामींचं नाव एकदाही नाही, असा दावा करताह्रेत.
तो खरा असला, तर तुम्ही कृष्णाजी अनंत सभासद यांनाही ब्रिगेडी ठरवणार का? आणि शेजवलकरांना सुद्धा?
एका वाक्याकडे तुमचं लक्ष गेलं नसेल तर ते दाखवतो."हिंदू दृष्टीने शिवाजींचे चरित्र जाणावयाचे, तर शिवभारत वाचावे लागते. तसेच, शिवाजींचे संपूर्ण चरित्र जाणून घेण्यास सभासदाची बखर वाचावी लागते."
चालू द्या तुमचं.

<<<कुठे नाहीच दिसणे हे तिचे दिसणेच आहे की>>>
असे सुप्रसिद्ध गझलकार बेफिकीर यांनी म्हंटले आहे.
रामदास स्वामींचे नाव शिवाजीचे गुरु होते असे लिहीले नसेल तर त्यावरून अर्थातच रामदास स्वामी हे शिवाजीचे गुरु होते हे सिद्ध होते.
तसे म्हंटले तर मी पण शिवाजीमहाराजांना युद्धशास्त्राचे काही धडे दिले होते. ते तसे लिहीले नाही म्हणजेच ते खरे आहे असे सिद्ध होत नाही का?
आणि रामदास स्वामी शिवाजीमहाराजांचे गुरु होते की नव्हते याचा महाराजांच्या मृत्यूशी काय संबंध - का आता कुणि लिहीणार की स्वांईंनीच महाराजांना विष दिले!!

उग्गीच ४०० वर्षांपूर्वीची गोष्ट उकरून काढायची, दुसर्‍या कुणाचे काहीहि खरे मानायचे नाही, वाट्टेल ते तर्कशास्त्र लावायचे नि फुक्कट की बोर्ड बडवत बसायचे!!
काय फायदा झाला उगाच धागा काढून?
याला म्हणतात गाढवांचा गोंधळ नि लाथाळ्यांचा सुकाळ.

"ही पत्रे गावागावातून गोळा केली आहेत इंग्रजांनी.. त्यात फक्त राजकारण विषयक माहिती नाही तर गावातले तंटे, जमिनीचे हक्क वगैरे यांसारखे असंख्य रुमाल आहेत!"

--> माहितीकरिता आभार.

"सभासदाने त्याच्या बखरीत समर्थ रामदासांचा उल्लेख केला आसता तर थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या मते ती बखर अगदीच टाकाऊ झाली असती का?"

"रामदास स्वामींचे अस्तित्व सभासद बखरीत नाव नाही म्हणून नाही असे असेल तर हास्यास्पद आहे ते लिखाण!!"

--> राजांच्या आयुष्याशी संबंधित महत्वाच्या सर्व व्यक्तींचा उल्लेख बखरकारांनी केलेला आहेच. त्यामुळे ज्यांचे नाव नाही त्यांना फारसे महत्व नसणार हे ओघाने आलेच. बाकी जर तर ह्या चर्चांना अर्थ उरत नाही.

"सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता."

--> हा निष्कर्ष काढण्याची आपणास खूपच घाई झालेली दिसून येते. एकतर त्याकाळातील याविषयासंबंधी जी उपयुक्त कागदपत्रे उपलब्ध आहेत ती (आधीच्या प्रतिसादात मी उल्लेख केल्यानुसार) संदिग्ध आहेत (बखरी किंवा इंग्रजांचे वा इतर अमराठी लोकांचे पत्रव्यवहार वगैरे). सभासदाची बखर सुद्धा याला अपवाद नाही. काव्य लिहिल्यासारखे लिहिले आहे. उदाहरणार्थ हेच वर्णन पहा:

"योगाभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले" "शिवदूत विमान घेऊन आले, आणि राजे विमानी बैसून कैलासास गेले"

krushnaji-anant.jpg

विमान घेऊन आले कैलासला गेले वगैरे या लिखाणाला विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा कशाच्या आधारावर म्हणावे? हे काव्य आहे बस्स.

दुसरे म्हणजे "रक्ताच्या उलट्या" आणि "विषमज्वर" हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. सभासदाच्या बखरीत फक्त ज्वर असा उल्लेख आहे (राजास व्यथा ज्वराची जाहली). उलटी झाल्याचा उल्लेख नाही. पण इतर काही संदर्भ (विशेषतः अमराठी लोकांची कागदपत्रे) राजे विषमज्वराने किंवा शेवटच्या काळात उलटी होऊन गेले असे उल्लेख करतात. (काही ठिकाणी गुडघी रोग असा पण उल्लेख आहे पण तो विश्वासार्ह नाही)

दोन्ही खरे आहे असे मानले तर विषमज्वर मध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या उलट्या होऊ शकतात असे एक वैद्यकीय वेबसाईट सांगते:

https://www.your.md/en-in/condition/typhoid-fever/#complications

पण हा अंतर्गत रक्तस्त्राव जीवघेणा ठरू शकत नाही असेही ते म्हणतात. अगदीच दुबळा कोणी रुग्ण असेल तर एकवेळ हे जीवघेणे ठरू शकेल. पण ज्या लढवय्या राजाने आपली अख्खी हयात युद्धे आणि इतर प्रचंड शारीरिक श्रम लागतात अशा कार्यात व्यतीत केली त्याची शारीरिक तंदुरुस्ती वयाच्या पन्नासाव्या वर्षी कशी असेल याची कल्पना आपण करू शकतो.

आजकालचे रोज तासभर व्यायाम करणारे लोकसुद्धा तंदुरुस्त असतात. अशा पार्श्वभूमीवर विषमज्वराचे वगैरे निमित्त होऊन उलट्या झाल्या आणि एक धडधाकट योद्धा तडकाफडकी गेला यावर विश्वास बसणे महाकठीण आहे.

आजकालचे रोज तासभर व्यायाम करणारे लोकसुद्धा तंदुरुस्त असतात>>>>>

तासभर व्यायाम करणारे, खाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन फक्त आरोग्यदायक तेच खाणारे, पूर्ण निरोगी जीवनशैली अंगिकरणारे लोकसुद्धा तडफातडफी, डॉक्टरी मदत मिळण्याची संधी न मिळता गेले. याची कारणमीमांसा करून त्यांच्या हातून काय आरोग्यविषयक चुका झाल्यात यावर रकाने भरून लिहिले गेलेय. अशी उदाहरणे खूप आहेत त्यामुळे अमुक व्यक्ती अमुक एक आरोग्यदायी जीवनशैली पाळतेय म्हणजे तिला अमरत्व प्राप्त झालेले आहे असा निष्कर्ष काढता येईल असे वाटत नाही.

साधना यांचा प्रतिसाद = डॅमेज कंट्रोल इन अ‍ॅक्शन. ↑
**
इतिहास कसा शिकवू नये, अन शिकू नये, हे आपल्या देशात शिकायला मिळते. सगळीकडे अभिनिवेश.

गतकाळाची होळी झाली
धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी
ये उदयाला नवी पिढी।

हे समजायचे सोडून आमच्या गतकाळी आमच्या पूर्वजांना अमुक येत होते, तमुक अन ढमुक करायला सुरुवात केली, तर भूतकाळ अती रम्य असे समजून पुढे जायचे सोडून मागे जाणे सुरू होते. अन नेमक्या चुकीच्या प्रथापरंपरा वा व्यक्तीही पूजल्या जाणेही सुरू होते.

"आपल्या देशात दुर्दैवाने कर्तुत्वाला नसून dynasty ला जास्त महत्व दिले जाते!" << असल्या वाक्यांतून "अभ्यासू" लेखकांचे नक्की काय बायस आहे ते आपसूक दिसत जाते. (इतिहासाचा अभ्यास असेल, तर डायनॅस्टी सोडा हो, जाती संस्थेबद्दलही अभ्यास असेलच ना? त्यात "आपल्या देशात नक्की कोणत्या कर्तृत्वाला महत्व होते ते लग्गेच समजेल. पण ते जौ द्या. फुले आंबेडकरांच्या लेखनातली ओरिजिनिल भाषा जरा वाचून पहा, हे इतके विखारी का बोलत असा प्रश्न पडेल.) तेव्हा लेखाखाली बिब्लिओग्राफी दिली, म्हणजे डिझर्टेशनमधले निष्कर्ष योग्य असतीलच असे नव्हे. डेटासेट व रिसर्चर कसा आहे तेही पहायला हवे.

अन, जर डायनॅस्टीला महत्व नाही, तर काय करक पडतो राजा कसा मेला त्याने? काय गरज हो मुळातच हा लेख पाडायची? असो.

बाकी डॅमेज कंट्रोल. : Wink त्याकाळचे अ‍ॅव्हरेज लाईफस्पॅन किती होते? अगदी १८व्या शतकाशेवटी/१९वे शतक अर्धे होईतो भारतात ६० झाले की डोईवरून पाणी. तेव्हा अ‍ॅक्चुअली थोरले राजे ५०शीत अचानक व्हायरल/तत्सम आजारास बळी पडले, हे होऊच शकते. (संदर्भ : माया/इंका संस्कृती लयास जाण्यापाठी नुसती पोर्तुगिजांची नुसती शस्त्रे कारणीभूत नव्हती. पोर्तुगिजांनी तिथे नेलेले संसर्गजन्य आजारही तितकेच जबाबदार होते. -युरोपियन्सना इम्युनिटी होती. अमेरिकन्सनानव्हती- राजा म्हणून वेगवेगळ्या देशींचे दूत भेटीस येत, त्यातून नव्या विषाणूशी संसर्ग अगदीच "अनइमॅजिनेबल" नाही)

असो.

जुन्या मायबोलीवर लिहायचे तसे, "अत्यंत संयत व अभ्यासू लिखाण. तुझ्या अभ्यासूपणाला उपमाच नाही, शंतनू" असे म्हणून, शेवटी दोन !! देऊन प्रतिसाद संपवतो.

आजकालचे रोज तासभर व्यायाम करणारे लोकसुद्धा तंदुरुस्त असतात. अशा पार्श्वभूमीवर विषमज्वराचे वगैरे निमित्त होऊन उलट्या झाल्या आणि एक धडधाकट योद्धा तडकाफडकी गेला यावर विश्वास बसणे महाकठीण आहे.>>>

बाजीरावांचा मृत्यू कसा झाला ते बघा आणि माधवरावांचा मृत्यू कसा झाला ते बघा!! एखाद्या माणसाला कधी कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. अति थकव्यामुळे किंवा अति दगदगीमुळे थकवा येतो. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांना काहीच होत नाही या मताशी मी सहमत नाही. आणि मला कोणतेही निष्कर्ष काढायची घाई झालेली नाही!! जर तुमच्याकडे दुसरा कोणता पुरावा असेल तर तो द्या की. मी पुरावे देऊन म्हणालो आहे सर्व. माझा कोणताही तर्क त्यात नाही.. पुराव्यांवरून निष्कर्ष काढणे यात काहीच चूक नाही. जे पुरावे दाखवतात तेच मी सांगतो आहे

रामदास स्वामीना कोणीही राजांचे गुरु म्हणत नाही. शिवाजी राजांच्या नंतरच्या पिढ्यांनी त्यांना गुरु म्हणून कायम मान दिला आहे हे भाग वेगळा. पण शिवाजी राजांचे गुरुपण रामदास स्वामींकडे जात नाही. राजे स्वयंभू होते आणि रामदास स्वामी सुद्धा स्वयंभू होते. दोघेही आपापल्यापरीने स्वराज्याचे काम करत होते. राजांनी शस्त्र उगारून यवनांना बाहेर घालवले तर रामदास स्वामिनी तीर्थाटन करून लोकांना धर्माचे आणि शक्तीचे महत्व समजावून सांगितले. राजांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राजांचा आणि रामदास स्वामींचा संबंध आला. त्याकाळात रामदास स्वामिनी राजांना अध्यात्मिक मार्गदर्शन केल्याची शक्यता नाकारता येत नाही!! पण स्वराज्य संकल्पना ही फक्त आणि फक्त राजांची होती आणि त्या संकल्पनेला साथ इतर मावळे आणि अष्टप्रधान मंडळातील जाणते यांनी दिली

हिंदू दृष्टीने शिवाजींचे चरित्र जाणावयाचे, तर शिवभारत वाचावे लागते. तसेच, शिवाजींचे संपूर्ण चरित्र जाणून घेण्यास सभासदाची बखर वाचावी लागते>> तसं बघायला गेले तर शिवभारत सुद्धा एक काव्य आहे आणि काव्याच्या दृष्टीने लागणारी अलंकारिक भाषा त्यात आहे.. तसेच ते काव्य अपूर्ण आहे. राजांचे चरित्र जाणून घ्यायचे असेल तर अस्सल समकालीन पत्रांना पर्याय नाही तसेच रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेले आज्ञापत्र हे सुद्धा उपयुक्त साधन आहे..

असल्या वाक्यांतून "अभ्यासू" लेखकांचे नक्की काय बायस आहे ते आपसूक दिसत जाते. (इतिहासाचा अभ्यास असेल, तर डायनॅस्टी सोडा हो, जाती संस्थेबद्दलही अभ्यास असेलच ना? त्यात "आपल्या देशात नक्की कोणत्या कर्तृत्वाला महत्व होते ते लग्गेच समजेल. पण ते जौ द्या. फुले आंबेडकरांच्या लेखनातली ओरिजिनिल भाषा जरा वाचून पहा, हे इतके विखारी का बोलत असा प्रश्न पडेल.) तेव्हा लेखाखाली बिब्लिओग्राफी दिली, म्हणजे डिझर्टेशनमधले निष्कर्ष योग्य असतीलच असे नव्हे. डेटासेट व रिसर्चर कसा आहे तेही पहायला हवे.>>>>>

मला काय म्हणायचे आहे हे समजून न घेता कमेंट केल्याबद्दल आभार. निष्कर्ष योग्य नसतील तर तुम्ही योग्य पुरावे देऊन खोडून काढा की. उलट तुम्हाला जर काही चुकीचे वाटत असेल तर समकालीन पुरावे देऊन बिनधास्त खोडून काढा. मला अजिबात वाईट वाटणार नाही. मी संदर्भ देऊन बोलणारा माणूस आहे. उगाच लेखकाचा हेतू वगैरे वर शंका घेणार असाल तर माझा आग्रह आहे की तुम्ही पुरावे देऊन तुमचे निष्कर्ष मांडाच. नाहीतर नुसतेच बोलल्यासारखे होईल.

लेख लिहिण्यामागे कोणताही बायस उद्देश नाही. उलट हल्ली जो प्रचार केला जात आहे की विषप्रयोग केला वगैरे तो खोडून काढण्यासाठी हा लेख आहे. विषप्रयोगाच्या प्रचारातून सोयराबाई यांचे नाव खराब होत आहे जे कोणताही मराठी माणूस सहन करणार नाही. त्यामुळे पुरावे देऊन हे सिद्ध करावे लागले की विषप्रयोग झाला नाही तर आजाराने गेले राजे.

बापरे, महाराष्ट्राबाहेर अनेक वर्षे असल्याने माझे इतिहासाविषयीचे ज्ञान एकदम मागासले आहे हे जाणवले. म्हणजे शिवाजीचा मृत्यू हा विवाद्य विषय ठरत आहे हेच मज बापुडीस ठावे नव्हते. असो.
अभ्यासकांसाठी हे खर्‍या अर्थाने कलियुग आहे. नको त्या फालतू मुद्द्यांवर राळ उडवून भावनांची भडकाभडकी करून सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी इतिहासतथ्यांना हवं तसं वाकवलं/ फिरवलं जातंय. सगळेच जण स्वयंघोषित इतिहासकार झालेत. आणि खरंच इतिहासात ज्या प्रश्नांवर काम करायला हवं आहे, त्यासाठी जे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संसाधने गरजेची आहेत त्याच्या कमतरतेविषयी कुणाला काडीमात्रही काही पडलेले नाही...

चालूद्यात!

लेख लिहिण्यामागे कोणताही बायस उद्देश नाही. उलट हल्ली जो प्रचार केला जात आहे की विषप्रयोग केला वगैरे तो खोडून काढण्यासाठी हा लेख आहे.
<<
लेख नव्हे, प्रतिसादातील तुमचे वाक्य मी तिथे दिलेले आहे. तेव्हा मी काय म्हणतोय ते तुम्हाला नीट समजलेले आहेच.
पुलेशु.

इतिहास फक्त कम्युनिस्टांनी लिहिला अन म्हणून तो वाईट आहे, हा जो प्रचार आजकालच्या कमळ्यांनी चालवला आहे, तो पाहून इरिटेट होते, इतकेच.

विषप्रयोगाच्या प्रचारातून सोयराबाई यांचे नाव खराब होत आहे जे कोणताही मराठी माणूस सहन करणार नाही.
<<
अखंडसौभाग्यवती वज्रचुडेमंडित महाराणी सोयराबाईसाहेब यांचे तुम्ही इतके खंदे पाईक आहात हे वाचून गहिवरलो. मराठी माणूस हे सहन करणार नाही हे वाचून रक्त सळसळले!!

कोणत्या लेखकाने कुठे माती खाल्ली ते दिसतंय का?
*संदर्भ : आपलाच प्रतिसाद Wink

साधना यांचा प्रतिसाद = डॅमेज कंट्रोल इन अ‍ॅक्शन
>>>>>>
भाऊ, तुमच्या इतिहासात मला रस नाही. मी कोण आहे, कांय आहे तुम्हाला काडीचीही कल्पना नाही, तुमच्यात मला काडीचाही रस नाही अशा वेळेला मला कसल्याही डॅमेज कॅट्रोल मध्ये रस आहे अथवा नाही याबद्दल तुम्हाला भाष्य करायची गरज नाही.

मला जितक्या भागात रस आहे तितका मी प्रतिसाद दिला. 300 400 वर्षापूर्वी जे घडले/घडले नाही/घडायला हवे होते/घडले असा भास होतोय त्यात मला काडीचाही रस नाही. इतर कोणाला रस आहे का जाणण्यातही मला सध्या रस नाही. वेळ असला की येईन इथे.

जे प्रत्यक्ष घडले त्याच्यात आज कोणाला कसले भास होताहेत याने काडीचाही फरक पडत नाही.

"अमुक व्यक्ती अमुक एक आरोग्यदायी जीवनशैली पाळतेय म्हणजे तिला अमरत्व प्राप्त झालेले आहे असा निष्कर्ष काढता येईल असे वाटत नाही."

--> माझे वाक्य धाग्याच्या संदर्भात होते. त्याकाळात विषाणूजण्य आजाराला खूप माणसे बळी पडत हे जरी खरे असले तरी:

१. एका लढवय्या योद्ध्याची रोगप्रतिकारक शक्ती इतकी दुबळी कशी असेल
२. तो राजा असूनही त्याला त्याकाळात सर्वोत्तम असलेले उपचार मिळू शकत नाहीत किंवा जरी मिळाले असले तरी त्याचा उपयोग होत नाही

या दोन गोष्टींवर शंका घ्यायला बक्कळ वाव आहे.

"बाजीरावांचा मृत्यू कसा झाला ते बघा आणि माधवरावांचा मृत्यू कसा झाला ते बघा!! एखाद्या माणसाला कधी कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. अति थकव्यामुळे किंवा अति दगदगीमुळे थकवा येतो."

--> बाजीराव पेशवे उष्माघाताने निधन पावले. माधवरावना दोन वर्षे राजयक्ष्मा(टीबी) झाला होता. या दोघांच्या मृत्यूबाबत विविध मते किंवा प्रवाद नाहीत. लिखापढीची तीच साधने असूनही वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे लिहिलेले नाही. तिथे गोष्टी नि:संदिग्ध आहेत. आजार वा अपघात कोणालाही व कधीही होऊ शकतो मान्य. पण "दगदग झाली, थकले मग दोन चार दिवसात विषाणूजण्य रोगाने गाठले व गेले" हे एखाद्या वय झालेल्या किंवा शरीराने दुबळ्या व्यक्तीला लागू पडते. धडधाकट योद्ध्याला नव्हे. शिवाय मृत्यूच्या कारणाबाबत सर्वांच्यात एकवाक्यता नाही That itself says a lot.

याविषयावर आपण पुरावे गोळा भरपूर केलेत याबद्दल माझे तरी दुमत नाही. नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण त्या पुरावांच्या आधारे तुमचे निष्कर्ष घाईने आणि चुकीचे निघत आहेत असे माझे म्हणणे आहे. कारण उपलब्ध पुरावे नि:संदिग्ध नाहीत.

१. ज्वर कोणता होता? विषमज्वर कि साधा?
२. रक्ताची उलटी झाली होती कि नव्हती? झाली असेल तर ती नक्कीच नोंद घेण्यासारखे महत्वाची बाब आहे. मग सभासदाने याचा साधा उल्लेख सुद्धा बखरीत का केला नसेल? झाली नसेल तर अमराठी मंडळींनी तसा उगाचच उल्लेख करायचे कारण काय?
४. रक्ताची उलटी झाली असेल तर त्याचे कारण काय असू शकेल? विषमज्वरातल्या रक्ताची उलटी मृत्यूस कारणीभूत ठरू शकत नाही. विषप्रयोग झाला असेल तर तो सोयराबाईनीच केला कशावरून?
३. गुडघी रोग असेही कारण काही लिहितात. त्यांना ते कुणी सांगितले असेल व तसे सांगायचे कारण काय?

इतके सगळ्या संदिग्धता असताना तुम्ही धाडकन

"विषप्रयोग केला वगैरे तो खोडून काढण्यासाठी हा लेख आहे. विषप्रयोगाच्या प्रचारातून सोयराबाई यांचे नाव खराब होत आहे"

असे विधान कसे काय करू शकता. विषप्रयोग झाला कि नाही. असल्यास सोयराबाईनी केला कि अन्य कुणी. काहीच सिद्ध झालेले नाही. जे अजून सिद्धच नाही झाले ते खोडून काढायची घाई तुम्हाला का आहे? यातून काय दिसून येते? मला तर ती उलट्या घागरीवर लटपटणारी मांजर आठवतेय.

पूर्वीच्या काळी जसे राजवाडे, सरदेसाई, खरे यांच्यासारखी माणसे होऊन गेली तशी आत्ता सुद्धा व्हायला हवीत इतकेच.
>>> परदेसाई चालेल का

अखंडसौभाग्यवती वज्रचुडेमंडित महाराणी सोयराबाईसाहेब यांचे तुम्ही इतके खंदे पाईक आहात हे वाचून गहिवरलो. मराठी माणूस हे सहन करणार नाही हे वाचून रक्त सळसळले!!
कोणत्या लेखकाने कुठे माती खाल्ली ते दिसतंय का?
*संदर्भ : आपलाच प्रतिसाद >>>>

एक तर तुम्ही लेख पूर्ण वाचलेला नाही किंवा तो वाचून काही मते आधीपासून गृहीत धरलेली आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या कमेंट करणे सुचत आहे.. ज्या एकमेव पत्रावरून विषप्रयोग झाला हे बोलण्यात येते त्या पत्रामध्ये सोयाराबाईंचे नाव येते.. आता तुम्ही कितीही कुत्सितपणे बोलायचा प्रयत्न केलात तरी मला फरक पडत नाही.. ज्या पत्रात सोयाराबाईंचे नाव येते ते कसे चूक आहे हे वर सांगितले आहेच.. त्यामुळे विषयाला फाटे फोडण्याचा जो प्रकार चालू आहे त्यापेक्षा पुरावे देऊन निष्कर्ष खोटे पाडू शकता..

परदेसाई चालेल का>>>>

इतिहासाचा अभ्यास करणार असाल तर आडनावाचा काय संबंध!?

असे विधान कसे काय करू शकता. विषप्रयोग झाला कि नाही. असल्यास सोयराबाईनी केला कि अन्य कुणी. काहीच सिद्ध झालेले नाही. जे अजून सिद्धच नाही झाले ते खोडून काढायची घाई तुम्हाला का आहे? यातून काय दिसून येते? मला तर ती उलट्या घागरीवर लटपटणारी मांजर आठवतेय.>>>>

मुळात 1680 मध्ये दळणवळणाची साधने नसताना सुद्धा जर सर्वच साधने आजाराने राजे गेले असे म्हणतात तर त्यात संदिग्धता कोणती!? जरी आजार वेगवेगळे सांगितले असले तरी विषप्रयोग झाला नाही यात सर्वात समानता आहे. त्यामुळे विषप्रयोग झाला नाही हाच निष्कर्ष काढता येतो..

मी हे काल पण म्हणालो आणि आज पण तेच म्हणतो आहे.. तुम्हाला जर माझ्या निष्कर्षांबद्दल शंका येत असेल तर पुरावे देऊन तो खोडून काढू शकता.. त्यापैकी काहीही न करता केवळ तर्कट लावून उत्तरे देणार असाल तर मी तरी तुमच्या प्रश्नांना उत्तरे का द्यायची!? तुमचे म्हणणे तर्कट बुद्धीला तुम्हाला योग्य वाटत असले तरी इतिहास हा तर्कानी नाही तर पुराव्यांनी चालतो त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कितीही बरोबर वाटत असल्या तरी दुर्दैवाने इतिहासाला तर्क चालत नाहीत.. पुराव्यांच्या आधारे मांडलेल्या निष्कर्षांवर इतिहास चालतो आणि तो तसाच चालत राहणार.. त्यामुळे माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्हाला जर याबद्दल अनेक शंका असतील तर तुम्ही याच्या मुळाशी जाऊन पुरावे शोधून निष्कर्ष मांडा. त्याने इतिहासाला फायदा होईल

म्हणजे शिवाजीचा मृत्यू हा विवाद्य विषय ठरत आहे हेच मज बापुडीस ठावे नव्हते. असो.>>>

अहो असे अनेक विषय आहेत इतिहासात.. त्यामुळे आपण दूर आहात यापासून हे उत्तम आहे.. पण आम्हा इतिहास वाचकांना हे सहन नाही होत त्यामुळे पुरावे देऊन हल्लीच्या बिनपुराव्यानी केलेल्या मांडण्या खोडून काढाव्या लागतात..

Pages