तू पूर्वीची राहिली नाहीस

Submitted by सई केसकर on 6 April, 2018 - 03:51

"माणसं बदलतात".
हे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.
"इट्स नॉट यू, इट्स मी" वगैरे.

पण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.
माझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.
"ही माझ्या नातसुनेसाठी".

लहानपणी मला साधे (चॉकलेटविरहित) दूध प्यायला लावण्यासाठी एका उंच स्टुलावर बसवण्यात यायचे. चिरंजीवांनी दूध नाकारल्या नाकारल्या त्यांना पेढ्याचे बॉक्स पुरवण्यात आले.
"एक पेढा म्हणजे एक कप दूधच की!" शिवाय आटवलेलं. त्यामुळे बसल्या बसल्या सहा पेढे खाल्ले तर सहा कप दूध प्यायल्यासारखे होईल.
मग पेढ्यांबरोबर चॉकलेटं, आईस्क्रीम, गुलाबजाम हे असले सगळे दुग्धजन्य पदार्थ पंगतीला येऊन बसू लागले.
"आजीकडे गेल्यावर मला ब्रेकफास्टला गुलाबजाम मिळतो", असे चिरंजीवानी सांगितल्यावर ते नक्की विधान आहे की धमकी आहे याचा विचार करून मी बुचकळ्यात पडले. पण अर्थात आजी त्याला गुलाबजामच्या पाकात जिलबी बुडवून, त्याला चिरोटा लावून जरी वाढत असली, तरी मी माझ्या, पंचडाळीच्या धिरड्यापासून मागे हटणार नव्हते. सुरुवातीला सगळे पहिलटकर पालक करतात तसे आम्हीदेखील अतिशय क्लिष्ट नियम केले होते. मुलाच्या खाण्यात चमचाभर साखर घालताना, मला आपण त्याच्यात कोकेन घालतोय अशी भावना यायची. तसेच माझ्या आई बाबांना धाक लावून त्यांच्या घरी ही असली करूण नियमावली पाठवायचेही प्रयत्न झाले. त्या नियमावलीचा उपयोग बहुधा माझ्या मुलाच्या तोंडाला लागलेला पाक पुसायला झाला असावा. मुलगा बोलत नव्हता तोपर्यंत आम्हाला ही साखपेरणी छोट्या छोट्या पुराव्यांमध्ये दिसायची. शर्टावर पडलेला एखादा डाग, मुलाच्या तोंडाला येणार वेलदोड्याचा वास वगैरे. अशा गोष्टींकडे, आम्ही कानाडोळा करायचो. पण नंतर मुलानी, "आईकडचे (बेचव) जेवण विरुद्ध आजीकडचे (चविष्ट) जेवण" असा तोंडी प्रबंध सांगायला सुरुवात केली, तेव्हा नाईलाजाने आम्ही आमच्याकडील नियम शिथिल केले.

दीड वर्षाच्या कोवळ्या वयात मला शाळेत पाठवणारी माझी आई, नातवाच्या शाळेत जाण्यावर मात्र काहीही मतं व्यक्त करू लागली.
एक दिवस आजीच्या गाडीत बसून शाळेत जाताना, पोरानी आजी बरोबर आहे हे ओळखून एक करुणरसपूर्ण नाट्य सुरु केले. आजीच्या डोळ्यात डोळे घालून टप्पोरे अश्रू बाहेर काढले आणि झालं! शाळेच्या बाहेर गाडीत मुलगा आजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून भोकाड पसरून बसला आणि त्याच्या बरोबर चक्क आजीसुद्धा अश्रू ढाळू लागली. "राहूदेत आज शाळा. नको रडवूस त्याला", असं म्हणून आईदेखील मुळूमुळू रडू लागली. मग केसात अडकलेले च्युईंगम काढायला जितके प्रयत्न लागतात, त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करून मला आजीपासून नातवाला सोडवावे लागले. शाळेतल्या बाईंना माझी व्यथा सांगितल्यावर, आजी आजोबा असेच असणार हे आदिम सत्य त्यांनी मला सांगितले.
"नको रडवूस त्याला" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे!
आणि एकूणच, "आई मुलाला रडवते" या वाक्यातील कर्त्याच्या डोक्यावर, त्या मुलाला बिघडवणाऱ्या सगळ्या मंडळींचे पापाचे घडे ठेवले जातात.

आणखीन वर, "आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही" हेदेखील असतं.
कसा करेल तो हट्टीपणा? तुम्ही त्याच्या मनातले, त्यालाही माहिती नसलेले हट्ट ओळखून ते पुरवण्याचा चंग बांधला असेल तर मुलाला फारसे कष्ट घ्यावे लागणारच नाहीत. एक दिवस डीमार्ट मध्ये मुलांना बसवून रिमोटने चालवायची गाडी असते तशी गाडी घेण्याचा मानस आजीबाईंनी व्यक्त केला. तसे केल्यास गाडी पुरवणाऱ्याच्या घरी ती गाडी आणि नातू कायमचे राहतील अशी धमकी देऊन तो आजीहट्ट मागे फिरवण्यात आला. नातवाला स्पीड ब्रेकरवरून गाड्या फिरवण्याची हौस आहे आहे असे कळताच, सुताराकडून दोन सुबक, लाकडी स्पीडब्रेकर बनवून घेण्यात आले. आणि घाई गडबडीचा वेळी त्यावर अडखळून पोराच्या आई बापानी पोराला कितीतरी साष्टांग नमस्कार घातले.

आपल्या आईच्या अशा वागण्याचा आपल्याला नक्की त्रास का होतो याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भरपूर पाहून झाल्यावर, तिला तिच्या तरुणपणीच्या कुचकटपणाचा पश्चाताप होतो आहे, पण त्याचं प्रायश्चित मात्र ती माझ्यावर न करता माझ्या पोरावर करते आहे, हे माझ्या निदर्शनास आले. आणि मला म्हातारपणी असा पश्चाताप नको असेल तर सध्या मला पोराशी माझी आई वागते तसे वागावे लागेल हे भीषण सत्य समोर आले.
एकतर आपल्या नातवाला काहीही करू देणे हा किमान जोखमीचा मार्ग आहे. त्याची थेट फळं मुलीला भोगावी लागतात. आणि आजी आणि नातवाच्या या घट्ट नात्याचे कारण त्या दोघांचेही माझ्याशी असलेले सौम्य शत्रुत्व हे देखील असू शकेल. या सगळ्याचा उहापोह करून निष्पन्न असे काहीच झाले नाही. परिस्थिती हाताबाहेर जातेय असे लक्षात येत होते तोच मला एक रामबाण सापडला. माझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेहे..मस्त झालय. मला ते पहिलटकरीण नवपालकत्वाचे दिवस आठवले.
साखर = कोकेन हे १०० % मला पण वाटायचं. साखरेचे पदार्थ लेकींना देणे म्हणजे पाप वाटायचं. मग त्या मोठ्या होत गेल्या आणि डोनट्/पाय्/सूफ्ले/चीजकेक/मूस हे पदार्थ खाण्यासाठी हट्ट करू लागल्यानंतर मी थोडी घाअबर्ले आणी आपणहोउन त्यांच्यासाठी विनाकारण खीर्/श्रीखंड/गुलाबजाम्/शीरा असे देसी पापी पदार्थ करू लागले. हे टोटल भंपक आहे याची कल्पना आहे पण उगाच वेस्टर्न जंक आवडीने खातात तसं आपलं देसी जंक पण खाउ दे बै असा येडपट विचार त्यामागे.

आथा थोरली खीर्/बासुंदी/श्रीखंडाची फर्माइश करते तर मला जामच बरं वाटतं. heehee
धाकलीचं काही होउ शकत नाही..असो.

मस्त खुसखुशीत झालाय आज्जीतला बदल.

इबा >> Lol

पेशन्स माझ्यात आत्ताच नाही तर मी आजी झाल्यावर अजिबातच उरणार नाही. माझी एक मैत्रिण म्हणते तशी तेव्हा पोराला आधे बडवू की नातवाला अशी वेल आली नाही म्हणजे मिळवलं

अमितव >> दुसर्‍या अपत्यांबाबतचा लियिनन्सी बाबत +१०१
धाकल्या रत्नानी एकदा एकव्लं की थोरली यू पुश हार्ड टु सस्कीड आणि यू जस्ट वाँट मी टू बी हॅपी Uhoh

छान लिहलयस! खुप ठिकाणी जाम रिलेट झाल ,
"फार चिडतेस तु ! जर्रा पेशन्स म्हणून नाही, चालतय तेवढ तु काय कमी त्रास दिलायस का? " त्यामानाने ही फार गुणी बाळ आहेत हे सर्टिफिकेट पण मिळत तेही गनिम समोर असतानाच...

फारच छान ग सई...
माझी आई अगदी अस्संच करायची.
आम्हाला लहानपणी धपाटे, धम्मकलाडू, चापटपोळ्या अगदी सगळा खाऊ आईकडून मिळालाय.
मी मात्र माझ्या मुलांना कधीच मारले नाहीय. फक्त एकदा मुलगी फारच त्रास देत होती तेव्हा नुसतं 'देऊ का धपाटा?' असं म्हटलं- मारलं नाहीच. तर आजीबाई धाव्वत आल्या- नातीला उचलून बाल्कनीत घेऊन गेल्या. वर म्हणे- 'तुम्हाला मुलं सांभाळताच येत नाहीत.'
(ऑ???)
यावर कडी म्हणजे मी एकदा म्हटलं- 'का ग, आता का? आम्हाला तर दोन्ही हातांनी बडवायचीस. नातवंडांना रागावलेलंही चालत नाही आता तुला. हे कसं काय?'
तर बिनदिक्कत म्हणाली- 'माझी नातवंडं शहाणी आहेत. रागावण्यासारखं काही करतच नाहीत.'
घ्या. म्हणजे धोपटण्याच्या लायकीची फक्त हिची मुलं Rofl

>> कॅल्विन अँड हॉब्स कोण ट्रान्सलेट करतंय?

माहित नाही. एका ग्रुप वर आले होते ते पोस्ट केले इथे.

>> शाळेच्या पुस्तकात याच थीमवर आधारीत एक धडा होता

"दुधावरची साय" याच शीर्षकाचा धडा होता. इथे अजूनही जसेच्या तसे ते पुस्तक वाचायला मिळेल. २४ वा धडा Happy

भारी लिहिलं आहे !! Proud

"फार चिडतेस तु ! जर्रा पेशन्स म्हणून नाही, चालतय तेवढ तु काय कमी त्रास दिलायस का? " >>>> "तुम्ही काय त्रास ने देता मोठे झालात का? लगेच इतकं चिडता काय आता? " हे वाक्य असतं नेहमी. Happy

तर बिनदिक्कत म्हणाली- 'माझी नातवंडं शहाणी आहेत. रागावण्यासारखं काही करतच नाहीत.' >>>>> ह्याच्यावरून आमच्या घरातला एक संवाद आठवला. माझी आज्जी माझ्या आईला म्हणायची "माझी नातवंडं लहानपणी शहाणी होती, तुझ्या नातवंडांसारखी आचरट नव्हती." म्हणजे नक्की कोणाचं कौतूक आणि कोणाला टोमणे हे कळायचच नाही. Proud

>>>>लहानपणी आम्हाला गाणी ऐकू न देणारे आजोबा नातवंडांसोबत गाणी म्हणतात. ते बघून मला हार्ट अटॅक आला होता almost. मी नाच शिकण्याचा हट्ट केला तर मोठी झाल्यावर काय नाचणारी होणार का म्हणणारे आजीआजोबा मुलीला भरतनाट्यम क्लासला पाठव हे सांगतात. मुलांच्यासमोर 'त्याच्याशी नीट वागत जा ' असं सांगतात

मी लहानपणी ज्यांच्या शेजारी राहायचे ते आजोबा (त्यांच्या तरुणपणी) नीटनेटकेपणामध्ये अतिशय कडक म्हणून ओळखले जायचे. पण मी हळू हळू त्यांच्या घरात शिरून इतका पसारा करू लागले आणि तेही माझ्या खेळात भाग घेऊ लागले. त्यांच्या मुलांची अशीच प्रतिक्रिया असायची.

>>>असा प्रश्न मला आणि भावाला अनेकदा पडतो, त्यांचं नातवंडांबरोबरच वागणं पाहून
तुमच्या आई ना दिलात का वाचायला? त्यांची काय प्रतिक्रिया होती?

"मी असं काहीही वागत नाही" अशी प्रतिक्रिया होती. डिनायल.

>>>उगाच वेस्टर्न जंक आवडीने खातात तसं आपलं देसी जंक पण खाउ दे बै असा येडपट विचार त्यामागे.

किती नॅशनॅलिस्ट विचार आहेत! ऋजुता दिवेकरनंतर तूच!
"त्याला डायबेटीस वगैरे काही नाही तर खाउदे की" ही एक प्रतिक्रिया असते जेव्हा नवर्यानी जास्त साखर खाऊ नये असे मत माझ्याकडून व्यक्त केले जाते. म्हणजे डायबेटीस व्हायची वाट बघायची. आणि ती बघता बघता बकाबका साखर खायची.

>>>सई माझ्या लेकीच्या आजीने भर ICU मधून माझ्या पोरीला मारू नकोस ग अशी ह्रदयद्रावक विनवणी केली होती

आज्या अमर असायला हव्यात. माझ्याकडून एकदा आईची एक सोन्याची बांगडी हरवली होती (हरवली नव्हती, माझ्या कपाटाच्या ड्रॉवरच्या मागच्या गॅप मध्ये अडकली होती). तेव्हा मला आई खूप बोलायची. आणि सारखी मी बांगडी हरवली म्हणून घरात रडत बसायची. तेव्हा माझ्या आजीने तिला सांगितले होते की बांगडीपेक्षा लेक जास्त महत्वाची आहे. आणि नंतर १ वर्षांनी वगैरे बांगडी सापडली. तेव्हा माझ्या आईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

>>"माझी नातवंडं लहानपणी शहाणी होती, तुझ्या नातवंडांसारखी आचरट नव्हती."
लोल!! यावरून मला एक किस्सा आठवला. आमच्या ओळखीच्या एका आजीनी त्यांच्या नातीसमोर "जावयाचं पोर, हरामखोर" हा वाक्प्रचार (का कोण जाणे) वापरला होता. तो लगेच मुलीने तातडीने आपल्या वडलांना जाऊन सांगितला.

मस्त लिहिलं आहे Lol

आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे! >>> Lol
परफेक्ट एकदम, फक्त आमच्याकडे हे वाक्य आजीपेक्षा आजोबांना जास्त लागू पडेल Happy

मस्तच लिहलंय

दुधा (मुलगा / मुलगी) पेक्षा दुधा वर ची साय (नात / नातु) आवडतं हे ही वैश्विक सत्यच आहे की.

लेखनाची शैली नेहेमीप्रमाणेच छान. मला रिलेट करता आलं नाही मात्र Happy
आमच्याकडे आम्ही लहान असताना आमचेही आणि आता आमच्या मुलांचेही प्रमाणात लाड झाले आजी-आजोबांकडून. म्हणजे अर्थातच आई-बाबांपेक्षा आजी-आजोबांची गोष्टच निराळी आणि जास्त लाडाची पण एक्सेसिव्ह नाही वाटली कधीच. कदाचित आम्ही इकडे लांब राहतो आणि आजी आजोबा वरचेवर भेटत नाहीत म्हणून तसं वाटत असेल.

<<<<दुधा (मुलगा / मुलगी) पेक्षा दुधा वर ची साय (नात / नातु) आवडतं हे ही वैश्विक सत्यच आहे की.>>>>

त्याचप्रमाणे या विषयी तक्रार करणे हे वैश्विकच नव्हे अनंतकालचे सत्य आहे. आताशा इंटरनेटमुळे ते सत्य जगजाहीर होते एव्हढेच.

Biggrin लेख आणि बरेचसे प्रतिसाद वाचून मजा आली. आमच्या घरी पण फार काही वेगळी परिस्थिती नाही. नातवंड *दली तरी 'किती गोड' म्हणतात Biggrin

मस्त लिहिला आहे लेख. प्रत्येक ओळ वाचताना अगदी अगदीचं फिलिंग होतं. एक उदाहरण :

एकदा मॅथ्स करताना विचारात हरवलेली मी नकळतच सोफ्याच्या फॅब्रिकमधे पेन्सिलचं टोक खुपसत राहिले होते, आईने ते पाहिल्यावर रप्पक्न एक धपाटा बसला. ( हा दुसरा कोणता तरी राग व्हेन्ट आउट झाला असावा, पण नकळत झालेल्या चुकीसाठी वॉर्निंग न देता धपाटा म्हणजे टु मच Proud ). तीच आई आता मी मुलाला फिजिकली मारणं दुरच, पण नुसते टोमणे मारले तरी दु:खी होते. प्रत्येक फोन कॉलमधे मुलांचं सेन्सिटिव मन, चाइल्ड सायकॉलोजीचे भाषण देते. तिला एकदा मला मिळालेल्या धपाट्यांची आठवण करुन दिली तर म्हणे तेव्हा मी पण तरुण होते. आता वयाबरोबर आलेलं शहाणपण आहे. यावर काय म्हणणार. बरं !!!

test.jpg

छान लिहिलंय अगदी, घरोघर कि कहाणी आहे हि

मस्तच लिहिलं आहे तुम्ही, नुकतीच आई झाले आहे, पण अवघ्या काही महिन्यातच या लेखातील बऱ्याचशा मुद्द्यांशी रिलेट करता येतंय
360 डिग्री फिरतात पालक आजी -आजोबा झाले की.
किती गुणाचं आमचं वासरू (नात) हे घरातील राष्ट्रीय वाक्य झालं आहे, म्हणजे आम्ही काय होतो ? असा कॉम्प्लेक्स येतो कधीकधी ..

छान लिहिलय
माझा अनुभव थोडा वेगळा आहे. माझा भाऊ माझ्या पेक्षा दहा वर्षे लहान आहे. त्याचा हा डायलॉग आहे.. ताई तू आता पूर्वीची राहिली नाहीस.. त्याला लहानपणी माझ्या शिस्त रूपी टोच्याने मी हैराण केले होते.. आणि माझ्या मुलाला मात्र अंमळ सवलत देण्यात येते माझ्या कडून..
त्यामधे पक्षपात हा हेतू नाही तर अनुभवी थकव्याचा भाग आहे हे त्याला कसं कळणार

Pages