तू पूर्वीची राहिली नाहीस

Submitted by सई केसकर on 6 April, 2018 - 03:51

"माणसं बदलतात".
हे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.
"इट्स नॉट यू, इट्स मी" वगैरे.

पण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.
माझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.
"ही माझ्या नातसुनेसाठी".

लहानपणी मला साधे (चॉकलेटविरहित) दूध प्यायला लावण्यासाठी एका उंच स्टुलावर बसवण्यात यायचे. चिरंजीवांनी दूध नाकारल्या नाकारल्या त्यांना पेढ्याचे बॉक्स पुरवण्यात आले.
"एक पेढा म्हणजे एक कप दूधच की!" शिवाय आटवलेलं. त्यामुळे बसल्या बसल्या सहा पेढे खाल्ले तर सहा कप दूध प्यायल्यासारखे होईल.
मग पेढ्यांबरोबर चॉकलेटं, आईस्क्रीम, गुलाबजाम हे असले सगळे दुग्धजन्य पदार्थ पंगतीला येऊन बसू लागले.
"आजीकडे गेल्यावर मला ब्रेकफास्टला गुलाबजाम मिळतो", असे चिरंजीवानी सांगितल्यावर ते नक्की विधान आहे की धमकी आहे याचा विचार करून मी बुचकळ्यात पडले. पण अर्थात आजी त्याला गुलाबजामच्या पाकात जिलबी बुडवून, त्याला चिरोटा लावून जरी वाढत असली, तरी मी माझ्या, पंचडाळीच्या धिरड्यापासून मागे हटणार नव्हते. सुरुवातीला सगळे पहिलटकर पालक करतात तसे आम्हीदेखील अतिशय क्लिष्ट नियम केले होते. मुलाच्या खाण्यात चमचाभर साखर घालताना, मला आपण त्याच्यात कोकेन घालतोय अशी भावना यायची. तसेच माझ्या आई बाबांना धाक लावून त्यांच्या घरी ही असली करूण नियमावली पाठवायचेही प्रयत्न झाले. त्या नियमावलीचा उपयोग बहुधा माझ्या मुलाच्या तोंडाला लागलेला पाक पुसायला झाला असावा. मुलगा बोलत नव्हता तोपर्यंत आम्हाला ही साखपेरणी छोट्या छोट्या पुराव्यांमध्ये दिसायची. शर्टावर पडलेला एखादा डाग, मुलाच्या तोंडाला येणार वेलदोड्याचा वास वगैरे. अशा गोष्टींकडे, आम्ही कानाडोळा करायचो. पण नंतर मुलानी, "आईकडचे (बेचव) जेवण विरुद्ध आजीकडचे (चविष्ट) जेवण" असा तोंडी प्रबंध सांगायला सुरुवात केली, तेव्हा नाईलाजाने आम्ही आमच्याकडील नियम शिथिल केले.

दीड वर्षाच्या कोवळ्या वयात मला शाळेत पाठवणारी माझी आई, नातवाच्या शाळेत जाण्यावर मात्र काहीही मतं व्यक्त करू लागली.
एक दिवस आजीच्या गाडीत बसून शाळेत जाताना, पोरानी आजी बरोबर आहे हे ओळखून एक करुणरसपूर्ण नाट्य सुरु केले. आजीच्या डोळ्यात डोळे घालून टप्पोरे अश्रू बाहेर काढले आणि झालं! शाळेच्या बाहेर गाडीत मुलगा आजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून भोकाड पसरून बसला आणि त्याच्या बरोबर चक्क आजीसुद्धा अश्रू ढाळू लागली. "राहूदेत आज शाळा. नको रडवूस त्याला", असं म्हणून आईदेखील मुळूमुळू रडू लागली. मग केसात अडकलेले च्युईंगम काढायला जितके प्रयत्न लागतात, त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करून मला आजीपासून नातवाला सोडवावे लागले. शाळेतल्या बाईंना माझी व्यथा सांगितल्यावर, आजी आजोबा असेच असणार हे आदिम सत्य त्यांनी मला सांगितले.
"नको रडवूस त्याला" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे!
आणि एकूणच, "आई मुलाला रडवते" या वाक्यातील कर्त्याच्या डोक्यावर, त्या मुलाला बिघडवणाऱ्या सगळ्या मंडळींचे पापाचे घडे ठेवले जातात.

आणखीन वर, "आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही" हेदेखील असतं.
कसा करेल तो हट्टीपणा? तुम्ही त्याच्या मनातले, त्यालाही माहिती नसलेले हट्ट ओळखून ते पुरवण्याचा चंग बांधला असेल तर मुलाला फारसे कष्ट घ्यावे लागणारच नाहीत. एक दिवस डीमार्ट मध्ये मुलांना बसवून रिमोटने चालवायची गाडी असते तशी गाडी घेण्याचा मानस आजीबाईंनी व्यक्त केला. तसे केल्यास गाडी पुरवणाऱ्याच्या घरी ती गाडी आणि नातू कायमचे राहतील अशी धमकी देऊन तो आजीहट्ट मागे फिरवण्यात आला. नातवाला स्पीड ब्रेकरवरून गाड्या फिरवण्याची हौस आहे आहे असे कळताच, सुताराकडून दोन सुबक, लाकडी स्पीडब्रेकर बनवून घेण्यात आले. आणि घाई गडबडीचा वेळी त्यावर अडखळून पोराच्या आई बापानी पोराला कितीतरी साष्टांग नमस्कार घातले.

आपल्या आईच्या अशा वागण्याचा आपल्याला नक्की त्रास का होतो याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भरपूर पाहून झाल्यावर, तिला तिच्या तरुणपणीच्या कुचकटपणाचा पश्चाताप होतो आहे, पण त्याचं प्रायश्चित मात्र ती माझ्यावर न करता माझ्या पोरावर करते आहे, हे माझ्या निदर्शनास आले. आणि मला म्हातारपणी असा पश्चाताप नको असेल तर सध्या मला पोराशी माझी आई वागते तसे वागावे लागेल हे भीषण सत्य समोर आले.
एकतर आपल्या नातवाला काहीही करू देणे हा किमान जोखमीचा मार्ग आहे. त्याची थेट फळं मुलीला भोगावी लागतात. आणि आजी आणि नातवाच्या या घट्ट नात्याचे कारण त्या दोघांचेही माझ्याशी असलेले सौम्य शत्रुत्व हे देखील असू शकेल. या सगळ्याचा उहापोह करून निष्पन्न असे काहीच झाले नाही. परिस्थिती हाताबाहेर जातेय असे लक्षात येत होते तोच मला एक रामबाण सापडला. माझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.>>> Lol धमाल लिहल आहेस.

मस्तच लिहिलंय!
अगदी अगदी अस्संच होतं!
' त्याला रडवू नकोस', ' त्याच्यावर चिडू नकोस' ही अत्यंत संतापजनक वाक्य ं !

आवडलं लिखाण
खरंच ह्याची मालिका होऊ शकते, मनावर घेणे

"आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही" ... डिप्रेशनच येते हे वाक्य ऐकून...
भन्नाटच लिहीले आहेस सई...

अगदी अगदी मुळात आजी आजोबांना नातू त्रास देतो हे विधानच मान्य नसते. किती गुणी आहे बाळ.
आजी तू नको घेऊ कदी, तुझे हात दुखतील म्हणणारे गुणी बाळ, आई बाबांच्या समवेत बाहेर गेले की पाच पावलं चालत नाही हे त्यांना कसे पटवून देणार?
शेवटी एकदा मोबाईलवर चित्रीकरण करून सज्जड पुरावा सादर केला गेला तरी, काहीतरी बिनसलं असेल रे त्याचे त्या दिवशी. मुलांना कळत नाही काय होतंय ते

मस्त लिहिले आहे.

'त्याला रडवू नको' आणि 'त्याला खायला देत जा' अश्या सूचना मला फोनवरूनही नेहमीच ऐकाव्या लागतात. Lol

धमाल.
पहिल्या तीनचार ओळी इंग्रजीतून मराठीत लिहिल्यासारख्या वाटल्याने पुढचं वाचायला घाबरत होतो. पण वाचलं. मजा आली.

मस्तच लिहिलंय.

घरात एखाद्या पाळीव प्राण्याची स्वप्नात ही कल्पना न करू शकणारी मी आता मुलीच्या मागे लागलेय , मांजर आण म्हणून. कारण तुम्ही ओळखलं असेलच. Lol Lol Lol

Lol

>>> "नको रडवूस त्याला" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये
टडोपा झालं बघ मला!! Lol

माझ्या आईने प्रथम 'नका गं रडवू त्याला' म्हटलं तेव्हा मला 'Who are you and what have you done to my mother?!!' असं झालं होतं! इतकी थक्क मी आयुष्यात कधी झाले नव्हते आणि यापुढे होईन असं वाटत नाही! Proud

लेखाची लिंक माझ्या पूर्वीच्या न राहिलेल्या आईला पाठवली आहे. Proud

Lol एकदम परफेक्ट आहे हे.
घरातलं उदाहरण म्हणजे, बायको लहान असताना असच तिच्या आई वडिलांनी खुप शिस्त लावली होती. घरातले सोफे, इतर काही वस्तू, पुढे गाडी वगैरे सगळं म्हणजे sacred असल्या सारख्या जपल्या जायच्या. पुढे काही वर्षांनी बायको एकदा तिच्या घरी गेली तेव्हा तिची ५-६ वर्षांची भाची पण तिथे होती. एका सकाळी तिला काय मूड आला आणि ती सरळ सोफ्यावर क्रॅयॉननी रंगरंगोटी करु लागली आणि सरवात मोठा धक्का म्हणजे ती (बाय्को) लहान असताना अशा घोर गुन्ह्यांकरता कर्दनकाळाचे रुप धारण करणारे तिचे वडिल अगदी समोर बसून तो एखाद्या भारी पिकचरचा फस्ट डे फस्ट शो असल्यासारखे कौतूकानी बघत होते. ती खाली पडायचीच बाकी राहिली होती! Lol

ह्या संदर्भातच काल परवा आलेलं हे एक व्हॉट्सअ‍ॅपियं पण तरी सत्यवचन सांगणारं रत्न.

Why do yo grandparents and grandchildren become the best of friends?
Because they have a common enemy!

Lol

घाला, घाला शिव्या आजोबा आजीला!
अहो तुम्हाला शिस्त लागावी म्हणून काळीज कठोर करून, मन दगडाचे करून तुम्हाला रागावलो, शिक्षा केली. आम्हालाहि भावना होत्या, आहेत.
पण तो पेशन्स, ती शारीरिक शक्ति आता नाही उरली हो! करू दे जरा नातवाचे कौतुक, किती बरे वाटते ते खूष झालेले बघण्यात.

वाट बघत असतो कधी एकदा नातवंडे घरी येतील. (जरा वेळाने वाटायला लागते, कधी एकदा घरी जातील. हो, खोटे का बोला?)

आमच्या घरी आमची पावणेतीन वर्षाची नात आली होती. तिच्या घरी तिची आई (मा़झी मुलगी) तिला कडक शिस्तीत ठेवायचा प्रयत्न करते. तिला चॉकलेट, आईस्क्रीम असले काही देत नाही. आमच्या घरी आल्यावर ती बिचारी मुलगी खूप खूष असते, कोचावरच्या उश्या इकडच्या तिकडे, कोस्टर्स इकडून तिकडे, दिवे लावणे, बंद करणे, काहीहि चालते! एकदा तर तिला तिच्या आजीने छोटे चॉकलेट दिले - नातीला आवडले. पण लगेच तिने घाईघाईने आ़जीला सांगितले - We won't talk about about this with Mommy. अर्थात आम्ही काही खोटे बोलत नाही - मुलीला जावयाला घरी कळलेच. जावयाने घरी गेल्यावर नातीला म्हंटले तुला चॉकलेट आवडले का? नात म्हणाली Daddy, we don't talk about these things.

आता आम्ही काय रागवायचे या मुलीवर?

@अतुल पाटील

कॅल्विन अँड हॉब्स कोण ट्रान्सलेट करतंय?

>>>>माझ्या आईने प्रथम 'नका गं रडवू त्याला' म्हटलं तेव्हा मला 'Who are you and what have you done to my mother?!!' असं झालं होतं! इतकी थक्क मी आयुष्यात कधी झाले नव्हते आणि यापुढे होईन असं वाटत नाही!

सेम!! आता मी आई-बाबा आणि विक्रम तिघांनाही त्यांच्या "हाल पे" सोडून दिलंय. मला आता फारसे धक्के बसत नाहीत. आणि फार काही झालं तर माझा ठेवणीतला आवाज आहेच.

>>>बसून तो एखाद्या भारी पिकचरचा फस्ट डे फस्ट शो असल्यासारखे कौतूकानी बघत होते. ती खाली पडायचीच बाकी राहिली होती!
हे असं तर मी खूप ठिकाणी बघितलं आहे. आणि आजोबांना नेहमी ड्रम किट, डमरू, पिपाणी, शिट्ट्या, भोंगे वगैरे खेळणी पण कौतुकाने आणावीशी वाटतात. सूडच असतो तो.

>>>(जरा वेळाने वाटायला लागते, कधी एकदा घरी जातील. हो, खोटे का बोला?)
हा हा. माझा आईकडे विक्रम येण्याची वेगळी बेडशीट्स असतात. ती काढली कि खाली नेहमीची असतात.

अभिप्रायांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार..

अगदी अगदी ! Lol
जावयावर सूड उगवल्यासाराख्या सासूबाई वागतात हे मलाच वाटत न्हवते तर!
पण आता दुसऱ्या अपत्याच्या वेळी आम्हीच एकदम लीनियंट (रीड आळशी) झालोय.

शाळेच्या पुस्तकात याच थीमवर आधारीत एक धडा होता. धड्याचं शिर्षक आठवत नाहि पण "दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जपावं लागतं", असा काहिसा संदेश होता...

समदुःखी. लहानपणी आम्हाला गाणी ऐकू न देणारे आजोबा नातवंडांसोबत गाणी म्हणतात. ते बघून मला हार्ट अटॅक आला होता almost. मी नाच शिकण्याचा हट्ट केला तर मोठी झाल्यावर काय नाचणारी होणार का म्हणणारे आजीआजोबा मुलीला भरतनाट्यम क्लासला पाठव हे सांगतात. मुलांच्यासमोर 'त्याच्याशी नीट वागत जा ' असं सांगतात

छान लिहिलं आहे.
असच होतं, आपले बाबा ते हेच का? असा प्रश्न मला आणि भावाला अनेकदा पडतो, त्यांचं नातवंडांबरोबरच वागणं पाहून
तुमच्या आई ना दिलात का वाचायला? त्यांची काय प्रतिक्रिया होती?

Pages