भिल्ल भारत २

Submitted by Rituparna on 3 April, 2018 - 08:47

पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.

पुढील भाग : सूतपुत्र हि त्या काळातील एकमेव अशी शिवी. दासींना झालेली मुले हि आपोआप सूत जमातीची म्हणून ओळखली जात. राजघराण्यातल्या लोकांची सेवा करणे, त्यांच्या घोड्याला खरारा करणे आणि त्यांची गुणगान करणारी गाणी गाणे हि त्यांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधने. यात मेख अशी कि या दासी आपल्या मुलांचे पिता म्हणून राजाकडे बोट दाखवीत तर मुली मात्र आपल्या नवऱ्यापासून झाल्याचा दावा करीत. साहजिकच आहे आपल्या पित्यापासून निपजलेल्या मुलीकडून कुठला राजकुमार दासी म्हणून आपली सेवा करून घेईल. साहजिकच सूतपुत्र म्हणजे मातेच्या स्वैर वागणुकीमुळे जन्माला आलेला संतती असाच तत्कालीन समाजाचा दृष्टिकोन होता. सौम्य भाषेत सांगायचं झालं तर सूतपुत्र हि हरामखोर या सांप्रत शब्दाला समानार्थी अशी शिवी होती. द्रौपदीने कर्णाला नाकारण्यामागे हे एक कारण तर होतंच. त्याहीपेक्षा सुतांच्या बायका या साहजिकच राजाच्या अथवा राजकुमाराच्या मालमत्ता बनत. जर यदा-कदाचित द्रौपदीने कर्णाला वरलं असतं तर दुर्योधनाची वाकडी नजर तिच्यावर पडली असती हे समजण्याइतकी ती बुद्धिमान आहे. साहजिकच धृतराष्ट्राचा अन्य संबंधापासून निपजलेल्या ८६ सुतापुत्रांना कौरव असा गौरव करणे हा दुर्योधनाच्या राजकारणी बुद्धीचा कळस होता आणि सुतांच्या आत्तापर्यंतच्या मानहानीकारक आयुष्यात झळाळलेला एकमेव बिंदू सुद्धा.

पण बायकांची गुपितं जशी बायकांनाच कळतात तसंच कर्ण जन्माचं गुपित हे सुद्धा द्रौपदीला कळलेलं आहे. तिच्या दृष्टीने कर्ण हा आता सूतपुत्र नसून पांडवांसारखा एक क्षत्रिय आहे. कर्ण आणि द्रौपदी यांच्यातला प्रमुख अडसर आता दूर झालेला आहे. ज्येष्ठ कौंतेय म्हणून द्रौपदी वर त्याचा अधिकार तर आहेच. पण त्याही पेक्षा तो अधिकार त्याने वापरावा हि द्रौपदी ची देखील मनोमन इच्छा आहे. हे रहस्य अर्जुनाला स्वतः हुन सांगायची तिची मनीषा नाही म्हणून आपलं जन्मरहस्य कर्णाला स्वतः हुन कळावं अशी तजवीज ती करते. साक्षात सूर्यपुत्र असलेल्या कर्णासमोर शेषाचा निभाव लागणार नाही हे सुद्धा ती जाणून आहे. म्हणूनच ती हतबल अश्या अर्जुनाला कर्णाची मदत मागण्यास सुचवते.

कर्णाबद्दल द्रौपदीच्या मनात प्रेमभाव तर आहेच. पण आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेल्या कुंतीबद्दल सुद्धा तिच्या मनात राग आहे. एका हळव्या क्षणी कुंतीने आपलं मन द्रौपदी समोर उघड केलं होतं. त्याचाच वापर करून ती आता कुंतीला अद्दल घडवणार आहे. द्रौपदी च्या या एका खेळीने अनेक पक्षी मारले जाणार आहेत. तिच्या अपमानाला जबाबदार असणारे अर्जुन, कुंती आणि वांझोटा कुळाभिमान यांना तर ती धुळीला मिळवणारच आहे. पण त्याच बरोबर ती आता कर्णाला आपल्या ताब्यात घेऊन दुर्योधनाच्या पुढच्या मानसुब्यांवर पाणी ओतणार आहे. नियतीच्या या पटावर द्रौपदी एक प्यादी नाही तर राणी बनून धुमाकूळ घालणार आहे.

पण नियतीला हे मंजूर नाही. कर्णाची मदत मागायला गेलेल्या अर्जुनाचा वृथा अभिमान चुकीच्या वेळी जागृत होतो. ऐन वेळी तो कर्णाला सूतपुत्र म्हणून त्याचा अपमान तर करतोच वरून तो कर्णाला त्याचा बाप माहीत नसल्याबद्दल हिणवतो सुद्धा. अपमानित कर्ण त्याच्या आईला याबद्दल विचारतो तेव्हा ती बिचारी त्याला कुंतीकडे पाठवते. अखेर कुंतीकडून त्याचा जन्म रहस्य उलगडल्यानंतर तो तिची आणि पांडवांची निर्भत्सना करतो. अर्जुनाबद्दलचा त्याचा द्वेष आता पराकोटीला पोहोचलाय. त्यातच द्रौपदी त्याच्याकडे मदतीची याचना करते. नशिबाच्या या खेळामध्ये द्रौपदी एक याचक म्हणून कर्णासमोर उभी आहे. ज्याचा सूतपुत्र म्हणून धिक्कार केला त्याच्या प्रीतीची याचना करण्याएवढी अगतिक ती कधीच नव्हती. उलट ती त्याला शेषाचा काटा काढणे हा त्याचा धर्म असल्याची जाणीव करून देते. कर्णाच्या आयुष्यातला हा सर्वात दैदिप्यमान क्षण होता. आपल्या पराक्रमाने तो वासुकीचा पराभव करतो आणि शेवटच्या क्षणी त्याला जीवनदान देतो. संकटात सापडलेल्यांना मदत करणे आणि निःशस्त्र शत्रूला सुद्धा जीवनदान देणे हा क्षत्रियधर्म तो कसोशीने पाळतो.

धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या या महाभारतात धर्माला जागणारा हा अपवादात्मक पुरुष. महाभारतातील सारीच पात्रं हि आपल्या आपल्या कर्माची फळं भोगताना दिसतात. पण या सर्वांमध्ये दुसऱ्याच्या कर्माची फळं भोगणारी कर्ण आणि द्रौपदी हि दोन पात्रं उठून दिसतात ती त्यामुळेच. म्हणूनच कदाचित मी आधी म्हटल्याप्रमाणे लाजे-काजेच्या, धर्माच्या, जातीच्या कुठल्याही जोखडापासून मुक्त असलेल्या आदिवासी जमातीला या दोघांमध्ये प्रीतीचा अंकुर फुलावा अशी अपेक्षा असेल. वरील कथा हि मूळ महाभारतात नाही. ती तशी घडली असणं शक्य आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण काव्यात्मक न्याय या शब्दापासून कोसो लांब असलेली हि संस्कृती या दोन पात्रांना मात्र तो न्याय देते. आणि हेच माझ्यामते त्यांचं मोठेपण आणि त्यांची प्रतिभा सुद्धा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही काळापूर्वी वाचनात आलेला आंतरजालावरील https://vinodviplav.wordpress.com/2011/11/25/the-rape-of-draupadi/ हा लेख या मुक्तका मागील प्रेरणा आहे. सदर लेख हा माननीय भगवानदास पटेल यांच्या 'भील भारथ ' या संग्रहावर आधारित आहे

महाभारतात ही कथा नाही? मग कुठे आहे? तुम्ही कुठे वाचलीत?
कर्माची फळं भोगणारी कर्ण > >>> भोगणारा हवं ना?