माझ्या कल्पनेतली शाळा....

Submitted by ..सिद्धी.. on 1 April, 2018 - 15:18

छोट्या शहरातली एक मराठी शाळा. आज जूनमधला शाळेचा पहिला दिवस होता. सगळे विद्यार्थी शाळेत आले होते .पहिल्या दिवसाची प्रार्थना संपली आणि वर्गात तास सुरू झाले. पण मुख्याध्यापक सर आज जरा टेन्शनमध्ये  होते. त्याला कारणही तसंच होतं. मागच्या दोन तीन वर्षांपासून शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत होती. या वर्षी बरेच शिक्षकही शाळा सोडून गेले होते.महागाई आणि त्यात परत कमी वेतन यामुळे त्यांनी शाळेत शिकवणं सोडलं होतं .त्यापैकी काहींनी मिळून एक खासगी क्लास देखिल सुरू केला होता. त्यामुळे आता वर्षभराचं नियोजन कसं करायचं याच्या विवंचनेत सर केबिनमध्ये बसले होते.

तितक्यात अचानक केबिनच्या दारावर टकटक झाली .सरांनी दचकून वर बघीतलं तर एक तरूण दाराबाहेर उभा होता. सर मी आत येऊ का ? असं त्याने विचारलं . त्यांची परवानगी घेऊन तो आत  आला आणि येऊन सरांपुढे बसला.  त्याने आपलं नाव सांगितलं आणि सरांशी बोलू लागला . काय काम होतं बाळा? असं सरांनी त्याला विचारलं . तेव्हा तो म्हणाला सर मला या शाळेत मुलांना शिकवायचं आहे . मला संधी द्याल का? .
हे ऐकून सर विचारात पडले. नंतर बराच वेळ तो तरूण आपल्याबद्दल सांगत होता . सरही विचार करता करता ऐकत होते . त्याच्या चेहेर्यावर चैतन्य ओसंडून वाहत होतं. आणि बोलण्यात एक परिपक्वता होती . त्याच्या व्यक्तीमत्वाने सरांवर छाप पाडली होती. शेवटी सरांनी ठरवलं. असंही शाळेत शिक्षकांची गरज आहे तर मग याला एक संधी देवून पाहूया. त्याचं बोलणं संपल्यावर सरांनी त्याला पत्र दिलं आणि उद्यापासून रूजू होण्यास सांगितलं .सरांना त्याच्या बोलण्यातून एक विश्वास वाटत होता की हा नक्की काहीतरी चांगल करून दाखवेल.
शाळेचा दुसरा दिवस उजाडला. प्रार्थना संपली .आठवी 'क' च्या वर्गातली सगळी मुलं आश्चर्याने दाराकडे पाहू लागली .एक नवीन सर त्यांना आपल्या वर्गाकडे येताना दिसले .  सर वर्गात आले आणि अख्या वर्गात शांतता पसरली .मी शरद ! या वर्षीचा तुमचा वर्गशिक्षक अशी त्यांनी आपली ओळख करून दिली. मग हळूहळू त्यांनी मुलांना नावं विचारली. पहिल्यांदा सगळे अवघडले होते. नंतर मुलांना एक जाणवलं. हे नवीन सर इतरांपेक्षा वेगळे होते . सतत प्रसन्न आणि हसतमुख असायचे . कधी मुलांवर चिडायचे नाहीत .त्यामुळे  पहिल्या दिवसापासून त्यांना ते मुलांना थोडे थोडे आवडायला लागले . असेच दिवस सरत होते .आता मुलंही सरांशी मोकळेपणाने बोलायची .त्यांनी प्रेमाने संपूर्ण वर्गाला आपलसं केलं होतं. छडी ही जनावरांना शिस्तीत आणण्यासाठी असते ; मुलांना नाही असं सरांना वाटायचं. शरद सर म्हणजे एक अजब रसायन आहे हे एव्हाना संपूर्ण शाळेला कळलं होतं.

सरांची शिकवण्याची पद्धतही खूप वेगळी होती .ते कधी पुस्तक हातात घेऊन शिकवायचे नाहीत . एकादा भाषेच्या तासाला त्यांनी वर्गात चिठ्ठ्यांचा बाॅक्स आणला .प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलायला लावली आणि त्यात जो उपक्रम  दिलाय तो करायला सांगितला.  असं करून त्यांनी वर्षभरात दोन कथा आणि तीन कविता संग्रह तयार केले ज्याचा अख्खा वर्ग लेखक होता .त्यांनी मुलांना भाषा वापरायला शिकवली. गणिताच्या तासाला मापन शिकवण्यासाठी त्यांनी शेठजींच दुकान एक दिवस चालवायला घेतलं होतं . सगळ्या मुलांना त्यांच्या कुवतीनुसार कामं वाटून दिली आणि हिशेबही शिकवला. मुलांसाठी हे सारं अविस्मरणीय होतं . शाळेच्या मैदानाची ; वर्गाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला लावलं . इतिहासाच्या तासाला सर ऐतिहासिक गोष्टी रंगवून सांगायचे . जवळपासच्या सगळ्या किल्ल्यांवर; संग्रहालयात त्यांनी मुलांना नेवून आणलं आणि इतिहास नुसताच न शिकवता दाखवलासुद्धा . भूगोलाच्या तासाला सर मुलांना डोंगरावर घेऊन गेले आणि भूरूप दाखवलं . वेधशाळेत नेऊन भौगोलिक उपकरणे प्रत्यक्ष दाखवली . पर्जन्यमापन यंत्र कस वापरतात ते शिकवलं . विज्ञानाचे तास तर क्वचित वर्गात भरायचे . न्यूटनचे नियम मुलं उदाहरण बघून शिकली . इंद्रधनुष्य कसं अवतरत हे प्रत्यक्ष दाखवून शिकवलं . शेतात सहल नेवून सिंचनपद्धत ; मातीचे प्रकार आणि खतं कशी वापरतात ते दाखवलं . सरांच नेहमी एकच म्हणणं अससायचं . "खरा गुरू हा निसर्ग आहे . मी तुम्हाला आणि त्याला जोडणारा एक दुवा आहे. चार भिंतीच्या वर्गात मी तुम्हाला तात्पुरतं ज्ञान देईन . पण निसर्ग तुम्हाला आयुष्यच्या  प्रत्येक टप्प्यावर धडे देईल." असा निसर्ग शिकण्यात संपूर्ण वर्ष संपलं आणि परीक्षा उजाडली . मुलांना जरा टेन्शन आलं आणि त्यांनी सरांना विचारलं; आम्ही आता अभ्यासाचं काय करू? . सर म्हणाले मुलांनो आपण वर्षभर जे केलं तेच तुम्हाला परीक्षेत लिहायचय .त्यामुळे आजिबात घाबरू नका तुम्हा सर्वांना सगळं येईल याची मला खात्री आहे . शेवटी एकदाची परीक्षा संपली . कधी नव्हे ते सर्वांनाच पेपर चांगले गेले .आता ते निकालाची वाट बघत होते . एकदाचा तो दिवस उजाडला आणि पहिल्यांदा असं झालं होतं की आठवी 'क' चा विद्यार्थी पहिला आला होता . निकाल वाचणार्याला पण क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . पण तेच खरं होतं . आणि चक्क सगळी मुलं सुद्धा पास झाली होती . शेवटच्या खुर्चीत बसून शरद हे सगळं आनंदाने बघत होता . निकाल संपल्यावर सगळी मुलं धावत येवून सरांना बिलगली. आणि तुम्हीच आम्हाला पुढची दोन वर्ष शिकवायचं असं आश्वासन घेऊनच परत गेली. 

कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापक सरांनी शरदला बोलावून घेतलं आणि त्याला शाबासकी दिली . शरद म्हणाला सर मी शांताक्काचा मुलगा . आपल्याच शाळेत शिकलो आणि पुढे  इंजिनीयर झालो . पण तरीही कुठेतरी कमी आहे असंच मला सतत वाटायचं . शेवटच्या वर्षी एका सरांनी सांगितलं शरद तू चांगलं शिकवू शकतोस .  त्यानंतर मी सरांच्या आग्रहास्तव एक लेक्चर घेतलं . आणि त्यादिवशी मला माझ्यात काय कमतरता होती ते कळलं  . नंतर मी कोर्स पूर्ण केला आणि आपल्याच शाळेत शिकवायच असं ठरवलं . शाळेत मी अभ्यासेतर उपक्रमात कधी पुढे नव्हतो त्यामुळे तुम्हाला मी फारसा आठवतही नसेन . पण आता आयुष्यभर मी इथेच शिकवायचं ठरवलय . सरांच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले .
एक उत्तम विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षक होऊ शकतो याचं उदाहरण त्यांच्यासमोर उभं होतं . प्रयोगशीलता ही शिक्षणाचा पाया आहे हे त्यांना पटलं होतं.
==============================
हा लेख म्हणजे माझ्या कल्पनेतली शाळा आहे . प्रत्येकाच्या शाळेविषयी काही कल्पना असतात .त्या प्रतिसादात मांडण्याची वाचकांना मुभा आहे.

--- आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेशी संदर्भात हा विषय आहे त्यामुळे इथे चर्चा करायला माझी काही हरकत नाहीये.
विक्षीप्त मुलगा तुमचं निरीक्षण बरोबर आहे.... ह्या गोष्टी अनेकदा पाहिल्यात ...

>> Convent school मध्ये मुलांवर संस्कार वगैरे काही करतच नाहीत का? >> अगदी अगदी. पण लोकं घालतातच का धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांत? उद्या मदरशांत पण घालतील मुलांना!
हे रस्त्याच्या पल्याडून ऐकू आलं.
मागील वेळीस एसटीन कोंबडी मारल्यान तर तीन तास गेलेले.. यावेळी अख्खी म्हस आहे! धर बोटे कर गणित! १००० राची निश्चिती झाली बगुनाना!

शाळेतल्या शिक्षकांचे मुलांकडे लक्षच नसेल का?>>>>>> शाळेतल्या शिक्षकांसमोर शिव्या घालत नाहीत ते... खेळताना किंवा एकमेकांना प्रेमाने हाक मारताना ती पद्धत असते त्यांची... अनेक चांगल्या घरातल्या मुलांनाही पाहिलं आहे शिव्या घालताना... एक दोनदा सांगूनही झालं.. पण पालथ्या घड्यावर पाणी असल्यामुळे नंतर बोलणंही सोडून दिलं.. खरं तर फार विचीत्र वाटतं हे बघून...

खेळताना किंवा एकमेकांना प्रेमाने हाक मारताना ती पद्धत असते त्यांची... >>>
प्रेमाने हाक मारतांना शिवी घातली जात असेल तरी त्याची एक मर्यादा असते. क** आदी. (जसे थ्री इडीयट चित्रपटात शेवटी शेवटी फरहान आणि राजू रंचोला भेटल्यावर त्याला प्रेमाने लाथाबुक्क्याने मारतांना शिव्या देतात तसे) पण आईवरूनही शिव्या??? मुला-मुलींच्या लैंगिक अवयवावरून अश्लील शेरेबाजी??? खूप वाईट वाटत अवघ्या १२ वर्षाच्या गोंडस, निरागस चेहऱ्याच्या मुलांना अशी रद्दड भाषा बोलताना पाहून.

अनेक चांगल्या घरातल्या मुलांनाही पाहिलं आहे शिव्या घालताना... >>>
ही सुद्धा चांगल्या घरातीलच मुले आहेत. फक्त आर्थिक परिस्थितीमुळे अगदी बिल्डींग-सोसायटीमध्ये न राहता चाळींमध्ये राहत आहेत. त्यातल्या एकाच्या घरी गेलो होतो. व्यवस्थित बांधलेल्या, टापटीप अशा बैठ्या चाळीत राहणारा, आई-वडील दोघेही नोकरी करणारे, वडील निर्व्यसनी अशा घरातील मुलानेही झोपडपट्टीतील मुलांप्रमाणे वागावे???

मागील वेळीस एसटीन कोंबडी मारल्यान तर तीन तास गेलेले.. यावेळी अख्खी म्हस आहे! धर बोटे कर गणित! १००० राची निश्चिती झाली बगुनाना! >>> Rofl

खूप वाईट वाटत अवघ्या १२ वर्षाच्या गोंडस, निरागस चेहऱ्याच्या मुलांना अशी रद्दड भाषा बोलताना पाहून.>>>>>+111111
अनेकदा खेळाच्या नावाखाली येणार्या जाणार्यांवर; मुलींवर नको त्या कमेंट्स ऐकायला मिळतात नववी दहावीच्या मुलांकडून...अशावेळी चांगल बदडून काढावं इतका राग येतो...त्यामुळे शिव्यांचं ज्ञान यांच्यामार्फत लहान मुलांना पास होत असावं...नुसत्या शिव्या घालण्यात अर्वाच्य भाषेत बोलण्यात काय थ्रिल मिळतं कोण जाणे...

Pages