डोळे

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 31 March, 2018 - 22:10

माझ्या शेजारी कुणीच नको होत आज..एकटंच बसायचं होतं,खिडकीतून बाहेर बघत कानात हेडफोन्स घालून..अंतर थोडंसच होतं म्हणजे जेमतेम २०-२५ किलोमीटरचं असेल पण अंतर कितीही असलं तरी तो एक प्रवास होता आणि मला प्रवास आवडतोच...पहिल्यापासून ! सुरुवातीला सीट रिकामीच होती माझ्या शेजारची,अगदीच गावाच्या वेशीजवळ आल्यावर बस थांबली,काही कॉलेजची पोरं आत शिरली वेळ साधारण अकरा साडेअकराची होती म्हणजे ती नक्कीच कॉलेजला निघालेली असावीत.माझ्यापण कॉलेजच्या आयुष्यातला पहिलाच आठवडा होता तो.त्यांच्या मागून आणखीही एकदोघेजण चढले.बस सुरु झाली.ती सगळी पोरं थेट मागच्या सीटवर जाऊन बसली आता बसनं थोडाफार वेगपण घेतलेला होता.मी माझा स्कार्फ काढून ठेवला आणि गाणी लावून कानात हेडफोन्स घातले.
"कुणी बसलंय का इथं ?"
पहिल्यांदा तर हेडफोन्समुळं मला ते ऐकायलाच नाही आलं मग अंदाजानेच त्यांना 'नाही'असं उत्तर दिल आणि पुन्हा खिडकीबाहेर लक्ष घातलं.
बस आता गाव सोडून मुक्ख्य रस्त्यावर आलेली होती.रस्त्यावर लांबलांबपर्यंत कोण दिसत नव्हतं.हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा अगदी कडक ऊन पडलेलं होतं.त्या उन्हात रस्त्यालगतच्या पाणवठ्यातलं पाणी चमकत होतं.गावाच्या चारीबाजूला बराचसा डोंगराळ भाग आहे.त्यावर मधेच कुठंतरी एखादा म्हशींचा कळप निवांत पहुडलेला दिसत होता.
बस रस्त्यावरचे खड्डे चुकवत तर काहीवेळा ते चुकवता न आल्याने त्यातूनच डुगडुगत आवाज करत निघालेली होती.मला माझ्याकडं तो शेजारी बसलेला माणूस एकटक बघतोय असं जाणवलं मी नकळतच त्याच्याकडं नजर टाकली,तो माझ्याकडेच बघत होता आणि मी पाहिल्यावर त्यानं नजर खाली घेतली.मी पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागल्यावर त्यानं पुन्हा एकटक बघायला सुरुवात केली.
माणूस दिसायला अगदी साधा होता.साधी विजार आणि सदरा होता त्याच्या अंगात,गळ्यात कसलातरी गोप होता,उंचीने साधारणच होता पण त्याच्या मिशा मात्र मोठ्या होत्या अगदी लक्षात राहण्यासारख्या.
तो माझ्याकडेच बघत होता.त्याची नजर मग माझ्या चेहऱ्यावरून सरकत माझ्या सगळ्या शरीराकडं जायला लागली.मी जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते सगळं खूप विचित्र वाटत होतं. त्याच्या नजरेतला हावरटपणा लपून राहत नव्हता. तो माझ्याकडं असं का बघत असेल ? असं एकटक बघून काय मिळेल त्याला ?
तो उठला आणि माझ्या जवळ आला मी चटकन माझी सॅक मांडीवर घेतली,त्यानं हातानंच मला मागं सरकायची खूण केली मी लगेच सीटला चिकटले त्यानं खिडकीतून वाकून बाहेर पिचकारी मारली आणि पुन्हा खाली बसला पण त्यानं ते सगळं करताना माझ्या नकळत खांद्यावर ठेवलेला हात त्यानं न हलवल्यानं मला जाणवला आणि अंगावर सर्र्कन काटा आला.मला बोलायचं होतं,तिथून पळून जायचं होतं पण शब्दच फुटेनात,त्या उन्हात थंडी वाजायला लागल्यासारखं झालं...त्यानं हात आजुनपण नव्हता काढला मीच हिम्मत करून सॅक अड्जस्ट करण्याचं निम्मित करून खिडकीकडे सरकले.त्यानं झटकन आपला हात काढून घेतला.मी सॅकला कवटाळूनच बसले अगदी.मला लवकरात लवकर घरी जायचं होतं.त्याचा तो हात अन तो घाणेरडा स्पर्श पुसून टाकायचा होता.मी मोबाईल उचलून दाद्याला स्टॅण्डवर घ्यायला बोलावलं.आता बस पोचायला थोडासाच वेळ बाकी होता.
तो माणूस आता दोन्ही पाय सीटवर घेऊन बसच्या दांड्याला हात अडकवून डोळे मिटून बसलेला होता.तो विचित्रच होता.
मला आता काहीही झालं तरी त्याच्याकडं बघायचाच नव्हतं त्याचाही आता कुठंच लक्ष नव्हतं.काही मिनिटातच बस पोचली.स्टॅण्डमध्ये आत जातानाच गाडीवरून दाद्या येताना दिसला आणि सुटका झाल्यासारखंच वाटलं.बस पोचल्या पोचल्या गर्दीतून खाली उतरून आमच्या गाडीकडं धावले.

"अशी लिहिलेली मी गोष्ट.सगळ्या शाळेत कौतुक केलेलं माहितीये आमच्या मॅडमनी...आवडली होती सगळयांना माझी गोष्ट" अजून बाकीचे जमायला अवकाश होता.आमच्या गप्पा आत्ता कुठे सुरु झालेल्या होत्या
"हि नक्की गोष्टच होती ना ?"
"म्हणजे ? असं का विचारतोयस ?"
"काही नाही,सहज "

तिचे डोळे तिच्यासारखं खोटं नव्हते बोलत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती स्वतःसोबत घडलेला प्रसंग सांगतीये पण तिला ते कबुल करायचं नाहीये त्यामुळं ती 'मी हि गोष्ट सांगितली होती' हे कारण देतीये...पण ती ते लपवू नाही शकते...

छान लिहीलं आहे !
गावाकडून दररोज अपडाउन करून शाळा कॉलेज करणाऱ्या मुली मनावर असलं दडपण घेऊनच जगतात. पण आता त्या गप्प बसत नाहीत, प्रत्यूत्तर देतात. द्यायलाच हवं !
पुलेशु ! Happy

ओह्ह,

खरेय, गाव काय किंवा शहर काय
मुली कुठेच सुरक्षित नाहीत

छान लिहिली आहे कथा. पब्लिक ट्रान्सपोर्टमधे प्रवास करणार्या मुलींसाठी हा फार कॉमन अनुभव आहे. खुप छोटे प्रसंग... फार काही शारिरिक झालेलं नसतं, पण जाणुनबुजुन धक्का, एकटक पहाणे किंवा एखादा चीड आणणारा शब्द हे जन्मभर लक्षात रहातं..... उगीचच.

शेवट तर विशेषच आवडला. ही पण नेहमीचीच घुसमट. सांगावंसं तर वाटतं पण आपणच गुन्हा केल्यासारखं घटना लपवण्यासाठी दुसर्‍याच्या नावावर खपवली जाते.

छान लिखाण आहे...
****पण शेवट करताना, फाडकन त्याच्या कान खाली चप्पल छापली आणि सुटका झाल्यासारखंच वाटलं.बस पोचल्या पोचल्या गर्दीतून खाली उतरून आमच्या गाडीकडं धावले......****

मुली सहन करतात, काही नाही बोलणार , फार फार तर रडेल ती, वगैरे वगैरे चे विचार (भ्रम ) मुलींनी मोडून काढायला हवे, गालावर पंजा छापून टाका हो परत तसे वागायचे कि नाही ते त्या जनावरांवर सोडा पण प्रयत्न तरी करायला हवा...( हे माझे वैयक्तिक मत आहे )