मित्राचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा.....

Submitted by ..सिद्धी.. on 28 March, 2018 - 06:57

2016  साली या दिवसात आमची दहावीची परीक्षा सुरू होती. आयसीटीचा पेपर संपला होता. शेवटचा फक्त एकच पेपर राहीला होता. आणि मग परीक्षा संपून आम्ही उनाडक्या करायला मोकळे होणार होतो. पण सगळच आपल्या मनासारख होईल तर नशीब हा फॅक्टर आपल्या आयुष्यात नसला असता. त्या दिवशीही आम्ही पेपर सुटल्यावर चर्चा करत शाळेबाहेर पडलो. माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यचा मित्र माझ्याच शाळेत होता.तो इंग्लिश मिडीयमला होता आणि मी सेमी इंग्लीशला. त्यामुळे सहसा आमची भेट होत नसे. पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे झालेल्या पेपरवर चर्चा करत बर्याचदा आम्ही भेटत होतो.त्या दिवशीही असेच पंधरा वीस मिनीटं गप्पा मारत उभे होतो. नंतर पुन्हा भेटू असं म्हणत मी घरी आले. पण हीच आमची शेवटची भेट ठरेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच दिवशी  रात्री अकराच्या सुमारास आदित्यचा मेसेज आला की; आपल्या अथर्वचा  रोड अॅक्सिडंट मध्ये मृत्यू झालाय.
पहिल्यांदा मला वाटलं की तो गंमत करतोय माझी पण पाच मिनीटांनी व्हाॅट्स अॅपवर पण हाच मेसेज आला.मला प्रचंड धक्का बसला.खरं तर या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता.अजूनही हे खरं वाटत नाही. ज्याच्याशी मी काही तासांपूर्वी बोलले तो आता या जगातच नाहीये हे पचवणं फारच अवघड होतं. पण तरीही तेच सत्य होतं जे आम्हाला स्वीकाराव लागलं.
अथर्व हा नॅशनल लेव्हलचा सायकलपटू होता.त्या दिवशीही तो मॅचच्या सरावासाठी गेला होता कारण आमची बोर्डाची परीक्षा संपल्यावर तीन दिवसांनी त्याची मॅच असणार होती. साडेआठच्या सुमारास तो प्रॅक्टीस संपवून घरी येत होता .तेव्हा समोरून राॅग साईडने एक टेम्पो आला आणि त्याची धडक बसल्यायाने अथर्व डिव्हायडरवर आपटला.नेहमीप्रमाणे टेम्पोचालक पळून गेला होता. जवळपास तासभर तो रस्त्यावर विव्हळत पडला होता.पण लोकं फक्त नुसतं बघून पुढे जात होती.तासाभराने एका भल्या माणसाने त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं .पण तेव्हा उशीर झाला होता.आतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला होता. अर्धा तास आधी आणलं असतं तर त्याचा जीव वाचू शकला असता असं डाॅक्टर म्हणाले. नंतर त्याला घरी आणल्यावर आम्ही आमच्या मित्राला शेवटचं बघायला गेलो.तेव्हा त्याच्या आईचा आक्रोश बघवत नव्हता.काही वेळापूर्वी परत भेटायच म्हणून सांगितलेला मित्र आता पुन्हा कधीच भेटणार नव्हता.त्याला असं शांत निपचीत पडलेलं आजिबात बघवत नव्हतं. मागच्या वर्षीच्या क्रिडाप्रात्यक्षिकांमधले त्याचे एकेक चित्तथरारक पराक्रम त्याची चेंदामेंदा झालेली सायकल बघून आठवत होते. एकुलत्या एका मुलाच्या अशा अकाली मृत्यूने त्याच्या आईवडीलांना हेलावून सोडलं होतं. हे सगळ सहन मला सहन झालं नाही. म्हणून मी तिथून निघून आले. कारण त्याला अग्नी देताना मला बघवलं नसतं. पण पुढचे पंधरा वीस दिवस फार वाईट गेले. कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू मी पहिल्यांदाच बघत होते. या घटनेला आता दोन वर्ष झाली. पण आजही काही प्रश्न पडतात. ज्याची उत्तरं मला आजवर मिळाली नाहीत.

1.)  लहानपणापासून आत्तापर्यंत शाळेत ; घरात  आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकवली जाते. "अपघातात सापडलेल्या माणसाची मदत करावी." आतापर्यंत एक दोनदा बाबांबरोबर येताना समोर अपघात झालेला दिसल्यावर जमेल तितकी मदत आम्ही केलीये.अगदी शाळेसमोर झालेल्या अपघातातही त्या स्त्रीला मदत करताना मी अथर्वला पाहिलय. पण जेव्हा त्याला गरज होती तेव्हा मात्र लवकर मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अगदी चौथीत असताना आम्हाला मराठीत याच आशयाचा एक धडा होता. पण आता तो ही फोल वाटायला लागला आहे.अर्थात यालाही अपवाद असतील .आपल्याकडे कोणाला मदत करावी इतकीही माणुसकी शिल्लक नाही का?

2.) अनेकदा अशा प्रसंगी  'लोकं पोलीसांच नसतं लचांड मागे नको लागायला' म्हणून मदत करणं टाळतात.हे कितपत बरोबर आहे ?

3.) हल्ली व्हाॅट्स अॅप नाहीतर फेसबुकवर अपघाताच्या ठिकाणी उभं राहून काही लोकं सेल्फी काढताना दिसतात.त्यापेक्षा मदत करणं खरंच इतकं अवघड आहे का?

आतापर्यंत मला या प्रश्नांची पटतील अशी उत्तर मिळाली नाहीत. उलट मदत न करण्याची कारणं कशी बरोबर आहेत याचीच स्पष्टीकरणं मिळाली. परवा अथर्वच्या या दुसर्या पुण्यतिथी निमीत्त आमच्या वर्गाने आपापल्या काॅलेजमध्ये  याविषयी पाच मिनीटांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हाही थोड्याफार प्रमाणात हीच मानसिकता दिसून आली.त्यामुळे मीच कुठे चुकतेय का ? असा प्रश्न मला आता पडला आहे. तेव्हा मी जर यात चुकत असेन तर मला सांगा.
====================================
तळटीप :- वरील घटना खरी असून त्यात जीव गमावलेल्या मित्राचे नाव बदलले आहे. जर यात मी कुठे चुकत असेन तर मार्गदर्शन करावे.
====================================
तेव्हा झाली ती घटना आम्ही टाळू शकत नव्हतो हेच एकमेव सत्य आहे. पण आता पुन्हा हे घडू नये असं आम्हाला वाटतं .त्यामुळे याबाबतीत अॅट लीस्ट आमच्या माहीतीतल्या लोकांना किंवा राहते त्या एरीयातल्या लोकांना योग्य ती माहिती देणं यासाठी सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत.हे आमचं या सुट्टीचं aim आहे.त्यामुळे यात माझं कुठे काही चुकत नाहीये ना हे जाणून घेणं हा धागा काढण्यामागचा माझा उद्देश आहे. ज्यांना ज्यांना याविषयातील माहिती आहे त्यांनी ती शेअर करावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad शालेय मित्राचा अपघातात मृत्यू ! मनाला सतत चटका लावणारी घटना असते ही.. अभीषेकदादाच्या एका कथेच्या धाग्याची आठवण झाली वरील प्रसंग वाचून.

मी स्वतः हा अनुभव घेतला आहे ... माझा जवळचा मित्र गमावला आहे अपघातात .... त्याला १० वर्ष झालीत पण अजूनही घाव ताजा आहे .... मित्र तुझे दुःख मी समजू शकतो.

अपघाताच्या वेळेस मदत केल्याचा पण अनुभव आहे गाठीशी. सकाळी सकाळी एका माणसाला कारने उडवले ... कोणी माझ्या मदतीला येत नव्हता ... हॉस्पिटल अगदी जवळ होते, पण सगळी मंडळी नुसती पाहत होती. शेवटी एक मुलगा आणि एक रिक्षावाला तयार झाला. त्याला हॉस्पिटल मध्ये नेले परंतु त्याला वाचवू शकलो नाही. पोलीस आले पण सगळ्यांना सांगतो त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही ... फक्त स्टेटमेंट घेतले आणि मग आम्हाला जाऊ दिले.

तेव्हा परत सांगतो कदाचित आपल्या छोट्याश्या मदतीने कोणाचाच तरी जीव वाचू शकतो ... तेव्हा बिनधास्त मदत करा ...

वा .चांगल काम केलत तुम्ही. पोलिसांचा चांगला अनुभव आलेला दिसतोय तुम्हाला. खर तर सगळेच पोलीस काही वाईट नसतात. बर्याचदा तेच मदत करतात. आमचा अपघात झालेला तेव्हा रस्त्या वरच्या लोकांपेक्षा त्यांनीच( ट्रॅफिक पोलीस) जास्त मदत केलेली.

तुझ्या मित्राचा झालेला अपघाती मृत्यू खरचं दुर्दैवी व मनाला चटका लावणारा. (जर मला वाटतोय "तो" तोच असेल तर) ह्या मुलाला मी पाहिलं नव्हतं , पण जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा फार वाईट वाटलं. Sad अजूनही त्याच्या घरासमोरून जाताना ती आठवण येतेच. आणि ते घर तर आता शांतच असतं, तिथे कोणी रहात नसल्यासारखं! Sad
जर खरच पोलीसांनी नियम शिथील केले असतील तर त्याबद्दल सूचना देणं किंवा मेन चौकांमध्ये तसे माहीतीदर्शक बोर्ड त्यांनी लावावेत.>>>>>>>>>अगदी हेच लिहायला मी आले होते.
वाढदिवस, कार्यक्रम, यांचे व इतर नको तेवढे फलक, चौका चौकातच नव्हे, तर जिथे जिथे जागा मिळेल तिथे अडकवलेले असतात. खरी गरज आहे ह्या फलकांची, ज्याच्यावर पोलिसांनी सर्व नागरिकांना केलेलं आवाहन असेल, साधारण अशा प्रकारे, " प्रत्येक अपघात ग्रस्ताला त्वरीत मदत करा, तुमच्यामागे कोणत्याची चौकशीचा ससेमिरा लागणार नाही!" . असे मोठे मोठे फलक जागोजागी लावले तर आत्ताच्या परिस्थितीत नक्कीच बदल होईल. आणि अपघात ग्रस्तांना वेळीच मदत मिळेल.

प्रत्येक अपघात ग्रस्ताला त्वरीत मदत करा, तुमच्यामागे कोणत्याची चौकशीचा ससेमिरा लागणार नाही! >>>> या आशयाचा बोर्ड लावणं गरजेचं आहे. किंवा जशी स्वच्छ भारत अभियानची अॅड येते तशी एखादी तयार करून प्रसारीत करावी.

किंवा जशी स्वच्छ भारत अभियानची अॅड येते तशी एखादी तयार करून प्रसारीत करावी.>>>>>>>>>ती फ़क्त पाहून विसरलीही जाईल. पण इथे स्वत: पोलिसांनीच आवाहन केलेय, म्हणुन लोकांनाही मदत करायला धीर येईल.

ती फ़क्त पाहून विसरलीही जाईल. >>>> याची शक्यता कमी वाटते कारण प्रसार माध्यमांवर जाहीर केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.
इथे स्वत: पोलिसांनीच आवाहन केलेय, म्हणुन लोकांनाही मदत करायला धीर येईल.>>>> मलाही असच वाटतं या विधानाशी सहमत.

दुर्दैवाने खरं आहे.माझा भाऊ रोज दुचाकीने बराच मोठा प्रवास करतो.तो म्हणतो की 'अपघात झाला तर स्वतः फोन करुन अम्ब्युलन्स बोलावण्याइतकं किंवा स्वतः जाऊन हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होण्याइतकं शुद्धीवर रहायचं.तसं न झाल्यास लोक आपण मरत असताना समोर व्हिडिओ आणि सेल्फी काढून १० व्हॉटसप फेसबुक ग्रुप वर 'इस को आपके मदत की जरुरत है, शेअर किजीए' वाल्या पोस्ट लिहीतील पण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार नाहीत.कोणाला आपली गाडी खराब होण्याची भिती असेल तर कोणाला 'तूच याला मारले' म्हणून आपल्याला अटक होण्याची.'

क्वचित अपवाद असतीलही.जिथे मदत मिळते.त्यातल्या त्यात महिलांना अजूनही मदत मिळते गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाल्यास.पण गर्दी नसलेल्या ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या पुरुषाला अनोळखी माणसांनी वेळेत मदत करणे जरा कमी फ्रिक्वेंट आहे.
नवीन Submitted by mi_anu on 28 March, 2018 - 18:29 >>>>>>>>>> हे प्रमाण आजकाल फार वाढलय, android युग अजुन काय.

अजुनतरी कुणाचा अगदी तोल जरी गेला तरी हातातल काम सोडून धावून जाणारे बघीतलेय मी.>>>याच्याशि सहमत.

मदत करायलाच हवी. काय होईल, पोलीस त्रास देतील वगैरे असे विचार करू नये. जर अपघातग्रस्त जास्त जखमी आहे असे दिसल्यास पोलिसांना कॉल करावा. म्हणजे त्या व्यक्तीला आणखी दुखापत, फ्रॅक्चर असे काही होणार नाही. पोलिसच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील.

अपघातग्रस्ताला मदत करण्याचा अनुभव नाही पण आत्महत्या केलेल्या व्यक्तीबद्दल पोलिसांना कळविण्याचा अनुभव आहे.

जुलै २०२१ मध्ये एके दिवशी सकाळी morning walk ला गेलो असतांना 'आझाद नगर मेट्रो स्थानका'च्या जिन्याजवळ एक व्यक्ती ग्रीलमधून आत हात घातलेल्या अवस्थेत उभी दिसली. आत हात घालून तो काय करतो आहे (म्हणजे काही चुकीचे करत नाही ना) हे पाहण्यासाठी जरा जवळ गेल्यावर त्याने त्या ग्रीलला नायलॉनची दोरी बांधून तिच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे व मृत्यू होऊन काही काळ उलटून गेल्याने हाताची बोटे काळी-निळी पडल्याचे लक्षात आले. सकाळची वेळ (०५:३० ते ०५:४५ दरम्यान) असल्याने रस्त्यावर वर्दळ अतिशय तुरळक होती. आयुष्यात प्रथमच असे काहीतरी पाहिल्याने सुरवातीची ५ मिनिटे काहीच सुचत नव्हते. शेवटी धीर करून १०० नंबर वर फोन करून पोलिसांना कळवले. थोड्याच वेळात 'आंबोली पोलीस स्टेशन'ची गाडी आली आणि त्यांनी फक्त माझे नाव, मोबाईल क्र. विचारून घेतले. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला बोलावून फक्त स्टेटमेंट घेतले (नाव, वय, पत्ता, उपजीविकेचे साधन काय व घडलेली घटना तुमच्या कशी लक्षात आली इ.) त्यानंतर आजतागायत पोलिसांनी काहीही त्रास दिला नाही. त्यामुळे मी अगदी खात्रीने सांगू शकेन की पोलीस मदत करणाऱ्याला वा माहिती देणाऱ्याला त्रास देत नाहीत. एखादा प्रसंग दिसल्यास जरूर मदत करा!

Pages