पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १०. नया दिन नयी रात (१९७४)

Submitted by स्वप्ना_राज on 25 March, 2018 - 08:12

अभिनय म्हणजे एका अर्थाने परकायाप्रवेश असं म्हटलं जातं. धर्म, जात, बोली, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, कधीकधी तर वय आणि जेन्डर ह्याबाबतीत स्वत:हून सर्वस्वी भिन्न अशी भूमिका साकारायला मिळणं ही कुठल्याही कलाकारासाठी फार मोठी गोष्ट असते. सर्वसाधारणपणे एका चित्रपटात प्रत्येक कलाकार एकच भूमिका साकारत असतो पण एकाच स्त्री वा पुरुष कलाकाराने एकाच चित्रपटात दुहेरी भूमिका केल्याची (भाऊ-भाऊ, आई-मुलगी, वडील-मुलगा, बहिणी-बहिणी) उदाहरणं हिंदी चित्रपटसृष्टीत खूप आहेत. तिहेरी भूमिका तुलनेने कमी असल्या तरी १९७६ सालच्या बैरागमध्ये दिलीपकुमारने आणि पाठोपाठ १९८३ मध्ये अमिताभ बच्चनने वडील आणि दोन मुलगे ह्या भूमिका वठवल्याचं सहज आठवावं इतपत त्यांची संख्या नक्कीच आहे.

पण दोन नाही, तीन नाही तर तब्बल ९ भूमिका एकाच चित्रपटात साकारायची संधी एखाद्या नटाला मिळाली तर? ही संधी संजीवकुमारला दिली १९७४ मध्ये आलेल्या 'नया दिन नयी रात' ह्या चित्रपटाने. टीव्ही गाईड मध्ये हा चित्रपट एका चॅनेलवर दाखवणार म्हटल्यावर नेटवर थोडी शोधाशोध केली. तर गुगलबाबांनी लगेच सांगितलं की ही करामत शिवाजी गणेशन ह्यांनी १९६४ मध्ये आणि अक्किनेनी नागेश्वर राव ह्यांनी १९६६ मध्ये 'नवरात्री' ह्याच नावाच्या चित्रपटात केली आहे. हे झालं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबद्दल. हिंदीत असा प्रयोग तोवर झाला नव्हता. नेटवर एका लेखातून असंही कळलं की 'नया दिन नयी रात' मधल्या ह्या भूमिकेसाठी आधी दिलीपकुमारना विचारण्यात आलं होतं. पण त्यांनी भूमिका नाकारली आणि स्वत:हून त्यासाठी संजीवकुमारचं नाव सुचवलं. एवढं सगळं वाचल्यावर चित्रपट बघणं आलं.

सुरुवातीलाच निवेदनात ह्या ९ भूमिका म्हणजे साहित्यातल्या नवरसांचा आविष्कार आहे असं सांगण्यात आलं. हे निवेदन दिलीपकुमार ह्यांनी केलंय हे नंतर नेटवरून कळलं. चित्रपटाचा साउंड ट्रेक सुरुवातीला थोडा खराब असल्याने माझ्या ते लक्षात आलं नव्हतं. तर ही कथा आहे सुषमाची. कॉलेजमधल्या एका कार्यक्रमात बक्षीस मिळवून ती मैत्रिणीसोबत बाहेर पडत असते. त्यांच्या थट्टामस्करीतून सुषमाचं तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आनंद नावाच्या मुलावर प्रेम आहे आणि तो सध्या त्याच्या गावी गेलाय हेही आपल्याला कळतं. सुषमा घरी येते तेव्हा घरातली सजावट बघून ती वडिलांना त्याबाबत विचारते तेव्हा ते दुसर्या दिवशी तिचा साखरपुडा असल्याचं तिला सांगतात. सुषमाला धक्का बसतो. आपल्याला न विचारता आपलं लग्न ठरवलं म्हणून ती वडिलांवर रागावते. पण लग्नाचं म्हणून एक वय असतं आणि ते उलटून जाता कामा नये अशी तिच्या वडिलांची ठाम समजूत असल्याने ते तिचं काहीएक ऐकून घ्यायला नकार देतात. दुखावलेली सुषमा आपल्या खोलीत जाते आणि खिडकीतून पळ काढून आनंदला भेटायला त्याच्या हॉस्टेलवर जाते.

तिथल्या वॉर्डनकडून तिला कळतं की आनंद अजून गावाहून आलेलाच नाहीये कारण त्याची आई खूप आजारी आहे आणि मरण्याआधी तिला आपल्या मुलाचं लग्न झालेलं बघायचं आहे. सुषमा लगेच त्याच्या गावी पोचते तेव्हा तिच्या डोळ्यासमोरून त्याच्या घरातून एक वरात जाते. ती चौकशी करते तेव्हा घरातल्या मुलाचं लग्न आहे असं तिला कळतं. घरातून पळून गेल्याने तिचा घरी जायचा रस्ताही बंद झालेला असतो. ती जीव द्यायला एका कड्यावर पोचते पण एक मध्यमवयीन माणूस तिला वाचवतो आणि आपल्या घरी घेऊन जातो. त्याच्या घरी पोचल्यावर तो विधुर असून त्याला एक लहान मुलगी असल्याचं सुषमाला कळतं. आधी तिला त्या माणसाच्या हेतूबद्दल शंका असते पण तो तिला 'हे तुझ्या वडिलांचंच घर आहे असं समज. हवं तितके दिवस राहा. मग हवं तर तुझ्या घरी तुला सोडतो' असं सांगतो म्हणून ती रात्री तिथे राहते. पण सकाळी मात्र निघून जाते.

रस्त्याने जात असताना काही मवाली तिचा पाठलाग करतात तेव्हा एक बाई तिला सोडवते. अर्थात ते गुंड तिनेच अ‍ॅरेंज केलेले असतात. आपण स्त्रियांसाठी एक आश्रम चालवतो असं सांगून ती बाई सुषमाला आपल्या घरी घेऊन जाते पण तो खरं तर एक कोठा असतो. ह्या कोठ्यावर तिला रात्री एक दारुडा भेटतो. बायकोने केलेल्या प्रतारणेमुळे व्यथित झालेला हा भल्या घरचा माणूस बायकांवर सूड उगवायला तिथे रोज रात्री येत असतो. सुषमा 'मी तुझ्यासोबत राहून तुला प्रेम देईन' असं सांगून त्याच्याबरोबर तिथून पळते पण तो पैसे आणायला त्याच्या घरात जातो तेव्हा तिथूनही निघून जाते. कोठ्यावर घातलेले भडक कपडे तिच्या अंगावर असल्याने रात्री अपरात्री तिला बाहेर बघून पोलीस तिला धरून नेतात. तिथून सुटका व्हावी म्हणून सुषमा वेडी असल्याची बतावणी करते तेव्हा पोलीस तिची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करतात. तिथला म्हातारा डॉक्टर ती अ‍ॅक्टिंग करतोय हे ओळखतो पण तरी एक रात्र तिला इस्पितळात राहू देतो. सकाळी तो तिला आपल्या घरी आणतो पण पेपरात आलेला आपला फोटो पाहून तो आपल्या वडिलांशी संपर्क साधणार हे लक्षात येताच तिथून निघून जाण्यावाचून सुषमाला गत्यंतर राहत नाही.

पुढे ह्या प्रवासात सुषमाला आपल्या धाकट्या भावाच्या खूनाचा बदला घेणारा चहाच्या बागेतला मजूर, साधूचा वेश धारण करून मौल्यवान मूर्तींची तस्करी करणारा लंपट माणूस, महारोग झालेला श्रीमंत, नाटक कंपनीतला बायकी नट, शिकारी शेरसिंग अशी माणसं भेटतात. पण मग तिचं शेवटी होतं काय? ती घरी वडिलांकडे परत जाऊ शकते? का तिच्या नशिबातली वणवण संपतच नाही? जवाब पानेके लिये पिक्चर देखनी पडेगी बॉस.

'पिक्चर देखनी पडेगी' असं मी म्हटलं खरं पण तो पाहून माझी स्वत:ची निराशाच झाली. मी स्वतः जन्मात कधी अभिनय केलेला नाही, तो कशाशी खातात ते मला माहित नाही हे सगळं सगळं मान्य करूनही एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी असं म्हणेन की महारोग झालेला सेठ धनराज (तोंडासमोरच्या माश्या हाकलण्याचा त्याचा अभिनय मुद्दाम पाहावा असाच) आणि नाटक कंपनीतला बायकी नट ह्या दोन भूमिका सोडल्या तर मला बाकीच्या भूमिकात फारसं वैविध्य आढळलं नाही. संजीवकुमारचा अभिनय बराच एकसुरी वाटला. दुसरी वाईट बाब ही की चित्रपटाची बाकीची कथा अक्षरश: ठिगळं जोडलेल्या घोंगडीप्रमाणे बेतलेली आणि बालिश वाटली. अर्थात ७०च्या दशकातले चित्रपट आताच्या काळात बघताना बरेचसे संदर्भ बदललेत हे लक्षात घ्यायला हवं हे खरं आहे. पण ते मान्य करूनही कथेवर अधिक मेहनत घ्यायला हवी होती असंच मी म्हणेन. केवळ एक विक्रम करायचा म्हणून ९ भूमिका हव्यात आणि त्या जोडणारी काहीतरी कथा हवी असला हव्यास ह्यामागे दिसतो. कदाचित मूळ दाक्षिणात्य चित्रपटाची कथा सहीसही उचलली असेल तर तो बटबटीतपणा तसाच राहून गेलाय. तरी संजीवकुमारसारख्या प्रथितयश नटानेसुध्दा सशक्त कथेचा आग्रह धरू नये ह्याचं आश्चर्य वाटलं. जया भादुरीला जवळपास संजीवकुमारइतकाच रोल असला तरी त्याचा उपयोग तोंडीलावण्याइतकाच आहे. संजीवकुमारसाठी निदान ९ भूमिका होत्या. पण तसं काहीही कारण नसताना तिने ही भूमिका का स्वीकारली हे कोडं आहे. ओमप्रकाश (सुषमाचे वडील) 'फ्रेंडली भूमिके'त असल्याचं टायटल्समध्ये म्हटलं आहे. सुषमा एक रात्र वेड्यांच्या इस्पितळात काढते तिथे असणाऱ्या वेड्यांत फरीदा जलाल, टूनटून, ललिता पवार आणि मनोरमा दिसतात. नेटवर अशी माहिती मिळते की संजीवकुमारचा मेकअप 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये झीनत आणि 'खूनभरी मांग' मध्ये रेखाचा मेकअप करणाऱ्या सरोष मोदी ह्यांनी केलाय. चित्रपटाच्या टायटल्समध्ये त्यांचा वेगळा उल्लेख आहे. पण मधल्या काळात मेकअपचं तंत्र प्रगत झाल्याने असेल म्हणा किंवा बर्याच विदेशी चित्रपटातला मेकअप पाहिलेला असल्यामुळे म्हणा त्याचंही फार अप्रूप वाटलं नाही. उलट बर्याच ठिकाणी तो थोडा 'garish’ वाटला.

चित्रपटात ४-५ गाणी आहेत पण मला स्वत:ला त्यातलं एकही आवडलं नाही. नाही म्हणायला वेड्यांच्या इस्पितळात सुषमाने म्हटलेल्या 'एक पहेली तुमसे पुछू' ह्या गाण्यात बजेट मांडताना लोकसंख्या कंट्रोल करायला मुलांच्या जन्मावर टॅक्स, दही-दुधाची कमतरता आणि पाणी-पुरी, दही-वडा असले रस्त्यावरचे अस्वच्छ पदार्थ खाऊन लोक आपोआप मरतील म्हणून त्यावर टॅक्स लावू नये ही भाष्यं त्या काळातल्या (?) परिस्थितीचं दर्शन घडवतात. कोठ्यावर भेटलेल्या दारुड्याने म्हटलेलं 'मै वोही वोही बात' हे आजच्या भाषेत सांगायचं तर 'टायटल सॉंग' थोडंफार श्रवणीय आहे.

असो. लेखाची नेहमीची लक्ष्मणरेषा आली. चित्रपट पाहिला नसल्यास आणि पाहायची इच्छा असल्यास ह्यापुढला लेख वाचू नये ही विनंती.

चित्रपटाच्या कथेबद्दल आधी लिहिलं आहेच. त्यात अनेक कच्चे दुवे आहेत ह्यात काही नवल नाही. ज्याच्याशी सुषमाचा साखरपुडा ठरलाय तो आनंदच असणार हे 'कटी पतंग' पाहिला असल्याने आपल्या लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे तिने दुसर्याच कोणाची तरी वरात पाहिली हेही आपण ताडतो. पण आनंदवर प्रेम करणाऱ्या सुषमाला त्याला एक भाऊ असल्याचं माहित नसावं आणि आनंदची आई खूप आजारी आहे ह्याचा साखरपुडा उद्यावर आला तरी सुषमाच्या वडिलांना गंधही नसावा हे अगम्य आहे. आनंदच्या गेटअपमध्ये संजीवकुमार जयाच्या मानाने फारच थोराड दिसतो. कॉलेजमध्ये जाणारी मुलगी दोन मुलांच्या बापावर प्रेम करतेय की काय असं वाटतं. चित्रपटाच्या शेवटची मॅरेथॉन टाळता आली असती.

९ भूमिकांतली प्रत्येक भूमिका नवरसांपैकी कोणता रस प्रामुख्याने दर्शवते तेही माझ्या नीटसं लक्षात आलं नाही. उदा. खूनी माणसाची कहाणी रौद्र, करुण आणि भयानक ह्या तिन्हीपैकी कुठल्याही रसाची असू शकते. अद्भुतरसाची व्यक्तिरेखा कोणती? खोट्या साधूची व्यक्तिरेखा कोणता रस दर्शवते? हे सगळं नीट स्पष्ट न झाल्यामुळे ९ भूमिका नवरसांचं प्रतिनिधित्त्व करतात हा दावा पोकळ वाटतो.

७०च्या दशकात मी हा चित्रपट पहिला असता तर माझी काय प्रतिक्रिया झाली असती कोणास ठाऊक. तो आज पाहताना मात्र चांगल्या कथेच्या अभावापायी एका नटाचं टॅलंट (आणि माझ्या आयुष्याचे २ तास!) पाण्यात गेल्याचं दु:खच अधिक झालं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट खूप लहानपणी पहिला होता, आता त्यातले फारसे काही आठवत नाही.
>>>>>दुसरी वाईट बाब ही की चित्रपटाची बाकीची कथा अक्षरश: ठिगळं जोडलेल्या घोंगडीप्रमाणे बेतलेली आणि बालिश वाटली. >>>
एकाच चित्रपटात जास्त भूमिका करायच्या मोहाला मोठे मोठे नट बळी पडत असावेत.
अगदी हेच मला कमल हसन च्या दशावतारम बद्दल वाटलेले.
कमल हसन असायची अजिबात गरज नसलेल्या भूमिका करण्यात त्याने श्रम का वाया घालवले असे वाटलेले.

या उलट " तो मी नव्हेच " मधल्या भूमिका (रादर मल्टिपल रोल करायची गरज )जास्त खऱ्या वाटतात.

बरेचसे जुने चित्रपट आता कालसुसंगत राहिले नाहीत. त्या काळात पाहिले तेव्हा ते भारी वाटले पण आता ते तितकेसे वाटत नाहीत. अपवाद फक्त गाण्यांचा. हा चित्रपट दूरदर्शनवर पाहिलेला तेव्हा आवडला नव्हता. काही भूमिका खरेच ओढून ताणून केल्यात.

मला नक्की आठवत नाही पण जयाचे लग्न वडिलांनी आनंदशीच ठरवलेले असते.

माझा असा भ्रमनिरास खूप वेळा झाला आहे. दिलीप व संजीवच्या 'संघर्ष' बद्दल खूप काही वर्षे खूप काही ऐकून होते. हल्लीच यु ट्यूबवर पाहिला. खूप निराशा झाली. ती अभिनयाची जुगलबंदी वगैरे तर काही दिसली नाहीच पण चार पोरांचा बाप असल्यासारखा दिसणारा दिलीप तितक्याच पोरांच्या आईसारख्या वैजयंतीला बघून लगेच प्रेमात पडतो बघून हसायला आले.

बरोब्बर लिहीलसं .
आम्ही असे २ तास वाया घालवले आहेत पण दुरदर्शनवर असे तास वाया घालवायची सवय होतीच. एक नजर (शेखर कपूरचा), अंधी गली, पार, खंडहर असलेही चित्रपट असतात आणि शबाना नसरूद्दिन हेही कलाकार आहेत हे कळलंच नसतं. असो आता ते दु:ख नाही उगाळत.

"चार पोरांचा बाप असल्यासारखा दिसणारा दिलीप तितक्याच पोरांच्या आईसारख्या वैजयंतीला बघून लगेच प्रेमात पडतो" प्रचंड हसतोय.
त्यात तो काय संवाद म्हणतो तोही संशोधनाचा विषय आहे. सगळ कुटुंब वाराणसीतल, सगळे संस्कृतप्रचुर हिंदी बोलतायत आणि एकटा दिलिपकुमार मुद्दत शिद्दत करत उर्दु हिंदी बोलतो.

फारच बटबटीत दक्षिणी सिनेमा आहे. जरा शतरंज के खिलाडी, अनकही, बाजार, मंडी, जुना उमराव जान , झुबेदा, सरदारी बेगम हे बघा.व लिहा. थोडी क्वालिटीची चाळणी लावली पाहिजे कधीतरी.

जया भादुरी व संजीव कुमार म्हणजे निगे टीव्ह केमिस्ट्री आहे. दोघे चांगले एक्टर आहेत पण एकत्र कपल म्हणून वेस्ट ऑफ टाइम.

दुरदर्शनवर असे तास वाया घालवायची सवय होतीच. एक नजर (शेखर कपूरचा), अंधी गली, पार, खंडहर असलेही चित्रपट असतात आणि शबाना नसरूद्दिन हेही कलाकार आहेत हे कळलंच नसतं. असो आता ते दु:ख नाही उगाळत.>>>>>>>

दुदवर दाखवण्यात आलेले चित्रपट पाहिले नाहीत तर पाप लागते असा माझा समज असल्याने मी इमाने इतबारे प्रत्येक चित्रपट पाहत असे, अंदी गली, खंडहर वगैरे सगळे पाहिलेत. एका चॅनेलची 1000 चॅनेल झाल्यावर ती सगळी मजाच गेली. खंडहर पाहताना आता काहीतरी होईल ह्याची द एन्ड पाटी येईपर्यंत वाट पाहिल्याचे आठवते.

फारच बटबटीत दक्षिणी सिनेमा आहे. जरा शतरंज के खिलाडी, अनकही, बाजार, मंडी, जुना उमराव जान , झुबेदा, सरदारी बेगम हे बघा.व लिहा. थोडी क्वालिटीची चाळणी लावली पाहिजे कधीतरी.>>>>>

कुणीतरी त्या दक्षिणी बटबटीत वर पण लिहिले पाहिजे ना.. नाहीतर असे चित्रपट बनत होते हे कसे कळणार? आणि हा चित्रपट तेव्हा संजीव कुमारच्या जबरदस्त अदाकारीसाठी गाजला होता. एक समर्थ अभिनेता म्हणून त्याची ओळख या चित्रपटाने प्रस्थापित केली.

आज हा चित्रपट बटबटीत वाटतोय ही गोष्ट वेगळी.

रच्याकने, मला तेव्हा अनकही ग्रेट वाटलेला. आज इतका फालतू चित्रपट का बनवला गेला याचे आश्चर्य वाटते. खानोलकरांची मूळ कथा बरीच बरी वाटते चित्रपटासमोर.

"संजीव कुमारच्या जबरदस्त अदाकारीसाठी गाजला होता"
पहीली चूक. हा पिक्चर पडलेला होता.

"इतका फालतू चित्रपट का बनवला गेला याचे आश्चर्य वाटते"
दुसरी चुकं. अनकही आजही बघायला चांगला वाटतो

1. चित्रपट भले पडलेला असेल, पण संजीवकुमारच्या अदाकारीसाठी गाजलेला, आजही त्याच्या चित्रपटांमध्ये याचा उल्लेख केला जातो.

2. अनकही तुम्हाला बघायला बरा वाटत असेल, मला फालतू वाटतो. मूळ कथा अंधश्रद्धेला उत्तेजन देणारी आहे, चित्रपट तीच परंपरा पुढे नेतो. अमोल पालेकरकडून ही अपेक्षा नव्हती.

पण त्याची girlfrd आत्महत्या करते ना. ज्योतिष असते की पत्नी मरेल, ती कुठे पत्नी असते? पत्नी जिवंत राहते, ज्योतिष चुकते...अंधश्रद्धा दूरच होतेय की.

त्याचे गफ्रेशी नाते अगदी पत्नीसारखेच असते, लग्न केलेले नसते एवढेच. आधीच्या एका दृष्ग्यात सुचवलेय तसे. सो, ज्याला विश्वास ठेवायचा आहे तो यावरून एक बायको बाळंत होत असताना मरते या भाकितावर विश्वास ठेवेल की. कुठल्या नंबरची बायको मरेल हे कुठे सांगतो ज्योतिषी?

. भीमसेन जोशींची गाणी ही एकमेव जमेची बाजू .

अनकही वर खुप लिहीता येईल अर्थात लहानपणी आईने समजावला होता हा चित्रपट. हा धागा स्वप्नाने लिहीलेल्या चांगल्या परीक्षणाचा आहे. आपल्या चर्चेना का खराब करा. मी थांबतो.

बरोबर. मीही काल इथे बरेच काही लिहिले होते पण पोस्टायच्या आधी खोडले. तुम्ही धागा काढा, लिहायला आवडेल तिथे.

प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे आभार Happy

अमा, मी नेटवर ह्या पिक्चरबद्दल चांगले रिव्ह्यूज वाचले म्हणून पाहिला. गुगु.......साधना म्हणते तसा अनकहीवर धागा नक्की काढ. त्या निमित्ताने चांगली चर्चा तरी होईल.

मला बेसिकली जया बच्चन अजिबात आवडत नाही . काय तो तिचा खोटा खोटा अभिनय गुड्डी/ उपहार सेम सेम .
चेहरा वाकडा तिकडा करून ओठ थरथरवणं ( नाकाच्या खालचा भाग ) . पहिल्या पहिल्यांदी गुड्डी /उपहार मध्ये बरी वाटलेली पण नंतर नंतर सेम सेम काहीच बदल नाही असो त्यामुळे यु ट्यूब वर पाहणार नाही कारण तुझे इथले रिव्ह्यू वाचून आधी बघितलेत बरेच युट्युब वर. पण हा नाही Wink

धन्स rmd! सुजा, अग मी हा चित्रपट पहा असं म्हटलेलं नाहिये. उलट मला आवडला नाही असंच लिहिलंय की Happy