आतुर -अन्तिम भाग

Submitted by Harshraj on 23 March, 2018 - 05:43

आतुर भाग-१
https://www.maayboli.com/node/65537

आतुर भाग-२
https://www.maayboli.com/node/65561

आतुर भाग-3

https://www.maayboli.com/node/65571

आतुर भाग-४

https://www.maayboli.com/node/65598

आतुर भाग-५

https://www.maayboli.com/node/65615

अक्षदा एकीकडे मेल वाचत होती आणि एकीकडे डोळ्यातून पाणी वाहत होतं .मधेच धूसर दिसत होतं पण पाणी पुसून तीन तीन वेळा मेल वाचत होती . तिला रिप्लाय करायचा होता पण दुसरं मन पुन्हा पुन्हा नाही म्हणत होतं.

तेवढ्यात अंजु आली. सायबर चा एक तास संपला होता. पाहते तर अक्षदाच्या डोळ्यात पाणी होतं. अंजुने डोळ्यांनीच तिला 'काय झालं ?' असं विचारलं .अक्षदाने अंजुला मेल दाखवली. तीही भावुक झाली.

म्हणाली ,"किती चांगला मुलगा आहे ग अक्षदा! मुलं आपला प्रेम मिळवण्यासाठी नाही नाही ते करतात. पण हा तसा नाही वाटत. त्याचं तुझ्यावर निरपेक्ष प्रेम आहे. तू खरंच नकार कसा दिलास? कौतुक आहे तुझं. पण मेल वाचून बदलला आहे का निर्णय तुझा? "

अक्षदा म्हणाली , "बिलकुल नाही अंजु , मी योग्य तोच निर्णय घेतलाय. मेल वाचून थोडीशी पघळले , पण निर्णय बदलण्याइतकी नाही."

"मग जाऊदे रिप्लाय कर त्याला तसा." अंजु.

अक्षदा म्हणाली," नाही मी रिप्लायही करणार नाही."

अंजु ," अगं ब्लॉक तरी करून टाक. त्याला आशा तरी नकोस लावू."

" ठीक आहे अंजु, मी शेवटचा रिप्लाय करते. उगीच माझ्यामुळे त्याला आशा नको लागायला . न जाणो त्याला कधीतरी दुसरी मुलगी आवडलीच तर ...खरं सांगू अंजु, आधी मलाही हे वरवरचं वाटलं होतं गं. पण मीही त्याच्याइतकीच बेचैन झाले आहे. मलासुद्धा तो आवडतो. पण काय करावं कळत नाही. घरी सांगितलं तर परवानगी तर देणारच नाहीत पण माझं शिक्षणही अर्धवट राहील. त्यांच्या मनाविरुद्ध काहीच करायची माझी इच्छा नाही गं. त्यांनी काय काय सोसत माझ्या शिक्षणाचे पैसे उभे केलेत. कधी काही बोलत नाहीत पण आपलं पण कर्त्यव्य आहेच ना ?"

आता मात्र अक्षदा रडायला लागली. आपण कॅफेमध्ये आहोत याचंसुद्धा भान राहिलं नाही तिला.

"खूप स्वार्थी झालेय का गं मी ?" अक्षदा

अंजुने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण अक्षदाची मनस्थिती समजून घेण्याच्या पलीकडची झाली होती. शेवटी अंजु तिला कसंबसं होस्टेलवर घेऊन आली.

अक्षदा जेवलीही नाही. तिच्या मनात सतत त्याचा विचार , त्याच्या आठवणी येत होत्या. किती काळजी करायचा तो . एकटं वाटू नये म्हणून सतत सोबत करायचा, ती लांब राहूनसुद्धा मिळून ऐकलेली गाणी, कधीतरी त्याचं काळजीयुक्त चिडणं ..सगळं सगळं आठवत होतं. पण तरीदेखील निर्णयावर ठाम होती. दुसऱ्यादिवशी सगळं विसरायचं ठरवून रात्री अक्षदा झोपली. कॉलेज नियमित चालू झालं. प्रोजेक्ट्स , अभ्यास यात दिवस पटापट जात होते . तरीसुद्धा अक्षदाला एकही दिवस असा जायचा नाही कि त्याची आठवण आली नाही , आणि कधी एखाद्या निमित्ताने मेलबॉक्स ओपन केला कि त्याच्या मेल्स ने मेलबॉक्स भरलेलाच असायचा . तेवढ्या दिवसापुरती ती डगमगायची, विचलित व्हायची , त्याला फोन करण्यासाठी मोबाइल हातात घ्यायची, वाटायचं आपणही सांगून टाकावं आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं. पण दुसऱ्याच क्षणी परत मोबाईल ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी दुप्पट वेगाने अभ्यासाला लागायची.

बघता बघता वर्ष संपलं . अक्षदा चांगल्या रिझल्टसने पासही झाली. पण तिला हव्या त्या प्रोफाइल मध्ये जॉब करण्यासाठी तिला एक वर्षाचा वेगळा कोर्सही करायचा होता. अक्षदाने त्यासाठी एडमिशन घेतली आणि काहीदिवस सुट्टीसाठी घरी आली. यावेळी मात्र आई अक्षदाच्या मागे लागली होती. शिक्षण पूर्ण झालंय, आता लग्न करायला पाहिजे . पण अक्षदा मात्र तिला उडवाउडवीची उत्तरे देत असे . तिला म्हणायची , "आई अगं , चांगला जॉब तरी लागूदे. एवढा बाबांनी आणि तू माझ्या शिक्षणासाठी खटाटोप केलाय , त्याचं काय ? "

मग बाबाही दुजेरा द्यायचे, "खरं आहे अक्षदा तुझं. काय घाई आहे लग्नाची?"

मग आई काळजीने म्हणायची ," सगळी चांगली चांगली स्थळं जातील त्योपर्यंत हातातून. मग काय करायचं तेव्हा?, शेजार- पाजारचे लोक सुद्धा विचारतात मला , काय वाहिनी कधी करताय अक्षदाचं लग्न ?"

"मग जे आहे ते सांगून टाकायचं. तिची इच्छा आहे ना शिकायची..मग शिकू दे. पुन्हा आहेच कि संसार रथ चालवायचा. आणि स्थळांचं काय घेऊन बसलीस , एकदा नोकरी लागली कि रांग लागेल बघ. माझ्या अक्षदासारखी गुणी पोरगी शोधून सापडायची नाही त्यांना ."

अक्षदाचे बाबा गावातल्या शाळेत शिक्षक होते. हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल कळकळ होती. म्हणूनच अक्षदाला ते नेहमी प्रोत्साहित करायचे. तिची वाचनाची आवड बघून ,जमेल तसे, जमेल तेव्हा तिला चांगली पुस्तके आणून द्यायचे. एकुलती एक मुलगी, तिचे सगळे लाड पुरवायचे बाबा. शेतातही राबायचे, येईल त्या पैशातून चार पैसे अगोदरच तिच्यासाठी बाजूला काढून मग घरखर्चाला वापरायचे. आपल्याला मुलगा नाही याचे कधीच त्यांना वाईट वाटले नाही. अक्षदाच्या आईचे मात्र जेमतेमच शिक्षण झालेले. म्हणून तिला वाटायचे, पोरीच्या जातीला काय करायचे शिक्षण? त्यापेक्षा घरातली चार कामे शिकावीत. नातेवाईकांना ही हेच वाटायचे. ते अक्षदाच्या बाबांना नेहमीच म्हणायचे , 'फाजील लाड केलेत पोरीचे नुसते.' पण बाबा कधीच लक्ष द्यायचे नाहीत. आईच्या आग्रहाखातर अक्षदा घरकामहीशिकली होती थोडंफार. पण फार रस घेऊन वगैरे नाही...तिची आवड पुस्तके, निसर्ग, गाणी...बाबांबरोबर शेतावर जायला तिला फार आवडायचं. पक्षांचं निरीक्षण करायचं, फुलपाखरांच्या मागे धावायचं..झाडांच्या सावलीत बसून ती सळसळणारी पानं निरखायचं....

असं होतं अक्षदाचं छोटंसं घरकुल.! घरात येणाऱ्या प्रॉब्लेम्स ची झळ आई- वडिलांनी तिला कधी लागू दिली नसली तरी अक्षदाला त्याची जाणीव होती.

अक्षदाचं कोर्स चं वर्षही संपलं, दरम्यान तिने काही ठिकाणी जॉबसाठी अप्लाय सुद्धा केलं होतं. सुट्टीत घरी आल्यावर आईने एक दिवशी अक्षदाच्या मागे तगादा लावला ," झालं कि आता शिक्षण. २५ वर्षाची झालीस. लग्नाला उशीर झाला तर स्थळं कुठून मिळणार"

"अगं आई, मी आत्ता तर कुठे जॉब साठी अप्लाय केलाय. थोडं थांब ना.", अक्षदा.

"पण नुसतं बघायला काय हरकत आहे? मी कुठे लगेच लग्न कर म्हणतेय." , आई.

एवढ्यात अक्षदाचे बाबाही बाहेरून आले. त्यांनी दोघींचा संवाद ऐकला होता.

ते म्हणाले , " आई बरोबर बोलतेय बेटा, आपल्याला लगेच कुठे लग्न करायचंय. तुझ्या नोकरीची अट मान्य असेल तरच आपण होकार कळवायचा. मग तर काही प्रॉब्लेम नाही ना?"

"त्येच म्हणते मी. मावशीनं चांगलं स्थळ आणलाय. नोकरीवाला मुलगा आहे, शेती आहे, घरची माणसं पण चांगली आहेत असं म्हणत होती ती." आई

" आई नको ना घाई करू इतक्यात.", अक्षदाला त्यांना कसं समजवावं ते कळेना. आज तर बाबांनीही लग्नाच्या विषयात रस घेतला होता.

"हे बघ अक्षदा, आता आम्ही म्हातारे झालो. तु एकुलती एक असल्यामुळं तुझ्याभोवतीच आमचं विश्व होतं इतके दिवस. पण आता मोठी झालीस. आमची जबाबदारी आम्हाला पार पडायलाच पाहिजे." अक्षदाचे बाबा थोडेसे भावुक होऊन बोलले.

" पण बाबा....", आपल्या मनात दुसरं कोणीतरी आहे हे याना कसं सांगायचं. पण अक्षदाला ते केव्हा ना केव्हा सांगायचं होतं. त्यानंतर दोघे जो निर्णय घेतील तो निर्णय स्वीकारायला ती तयार होती.

"बोल अक्षदा, आजपर्यंत आम्ही तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती केली नाही आणि तूसुद्धा कधी आमचं मन दुखावेल असं वागली नाहीस." बाबा.

" हो बाबा, पण...दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी ट्रेनिंग ला पुण्याला गेले होते तेव्हा मला एक मुलगा आवडला होता. बाबा..आई..तुम्हाला त्रास होईल म्हणून मी कधी काही सांगितलं नाही. पण अजूनही मी त्याला विसरले नाही. "

आईला तर धक्काच बसला. तेवढ्याच रागानं ती बोलली ," हि थेरं करायला गेली होतीस का ? तरी सगळे म्हणत होते नका पाठवू बाहेर शिकायला . मेली आम्हालाच हौस भारी !"

"अगं तिला पूर्ण बोलू तरी दे. सांग अक्षदा, कोण आहे तो मुलगा? काय करतो? आपल्या जातीचा आहे कि दुसऱ्या जातीचा?"

पुन्हा आई रागानं बोलली ," कशाला विचारताय तुम्ही ? आपल्या समाजात काय चालतं का हे ? लोक तोंडात शेण घालतील. "

बाबा आईला शांत करत अक्षदाला म्हणाले , "तिच्याकडे लक्ष न देता बोल तू .."

अक्षदाला थोडा धीर आला. तिनं त्यांना विलासबद्दल सगळं सांगितलं. आणि म्हणाली ,

"बाबा, मला कोणालाच दुखवायचं नव्हतं, म्हणून तर मी त्याला नकार दिला. पण त्याला विसरू शकले नाही. तो माझ्यासाठी थांबलाय कि नाही हेही माहित नाही मला. तरीपण...मला वाटलं कि एकदा तुम्हाला सांगावं . तुम्ही आता जो निर्णय घ्याल तो मान्य आहे मला."

"ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. सध्या हा विषय संपवा."

"अहो पण पोरीचं ऐकणार का आता तुम्ही? उद्या लोक, नातेवाईक काय म्हणतील?" आई वैतागून म्हणाली.

अक्षदाला वाटलं बाबांना खूप वाईट वाटलंय. पुन्हा त्यांना जाऊन समजवावं. आईने तर अक्षदाला खूप काही बोलून घेतलं , पण अक्षदा एकदाही उलट बोलली नाही. त्यानंतर मात्र तिने अक्षदाशी बोलणंच टाकलं. आठवडाभर घरात वातावरण खूप गंभीर होतं. त्यातच एक दिवस अक्षदाला पुण्याच्या एका कंपनीसाठी इंटरव्ह्यू कॉल आला. अक्षदाला काय करावं कळेना. पुण्याचं नाव ऐकून पुन्हा घरात वातावरण बिघडणार. शाळेतून आल्यावर ती बाबांना म्हणाली ,

"बाबा, एका कंपनीकडून इंटरव्हू साठी कॉल आलाय. पुण्याची आहे."

" हो का, अगं मग जा कि, केव्हा जायचं आहे?" बाबा.

बाबांचं एवढं शांतपणे बोलणं ऐकून अक्षदाला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली ,"परवा सकाळी आहे इंटरव्ह्यू. उद्याच जावं लागेल. मैत्रिणीकडे उतरेन आणि परवा इंटरव्ह्यू झाला कि लगेच निघेन."

"ठीक आहे.", बाबा म्हणाले. अक्षदा जायला वळली तोच त्यांनी पून्हा आवाज दिला.

"अक्षदा..थांब जातेच आहेस तर आमच्या जावयांना सुद्धा भेटून ये."

अक्षदा ला क्षणभर काहीच समजले नाही. आणि आईला तर नाहीच नाही.

"म्हणजे?..." अक्षदा.

"म्हणजे म्हणजे..वाघाचे पंजे...! विलास ला भेटून ये म्हणतोय मी." बाबा.

अक्षदा उडालीच. चक्कर यायचीच बाकी राहिली होती तिला. बाबा पुढे म्हणाले,

"तू त्यादिवशी सांगितलंस तेव्हा मला आधी खूप वाईट वाटलं. परत वाटलं आजपर्यंत तुला सगळ्या निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं मग हा तर आयुष्यभराचा निर्णय आहे. पण असंच कसं सोपवणार मी तुला दुसऱ्याच्या हाती. मग विचार आला, मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे. आजपर्यंत मी कधी समाजाची आणि नातेवाईकांची पर्वा केली नाही. आज तरी का करावी? पुण्यातल्या एका मित्राला फोन लावला, त्याच्याकडून धागे जुळवत जुळवत विलास च्या घराची चौकशी केली. खूपच साधे आहेत ते. बाबा लहानपणी गेल्यामुळे आजपर्यंत सगळं घर त्यानेच संभाळलंय. जिद्दीने परिस्थितीतून वर आलाय. जिद्द असली कि माणसाला यशाच्या शिखरावर पोचायला वेळ लागणार नाही. आणि माझी ओळख न दाखवता त्याच्यासाठी मी स्थळ आहे असं सांगितल्यावर त्याने मला नम्र पणे नकार दिला. तो अजूनही तुझीच वाट बघतोय. तो जर चांगला मुलगा नसता तर मात्र मी या लग्नाला संमती नसती दिली."

आता आईतरी काय बोलणार होती याच्यावर..नवरा जे म्हणेल ते बरोबर असंच तिचं आतापर्यंत तंत्र होतं. म्हणून गप्प बसली. बाहेरच्या जगात कोणा कोणाला तोंड द्यावं लागणार याच्या नुसत्या कल्पनेनंच बावरली.

अक्षदाला मात्र काय बोलावं सुचेना. असे वडील आपल्याला लाभले खरंच भाग्य आहे आपलं. नाहीतर तिने अनेकांच्या प्रेमकथा ऐकल्या होत्या. घरून होणारा तीव्र विरोध ऐकला होता. म्हणून तिला कायम भिती वाटायची. पण आज त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता. तिनं बाबांना मिठीच मारली. थॅन्क्यु म्हणायची गरजच नव्हती. अश्रूच सगळं काही बोलत होते.

थोड्यावेळ थांबल्यावर पुढं म्हणाले ," त्याच्या घरच्यांशी बोललोय मी. ते सुद्धा तयार झालेत. पण विलास ला मात्र यातलं काहीच माहित नाही. तूच त्याला सांगावंसं असं वाटतंय मला."

"ठीक आहे बाबा, असं म्हणून अक्षदा आत पाळली...इतक्या वर्षांचा बांध आज फुटला होता. तिनं मनसोक्त रडून घेतलं. इंटरव्ह्यू तर ती अजून आत्मविश्वासाने देणार होती. पण त्याहीपेक्षा इंटरव्यूह झाल्यावर त्याला भेटणार होती...त्याला प्रपोज करणार होती..."

म्हणूनच ..म्हणूनच आज तिने त्याला मेसेज केला होता आणि आता वाट बघण्याची वेळ तिची होती. दुसऱ्या दिवशी ती पुण्याला पोहचली तरी विलासचा रिप्लाय आला नव्हता. इंटरव्यूह झाला आणि रूमवर येऊन एकटीच नाराज होऊन बसली होती...तेवढ्यात फोन वाजला ..त्याचाच मेसेज होता ..."उद्या येतोय भेटायला ..कुठे भेटूया ?"

का कोणास ठाऊक उगीच डोळ्यात पाणी आलं..या क्षणासाठी तिचं मन केव्हाचं आतुर झालं होतं..पण आता भेटीचा क्षण जवळ आला असता हि कसली तगमग? हि कसली भीती? तीने त्याला पत्ता मेसेज केला आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. त्याला भेटायला,त्याला पाहायला तिचे डोळे आतुर झाले होते...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे खूप धन्यवाद. ज्या त्रुटी असतील त्यांना लक्षात घेऊन पुढील लेखनामध्ये सुधारणा करण्यात येईल.

असा शेवट करण्याचा हेतू हाच की, जाती साठी , समाजासाठी,प्रतिष्ठेसाठी प्रेमाला विरोध करण्यापेक्षा मुलांना पारखून जर आई वडिलांनी योग्य निर्णय घेतला तर बऱ्याच समस्या कमी होतील.

आवडली कथा. शैलीसुद्धा आवडली आणि त्यातून जाणारा विचारही आवडला.

या पुरुषप्रधान संस्कृतीत अश्या प्रेमप्रकरणाबाबत समाजाला आणि नातेवाईकांच्या फुटकळ प्रश्नांना कसे तोंड द्यायचे यावर बाबा लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तरच ते असे जमू शकते. अन्यथा आई फेवरमध्ये असेल आणि बाबा नसतील तर ती आई बिचारी फार फार तर मुलीच्या हातात गाठोडे देत भाग सिम्रन भागच करू शकते..

Please ending nit taka na...pudhe kay zle read kryche ahe...please ending cha bhag taka