आतुर भाग-५

Submitted by Harshraj on 20 March, 2018 - 03:35

आतुर भाग-१
https://www.maayboli.com/node/65537

आतुर भाग-२
https://www.maayboli.com/node/65561

आतुर भाग-3

https://www.maayboli.com/node/65571

आतुर भाग-४

https://www.maayboli.com/node/65598

सगळयात जुनी मेल होती, अक्षदा सोडून आली त्याच्या दुसऱ्या दिवशीची ...

आणि सब्जेक्ट होता ..'तू गेली तेव्हा ...'

अक्षदाने मेल ओपन केला आणि वाचायला सुरुवात केली ,

"dear अक्षदा ,

मैत्रीच्या नात्याने dear लिहिले आहे. गैरसमज करून घेऊ नकोस . मनातलं खूप काही सांगायचं राहिलं होतं . राहवलं नाही म्हणून मेल केला. फोनच करावा असं कित्येक वेळा वाटलं . पण ..तू उचलणार नाहीस याची खात्री होती .आय होप कि , माझा मेल तरी वाचशील.

त्या दिवशी निघून गेलीस ..पण मी , माझा काळ मात्र तिथेच थांबला . मी किती वेळ चालत होतो , मलासुद्धा कळत नव्हतं . एवढंच कळत होतं कि तू दूर गेलीयस , मला कधीच भेटणार नाहीस . हि कल्पनाच सहन होत नव्हती. एकदा वाटलं तुला कन्व्हेन्स करायचा पुन्हा एकदा प्रयत्न करावा. पण तुझ्या निर्णयाचा मी आदर करतो . कारण तू खूप विचारपूर्वक निर्णय घेतला होतास. आजपर्यंत आई रोज मागे लागायची लग्न कधी करणारेस , पण घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये मी कमी पडेन म्हणून , मुली , प्रेम या गोष्टींपासून दूर राहत होतो. काल तुही मला तेच तर सांगत होतीस. म्हणून मी तुला जास्त आग्रह केला नाही .

पण ..खरंच सांगतो मी मात्र कोसळलो आहे . कालच आईला सांगितलं आहे , आता कधीच लग्न करणार नाही . बिचारी ..माझ्यासाठी खूप रडत होती. पण मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे .

आज ऑफिसला आलो , पण तुझा हसत गुडमॉर्निंग म्हणणारा चेहरा दिसला नाही , तुझ्या खुर्चीवर पडणारा कवडसा मात्र उगीच तुझ्या भासाची जाणीव करून गेला . मग मीच उठून तुझ्या pc वर लॉगिन केलं. आणि तसाच चालू ठेवला . नजर मात्र सतत तुझ्या चेअर कडे जात होती ..तू जवळ असताना रोज तुला चोरून बघायचो. पण आज तू नाहीस , तरी तुझा भास इथे सतत जाणवतोय . आज नाश्तासुद्धा एकट्यानेच केबिन मध्ये येऊन केला . आणि लंच सुद्धा . मित्र म्हणत होते , 'सोड यार, असं तर होतंच असतं .कितीतरी मुली भेटतील तुला !' खरं आहे , यानंतर कितीतरी मुली भेटतील मला , पण 'तू ' मात्र भेटणार नाहीस . तू मला किती ओळखायला लागली होतीस माहीत नाही पण दोन महिन्यात तुझ्या आवडीनिवडी , तुझं हसणं, गाण्यात हरवून जाणं , पावसात रमून जाणं ,आणि कधी मला सांगितलं नाहीस तरी ..तूझं कविता करणं ..सगळ्या गोष्टी काळजात घर करून गेल्या आहेत. मूळात अबोल असलेला माझा स्वभाव, तुझ्याबरोबर कुठे पळून जायचा कोणास ठाऊक. तुझ्या आवडीच्या विषयावर गप्पा मारता याव्यात म्हणून किती गाणी सर्च केली,किती ऐकली , किती पुस्तके वाचली या दोन महिन्यात. नाहीतर या गोष्टींपासून कोसो दूर होतो मी. पाऊस तर नसती झंझट वाटायची मला..पण तू गेल्यावर शिकलो , पाऊस अनुभवायला , त्याच्याशी बोलायला. तू गेलीस त्यादिवशी वेड्यासारखा बरसत होता. जणू काही तू जाणार आहेस म्हणून तोही रडत होता ..माझ्यासारखाच. जाताना त्याच्याबरोबर माझं नातं मात्र जोडून गेलीस.

तू काल तुझा निर्णय घेतलायस आणि आज मी माझा. तुझी वाट पाहणार आहे. जीवात जीव असेपर्यंत. मला तुझ्या आठवणी पुरेशा आहेत जगायला. बघुयात काय होतंय. कदाचित उद्या तू मला विसरूनही जाशील , पण मी मात्र तुला कधीच विसरणार नाही. ऑल द बेस्ट फॉर युवर ब्राईट फ्युचर. अजून खूप काही आहे बोलण्यासारखं ..पण आता तू भेटल्यावरच ! वाट पाहीन तुझ्या रिप्लायची."

अक्षदा एकीकडे मेल वाचत होत आणि एकीकडे डोळ्यातून पाणी वाहत होतं .मधेच धूसर दिसत होतं पण पाणी पुसून तीन तीन वेळा मेल वाचत होती . तिला रिप्लाय करायचा होता पण दुसरं मन पुन्हा पुन्हा नाही म्हणत होतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव दिसतोय विलास. तिचा निर्णय स्विकारलाय अन गुड लक फॉर द फ्युचर हेच सांगायचेय तर मग मुद्दाम हून मी कोसळलोय, आता लग्नच करणार नाही, माझी आई रडली वगैरे इमोशनल ब्लॅकमेल कशाला? तिला गिल्ट द्यायला?

मै + १
अग्दी हेच वाटलंय. एकदा नाही म्हणलीये ना. तिचा निर्णय स्विकारलाय्स ना मग इमेल मधुन एमोशनल अत्याचार कशाला? असं वाटलं.
नाही म्हणतेय तरी तिचं प्रेम आहेच माझ्यावर असा अर्थ निघतोय का?