माझी व्हिएन्ना यात्रा - सिंहावलोकन - १

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

माझी व्हिएन्ना यात्रा - सिंहावलोकन - १

व्हिएन्नाला येऊन २ आठवडे झाले. काहीतरी लिहावे असे मनात घोळत होते. तसे बघायला गेले तर हल्ली ऑफीसमध्ये प्रोजेक्ट ची डॉक्युमेन्ट्स आणि घरी बायकोने सांगितलेली सामानाची यादी यापलिकडे काही लिहायची सवय उरली नाहीये आजकाल.. पण लिहायला जागा आहे, वेळ आहे आणि कधी नव्हे ती इच्छा आहे तर लिहावेच असा विचार करुन बसलोय...

लंडन मध्ये ८ वर्षे राहिलो पण ऑस्ट्रिया ला जाण्याचा योग कधी आला नाही. एक मोझार्ट सोडला किंवा त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेलं साल्त्झ्बर्ग सोडलं तर तेथे काही असेल असं पण कधी वाटायचं नाही. पण माझ्या सध्याच्या कंपनीच्या कृपेने व्हिएन्ना ला जायचे आहे असे कळले आणि नवीन काहीतरी बघण्याची उत्सुकता परत एकदा वाढीला लागली. तसं बंगळूर ला गेल्यापासून कमीत कमी जागेत आपली चार चाकी कशी घुसवता येईल असा विचार करणारे चालक आणि अशा चालकांना हूल देऊन आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा विचार करणारे दुचाकी स्वार यांच्या रोजच्या अटीतटीशी नावीन्य सुरु होतं आणि तेथेच संपतं.. त्यामुळे पुन्हा एकदा बर्‍याच दिवसांनी काहीतरी वेगळं होणार आहे हेच जास्त समाधानकारक होतं.

तशी ऑस्ट्रिया बद्दल बर्‍यापैकी माहिती होती आधी, म्हणजे, मी जर चुकत नसेन तर, या देशाशी सामायिक सीमा असणारे ७ देश आहेत. आल्प्स चं सान्निध्य आहे आणि देश छोटा जरी असला तरी EU मध्ये नगण्य नाही..इत्यादी.

सध्या सगळीकडेच हवामान थोडे अस्थिर आहे, येथे तर पाऊस, स्नो आहे अशी माहिती मिळाली. हे सांगितल्यावर लगेच सूचनांचा भडीमार चालू झाला... घरी आणि दारी (ऑफीस मध्ये) सुद्धा. कोट घेऊन जा बरं का (इ. सहकारी, जणू मी कोटाशिवायच जाणार होतो), भरपूर गरम कपडे ठेव बरोबर (इ. आई, शेवटी आईचं हृदय आहे ना), बायकोने तर उत्साहाने मफलर, हातमोजे इत्यादी गोष्टी कोणत्यातरी बोचक्यातून काढून दिल्या... चला, त्या निमित्ताने त्यांना जरा हवा लागेल, हे तिचं गणित Happy

तर अशी तयारी झाली. आता प्रश्न आला मुलीला समजावयाचा. तिला झोपवायला मी लागतो, मग तिच्या मनाची तयारी करायला सुरुवात झाली. आता मी कामासाठी गेलो की एकदम २१ दिवसांनी येणार हे सांगितल्यावर तिने शांतपणे विचारले की म्हणजे तुम्ही जेवायला आणि झोपायला येणार नाही का ? मी अवाक्...काय बोलणार हो.. वडील म्हणजे घरात झोपायला आणि कधीकधी जेवायला येतो तो माणूस अशी तिने स्वतःची पक्की समजूत घातली आहे.. काही इलाज नाही.

तशा ही ट्रीप ठरल्यापासून बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा घडताहेत माझ्यासाठी... म्हणजे एमीरेट्स ने प्रवास आधी केला नव्हता, तो झाला, मला एअरपोर्ट वर न्यायला आलेली टॅक्सी कधी नव्हे ती वेगात पळत होती, नाहीतर माझे नशीब काय विचारता... मी अशीच रिक्षा पकडतो जी कधीच २० कि.मी. पेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाही आणि जिचा चालक या विरक्तीला पोचलेला असतो, कितीही सांगा, 'मनावर संयम, वेगावर संयम' हे अंगी बाणवून घेतलेलाच असतो... असो.

तर घरातून निघालो, काहीही विघ्ने न येता विमानतळावर पोचलो. चेक-इन काऊंटर ला गेलो. माझा पासपोर्ट बघून तेथला माणूस मला विचारतो, तुम्हांला तिकडे जायला व्हिसा लागत नाही का ? पुन्हा एकदा माझी बोलती बंद...मनात म्हटलं, अरे राजा, हे तू मला काय विचारतोस, तुला माहिती नाही का हे ? मी, 'नाही लागत' असं म्हणालो तर ते खरं असेलच याची काय शाश्वती ? अर्थातच, मोठ्याने त्याचे शंकासमाधान करुन ते सोपस्कार पार पाडले आणि पुढचे ४ तास हरि जागर करत विमानाची वाट पाहिली.

मला माणसांचे निरिक्षण करण्याचा छंद आहे. विविध माणसे, त्यांचे विभिन्न स्वभाव हे पाहत माझा वेळ सहज जातो. त्यामुळे विमानतळ, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी मला कधी कंटाळा येत नाही. त्यामुळे या ही वेळेला मी माझ्या निरिक्षणाला सुरुवात केली. लगेच १५ मिनिटांत पहिला नमुना सापडला...

एक मुलगी, साधारण ३० वय असेल, चेक-इन च्या वेळी माझ्या मागे रांगेत उभी होती, ती अचानक तरातरा आली आणि समोर उभ्या असलेल्या दुसर्‍याच विमानाच्या रांगेत उभी राहिली बोर्डींग साठी... तिला शुक शुक करुन बोलवायचा प्रयत्न केला, नेहमीप्रमाणेच ती सोडून त्या रांगेतल्या जवळ जवळ सगळ्यांनी माझ्याकडे पाहिले पण तिला काही ऐकू येईना... शेवटी तिथल्या एका कर्मचार्‍याने तिला त्या रांगेतून बाहेर काढले तेव्हा हा प्रकार थांबला..

दुसर्‍या बाजुने एक तरुण हातात लॅपटॉप आणि गळ्यात एक फॅन्सी पिशवी अडकवून येत होता. दर चार पावलांनंतर थांबून आजुबाजूला बघत होता, शेवटी कोठेतरी त्याला बसायला जागा मिळाली असावी, पण ५ च मिनिटांनी तो परत आला आणि मग री-प्ले.. सगळ्या प्रवासाचा..
तिसर्‍या वेळेला तो आला तेव्हा अचानक माझ्यासमोर थांबून सगळं सामान उचकायला लागला... माझं बोलणं ऐकून लोक स्वतःचे केस उपटतात असं ऐकून होतो, सामान उचकणारा पहिलाच दिसला (अजून एक पहिल्यांदा झालेली गोष्ट)..मग मात्र मी न राहवून त्याला विचारले, तेव्हा कळले की त्याचा पासपोर्ट हरवला आहे आणि म्हणून तो सगळ्या विमान तळाची चक्कर मारतोय, कुठे सापडतोय का ते बघायला..

अजून एक किस्सा सांगायचा राहिला.. चेक-इन च्या रांगेत इटालियन लोकांचा एक मोठा जथा होता (घ्या, मायबोलीवर ग्रूप शब्द नकोय ना..), तर त्यातले काही लोक पुढे होते, काही पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, काही थेट घुसत होते.. आणि हे सर्व तेथला कर्मचारी शांतपणे बघत होता.. त्याला मी हे दाखवून दिल्यावर त्याने 'वो गोरे लोगोंको कुछ बोल नही सकता' असे उत्तर दिले. कदाचित त्याला त्यांना कळेल असे इंग्लिश येत नसावे, पण या प्रकाराची मला अतिशय चीड आली. जे लोक स्वतः च्या देशात मारे शिस्तीचे पुळके आणतात त्यांना दुसर्‍या देशात ते कळू नये का.. आणि त्यांना कळलं नाही तर आपण सांगू नये का..पण जोपर्यंत कातडीच्या रंगाला महत्व देण्याची आपली वृत्ती जात नाही तोपर्यंत हे असंच चालणार, त्यांचंही आणि आपलंही... Sad

पुन्हा एकदा गाडी रुळावर आणतो..

दुबई पर्यंतचा प्रवास अगदीच अनुल्लेखाने मारण्यासारखा (म्हणजे uneventful ) झाला.
दुबई विमानतळावर विमान उतरताना इतक्या अलगदपणे उतरले की तो वैमानिक नक्कीच हळूवार कविमनाचा असणार असे वाटून गेले.. माझ्या ६० प्रवासांमध्ये पहिलीच वेळ (पुन्हा एकदा पहिली वेळ) इतक्या सॉफ्ट लॅन्डींग ची.

दुबई विमानतळावर एक उल्लेखनिय गोष्ट दिसली म्हणजे तेथल्या तेथे वापरण्यासाठी बेबी स्ट्रोलर्स आहेत. म्हणजे ट्रान्झिट मध्ये असताना काय करु असा प्रश्न नाही.. ही सोय मी युरोप मध्ये कोठे पाहिल्याचं मला आठवत नाही.

दुबईहून साधारण एकाच वेळी सर्व युरोप भर विमाने जातात. विमानतळावर असंख्य गोरे लोक जागा मिळेल तेथे झोपलेले होते. व्हिएन्ना च्या विमानात कोणीतरी असेल का ही सुरुवातीला आलेली शंका नंतर एवढे सगळे लोक या एकाच विमानातून जातील का यात बदलली.. काही भारतीय पण दिसले, मी त्यांना पाहिलं, त्यांनी मला पाहिलं, पण दोन भारतीयांनी परदेशात पोचल्याशिवाय (दुबई तशा अर्थाने परदेश नाही हो, आपल्यासारखीच आणि आपली माणसेच जास्त दिसतात तेथे) एकमेकाला ओळख द्यायची नाही हा अलिखित नियम आम्ही तेथेही पाळला..

विमानात स्थानापन्न झालो खरा.. कधी नव्हे ती 'आपात्कालीन निकास' असलेल्या ठिकाणी जागा मिळाली (पहिलीच वेळ...), आरामात बसेन असं वाटलं, तर तेवढ्यात एक हवाई सुंदरी येऊन तिने सगळे विस्कटून टाकले...माझ्या जागेवर एक देशी लेकुरवाळा येऊन बसला, त्याची बायको तेथेच कोठेतरी जवळ होती म्हणून.. मी माझ्या शेजार्‍याला उठवलं, तो उठून अजून तिसरीकडे हे करेपर्यंत विमान निघण्याची वेळ झाली. हा लेकुरवाळा विमानात बसल्यापासून घोरत होता आणि बायको जेवढा वेळ जागी होती तेवढा वेळ जगाचा राग आल्यासारखी बसली होती... कदाचित नवर्‍यावर पण रागावलेली असेल, त्याचा उपयोग नाही म्हणून... सांगायचं काय की आजुबाजुला किती करमणूक होती ते बघा...

विमानात निघाल्यानंतर एक न्याहारी आणि नंतर उतरण्याच्या आधी जेवण असे मिळणार होते. विमान उडल्यानंतर लगेच ढगाई सुंदरी ने मेन्यू आणून दिला, अशा आविर्भावात की बघा, बघा, दिलेल्या १०० पदार्थांमधून पाहिजे ते निवडा..

माझ्यासमोर बरीच मोकळी जागा होती, ती जागा जेवणाच्या ट्रॉलीज ची पार्किंग स्पेस म्हणून वापरायची आहे असे त्यांचे आधी ठरले असावे. प्रत्येक एअरलाईनची सगळी विमाने जशी त्यांच्या हब ला जमा होतात, तशा सगळ्या ट्रॉलीज माझ्या समोरच्या जागेत येऊन विश्रांती घेत होत्या. एका सुंदरीचं फक्त त्या हलवणं आणि परत पार्क करणं एवढंच काम होतं... फ़ूटबॉल मध्ये कमी दर्जाचे संघ कसे ५-५ जण एकावेळी बॉल च्या मागे पाठवतात, तसे एकदा एक ट्रॉली निघाली की असतील तेवढे सगळे तिच्या मागे जायचे... न्याहारी संपली .. मी निश्वास सोडला...परत अर्ध्या तासाने त्याच आल्या की... जेवणाची वर्दी घेऊन.. हे म्हणजे आदरातिथ्याचं दुसरं टोक होतं (पुन्हा एकदा पहिल्यांदाच...). मागितलेले पाणी ३०-४० मिनिटांनी आणून देणे हा प्रकार आपल्याला नवीन नाही, पण आता न्याहारी केलीत ना, मग आता लगेच जेवलंच पाहिजे बरं का असा आग्रह कधी झाला नव्हता... कदाचित या सुंदर्‍या कर्क राशीच्या असतील...भावोजी, मी दिलं तरी नाही घेणार का म्हणणार्‍या Happy

क्रमश:

प्रकार: 

Proud सुरुवात तरी चांगली झालीये. वेळच वेळ आहे म्हणतोस म्हणजे पुढचे भाग पटापट पडतील.

अरे मिलिंदा सहीच... छान लिहीलय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

मस्त लिहिलय! पुढचा भाग टाक लवकर. नाहीतरी काम नाही आहे म्हणाला होतास! Proud

कायभावोजी,अह्गदी अजीर्ण होईपर्यंत खाल्लं का मग? Happy

ढ.सुंदरींचं वर्णन वाचायलाही आवडॅल हो भावोजि! Happy
_________________________
-Impossible is often untried.

एव्हढ्या हवाई सुंदरी पाहून तुमचं ईमान पार ढगात गेलं असेल ना?

तुम्ही जेवायला आणि झोपायला येणार नाही का ? मी अवाक्...काय बोलणार हो.. वडील म्हणजे घरात झोपायला आणि कधीकधी जेवायला येतो तो माणूस अशी तिने स्वतःची पक्की समजूत घातली आहे.. काही इलाज नाही.
>>> Lol

भावोजी, मी दिलं तरी नाही घेणार का म्हणणार्‍या Happy

मस्तच!!!!!!!!

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

नमनालाच तेलाचा बुधला संपला की रे मिलिंदा! व्हिएन्नाबद्दल कधी लिहिणार अशाने Happy
छान लिहितोयस. पुढचे भाग पटापट टाक

मस्त रे.
मायबोलीला प्रवासात बशीवलंस. त्या पोरीला जोरात बीबी चुकला असे का नाही म्हणालास?

वाह मस्त लिहीलंय!! मजा आली वाचायला!
लवकर येऊदेत आता पुढचे भाग...

व्हिएन्नात बघण्यासारखं खूप आहे. आम्हाला वाचायला सुद्धा खूप मिळेल अशी आशा करते . [:)] छान चालू आहे .
तळटीपः- ईटालियन लोक युरोपातील सर्वात बेशिस्त लोक म्हणून ओळखले जातात . [:)] त्यांचे कार चालवणे पाहिल्यावरच अंदाज येतो . [:)] जर्मनीतून , स्वीस मधून किंवा ऑस्ट्रियातून कार चालवत तिथे गेले की भयंकर धक्का बसतो .

शोनू ला मोदक.. मी पण तेच लिहिणार होतो.. नमनालाच घडाभर झालं...
पुढचे भाग पटापट लिही आता... Happy

चांगलं लिहिलंय...
सगळ्यांनी म्हणून झालेलं आहे.. तरी मी पुन्हा म्हणतो पुढचे भाग पटापट लिही आता.. Happy

कर्क राशीच्या'च' मुली भावोजींना आग्रहाने खाऊ घालतात का हो? Happy
वरती कोणीतरी म्हटल्याप्रमाणे ढ. सुंदरी वर पण एक आणखी एक पान असेल तर व्हिएन्ना यायला वेळ लागणार बहुधा.

धन्यवाद सर्वांना.

नाही, ढ. सुंदरींवर एक पान नक्कीच लिहिणार नाही Happy
लोकहो, मी लिहितोय, पण माफ करा, थोडे हापिसाचे काम (ज्यासाठी आलोय ते) पण चालू आहे, वीकेंड ला. त्यामुळे थोडा विलंब होतो आहे.
कर्क राशीच्या'च' मुली <<< मला कल्पना नाही. माझा स्कोप लिमिटेड आहे या बाबतीत Happy

सही लिहितोयस मिल्या! प्रवासात आजूबाजूला बघितलं की खूपच करमणूक होते.

व्हिएन्नाबद्द्ल पण असंच सविस्तर येऊ दे.

चांगलं लिहिलंय...
>> विमानात कोणीतरी असेल का ही शंका नंतर एवढे लोक विमानातून जातील का यात बदलली.. >> Lol
>>दुबई तशा अर्थाने परदेश नाही हो,
बरोबर.. बरेच विमानतळ कर्मचारी मस्त हिंदी बोलतात. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना लंडनला जायचे होते (त्यांची पहिलीच वेळ) त्यावेळी transit दुबइलाच घेतली, सोइस्कर पडतं (एकदम फोरिनचा धक्का बसत नाही!!)

छान लिहिलय!
मला दोनतीन शन्का आहेत
व्हाया दुबई व्हिएन्नाला गेलास, तर निघालास कुठून??? भारतातून की इन्ग्लन्डातून???
विमानतळावरील कर्मचारी हिन्दी कसे काय बोलत होता? कोणता विमानतळ?
बेबी स्ट्रोलर्स म्हणजे काय?
बायदिवे, (माझ्यासाठी) सगळीकडची चिल्लर जमा करतो हेस ना? Happy
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

छानच लिहीले आहेस रे. Happy

मिलिंदा छानच !! जथ्यातल्या पुढच्या भागाची वाट बघतो.