आतुर भाग-३

Submitted by Harshraj on 14 March, 2018 - 05:27

आतुर भाग-१
https://www.maayboli.com/node/65537

आतुर भाग-२
https://www.maayboli.com/node/65561

त्याचा हसरा चेहरा बघून अक्षदालाही जरा हायसं वाटलं. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली.

पुण्यात इतका पाऊस पडतो याचं अक्षदाला आश्चर्य वाटत होतं. ती पुन्हा पुन्हा पावसाचा माहोल न्याहाळत होती , आणि विलास तिला. जेवण झालं होतं दोघांचं पण पाऊस कमी होण्याचं नाव घेत नव्हता. त्यात दोघांनीही आणलेली छत्री केबिनमध्ये राहिली होती. लंचब्रेक संपायला तसा वेळ होता. पण विलास ला अर्जंट मशीनवर जायचं होतं. मग त्याने एका मित्राजवळ छत्री मागितली.

अक्षदाला म्हणाला, "मला दुसऱ्या वर्कशॉप मध्ये जायचं आहे. मी तिकडे जातो. तु कशी जाशील केबिनमध्ये ? पाऊस कमी झाला कि जा." असं म्हणून विलास गेलासुद्धा. अक्षदाची मात्र पंचाईत झाली. काही लोकांची तोंडओळख झाली होती इतक्या दिवासात. पण लगेच कसं त्यांना छत्रीबद्दल विचारायचं ?ती तशीच कँटीनच्या दारात उभी राहिली. हळू हळू सगळे आपापल्या कामाला निघून गेले.अक्षदा एकटीच राहिली. ती ट्रेनी असल्यामुळे तिला विशेष काही काम नसायचंच. विलास तिला कधीतरीच मशिन्स वर घेऊन जायचा. काही समजावून सांगायचं असेल तरच. बाकी इतर गोष्टी तर कम्प्युटरवर च असायच्या. आता कसं जायचं ह्या विचारात असतानाच विलास आला,

"अजुन इथेच का तू? का आजपण कोणतं गाणं ऐकू येतंय?"

अक्षदा हसली.
"चल आता." विलास

पहिलाच प्रसंग..अक्षदा आणि विलास एकाच छत्रीतून जात होते. विलास ला हा छोटासा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. अक्षदा मात्र आजूबाजूला झाडं , पक्षी बघत चालली होती.

अचानक म्हणाली, "तुम्ही नाहीत का कधी गाणी वगैरे ऐकत ?"

विलास ," तसं काही नाही. ऐकतो पण जास्त करून हिंदी , जुनी गाणी. "

"पण मला तर मराठी भावगीते खूपच आवडतात. डोळे मिटून घेतले कि गाणं जिवंत झाल्यासारखं वाटतं." अक्षदा

अक्षदा मग केबिन येईपर्यंत गाण्यांबद्दलच बोलत होती.

विलास मात्र विचार करत होता, सांगायचं का हिला आपल्या मनातलं? पण हिने मैत्रीसुद्धा तोडली तर? नकोच. हि अर्धवट उमलेली सुरेख कळी आपण दुरून पाहावी हेच बरे . नाहीतर उगीच सुकून जाईल.

संध्याकाळी रूमवर आल्यावर अक्षदां एफम लावला तेव्हा विविध भरतीला ' शुक्रतारा ..मंद वारा ..' हे गाणं लागलं होतं. अक्षदाला काय वाटलं कुणास ठाऊक , तिने विलास ला मेसेज केला, 'listen fm vividh bharati'.

विलास अजून बसमध्येच होता. त्याने अक्षदाचा मेसेज वाचला , आणि आश्चर्य म्हणजे तोही तेच गाणं ऐकत होता. त्याला पुन्हा वाटून गेलं , आपल्यात आणि हिच्यात नक्की काहीतरी कनेक्शन आहे. एकदा सांगून बघायला काय हरकत आहे ? पण नकोच . मग हळू हळू मेसेज चा सिलसिला हि वाढला. त्यावेळी साधे कीपॅड वाले फोन्स होते. हळू हळू अक्षदाच्या सहवासात दिवस उडून जात होते. दरम्यान विलासच्या मित्रांनीसुद्धा त्याला,तिला प्रपोज करण्याविषयी सुचवलं होतं. पण विलासच्या मनातली दुविधा जात न्हवती. उद्या रविवार आणि परवा सोमवार..अक्षदाच्या ट्रेनिंगचा शेवटचा दिवस. माहित नाही त्यानंतर कधी ती भेटेल कि नाही माहित नाही. शेवटी त्याने मेसेज केला. 'उद्या भेटतेस का?'

अक्षदाने सुद्धा 'ok ' असा रिप्लाय केला. तिला असं वाटत होतं, विलासच्या रूपाने तिला सच्चा मित्र मिळाला होता . त्याला आता भेटणार नाही म्हणून तिलाही वाईट वाटत होतं. रवीवारी ccd मध्ये भेटायचं ठरलं होतं. विलास वेळेच्या आधीच 20-- 25 मिनिटं हजर झाला होता. तिची वाट बघताना एक एक क्षण त्याला युगासारखा वाटत होता. अक्षदा वेळेवर आली तेव्हा त्याला हायसं वाटलं. दोघांनी कॉफी ऑर्डर केली , वरवरच्या गप्पासुद्धा झाल्या. गप्पामध्ये कॉफीही संपली.

शेवटी अक्षदाच म्हणाली,"चला जायचं का आता. मला अजून ट्रेनचं बुकींगसुद्धा करायचंय."

विलासचा नाईलाज झाला, तरी तो म्हणाला , "मी येतो तुला सोडायला. चालत चालत जाऊया का ? मला तुझ्याशी थोडं बोलायचंही आहे. आता मात्र अक्षदाला शंका आली. तरी ती म्हणाली," इथेच थांबून बोलूया मग."

विलास ठीक आहे म्हणाला. आणि त्यानं सुरुवात केली ,

" हे बघ अक्षदा, तू प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस. पण..पण तू मला खूप आवडतेस. पहिल्या दिवसापासूनच तुझ्या प्रेमात पडलोय. आणि म्हणूनच तुझ्याशी मैत्री वाढवली. तुझा सहवास सतत मिळावा म्हणून खटपट केली. रोज विचार करायचो तुला सांगेन, पण हिम्मतच होत नव्हती. वाटायचं तुझी मैत्रीसुद्धा गमावून बसेन मी. पण तू जायच्या आधी मला माझं मन मोकळं करायचं होतं. लग्न करशील का माझ्याशी?"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त