कुणी कुणाचे नाही

Submitted by Pradipbhau on 12 March, 2018 - 06:39

कुणी कुणाचे नाही
रात्री खूप वेळ संगणकावर काम केल्याने थकलो होतो. सकाळची वेळ. नुकताच झोपेतून जागा झालो होतो. घरात नेहमीप्रमाणे रेडिओवर जुनी गाणी लागलेली होती. वातावरणामुळे खरखर असली तरी गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत होते. जिव्हाळा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेले ते गीत होते. अंथरुणावर पडूनच मी गाणे ऐकत होतो. ग.दि. माडगूळकरांनी लिहलेले व सुधीर फडकेनी गायलेले गीत माझ्या मनास खूपच भावले. गीताचे बोल असे होते-
“लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई,
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही.
पिसे, तनसडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले पिल्लू उडुनि जाई
रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायची नाती सगळी जो तो आपुले पाही
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
मी एकाग्रतेने पूर्ण गीत ऐकले. थोडा बेचैन झालो. विचारांची चक्रे मला स्वस्थ बसू देईनात. आपण आज जे अनुभवतो ते गेल्या कित्येक वर्षांपूर्वी या चित्रपटातून मांडले गेले याची मला मनोमन प्रचिती आली.
दिवसभर मी या गीताचाच विचार करीत होतो. खरच किती स्वार्थीपणा आपल्या नसानसात भिनला आहे. अगदी बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत क्षणाक्षणाला आपल्याला हा अनुभव येत असतो.
आई वडिलांना मुलांचा, मुलांना आईवडिलांचा लळा आहे असे आपण जरी म्हणत असलो तरी तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असतो हे वास्तव नाकारून चालणार नाही. बघाना लळा जर एकमेकांना खरोखरी असता तर वृद्धाश्रमात एवढी गर्दी का झाली असती. ज्या आईबापांनी जन्माला घातले. स्वतः उपाशी राहून वाढवले, त्यांना म्हातारपणात वृद्धाश्रमात धाडण्याचे धाडस मुलांनी कसे केले असते. आई वडीलांनी सुद्धा सर्व मुलांवर सारखे प्रेम केले नसते का? कदाचित माझे हे विचार काहींना पटणार नाहीत. काय करायचे वास्तव हे नेहमीच कटू असते.
लळा, जिव्हाळा, सहानुभूती, आत्मीयता, प्रेम, माया, ममता हे शब्द आता वापरून वापरून गुळगुळीत झाले आहेत. त्या शब्दांची धारच कमी झालेली आहे. आपण संकटात असलो की आपले आप्तस्वकीय आपल्या बद्दल ‘मला खूप सहानुभूती वाटते पण काय करणार माझी सुद्धा मदत करण्यासारखी परिस्थिती नाही’ असे सांगून पोकळ सहानुभूती दाखवतात. लळा, जिव्हाळा यासारखे कितीतरी खोटे शब्द आपण रोज वापरतो नाही का?
मानवी जीवनात कुणी कुणाचे नसते. आपण एकटे आलेलो असतो व एकटे जाणार असतो. नाती ही सोयीसाठी असतात. आपली संस्कृती अजून टिकून आहे म्हणून त्यांना जीवनात काहीतरी स्थान आहे. आई- वडील, बहीण- भाऊ, पती- पत्नी, भाऊ- भाऊ, शेजारी- शेजारी, बहिणी- बहिणी, मामा- भाचा, काका- पुतण्या ही नाती आजतरी तकलादू वाटतात. या नात्यातही स्वार्थ, मत्सर, हेवा नकळत पहावयास मिळतो. सर्वच ठिकाणी तो असेल असे मी म्हणणार नाही. असला तरी कदाचित तो दिसत नसेल. संस्कृती रक्षकांचा विनाकारण रोष नको म्हणून हा विषय सर्व स्तरावर टाळला जात असेल.
चिमणी यातायात करून घरटे बांधते. एकेक दाणा आणून पिलांना भरवते मात्र पंखात बळ येताच पिले घरटे सोडून निघून जातात. माणसाचे जीवन तरी यापेक्षा वेगळे काय आहे. ज्या मुलांना शिकवले लहानाचे मोठे केले तीच मुले बायकोच्या आहारी जाऊन परदेशात स्थिर होतात. आई बापाची साधी चौकशी करीत नाहीत.
मला ती ऐकलेली एक गोष्ट आजही आठवते. आई वडीलांनी आपल्या दोन मुलांना प्रसंगी उपाशी राहून काबाडकष्ट करून शिकवले. मुले परदेशी नोकरीसाठी गेली. तेथेच स्थिरावली. आई वडील आधार नसल्याने वृद्धाश्रमात जाऊन राहिले. एके दिवशी वडील मरण पावले. दोन्ही मुलांना कळविण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यासाठी एकच मुलगा आला. दुसरा का आला नाही याची लोकांनी चौकशी केली. त्यावेळी रजा नसल्याने व काम भरपूर असल्याने तो आला नसल्याचे त्याच्या भावाने सांगितले. त्याने जे वाक्य ऐकवले त्यामुळे मीच काय सारेच थक्क होतील. तो म्हणाला आम्ही ऍडजेस्टमेंट केली आहे. आत्ता मी आलो. आईच्या वेळी तो येणार आहे.
आता मला सांगा कोण कोणाचे आहे. हताश होऊन जीवनात कोण कोणाचेच नाही हेच सत्य असल्याचे म्हणावे लागते. संपत्तीसाठी बाप मुलाचा, मुलगा बापाचा खून करतो. पत्नी पतीला संपवते. जेथे रक्त सांडले जाते तेथे कसली आली आहेत नाती. ती फक्त सांगण्यापूरती आहेत. जीवनात जो तो आपलेच पहातो. नोकरीत असतो घरी महिन्याला पगार आणतो. बायको मुलेबाळे याना चैनीत ठेवतो तोवर कुटुंब प्रमुखावर प्रेमाचा वर्षाव होतो. सेवानिवृत्ती नंतर त्याचेही आयुष्य बदलून जाते. बायको, मुले यांचे प्रेम कमी होत जाते. का कोणास ठाऊक पण एकटेपणाची जाणीव होऊ लागते.
बालपण, तारुण्य, वृद्धावस्था यातील प्रेमावर तर आता विश्वास ठेवणे देखील कठीण आहे. समाजात दिखाऊ, बेगडी प्रेम वाढतच चालले आहे. कुणी कुणाचे नाही हे जरी खरे असले तरी देखील सर्वजण आपलेच आहेत असे समजून आपण आनंदमय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कारण मंगेश पाडगावकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे सांगून आपल्या जगण्यात एक नवी उर्मी दिली आहे.
प्रदीप जोशी विटा
मोबाईल..9881157709

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मानवी जीवनात कुणी कुणाचे नसते. आपण एकटे आलेलो असतो व एकटे जाणार असतो. नाती ही सोयीसाठी असतात.
कुणी कुणाचे नाही, हे अगदी खरे आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात एवढी गर्दी का झाली याच्यावर फार विचार करू नका.

ज्या मुलांना शिकवले लहानाचे मोठे केले तीच मुले बायकोच्या आहारी जाऊन परदेशात स्थिर होतात. आई बापाची साधी चौकशी करीत नाहीत. >> हे सरसकट खरे आहे, असे समजू नका.

<< चिमणी यातायात करून घरटे बांधते. एकेक दाणा आणून पिलांना भरवते मात्र पंखात बळ येताच पिले घरटे सोडून निघून जातात. >>
----- हेच तर नैसर्गिक आहे. मला माझ्या पुढच्या पिढी कडुन असेच अपेक्षित आहे.

<< माणसाचे जीवन तरी यापेक्षा वेगळे काय आहे. ज्या मुलांना शिकवले लहानाचे मोठे केले तीच मुले बायकोच्या आहारी जाऊन परदेशात स्थिर होतात. आई बापाची साधी चौकशी करीत नाहीत. >>
------ हे सामान्यकरण झाले आणि ते खरे स्वरुप नाही आहे. अनेक वेळा मुलाने किव्वा मुलीने पालकान्च्या जवळ रहाण्यासाठी नोकरी, करिअर सोबत तडजोड केलेली आहे.

जोपर्यंत पालक धडधाकट आहेत, हातपाय चालताहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणे फायद्याचे असते. नंतर त्यांची अडचण होते.

Hierarchy ही downward असते....
मुलं>>>>पारेन्ट्स

आईबाबांनी आता ते काबाडकष्ट करून मुलांना गावातून शहरात व शहरातून परदेशात पाठवायचे बंद करा. मुलांना आवश्यक ते शिक्षण द्या व पुढचे शिक्षण त्यांचे त्यांना घेऊ द्या. मुले हीच म्हातारपणाची काठी हे डोक्यातून काढा व स्वतःची सोय स्वतः करा. आणि आरामात राहायची सोय होत असेल तर स्वतःहून वृद्धाश्रमात जाऊन राहा. पुरुष रिटायर होऊन काहीही न करता घरात पडून राहिल्यावर त्याच्या समवयस्क बायकोने त्याची सेवा करत आयुष्य घालवायचे का? तिला आराम नको? ही सगळी सोय तुमची तुम्ही, तुमच्या पैशात करा आणि सुखात राहा. मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या मनासारखे जगू द्या.

मुलांच्या संसारात प्रचंड ढवळाढवळ करणारे, उगीच जिकडे तिकडे नाक खुपसणारे, त्यांना न सांगता सुनेने वा मुलाने काही केले की चार लोकांत त्याचा बोभाटा करणारे पालक विशेषतः आया, पन्नाशीच्या सुनेनेसुद्धा सगळे सासुलाच विचारून करावे हा हट्ट धरणाऱ्या सासवा हे सगळे इतक्यांदा आजूबाजूला पाहिले आहे की हे म्हातारे नको असे वाटायला लागते. माणसाचा पाचपोच गेलाय सगळा. कुठे थांबावे हे त्याचे त्यालाच कळत नाही. त्यामुळे आईबाबांकडे पाठ फिरवणारी पोरे व मरेपर्यंत हट्टीपणा करणारे पालक जन्माला येतात.

आमच्या घरात पण हे दोन्ही नमुने आहेत. माझी मुलगी मला कायम बजावत असते, मी यांच्यासारखी वागणार नाही पण तुही यांच्यासारखी होऊ नकोस. चूक दोन्ही बाजूंनी होते पण प्रत्येकाला आपलीच बाजू न्यायाची वाटते.

मुलांना आवश्यक ते शिक्षण द्या व पुढचे शिक्षण त्यांचे त्यांना घेऊ द्या.
>>>>
कसे घेणार? स्वत: कमावून शिक्षण घेणे सोपे नाहीये भारतात. जर योग्य वयात शिक्षण नाही मिळाले तर प्रगती खुंटू शकते. आईवडिल काही हजार वाचवतील आणि भविष्यात काही लाखांचे नुकसान होईल.

मला वाटते यापेक्षा अश्या आईवडिलांनी मुलं 18 वर्षे सज्ञान होताच त्यांच्याशी लिखित करारच करावा. यापुढे तुझ्या शिक्षणावर आणि ईतर पालनपोषणावर मी जो खर्च करणार आहे आणि तो तू मला नंतर असा अमुकतमुक व्याजासह फेडावा.
थोडक्यात हे 18 वर्षे ते कमावता होईपर्यंतच्या काळात जगण्यासाठी होणारया सर्व खर्चासाठी घरून लोण घेतल्यासारखे झाले.

मुलांनाही हे चांगलेच आहे कारण उद्या ते आयुष्यात अपयशी ठरले आणि ते पैसे परत करायची ऐपत नसल्यास आणि तुमचीच आर्थिक स्थिती त्यापेक्षा चांगली असल्यास तुम्ही त्यांच्या मानगुटीवर नाही बसणार.

किंवा सरळ असाच क्लॉज टाकावा की तुझ्या उत्पन्नाच्या दहा ते पंधरा टक्के तू आम्हाला द्यावास. मग तू हजारात कमव की करोडोंत. ही बेस्ट आयडीया आहे. मी असेच करेन Happy

साधना यांचा प्रतिसाद पटला फक्त ही वाक्य सोडून -
आईबाबांनी आता ते काबाडकष्ट करून मुलांना गावातून शहरात व शहरातून परदेशात पाठवायचे बंद करा. मुलांना आवश्यक ते शिक्षण द्या व पुढचे शिक्षण त्यांचे त्यांना घेऊ द्या.

मुलांची आर्थिक जबाबदारी कोणत्या वयापर्यंत घ्यावी याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. हल्ली लोकं एक दोन मुलांवर थांबू लागले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आईवडिल म्हणून तुम्ही त्यांच्या दरडोई पालनपोषणावरचे बजेट वाढवू शकता. त्यातही शिक्षणाला जास्त बजेट राखू शकता. लहानपणी त्यांच्या चॉकलेट आईसक्रीम वर जास्त खर्च करून, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करून, अति लाडाने त्यांना बिघडवण्यापेक्षा तेच पैसे तेव्हा वाचवून त्यांच्या नावाने साठवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरू शकता.
बरेचदा मध्यमवर्गीय पालक आपले स्टेटस जपायला वा दाखवायला मुलांना मोठ्या शाळेत टाकतात. सोबत हायफंडू क्राऊड असतो. त्या फ्रेंडसर्कलला साजेसे मग मुलालाही ठेवावे लागते. वगैरे वगैरे.. प्रत्येक जण हे करतच असेल असे नाही. पण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी योग्य प्रायोरीटी काय आहे हे पालक म्हणून आपल्यालाच ठरवायचे आहे.

आणखी एक गोष्ट. प्रत्येक मूल एकसारखे नसते. एवरी चाईल्ड ईज डिफरण्ट. एखादा मुलगा नसेल हुशार वा कर्तबगार तर त्याला तुझे तू बघ म्हणून सोडणेही चुकीचेच.

साधनाने बरोबर लिहिले आहे. आई वडीलांनी खरंच चारदा विचार करावा की आपली रिटायरमेन्ट मुलांच्या शिक्षणासाठी पणाला लावणे योग्य आहे का? लावायची असेल तरी तो तुमचा चॉइस अर्थात , पण मग त्याबदल्यात मुलांवर अवलंबून रहायची वेळ येणे, मुलांनी आपल्या आकांक्षा मारून आपल्या उतार वयात आपल्याला आधार देण्यासाठी तडजोडी कराव्यात ही अपेक्षा धरणे हे चुकीचे ठरते.
पूर्वी जास्त करून बॅचलर्स डिग्री देशात घेऊन पोस्ट ग्रॅड साठी किंवा जॉब साठी परदेशात जाणे हा कॉमन पाथ होता. हल्ली असे दिसत आहे की मुलांना अंडरग्रॅड एज्युकेशन साठी पण भारतातून अमेरिकेत पाठवायचे फॅड बरेच वाढले आहे. इथे राहून डॉलर्स मधे कमवून पण ४ वर्षांचा कॉलेज चा खर्च हा डोंगराएवढा वाटतो. रुपयाचे कन्वर्शन केले तर अजून जास्त वाटेल! कोणी असतील पैसेवाले आणि अफोर्ड करू शकत असतील तर करू देत बापडे पण केवळ तसा ट्रेंड आहे म्हणून पिअर प्रेशर मधे येऊन ऐपत नसताना इतका प्रचंड खर्च करणे आपल्या फायनन्शियल परिस्थितीला झेपेल का याचा विचार पालकांनी नक्कीच करावा.

" कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही " या वाक्यातच शहाण्या ज्येष्ठ नागरिकांनी बोध घ्यावा तो असा की मुला-मुलींसाठी आवश्यक तो खर्च करावा, तो कर्तव्य म्हणून, पण उतारवयात आपल्याला त्यांच्यावर अजिबात अवलंबून राहावे लागणार नाही याची सुद्धा तरतूद ,वयाची साठी उलटण्याच्या आत करावी. आपला साठविलेला पैसाच, त्या वयात कामी येतो. मुलांवर संस्कार गोष्टी , तत्वासाठी चांगल्या ,पण भावना बाजुला ठेवून असेच म्हणावे लागते की, पैसा हाच देव आहे, तोच आपला तारणहार आहे.

खरे आहे, सब से बडा रुपैय्या !
पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा रक्ताची नाती म्हणजे मुलं सुख देतात तेव्हा ते पैश्यांनी मिळणार्‍या सुखापेक्षा जास्त देतात. त्यामुळे हा विचार त्या वेळेला सुचत नाही.

एक असाही विचार करा,
एका मुलाला काही भयानक आजार झाला, वा मोठा अपघात झाला. ज्यात त्याच्या आईवडिलांची आयुष्यभराची कमाई खर्च होणार असेल. पण ते खर्च करून जर मुलं बरे होणार असेल. तर त्या आईबापांनी काय करावे?