बंद घड्याळ आणि पावणेबारा - ललितलेख

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2018 - 08:42

गर्लफ्रेण्डच्या बहिणीने परदेशातून आणलेले एक ब्राण्डेड घड्याळ गेले दोनेक वर्षे मी वापरतोय. मागे कधीतरी ते अचानक बंद पडले. काय कसे चालू करावे हे नाक्यावरच्या देशी घड्याळजीला समजू न आल्याने, हातात तसेच ते बंद अवस्थेतच मिरवत आहे. काय करणार, एक दिवस न घालायचे ठरवले तर दिवसभर हाताचा एक अवयवच गळून पडला आहे असे वाटत होते. त्यामुळे लगेच दुसरया दिवशीपासून पुन्हा घालायला सुरुवात केली. चालू व्हायचे तेव्हा होईल. तोपर्यंत बंद असले म्हणून काय झाले, ब्रेसलेट सारखा दागिना समजूनच घालू. बायकाही लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात. भले ते शोभत असो वा नसो. त्याचा तरी काय उपयोग असतो.

पण ईथे मी हे विसरलो, की ते सौभाग्याचे प्रतीक असते. बंद घड्याळ मात्र दुर्भाग्याचे प्रतीक समजले जाते.

हो, गेला काही काळ मी सतत हेच ऐकतोय. या आधी माझ्या ब्रांडेड घड्याळाचे लोकांनी कौतुक करावे, गर्लफ्रेण्डच्या बहिणीने दिलेय मज्जा आहे बाबा एका मुलाची म्हणून गालगुच्चे घ्यावेत, यासाठी मुद्दामच लोकांसमोर हाताची विशिष्ट हालचाल करायचो. पण कोणी ढुंकून पाहील तर शप्पथ!

पण गेले काही दिवस मात्र बघावे त्याला आपल्या खिशातील मोबाईल काढून वेळ चेक करण्याऐवजी माझ्या घड्याळातच ढुंकायची सवय लागली आहे.

"काय रे रुनम्या, कसले घड्याळ आहे तुझे? दुपारचे कसले साडेदहा दाखवताहेत?"

"काय रे शान्या, घाबरूनच गेले ना मी.. म्हटलं एवढ्या लगेच साडेदहा वाजले पण.. अकराच्या आधी मला मेल टाकायचा आहे.."

"तुझे ते घड्याळ बदल बाबा, नेहमी बघतो आणि दचकायला होते.."

अशी वाक्ये वरचेवर ऐकू येऊ लागली.
पण यानंतर जी चर्चा सुरू व्हायची त्या सर्वात एकच सूर आढळायचा.. बंद घड्याळ घालू नये. ते अशुभ असते. त्याने आपली प्रगती थांबते. विकास होत नाही. देशाची कल्पना नाही, पण आपले अच्छे दिन येत नाहीत. वगैरे. वगैरे.

माझ्या भाग्याची कल्पना नाही. पण घड्याळाचे भाग्य मात्र नक्कीच उघडले होते. याआधी त्याला जराही भाव मिळायचा नाही. पण आता गडी चर्चेत आला होता. अगदी ट्रेनने जातानाही शेजारचा माणूस त्यात डोकावायचा आणि हेच घड्याळपुराण सुरू करायचा. जगात घड्याळाचा शोध कधी लागला, ते भारतात कधी आले, आता आपण वापरतो ती सेलवर चालणारी घड्याळे केव्हापासूनची याचा काही ईतिहास माहीत नसलेली लोकंही बंद घड्याळ वापरणे आपल्या शास्त्रानुसार अशुभ आहे हे ठामपणे सांगू लागली.

कधीकाळी मीच एक छानसे वाक्य लिहिले होते -
" जर मनगटात ताकद असेल तर त्यात घातलेले घड्याळ आपल्याला हवी ती वेळ दाखवते. "

आज मात्र माझ्या मनगटातील घड्याळ एक आणि एकच वेळ दाखवत होते आणि माझी मनगटी ताकद लोकांचे कुजकट बोलणे रोखायला कुचकामी ठरत होती.

मग एके दिवशी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ट म्हणत डोकॅलिटी केली. गरगर घड्याळाचे काटे फिरवले आणि त्यात "पावणेबारा" वाजवले.
सोबत लोकांना सांगायला घड्याळशास्त्राची एक स्टोरी तयार केली,

"सध्या माझी वेळ फार खराब चालू आहे. त्यावर आमच्या फॅमिली गुरुजींनी मला सल्ला दिला आहे की घड्याळात पावणेबारा वाजवून ते तिथेच थांबव. जेणेकरून घड्याळात आणि प्रत्यक्ष आयुष्यातही तुझे पावणेबारा वाजले तरी बारा कधीच वाजणार नाहीत Happy "

आता मला लोकांपासून मनगट लपवत फिरायची गरज नव्हती. एकेका शंकेखोराला पकडून मी हे शास्त्र सांगू लागलो. काहींन पटत होते तर काहींना नाही. ज्या लोकांनी माझ्या बंद घड्याळाला अशुभ म्हटले होते त्यातील काही जणांनी माझ्या या शास्त्रावर अंधश्रद्धाळूपणाचा शिक्का मारला. तर काही जणांनी घड्याळशास्त्राबद्दल आणखी जाणून घेण्यात रुची दाखवली. आता स्टोरया रचायची वेळ माझी होती. आणि माझे तर अर्धे आयुष्य गेलेय त्यात. घड्याळात कुठली वेळ दाखवून घड्याळ बंद पाडले तर काय होते आणि त्याचा कोणाला कसा फायदा झाला आहे याच्या किस्से कहाण्या रचून सांगू लागलो.

उदाहरणार्थ,
कुठल्याही कामाचा शुभारंभ करायचा असेल तर घड्याळ ठिक १ च्या ठोक्यावर थांबवावे. लग्न जमत नसेल तर तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही एकमेकांवर येतील अश्या एखाद्या वेळी थांबवावे. आयुष्यात शुभ शुभ घडावे असे वाटत असेल तर तुमच्या जन्मतारखेनुसार जो शुभांक येतो तीच वेळ घड्याळात सतत दिसावी. वगैरे. वगैरे.

आतापर्यंत तरी हळूहळू का होईना 90 टक्के लोकांनी यावर विश्वास ठेवला आहे. प्रत्यक्ष आयुष्यात माझे सध्या पावणेबारा वाजले आहेत पण अजून बारा वाजता वाजत नाहीयेत हे ज्यांना ठाऊक आहे त्यांचा जास्तच विश्वास बसला आहे. तर ही पावणेबारा थिअरी लवकरच प्रचलित व्हायला वेळ लागणार नाही. उद्या तुम्हाला कोणी हा सल्ला दिला तर त्याचे मूळ श्रेय माझे आहे हे तुम्हाला समजावे, याच हेतूने केलेले हे लिखाण आहे.
धन्यवाद,
कु. ऋन्मेष

तळटीप - धागा सध्या ललितलेखनात आहे. जर ईथेही 90 टक्के लोकांचा विश्वास बसला तर ज्योतिषग्रूपात ढकलला जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषदादा आवडला लेख.अजून स्टोर्या बनव.बघू कधी कानावर येतात ते.ऐकल्यावर सांगेन तुला.बाकी आॅल द बेस्ट नवीन उपकथा बनवण्यासाठी.

अजून स्टोर्या बनव.
>>> याचा नक्की अर्थ काय ☺️ अशा मूळ स्टोर्या अजून बनाव की मुळ कथेतल्या उपकथा अजून बनव.

अरे सतत बारा वाजण्याच्या भितीत रहाण्यापेक्षा ते पावणे बारा ऐवजी सव्वा बारा कर, म्हणजे तुला सांगता येइल - मेरे बारा तो ऑलरेडि बज चुके है. और क्या बुरा होगा; जाओ उखाडलो जो उखाडना है... Proud

म्हणजे तुला सांगता येइल - मेरे बारा तो ऑलरेडि बज चुके है.
>>>>
हो पण हे कोणाला सांगायचे.. जो माझे घड्याळ बघून वेळ विचारेल त्याला का Proud

जर मनगटात ताकद असेल तर त्यात घातलेले घड्याळ आपल्याला हवी ती वेळ दाखवते.<<
>> याला म्हणतात श्रद्धा .. बाकी सब अंधश्रद्धा है..!

"जर मनगटात ताकद असेल तर त्यात घातलेले घड्याळ आपल्याला हवी ती वेळ दाखवते"

वा क्या बात है..

तुमच्या ऑफिसमधले किंवा ज्यांना ज्यांना पावणेबाराचं शास्र तुम्ही सांगितलं आहे ते लोक माबोवर तुमचा लेख वाचेपर्यंत तुमच्या घड्याळ्यात पावणेबाराच वाजलेले असतील..एकदा त्यांनी वाचल की,
मग बाराच वाजतील तुमचे...आणि वर काय बाराचं आहे हा...असंही म्हणून दाखवतील Wink

ज्यांना मनगटातले घड्याळाचे वाक्य आवडले त्यांचे धन्यवाद. मागेच कधीतरी डायरीत लिहून ठेवलेले. पण कुठे वापरायची संधीच मिळत नव्हती. नाही म्हणायला दोनचार पोरींना चॅटवर ईम्प्रेस् करायला चिकटवले होते Happy

जर मनगटात ताकद असेल तर त्यात घातलेले घड्याळ आपल्याला हवी ती वेळ दाखवते

भारी वाक्य आहे ! याचं हिंदी version शाहरूखच्या कुठल्यातरी मूव्हीत सहज खपून जाईल. तुम्ही प्रयत्न करून बघायला हरकत नाही.. Happy

उद्या तुम्हाला कोणी हा सल्ला दिला तर त्याचे मूळ श्रेय माझे आहे हे तुम्हाला समजावे, याच हेतूने केलेले हे लिखाण आहे.>>>>> तरीच... परवा असं काहीसं कोणालातरी अलिबागेत बोलताना पाहिलं.. काल एक भविष्य सांगणारे गुरूजीही रस्त्याच्या कडेला असंच काहीसं सांगत होते गिर्हाईकाला. मी तर सांगते पेटंट घेऊनच ठेवा. उगाच लोकं फायदा उचलतात भोळ्या माणसांचा...... Happy Wink

ऋन्मेषदादा खरच पेटंट घेऊन ठेव.स्पेशली त्या वाक्याच.द्वादशांगुलाशी सहमत. हिंदी व्हर्जन शाहरूखच्या तोंडून ऐकायला मस्त वाटेल त्या वाक्याचा.बर झाल इथे आधी लिहीलस ते.कोणी जर ते वाक्य आपल म्हणून खपवल तर प्रुफ दाखवता येईल तुला .

Lol
लेखाच्या शेवटी 'कु'. ऋ कशासाठी.. Wink