स्त्री

Submitted by पल्लवीजी on 10 March, 2018 - 03:13

स्त्री

जगास वाटते, स्री असावी सुंदरी
मोहक तरूणी, अप्सरा स्वर्गाची
मंजुळ मितभाषी, गोड स्वभावाची
तिच्या स्पर्षाने तृप्ती व्याकुळ मनाची !

जगास वाटते, स्री असावी शालिनी
माता-कन्या-भगिनी, मायेची संजीवनी
नम्र आज्ञाधारी, सेवाभावी पत्नी
तिच्या संयमाने शांती बेघर मनाची !

जगास खचित वाटते, स्री असावी पराक्रमी !
कुशाग्र बुद्धीची तेजस्वी सौदामिनी
उदात्त विचारांची सुसंस्कृती निर्माती
तिच्या ज्ञान, नेतृत्वाने प्रगती जगाची !

नसे स्त्री गौण, दासी वा वस्तू उपभोगाची
शिव-पुरूष, स्त्री-शक्ती- समानता गुणांची
स्त्रीने धरावी आस प्रगती पथाची
जागृत शिव-शक्ती, उन्नती जगाची!
****
आजच्या प्रगत युगात महिला दिन साजरा करावा लागतोय, स्त्रीच्या वेगळेपणाचा उल्लेख करावा लागतोय, तिच्या योगदानाचा सत्कार करावा लागतोय, ह्याचं जरा आश्चर्यच वाटतं नाही ? पण सत्य हे की काही अपवादात्मक प्रगत समाज घटक सोडल्यास बहुतांशी समाजात स्त्रीचे महत्व, तिच्या विषयी संवेदनशीलता व आदर नगण्यच दिसतो.

समाजात स्त्रिया व पुरुष दोन्ही घटक सामाविष्ट आहेत आणि ह्या समाजाच्या स्त्री कडून काही अपेक्षा आहेत. तशा अपेक्षा पुरुषांकडूनही असतात, पण एक फरक वाटतो तो म्हणजे बहुतांशी स्त्रिया त्या अपेक्षांचे कुंपण स्वत:भोवती इतके घट्ट बांधून घेतात, स्वत:ला अडकवून घेतात की त्या कुंपणाचे दार उघडून बाहेर येऊन मोकळया हवेत श्वास घ्यायचेच विसरून जातात ! ज्यामुळे उद्योग-व्यवसाय, समाजाच्या प्रगतीत, जडणघडणीत स्त्रियांचा सहभाग कमी होतो, त्यांचे वेगळे विचार, दृष्टीकोण समजले जात नाहीत ( diversity inclusion), संस्कृतीची समृद्धता वाढत नाही. ज्या प्रगत समाजासाठी पुरूष व स्त्रिया दोघांचे ही योगदान समप्रमाणात महत्वाचे आहे, तो घडत नाही !

मोलमजुरी करून स्वत:चे व कुटुंबाचे पोट भरणारी गरीब स्त्री, कुटुंबाच्या गरजा पुरवणारी कर्तव्यदक्ष गृहिणी,घर-कार्यालय- व्यवसाय अशी कामाची तारेवरची कसरत सांभाळणारी नोकरदार, व्यावसायिक, उच्चशिक्षित, मोठ्या हुद्द्यावर जबाबदारीचे काम सांभाळणारी कर्तबगार यशस्वी महिला वा आंतरराष्ट्रीय किर्तीची अभिनेत्री, खिलाडू, कलाकार, ... प्रत्येकीच्या वाट्याला छोट्यामोठ्या प्रमाणात संघर्ष हा अटळ आहे - एक व्यक्ती म्हणून स्वत:चे वेगळे अस्तित्व, व्यक्तीमत्व राखण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी.

स्त्री ही कुटुंबवत्सल गृहिणी असावी, प्रेम करणारी, काळजी वाहणारी आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून असावी.. अशा अपेक्षा नकळत समाज करत जातो आणि ती स्त्री ही त्या अपेक्षा बंधने, रिती- संस्कार, कर्तव्य ह्या बिरुदांखाली आनंदाने पुरवत जाते. त्याकरता कधी स्वत:ची आवड, स्वास्थ, स्वाभिमान ही दुय्यम मानते. हळूहळू घर, स्नेही, नातेसंबंध हेच स्वत:चे विश्व मानून बसते. स्वत:ची बौद्धिक, कलागुणांची प्रगती खुंटवून टाकते. अपयशाची भिती बाळगत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा आत्मविश्वासच हरवून बसते. ह्या सर्वाची खंत मनात खोलवर रुतून असते आणि बऱ्याचदा ती खंत कारण बनते कौटुंबीक कलह, नैराश्य व दु:खाचे.

स्त्री दिसायला कायम सुंदर, सुडौल दिसणारी असावी, ही पुरुषप्रधान समाजाची अजून एक अपेक्षा. मग त्यातून उगम होतो सौंदर्यप्रसाधने, कपडे लत्ते,  फॅशन, डाएट चा अतिरेक, अनैसर्गिक उपचार पद्धती, महागडी जीवनरहाणी, स्त्री चे प्रदर्शन करणाऱ्या जाहिराती, सिनेमे, अश्लील गाणी... यादी वाढत जाईल. ह्या समजुतीच्या, अपेक्षेच्या आहारी जाऊन काही जणी स्वत:च्या आरोग्याचे नुकसान करून घेतात, आर्थिक अस्थैर्य ओढवून घेतात. स्त्री ही एक सुख देणारी, उपभोग घेण्याची वस्तू आहे, ही घाणेरडी समजूत समाजात बोकाळायला लागते, ज्यातून स्त्रियांवरचे अत्याचार, त्यांचा छळ (sexual harrassment) वाढीस लागतो.

काहीजणी स्वत:चे अस्तित्व राखणे म्हणजे संसाराकडे दुर्लक्ष व नोकरी- व्यवसायात यशस्वी होणे, हेच पूर्ण लक्ष्य अशी टोकाची भूमिका घेतात व कुटुंब सुखच हरवून बसतात. तर काहीजणी कुटुंब जबाबदाऱ्या व नोकरी व्यवसाय ह्या दोन्ही पातळ्यांवर लढाई करत, दमछाक होत, स्वत:चे व्यक्तिमत्व, छंद जोपासणे विसरून जातात, चिंताग्रस्त कातावलेल्या रहातात.

ह्या सुखाचा समतोल साधायचा असेल तर मला वाटतं एक स्त्री म्हणून स्वत: बद्दलच्या अपेक्षा, स्वत:च्या क्षमता, आनंदाच्या व्याख्या, स्वत:च्या नजरेतून तोलून पाहणे, हे सर्वात महत्त्वाचे. मला काय हवे आहे, ते माझ्या शारिरीक व मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्या करता योग्य आहे का ? मी जे आत्ता करत आहे त्यात आनंदी आहे का फक्त इतरांच्या अपेक्षा पुरवण्यासाठी करत आहे ? माझ्या आवडीचा छंद, शिक्षण, नोकरी, व्यवसाय याकरता लागणारे कष्ट, वेळ, पैसा मी कसा देऊ शकते ? त्यात अपयश आले, तर त्याला कसे सामोरे जायचे, त्यातून काय शिकता येईल ? यश आले तर त्यातून मी स्वतःसाठी व इतरांसाठी काय मिळवेन व पुढे काय करेन ?... ह्या व अनेक प्रश्नांचा विचार करून, त्याविषयी इतरांशी संवाद साधून, जाणत्यांकडून मार्गदर्शन घेऊन छोटया  छोटया सुधारणा करू शकतात.

प्रेम व संवेदनशीलता, चौकस तीक्ष्ण बुद्धी, बारीक नजर, जाणीव, तारतम्यता, युक्तिवाद, एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता, कष्टाळूपणा - असे अनेक चांगले गुण स्त्रीमध्ये निसर्गाने उपजत दिले आहेत. गरज असते ती स्त्रीने स्वत:ला प्रेरणा देण्याची, आत्मपरिक्षण करण्याची, सकारात्मक दृष्टीकोण व उन्नत विचार करण्याची, ते निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याची, आपल्या वेळेचा व गुणांचा सदुपयोग योग्यरित्या स्वत:च्या विकासासाठी करण्याची, पुरुष घटकासोबत बरोबरीने प्रयत्न करण्याची,  एक प्रगत समाज घडवण्यासाठी स्त्रीशक्ती चा जागर करण्याची. 

जागृत शिव-शक्ती, होई उन्नती जगाची!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, ८ मार्च २०१८

-- पल्लवी गुंफेकर

Group content visibility: 
Use group defaults