|| शालिवाहन शक उर्फ शक-संवताचे उपाख्यान ||

Submitted by वरदा on 7 March, 2018 - 08:02

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मायबोलीवर कुणीतरी शालिवाहन-कुंभार-शकनिर्दालन-शालिवाहन शक या दंतकथेवर एक धागा काढला होता. तिथे मी त्या दंतकथेचे ऐतिहासिक वास्तव काय आहे यावर एक प्रतिसाद तपशीलात लिहिला होता. मग पुढची एक दोन वर्षे दर गुढीपाडव्याला फेसबुक किंवा इथेच परत त्या मजकुराचे पुनर्लेखन, दुवे देऊन रिक्षा फिरवणे असे उद्योग केले. गेल्या वर्षी ही रिक्षा फिरवायला जरा संकोचच वाटत होता, पण सध्याच्या वाढत्या ' एकमात्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छांच्या' फेसबुकीय आणि वॉट्सॅपीय उन्मादामुळे आवर्जून तपशीलात सोशल मीडियावर लिहिलेच, शिवाय लोकांशी वादविवादही केले. आता बास की! असं माझं मलाच वाटलं आणि तो मुद्दा मागेच पडला डोक्यातून.. पण एकुणात लक्षात आलं आहे की दरवर्षी नेमेचि येणार्‍या पावसाळ्याप्रमाणे अगदी नेमेचि येणारा हिंदू नववर्षाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा पूर काही थांबणारा नाही. तेव्हा निदान या संबंधीची ऐतिहासिक माहिती काय आहे हे सर्वांसमोर परत एकदा यायलाच हवी म्हणून. माझे गेल्या वर्षीचे प्रतिसाद, उत्तरं, टिपणं असं सगळं एकत्र संकलित करून इथे देते आहे. त्यात मधे मधे जर पुनरावृत्ती झाली किंवा वेगवेगळे परिच्छेद एकत्र केल्याने थोडेसे विस्कळित वाटले तर तेवढं गोड मानून घ्या अशी विनंती...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती. तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४) आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे...... साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली त्याला शिवराज्याभिषेक शक म्हणतो
साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.

आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला......
पुरावे एवढंच सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली असोसिएशन नंतरची आहे.)

आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल.... भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.

हो, आणि शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....

गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...

|| इत्यलम् ||

चष्टनाची प्रतिमा असेलेले त्याने पाडलेले नाणे
Coin_of_Chastana.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार उपयुक्त माहिती.
मस्त झाला आहे लेख. आणि प्रस्तावनेला अनुमोदन. तुझा त्रास नक्कीच समजू शकते. :प

सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं.
औरंगाबाद, हैद्राबाद, अकोला येथे जमिनीवर आणि कोंडापूर, नेवासे येथे उत्खननात सातवाहन नामक राजाची नाणी सापडली आहेत. त्यावर पुढील बाजूस हत्ती आणि सभोवती 'रञो सिरि सादवाहनस' (राजा श्री सातवाहन) आणि मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष असावा कारण ह्याचेच नाव पुढे कुलाला पडलेले दिसते.

शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे
चष्टनाने स्वतःचे राज्यगणना वर्ष सुरु केले हे काहीसे असंभवनीय वाटते कारण चष्टन हा स्वतंत्र राजा नसून क्षत्रप होता. अर्थात क्षत्रपाचा स्वामी सामर्थ्यशाली राजा नसल्याने तो स्वतंत्र झाला होता. अर्थात कोणत्याच प्राचीन संवतांचे (शक्/विक्रम)उल्लेख संस्थापकाच्या नावाने येत नाहीत, तर ते कालांतराने प्रचलित होतात. ह्याच वेळी त्याचा समकालीन असलेल्या नहपानाच्या लेखातही संवताचा उल्लेख आहे ह्याचाच अर्थ चष्टन किंवा नहपान यांचा अधिपती असलेल्या कुणा प्रभावी राजाने हा संवत सुरु केला असला पाहिजे. तो म्हणजे कुशाण वंशीय कनिष्क. कनिष्क हा संवताचा संस्थापक असावा हे मत फर्ग्युसनने मांडले. कनिष्काने आपल्या विशाल भूभागाच्या शासनार्थ विविध क्षत्रपांची नेमणूक केली. कार्दमक, क्षहरात, भूमक ही क्षत्रपांची कुळेच. कनिष्काने आपला संवत सुरु केला होता व हुविष्क्, वासुदेव इत्यादी त्याच्या वंशजांनी तो सुरु ठेवला होता व त्याच्या क्षत्रपांनी देखील त्याचे निष्ठेने पालन केले. कुशाण कमजोर झाल्यावर क्षत्रप स्वतंत्र झाले, मात्र त्यांनी हेच संवत पुढे प्रचलित ठेवल्याने शक हे नामाधिमान त्याला चिकटले असावे असे मानता यावे.

शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे
हे संवतही माळवा, राजपुताना आदी भागातील शकांनी प्रचलित ठेवले, पुढे शेकडो वर्षांनी चंड्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्य ह्याने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व माळवा तसेच उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या ह्या पराक्रमामुळेच अ‍ॅझेसने सुरु केलेल्या संवताला विक्रम हे नाव चिकटले असावे.

माझ्या शंकेचे कुणी निरसन करेल काय? त्या नाण्यावरची लिपी रोमन लिपीला इतकी मिळती जुळती कशी काय? ACTPNCT ही अक्षरे मला दिसत आहेत डाव्या बाजूला.

@टवणे सर
ती प्राचीन ग्रीक लिपी आहे.

वरदा उत्तम माहिती व डोंगरवेडा तुमची माहिती पण उत्तम.

हल्ली कुठल्या गोष्टीचा कसा वापर करतील याचा विचार करून संताप होतो खरच.

अतिशय उत्कृष्ट लेख! डोंगरवेडा यांनी लिहिलेली माहिती पण छान! मी बहुतेक तो पाडवा-संभाजी महाराज लेख वाचला. तो मुळातच हास्यास्पद आहे, पण त्याचा उल्लेख करून तुम्ही ही माहिती पुनः संकलित केल्यामुळे असं वाटतं की त्यातल्या मूळ मुद्द्याला अजूनही उत्तर दिले गेले नाही. काही प्रश्न उरतातचः
१. या सगळ्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध? वेगवेगळ्या संवतांमध्ये नववर्षाची सुरुवात एकाच दिवशी कशी? (काही पंचांगे वेगळी आहेत म्हणा, पण तो वेगळा मुद्दा). की फक्त वर्षगणना राज्याभिषेकानुसार होत असे आणि नवीन वर्ष = चैत्र प्रतिपदा हे आधीपासूनच पक्के गृहीतक आहे?
२. उत्तरेत दिवाळी पाडव्याला राम आयोध्येत आला असे मानतात, आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला... ह्या गोष्टी कशा रूढ झाल्या?
३. चैत्र प्रतिपदा हे नववर्ष सर्वप्रथम कुणी मानले? का?
४. सुरुवातीलाच तुम्ही म्हणता की शालीवाहन नावाचा कुणी राजा नव्हता. आणि त्याच लेखात पुढे 'शालिवाहनाने मातीचे पुतळे ...' आणि '१२व्या शतकापासून ..... उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो' असे लिहिले आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी ब्रिटीश गॅझेटियर्स आणि परमार राजे यांनी लिहिलेल्या जरी असल्या, तरी ते नक्की कुणाला 'शालिवाहन' म्हणतात? आणि असे नाव का वापरले गेले?

मी बरेच दिवसांनी इथे डोकावले. क्षमस्व.
डोंगरवेडा आणि शंतनू, दोघांनाही मी नंतर सविस्तर उत्तरं लिहेन. जरा वाट बघावी लागेल, कारण सध्या ऑनलाईन फार वेळ येता येत नाहीये Happy

डोंगरवेडा -
१. सातवाहन हे त्या कुलाचं नाव आहे. राजाचं नाव सिरि किंवा श्री आहे. सातवाहन राजाचा मूळपुरुष सिमुक नामक एक राजा होता. सातवाहनांना आंध्रभृत्य असे म्हणले जात असले तरी त्यांचे सुरुवातीचे पुरावे पश्चिम दख्खनमध्येच सापडले आहेत. या विषयात रस असेल तर डॉ शैलेन्द्र भंडारे यांच्या पीएचडीचा प्रबंध वाचा. त्यात त्यांनी नाण्याच्या पुराव्यांचं अतिशय सुरेख विश्लेषण केलेले आहे. हा प्रबंध अ‍ॅकेडेमिया.एज्यु वर उपलब्ध होता, अजूनही असावा
२. कनिष्काने शक संवत सुरू केला हे जुनं मत आहे. हे मत आता विश्वसनीयरीत्या मोडीत निघाले आहे. हॅरी फाल्क यांनी आता कनिष्काच्या राज्यारोहणाचे वर्ष इ स १२७ असावे असे मत मांडले आहे आणि ते बहुतांशीरीत्या मान्य झालेले आहे. ज्यांचे याविषयी मतभेद आहेत तेही कनिष्काने शक संवत सुरू केला हे आता म्हणत नाहीत.

शंतनू
१. चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं.
२. रामाची गोष्ट कुठे कशी रूढ झाली किम्वा याच्याशी जोडली गेली यावर माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी कुणाला तरी जेठा मारून बसून नव्याने काम करावं लागेल बहुदा
३. शालिवाहन असा राजा नसला तरी सातवाहन या नावाचे प्राकृत रूप शालिवाहन किंवा सालाहण हे आपल्याला ७व्या ८व्या शतकापासून दिसू लागते. शालिवाहन राजा प्रतिष्ठान नगरीत राज्य करत असताना अशी अगदी टिपिकल सुरुवात करून बर्‍याच दंतकथा/मिथककथा नंतरच्या साहित्यात आपल्याला दिसून येतात. त्या सातवाहन कुलाची ती सांस्कृतिक आठवण मिथककथेमधे एका राजाच्या रूपात साठवली गेली आहे असे आपण म्हणू शकतो

हिम्सकूल -
वेदकाळापासून आपल्याला महिन्याची आणि तिथीची गणना होत असे दिसून येते. वेदातल्या उल्लेखानुसार फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या दिवसाला नवे वर्ष सुरू होत असे म्हणे. ही चांद्रमासीय कालगणना होती आणि पाच वर्षांच्या कालावधीत दोनवेळा अधिकमास मिळवला जात असे. मात्र कशा पद्धतीने त्याचे तपशील आपल्याकडे नाहीत.
जाता जाता - अवांतर वेदाच्या भाषेत युग म्हणजे पाच वर्षांचा काळ (इथेही वर्षाला संवत्सर म्हणले जात असे)

माझ्या हाताशी आत्ता सर्व संदर्भ ग्रंथ नाहीत तेव्हा जशी आठवेल तशी माहिती इथे लिहिली आहे. किंचित कुठे चुभू असू शकते, पण माझ्या स्मृतीप्रमाणे तपशील बरोबर आहे.

शंतनूच्या सूचनेनुसार चैत्रप्रतिपदेविषयीच्या ओळी मी मूळ लेखात समाविष्ट केल्या आहेत. संभाजी-गुढीपाडवा हा तात्कालिक उल्लेख होता तो काढून टाकला आहे. आणि मजकुराची पुनर्रचना केली आहे. सूचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, शंतनू. __/\__

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने आपल्या बहुपेडी सर्वसमावेशक भारतीय वारशाची आठवण आपण प्रत्येक जण नव्याने करून घेऊ आणि इतरांना देऊ!! Happy

अवांतर वेदाच्या भाषेत युग म्हणजे पाच वर्षांचा काळ (इथेही वर्षाला संवत्सर म्हणले जात असे)
>>
हे मी पहिल्यांदाच वाचतोय. तुमच्या लेखातुन, प्रतिसादातुन खुप मोलाची माहिती मिळतेय.

चांगली माहिती वरदा! वेळ काढून इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद! सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वाह नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा सुंदर लेख वाचायला मिळाला! सगळीकडे शेअर करत आहे.
शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). >> सोयीसाठी शके १९१ म्हणजे 113 एडी ना?

गुढीपाडवा आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा

वरदा, माझ्या आणि इतरांच्या सूचनांची दखल घेतलीत, एवढेच नव्हे, तर तुम्हाला सयुक्तिक वाटले तिथे मजकुराची पुनर्रचना देखिल केलीत. तुमची कृती अतिशय प्रशंसनीय आहे! अनेक आभार _/\_

Pages