|| शालिवाहन शक उर्फ शक-संवताचे उपाख्यान ||

Submitted by वरदा on 7 March, 2018 - 08:02

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मायबोलीवर कुणीतरी शालिवाहन-कुंभार-शकनिर्दालन-शालिवाहन शक या दंतकथेवर एक धागा काढला होता. तिथे मी त्या दंतकथेचे ऐतिहासिक वास्तव काय आहे यावर एक प्रतिसाद तपशीलात लिहिला होता. मग पुढची एक दोन वर्षे दर गुढीपाडव्याला फेसबुक किंवा इथेच परत त्या मजकुराचे पुनर्लेखन, दुवे देऊन रिक्षा फिरवणे असे उद्योग केले. गेल्या वर्षी ही रिक्षा फिरवायला जरा संकोचच वाटत होता, पण सध्याच्या वाढत्या ' एकमात्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छांच्या' फेसबुकीय आणि वॉट्सॅपीय उन्मादामुळे आवर्जून तपशीलात सोशल मीडियावर लिहिलेच, शिवाय लोकांशी वादविवादही केले. आता बास की! असं माझं मलाच वाटलं आणि तो मुद्दा मागेच पडला डोक्यातून.. पण एकुणात लक्षात आलं आहे की दरवर्षी नेमेचि येणार्‍या पावसाळ्याप्रमाणे अगदी नेमेचि येणारा हिंदू नववर्षाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा पूर काही थांबणारा नाही. तेव्हा निदान या संबंधीची ऐतिहासिक माहिती काय आहे हे सर्वांसमोर परत एकदा यायलाच हवी म्हणून. माझे गेल्या वर्षीचे प्रतिसाद, उत्तरं, टिपणं असं सगळं एकत्र संकलित करून इथे देते आहे. त्यात मधे मधे जर पुनरावृत्ती झाली किंवा वेगवेगळे परिच्छेद एकत्र केल्याने थोडेसे विस्कळित वाटले तर तेवढं गोड मानून घ्या अशी विनंती...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती. तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४) आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे...... साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली त्याला शिवराज्याभिषेक शक म्हणतो
साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.

आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला......
पुरावे एवढंच सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली असोसिएशन नंतरची आहे.)

आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल.... भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.

हो, आणि शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....

गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...

|| इत्यलम् ||

चष्टनाची प्रतिमा असेलेले त्याने पाडलेले नाणे
Coin_of_Chastana.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व एकत्र करुन इथे लिहिलेस हे फार छान केलेस वरदा. आता व्हॉट्स अ‍ॅप वर काही आचरट फॉरवर्ड आले की की ही लिंक देईन.

लेखाच्या खाली तुझे नाव आणि क्रेडेंशियल्स पण देशील का ? व्हॉ अ‍ॅ वरुन इथे आलेले सर्व काही लोक तुला ओळखत नसणार .

मस्त केलंस वरदा. अर्थात हे इतकं लिहूनही कोणावर किती प्रभाव पडेल काय माहीत. मी तर हेही वाचल्याचं आठवतं, की गौतमीपुत्राच्या मुलाने स्वतःचा शक सुरू केला होता. हे खरं आहे का?

<<नहपान नामक क्षहरात कुलाच्या>> मी आधी 'क्षहरात' हा 'शहरात'चा टायपो आहे, असा विचार करत होतो. कुलाचं नाव क्षहरात, हे नंतर लक्षात आलं. तेवढी वाक्यरचना बदलता येईल का? Happy

सॉरी, सध्या संपादनाला कालमर्यादा असल्याने छोटेछोटे बदल आत्ताच करून घेते आहे. दोन वाक्यं जास्तीची आणि चष्टनाच्या नाण्याचा फोटो अशी आत्ताची अ‍ॅडिशन आहे

भा.चा
प्रत्येकच राजा सहसा त्याचे अभिलेख त्याच्या राज्यारोहण कालाचा संदर्भ देऊन लिहित असे.

इतकं लिहूनही कोणावर किती प्रभाव पडेल काय माहीत.>> पडणार नाही हेही कळतंय पण वळत नाही ना... निदान ज्यांना खरंच मनापासून सत्य जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी तरी ही माहिती एकत्रित राहूदेत आंतर्जालावर. या विषयावर दरवर्षी काही अभ्यासक नेमाने मराठी वृत्तपत्रांमध्ये टिपण्या लिहित असतात गुढीपाडव्याला. पण तरीही त्याचे संकलन इथे असावे असे वाटले.

मेधा, मैत्रेयी, धन्यवाद Happy

प्रत्येकच राजा सहसा त्याचे अभिलेख त्याच्या राज्यारोहण कालाचा संदर्भ देऊन लिहित असे. >> पण फक्त हे करणे म्हणजे संवत्सर सुरू होणे, असे आहे काय? वर नामोल्लेख असलेल्या राजांनी शकांच्या कालगणनेचा उल्लेख केला, म्हणजे काहीतरी होऊन ती रूढ झाली, असे दिसते. हे 'काहीतरी' म्हणजे काय असू शकेल?

थँक्स वरदा,
सगळे एका ठिकाणी लिहून ठेवल्या बद्दल,
आता शेअर करायला सोयीचे होईल.

नाही संवत्सर सुरू म्हणून मुद्दाम केलेलं नसणार. पण एखाद्या राजकुलाने त्यांच्या आद्य राजाची राज्यारोहण कालगणना सातत्याने काहीशे वर्षं वापरली तर तीच त्या भागात अधिकृत दस्तावेज --> लोकप्रिय समाजमान्य कालगणना होणार हे उघड आहे. मग हळूहळू ती जितकी जुनी तितकी सोयीची होत जाणार जास्तीतजास्त लोकांना माहित होत होत.... शक कालाबाबत तर हे निश्चितपणे झाले आहे.

वरदा , या लेखाबद्दल तुझे खूप आभार. मेधाने म्हटल्याप्रमाणे सोबत तुझे नाव आणि क्रेडेंशिअल्स दे.
आजकाल खोट्या इतिहासाचर्य आणि तत्सम विद्वानांनी फार वात आणालाय. अशावेळी योग्य माहीतीचा प्रसार होणे हे फार गरजेचे!

माझं नाव द्यायची माझी फारशी इच्छा नाही आणि गरजही वाटत नाही कारण हे माझे संशोधन नाहीये. उपलब्ध संशोधनाचा गोषवारा आहे फक्त. आणि मी अगदी उद्या आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची महासंचालक असले तरीसुद्धा ज्यांना विश्वास ठेवायचा नाहीये ते ठेवणारच नाहीयेत...

फारतर संदर्भासाठी काही संशोधन-निबंधांचे तपशील लिहू शकते, ते लिहू का मग?

खूपच छान.
आपल्याकडे ही 'आक्रमक' संकल्पना इतकी खोल रुजली आहे की सगळे या भूमीत आलेले आणि या भूमीत मिसळून गेलेले वंश शत्रूच वाटू लागले आहेत. आमच्या सध्याच्या पिढीतले कितीतरी जण या ' शत्रूं' चे वंशज असू शकतील हेही आम्ही लक्ष्यात घेत नाही.

आपल्याकडे ही 'आक्रमक' संकल्पना इतकी खोल रुजली आहे की सगळे या भूमीत आलेले आणि या भूमीत मिसळून गेलेले वंश शत्रूच वाटू लागले आहेत. आमच्या सध्याच्या पिढीतले कितीतरी जण या ' शत्रूं' चे वंशज असू शकतील हेही आम्ही लक्ष्यात घेत नाही>>>>>>>>

जे आले ते इथेच मिसळून गेले. मग येणारे आक्रमक, त्यांना विरोध ही धारणा/संकल्पना कधीपासून सुरू झाली? की ही गेल्या 50-100 वर्षातली धारणा/संकल्पना आहे? ही कुणी रुजवली?

वरदा, खूप छान लेख. सकाळपासून तो दुसरा लेख आणि त्यातले संदर्भ त्रास देत होते.
तुझ्या लेखातले तपशील लक्षात राहणं कठीण आहे, पण मुद्दा नीटपणे कळला आहे. धन्यवाद!

थँक्स वरदा. छान माहिती. ही एवढी जुनी माहिती आजही
शिलालेखामुळे उपलब्ध आहे .

आपण हे शिलालेख कसे जतन करतो? वस्तूसंग्रहालयात? अजून 1000 वर्षांनी तेव्हाच्या मानवाला किंवा जे कोणी तेव्हा असतील त्यांना हे सापडतील तेव्हा ते 1000 वर्षांपूर्वीचे वाटतील की 3000 वर्षांपूर्वीचे? तेव्हा पद्धत होती म्हणून शिलालेख खोदले जात की आपली निशाणी मागे राहावी म्हणून ? आता बहुतेक गोष्टी लिखित स्वरूपात कागदावर छापलेल्या आहेत पण कागदाचे आयुष्य काही फार नाही. पण इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू दीर्घकाळ टिकतील. मग अजून 1000 वर्षांनी जेव्हा वस्तूसंग्रहालयातले शिलालेख व सोबत मोबाईल एकत्र सापडतील तेव्हा त्यावेळच्या मानवाचा कालगणनेचा भारीच गोंधळ उडेल..

उगीच काही असंबद्ध विचार डोक्यात आले ते उतरवले. पण असे खरेच घडूही शकते?

उत्कृष्ट लेख वरदा!
फारतर संदर्भासाठी काही संशोधन-निबंधांचे तपशील लिहू शकते, ते लिहू का मग?>> नक्की ‌!

चांगली माहिती. धन्यवाद, वरदा.
इतिहासाचा 'उपयोग' चालू वैमनस्येच आणखी गडद करण्यासाठी केला गेलेला पाहून आम्हा अज्ञांनाही उबग येतो, तुम्हा जाणकारांना किती त्रास होत असेल!

एकदम मस्त संकलन..

मला एक शंका आहे, कालगणना एका ठराविक वेळेपासून सुरु झाली पण त्याच्या आधी नक्की कश्याप्रकारे कालगणना केली जायची... महिने, तिथी, वार हे कधीपासून अस्तित्त्वात आले?

Pages