रसग्रहण: मी पृथ्वीचा झालो प्रियकर - विंदा करंदीकर

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 March, 2018 - 15:14

विंदा करंदीकर प्रथम भेटले ते शालेय वयात.

'पवित्र मज यंत्राची धडधड, समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके
पवित्र सुखदु:खाची गाणी वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन!'

असं ठासून सांगत.

तोवर कविता म्हणजे भावनांचा उत्कट आविष्कार इतपत समजू लागलं होतं. पण तो प्रेम, भक्ती, देशभक्ती, असा सगळा हमरस्त्यावरचा प्रवास. 'रात्रीच्या गर्भातील उषःकाला'च्या हमीने दिपून जायचे आणि गळ्यात 'चांदण्याच्या हातां'चा हार पडायच्या किंवा घालायच्या कल्पनेने मोहरून जायचे ते दिवस! 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' ही नाट्यमयतेची परिसीमा. पण एकूण ही सगळी हृदयाची, भावनांची मिरास होती.

त्यात हे 'सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके' आणून विंदांनी माझ्यासाठी एक नवीनच लख्ख उजेडाची खिडकी उघडली.
तिथे देवाची भीती नव्हती, संस्कारांचं कुंपण नव्हतं, जगरहाटीतली सोवळीओवळी नव्हती, व्याकुळ स्मरणरंजनं नव्हती. या कवितेला सुस्पष्ट विचार आणि नेटक्या सहृदय तत्वज्ञानातून उमटलेला स्वत:चा आवाज होता. मातीशी, मातीतून उगवलेल्या शरीराशी, त्याच्या सगळ्या ऐद्रिय संवेदनांशी, गुणदोषांशी तिची बांधिलकी होती.

प्रस्तुत कविता याच मुशीतली:

दफन करुनि भगव्या कफनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर
मी मातीशी करून मस्ती अधरक्षत केले अवनीवर

चढली माझ्या नवस्पर्शाने पृथ्वीच्या गालावर लाली
उसळुन आल्या तिच्या उरातुन सळसळणार्‍या हिरव्या साळी

उष्ण तिची नि:श्वसने प्यालो, त्या धुंदीतच स्मरली गाणी
"'स्वर्ग इथे वा इथेच रौरव - या मातीतच, याच ठिकाणी!"

धर्म रडे हा धाय मोकलुन आणि लपे पापासह ईश्वर
दफन करुनि भगव्या कफनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर!

सलामीलाच भगव्या कफनीचे 'दफन' करतो म्हणतात विंदा. 'दफन'च का? 'दहन' शब्दही बसला असता की त्याच वजनात! 'भगवी' कफनी आणि दफन ही दोन दृष्यकं (व्हिज्युअल्स) वापरून सगळेच पूर्वाधिष्ठित संकेत झुगारून देत असल्याचं स्पष्ट करतात ते.

दुसरी गंमत 'मातीचा प्रियकर' म्हणवून घेण्यातली! पृथ्वी म्हणजे 'भूमाता' ही संकल्पना आपल्या मनात खोलवर रुजलेली असते. तिचे 'तसले काही' संबंध असतीलच तर ते ' युगामागुनी युगे' तिची वंचना करणार्‍या भास्कराशी किंवा दर पावसाळ्यात तिला नेमाने हिरवा शालू नेसवणार्‍या पावसाशी! असलं अलौकिक, पारलौकिक, प्लॅटॉनिक प्रेम रंगवणं हा विंदांच्या कवितेचा स्वभावच नाही. ते तिच्या अंगावर चुंबनांच्या खुणा उमटवतात आणि ती मोहरून येते! तिच्या पोटी उमलून येणारं बीज मानवाने पेरलेलं आहे! त्याला सुचणारी गाणी तिच्या उष्ण श्वासांनी गंधाळलेली आहेत!

त्यांचा एकमेकांवर अधिकार आहे, पण तो प्रेमाचा! ती 'हृदयी अमृत नयनी पाणी' कुळातली आईही नाही आणि वापरून विसरून जायची भोगवस्तूही नाही. प्रेयसी आहे. तिचा सन्मान जपत तिच्या तनामनावर अधिराज्य गाजवणं यातच त्याचा आनंदही आहे आणि त्याचं क्षेमही! नित्य नवी आहे ती, आणि तिला समजून घेण्यात, नवे अर्थ देण्यात त्याचंही सार्थक आहे!

पाप त्यांच्या मीलनातही नाही आणि स्खलनातही!

धर्माधर्म, योग्यायोग्य यांच्या पलीकडे जाणारं रोकडं गणित!
मांडायला सोपं, जगायला अवघड!

ता.क. : थोडंसं भगवी कफनी आणि दफनाबद्दल :
भगवी कफनी म्हणजे हिंदू परंपरेनुसार संन्यासाचं प्रतीक. तसंच मृताचं दहन ही हिंदू पद्धत. बाकी बहुतांश धर्मपरंपरांत पुरण्याची / दफनाची पद्धत आहे. विंदा सगळेच धर्म नाकारत आहेत. 'धर्म' म्हणजे केवळ 'रिलिजन' या अर्थी नव्हे तर परंपरेने आखून दिलेले नियम आणि जीवनपद्धती या अर्थी. त्यांचा सद्सद्विवेक हाच त्यांचा धर्म असणार आहे, ज्याला कोणत्याही प्रेषिताच्या शिक्कामोर्तबाची आवश्यकता नाही.

केशवसुत म्हणाले होते, 'जुने जाउद्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरुनी टाका' - इथे तो विचार आणखी स्पष्ट होत जातो.

आणखी खोलात गेलं तर संन्यास घेणं हे केवळ कपडे बदलण्याइतकं सोपं नाही. त्यासाठी निहित विधी असतात, ज्यात एक विधी हा संन्यास घेणार्‍या व्यक्तीचं (पूर्वायुष्याचं/आयडेन्टिटीचं) प्रतिकात्मक दहन करणं हा असतो. म्हणूनच एकदा संन्यास घेतला की परत फिरता येत नाही. (संन्याशाच्या मुलांचे हाल आठवतात ना?)
पुढे जाऊन संन्यासी मृत्यू पावतो तेव्हा त्याचं दहन करीत नाहीत, तर त्याला पुरतात. लहान मुलं आणि संन्यासी हे विशुद्ध आत्मे, त्यांना जगाची कोणतीही उपाधी चिकटलेली नाही म्हणून त्यांचं दहन करण्याची आवश्यकता नसते असं मानतात.
विंदा इथे भगवी कफनीच दफन करतो म्हणतात - त्यांना वैराग्याचा त्याग करायचा आहे. जीवनोन्मुख आणि कार्यप्रवण अशी, 'स्वेदगंगा' वाहवणारी विचारसरणी ते मांडत आहेत.

कविता वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. आनंद करंदीकर व पॉप्युलर प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह!! अशा चार दोन ओळी जरी वाचल्या तरी वाटते की तुमच्यासारख्यांनी नेहमी लिहीत रहावे ( उगीच आपलं पारावर गप्पा मारत बसता! )
खरं सांगायचं तर मला अजूनही नीट समजलीच नाही आहे ही कविता!! ते धर्म, भगवी कफनी वगैरे रुपकं नीट समजलेली नाहीत. अजून त्यावर लिहिलंस तर वाचायला आवडेल.

नेमक्या शब्दांत केलेले रसग्रहण आवडले.

विशेष म्हणजे उगाच कवीच्या मोठेपणाची हवा निर्माण न करता तटस्थपणे विचार करून प्रस्तुत कवितेबद्दलचे स्वतःचे आकलन प्रामाणिकपणे मांडलेले आहे असे वाटले. धन्यवाद!

वाह!
तुम्ही लिहिलेलं वाचून आधीपासूनच आवडत असलेली कविता आणखी उमजते, आणखी आवडायला लागते.

धर्म रडे हा धाय मोकलुन आणि लपे पापासह ईश्वर

- ही ओळ वाचल्यावर ती 'मस्ती' पुन्हा अधोरेखित होते.

धन्यवाद.

भरत, लाजवताय. Happy

मैत्रेयी, भगव्या कफनी आणि दफनाबद्दल थोडं विस्ताराने लिहिलं आहे.

आत्ता वाचले. संन्याश्यांना मरणोत्तर दहन करत नाहीत वगैरे बर्‍याच गोष्टी माहित नव्हत्या, लक्षात आल्या नव्हत्त्या. तुझ्या ता.क. मुळे बरेच गोंधळ क्लिअर झाले. मस्त!

मस्त लिहिलं आहेस. मैत्रेयीला अनुमोदन
अधर क्षत - ओठांनी दिलेले डाग - पक्षी चुंबनाच्या खुणा. आजकालच्या प्रचलित मराठीत hickey किंवा लव्ह बाइट Happy

खूप छान लिहिलय ! पण सगळ्यात आवडलं ते नेमक्या उचलेल्या ओळी. एकूण त्यांच्या कविता प्रवासाबद्दल न लिहिता , या नेमक्या ओळींमुळे , मनात त्या आवेगाच्या ज्या प्रतिमा तयार होतायत त्याला तोड नाही.
"मी मातीशी करून मस्ती अधरक्षत केले अवनीवर" आणि "स्वर्ग इथे वा इथेच रौरव - या मातीतच, याच ठिकाणी!"
या ओळी इथे वाचल्यावर डोक्यात एकदम घूसल्या आहेत त्या काही निघायला तयार नाहीत.

अत्यंत सुंदर कविता आणि तू लिहिलेलं रसग्रहण.
भगवी कफनी, दफन संदर्भ वाचून जास्त समजली कविता आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे वर अजय म्हणताहेत त्या "अधरक्षत " ओळी.
अधरक्षत चा अर्थ माहित न्हवता... काय भारी शब्द आहे! व्युत्पती माहित असेल तर वाचायला आवडेल.

अधर = ओठ
क्षत = या कॉन्टेक्स्टमध्ये व्रण म्हणता येईल. (जखम / इजा इ. - अ-क्षत म्हणजे तांदुळाचा अखंड दाणा - त्यावरून लक्षात येईल.)

अप्रतिम.
रसग्रहणही आणि अर्थात कविता तर आहेच.
विंदांचा सरळसोट बंडखोरपणा नेहमीच उत्कट, कमीत कमी आणि चमत्कार वाटावा अशा शब्दकळेतून प्रगट होत आला आहे.
इथे वाचकांसमोर हे सुंदर लेणे आणि तितकेच सुंदर भाष्य आणल्याबद्दल आभार.

अतिशय सुंदर लिहिलंय !
मागे तुझ्याकडून एक कविता समजावून घेतली होती. धुक्याने धूसर झालेल्या काचेमागून एखादं दृश्य पाहताना कुणीतरी ती काच पुसावी आणि सगळं लख्ख समोर दिसावं तसं वाटलं होतं तुझ्या नजरेतून ती कविता बघताना. आजचा अनुभवही वेगळा नाही Happy

पण सगळ्यात आवडलं ते नेमक्या उचलेल्या ओळी. एकूण त्यांच्या कविता प्रवासाबद्दल न लिहिता , या नेमक्या ओळींमुळे >> हे तर एकदमच पर्फेक्ट म्हटलय अजयने. उगाच ओळी ओळीचा कीस न काढता, पूर्ण कवितेमागचा विचार अधोरेखित केलाय. भरत म्हणालाय तसे आधी माहित असलेली कविता अजून आवडून गेली. केशवसूतांचा जोडलेला संदर्भ तर खासच आहे. एव्हढा ढळढलीत समोर असून कधी लक्षात आला नाही

इतकं उत्कृष्ट रसग्रहण माबो वरती नेहमीच वाचायला मिळाले तर किती छान होईल >> +१

भगवी कफनी संदर्भ शेवटच्या ता.क. मूळे थोडा गडबडतोय असे वाटले. सन्याशांचे दफनच करतात मग भगव्या कफनीच्या दफनामागचा लौकिक अर्थ कमकुवत होतोय. अर्थात तू लिहिलेला सर्वच पारंपारिक संकेतांना झुगारून देण्याचा अर्थ अभिप्रेत असावा नि तो पर्फेक्ट बसतोय विंदांना अभिप्रेत नसेल तरीही Happy

सुंदर लिहीले आहे! मूळ कविता झेपली/पटली असे नाही पण रसग्रहणामुळे नीट समजली.

कफनीचे दफन म्हणजे वैराग्याचा त्याग असेच माझ्याही डोक्यात आले. संन्यासाची कल्पना संन्यासाबद्दलच वापरल्यासारखे.

मभादि होउन गेला असला तरी असे रसग्रहण अजून येउ दे!

सर्वांचे मनापासून आभार.

कविता लिहितांना कवीला काय अभिप्रेत होतं आणि वाचतांना त्यातलं आपल्याला किती गवसलं याचा ताळा मांडणं जवळपास अशक्य असतं.
कवितेचाही एक प्रवास असतो. वाट पायाखालची असली तरीही आजवर लक्ष न गेलेलं एखादं वळण, एखादा रंगीत दगड, एखादं फुलझाड एक दिवस अचानक मोहवून गेलं असंही होऊ शकतं. नवीनच वाट धुंडाळत गेलं आणि आपल्यातलंच काहीतरी आपल्याला नव्याने माहीत झालं असंही होऊ शकतं. त्यामुळे वाट तीच, पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रवास निराळा!
माझ्या नादाने या कवितेच्या वाटेवर तुम्हीही चार पावलं चालला असाल तर त्यासारखा आनंद नाही.

विशेष आभार भरत यांचे - त्यांनी कविता पाठवून, कान धरून लिहायला उद्युक्त केलं म्हणून हे रसग्रहण धावतपळत का होईना, लिहिलं गेलं.

विशेष आभार भरत यांचे - त्यांनी कविता पाठवून, कान धरून लिहायला उद्युक्त केलं म्हणून हे रसग्रहण धावतपळत का होईना, लिहिलं गेलं. >> भरतचेही आभार. भरत, माणसाला दोन कान असतात ह्याची कल्पना आहे ना Happy

Pages