रसग्रहण: मी पृथ्वीचा झालो प्रियकर - विंदा करंदीकर

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 March, 2018 - 15:14

विंदा करंदीकर प्रथम भेटले ते शालेय वयात.

'पवित्र मज यंत्राची धडधड, समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके
पवित्र सुखदु:खाची गाणी वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन!'

असं ठासून सांगत.

तोवर कविता म्हणजे भावनांचा उत्कट आविष्कार इतपत समजू लागलं होतं. पण तो प्रेम, भक्ती, देशभक्ती, असा सगळा हमरस्त्यावरचा प्रवास. 'रात्रीच्या गर्भातील उषःकाला'च्या हमीने दिपून जायचे आणि गळ्यात 'चांदण्याच्या हातां'चा हार पडायच्या किंवा घालायच्या कल्पनेने मोहरून जायचे ते दिवस! 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' ही नाट्यमयतेची परिसीमा. पण एकूण ही सगळी हृदयाची, भावनांची मिरास होती.

त्यात हे 'सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके' आणून विंदांनी माझ्यासाठी एक नवीनच लख्ख उजेडाची खिडकी उघडली.
तिथे देवाची भीती नव्हती, संस्कारांचं कुंपण नव्हतं, जगरहाटीतली सोवळीओवळी नव्हती, व्याकुळ स्मरणरंजनं नव्हती. या कवितेला सुस्पष्ट विचार आणि नेटक्या सहृदय तत्वज्ञानातून उमटलेला स्वत:चा आवाज होता. मातीशी, मातीतून उगवलेल्या शरीराशी, त्याच्या सगळ्या ऐद्रिय संवेदनांशी, गुणदोषांशी तिची बांधिलकी होती.

प्रस्तुत कविता याच मुशीतली:

दफन करुनि भगव्या कफनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर
मी मातीशी करून मस्ती अधरक्षत केले अवनीवर

चढली माझ्या नवस्पर्शाने पृथ्वीच्या गालावर लाली
उसळुन आल्या तिच्या उरातुन सळसळणार्‍या हिरव्या साळी

उष्ण तिची नि:श्वसने प्यालो, त्या धुंदीतच स्मरली गाणी
"'स्वर्ग इथे वा इथेच रौरव - या मातीतच, याच ठिकाणी!"

धर्म रडे हा धाय मोकलुन आणि लपे पापासह ईश्वर
दफन करुनि भगव्या कफनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर!

सलामीलाच भगव्या कफनीचे 'दफन' करतो म्हणतात विंदा. 'दफन'च का? 'दहन' शब्दही बसला असता की त्याच वजनात! 'भगवी' कफनी आणि दफन ही दोन दृष्यकं (व्हिज्युअल्स) वापरून सगळेच पूर्वाधिष्ठित संकेत झुगारून देत असल्याचं स्पष्ट करतात ते.

दुसरी गंमत 'मातीचा प्रियकर' म्हणवून घेण्यातली! पृथ्वी म्हणजे 'भूमाता' ही संकल्पना आपल्या मनात खोलवर रुजलेली असते. तिचे 'तसले काही' संबंध असतीलच तर ते ' युगामागुनी युगे' तिची वंचना करणार्‍या भास्कराशी किंवा दर पावसाळ्यात तिला नेमाने हिरवा शालू नेसवणार्‍या पावसाशी! असलं अलौकिक, पारलौकिक, प्लॅटॉनिक प्रेम रंगवणं हा विंदांच्या कवितेचा स्वभावच नाही. ते तिच्या अंगावर चुंबनांच्या खुणा उमटवतात आणि ती मोहरून येते! तिच्या पोटी उमलून येणारं बीज मानवाने पेरलेलं आहे! त्याला सुचणारी गाणी तिच्या उष्ण श्वासांनी गंधाळलेली आहेत!

त्यांचा एकमेकांवर अधिकार आहे, पण तो प्रेमाचा! ती 'हृदयी अमृत नयनी पाणी' कुळातली आईही नाही आणि वापरून विसरून जायची भोगवस्तूही नाही. प्रेयसी आहे. तिचा सन्मान जपत तिच्या तनामनावर अधिराज्य गाजवणं यातच त्याचा आनंदही आहे आणि त्याचं क्षेमही! नित्य नवी आहे ती, आणि तिला समजून घेण्यात, नवे अर्थ देण्यात त्याचंही सार्थक आहे!

पाप त्यांच्या मीलनातही नाही आणि स्खलनातही!

धर्माधर्म, योग्यायोग्य यांच्या पलीकडे जाणारं रोकडं गणित!
मांडायला सोपं, जगायला अवघड!

ता.क. : थोडंसं भगवी कफनी आणि दफनाबद्दल :
भगवी कफनी म्हणजे हिंदू परंपरेनुसार संन्यासाचं प्रतीक. तसंच मृताचं दहन ही हिंदू पद्धत. बाकी बहुतांश धर्मपरंपरांत पुरण्याची / दफनाची पद्धत आहे. विंदा सगळेच धर्म नाकारत आहेत. 'धर्म' म्हणजे केवळ 'रिलिजन' या अर्थी नव्हे तर परंपरेने आखून दिलेले नियम आणि जीवनपद्धती या अर्थी. त्यांचा सद्सद्विवेक हाच त्यांचा धर्म असणार आहे, ज्याला कोणत्याही प्रेषिताच्या शिक्कामोर्तबाची आवश्यकता नाही.

केशवसुत म्हणाले होते, 'जुने जाउद्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरुनी टाका' - इथे तो विचार आणखी स्पष्ट होत जातो.

आणखी खोलात गेलं तर संन्यास घेणं हे केवळ कपडे बदलण्याइतकं सोपं नाही. त्यासाठी निहित विधी असतात, ज्यात एक विधी हा संन्यास घेणार्‍या व्यक्तीचं (पूर्वायुष्याचं/आयडेन्टिटीचं) प्रतिकात्मक दहन करणं हा असतो. म्हणूनच एकदा संन्यास घेतला की परत फिरता येत नाही. (संन्याशाच्या मुलांचे हाल आठवतात ना?)
पुढे जाऊन संन्यासी मृत्यू पावतो तेव्हा त्याचं दहन करीत नाहीत, तर त्याला पुरतात. लहान मुलं आणि संन्यासी हे विशुद्ध आत्मे, त्यांना जगाची कोणतीही उपाधी चिकटलेली नाही म्हणून त्यांचं दहन करण्याची आवश्यकता नसते असं मानतात.
विंदा इथे भगवी कफनीच दफन करतो म्हणतात - त्यांना वैराग्याचा त्याग करायचा आहे. जीवनोन्मुख आणि कार्यप्रवण अशी, 'स्वेदगंगा' वाहवणारी विचारसरणी ते मांडत आहेत.

कविता वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. आनंद करंदीकर व पॉप्युलर प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता!!!
ही कविता कुठल्या काळात लिहिली गेलीये ते माहित नाही पण फार नवीन नसावी असा अंदाज आहे आणि म्हणूनच मला वाटतं अगदी ग्राऊंडब्रेकिंग ठरली असावी. मुख्य विचार नेहमीच्या आणि तुम्ही उल्लेख केलेल्या पठडीतल्या प्लटॉनिक प्रेमापेक्षा पुर्णपणे वेगळा म्हणजे पॅशनेट, कार्नल असला तरी जसा अर्थ उलगडत जातो तसं तसं ते लॉजिक बरोबर आपल्या गळी उतरवलं जातं! गळी उतरवलं म्हणजे फोर्सफुली नाही तर आपोआप आपल्याला स्वतःला "अरे खरच की! अगदी बरोबर म्हणत आहेत!" असं वाटायला लागतं . भाषेवर प्रभुत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस विचार कसा करतो ह्याची खुप खोल समज असावी लागते. मोजक्या शब्दात हे असं काही मांडायला केवढं सामर्थ्य लागतं! He has that and more!
मला तर अगदी एखाद्या पठडीतल्या प्लटॉनिक प्रेमवीराच्या चेहर्‍यावर ही कविता वाचताना आणि वाचून झाल्यावर काही क्षण अगदी भारावलं गेल्याचे आणि नंतर अरे हा तर आपल्या बेसिक थिंकिंग वर घाव पडला हे लक्षात आल्याने गोरामोरा झाल्याचे भाव उमटले असतील असं इमॅजिन करुन हसायला आलं. Lol

रसग्रहणाचं म्हणाल तर, आता हे रसग्रहण वाचून मी आता आवर्जून विंदांच्या कविता वाचणार. आधी फक्त नाव एकून होतो. आता नेमकं इतकं नाव का होतं हे जाणून घेण्याची उस्फुर्त इच्छा तुम्ही निर्माण केलीत.

नेहमी प्रमाणे:
लिखते रहो...
जीते रहो.....
Happy

याला कान धरणं म्हणतात, हे माहीत नव्हतं. Happy

ही कविता विंदांच्या 'मृद्गंध' या दुसर्‍या कवितासंग्रहात आहे. कविता लिहिल्याची तारीख त्यांनी नोंदवलीय. ५ जून ५०.

Happy
एवढे सुंदर रसग्रहण -
एवढे अलौकिक प्रतिसाद ...
मी निशब्द राहणेच पसंत करील ....

अहाहा!!! तुझ्या लेखातील 'पवित्र मजला' या शब्दांच्या शोधात, मला हे रत्न सापडले. तुस्सी ग्रेट हो. अजब रसायन आहेस स्वाती.

सुंदर रसग्रहण !
वरील ओळींमधे वीररसयुक्त-वैराग्य असल्याने (किंवा मला वाटल्याने) एकदम विवेकानंदच आठवले.

अफाट सुंदर लिहिलंय
धन्यवाद स्वाती हे लिहिल्याबद्दल आणि
धन्यवाद भरत हे लिहायला उद्द्युक्त केल्याबद्दल आणि लेख वर काढल्याबद्दलही

Pages