हिशोब

Submitted by kokatay on 2 March, 2018 - 13:25

माझी मैत्रीण दीपा हीच लग्न आमच्या ग्रुप मध्ये सर्वात पहिल्यांदा झालं. पहिली दिवाळी साजरी करायला तिच्या सासरची सगळी मंडळी इंदूरला जमली. दीपाच्या सासुला, ती दुसऱ्या गावाची असूनहि इंदोर च्या खाद्य संस्कृती बद्दल माहिती होती, आणि तिला सराफा, छप्पन दुकान इत्यादी ठिकाणी सैर-सपाटा करायचा होता, जोडीला दिवाळी ची खरेदी पण करायची होती. दीपाने मला त्यांच्या बरोबर यायला सांगितले, मी, दीपा, आणि तिची सासु खरेदी आणि खाण्यासाठी गावात गेलो. विजय चाट ची कचोरी, जोश्यांचे दहीबडे खाऊन आम्ही इतर खरेदी करायला गेलो.
एक गोष्ट लक्षात आली कि जे पैसे तिची सासु खर्च करत होती , ते ती एक छोट्या डायरीत लिहीत जायची. मला ही गोष्ट थोडी विचित्रच वाटली, दीपा ला सरळ विचारावं असं वाटलं, पण सासु समोर कसं विचारायचं? म्हणून तो विचार झटकून टाकला.
मनात बरेच विचार येऊ जाऊ लागले आणि दीपा ची काळजी पण वाटू लागली, हे कसलं सासर मिळालं आहे .....दमडी दमडी चा हिशोब लिहीत बसतात.
आडव्या बाजारात बांगडया खरेदी करताना एका दुकानात बसलो होतो, तेव्हा दीपाच्या पूर्वीच्या कामावरची मैत्रिण भेटली आणि दीपा तिच्या बरोबर गप्पा मारायला दुकानाच्या बाहेर गेली.
आता मी आणि तिची सासु निरनिराळ्या सुंदर बांगड्या घालुन बघत होतो.
तिच्या सासुने एक सेट विकत घेतला , पैसे दिले आणि , परत तेच ! ती डायरी काढून
त्यात लिहिले. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोंचलेली त्यांच्या लक्षात आली आणि त्या म्हणाल्या : अग आमचे हे आहेत नं , त्यांना पै पै चा
हिशोब द्यावा लागतो, नाही तर ते रागवतात. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कुठलाच
भाव नव्हता. दुसऱ्या दिवशी दीपा ने आम्हा सगळ्या मैत्रिणींना दिवाळीच्या
फराळाला बोलावलं होतं. आम्ही सगळ्यानीं एकत्रच तिच्याकडे जायचं ठरवलं. बेल
वाजवली तर दार तिच्या सासऱ्यांनी उघडलं, त्यांनी स्वतःची ओळख करुन दिली, आम्हाला बसायला सांगितलं आणि दीपा ला हाक मारली.
सोफ्यावर बसायला गेले तर तिकडे मावशींचीं [दीपाच्या सासुची] डायरी दिसली
मी पटकन ती ओळखून उचलली आणि काकांच्या हातात दिली, ती घेताच त्यांचा चेहऱ्यावर मिस्कील भाव उमटले आणि ते म्हणाले : ही डायरी आमच्या लक्ष्मीची जीव कि प्राण आहे, एक पै पै चा हिशोब लिहीत बसतात ते.....
मी थक्कच झाले! मला त्या दोघांच्यातला हिशोबच कळेनासा झाला .
पण मग वाटायला लागलं की दोघेही कमालीचे हिशोबी असावेत, फक्त हा “पै पै”च्या हिशोबाचा अट्टाहास ते एकमेकांवर ढकलत तर नसतील? आणि मग मला माझ्या मैत्रिणीची जास्तच काळजी वाटू लागली! तेव्हढ्यात तिच्या सासऱ्यांचा मिस्कील चेहरा आठवला, आणि आशा वाटली की केवळ एक चांगली सवय म्हणून ते सासूबाईंकडून हिशोब मागत असावेत.
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स.com

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलंय.

कोकाताय मी मागे तुमच्या विचारपुसमध्ये एक मेसेज टाकलाय तो तुम्ही वाचलात का.

सवय चांगली आहे. ते लिहून ठेवल्यावर त्याचे पुढे काही अ‍ॅनलिसिस करून काही निर्णय बदलतात का? निदान रोज कुणि जास्त पैसे खर्च केले त्याला/तिला शिक्षा असे काही असते?
नंतर फेसबूक, व्हाट्सअ‍ॅप वर टाकून सगळ्यांना सांगतात की नाही?
की आपले लोक मायबोलीवर लिहितात तसे हे आपले खर्च डायरीत लिहून ठेवतात! मायबोलीवर लिहा, कुणि वाचो अथवा न वाचो!

कोकाताय मला ही ही सवय आहे पण मी डायरी त न लिहिता फोन मध्ये लिहून ठेवते.
हे मी अशासाठी करते की जर मी 800 रुपये खर्च केलेत तर कधीकधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की ,
अर्रे 800 रु होते इतके कशावर बरं खर्च झाले??
सो लक्षात राहावं म्हणून मी लिहून ठेवते...
पै पै चा हिशोब हे मला कळत नाही कारण खर्च आपण करतो च पण 3 च गोष्टी घेतल्या त्याचे झाले 650 रु पण बाकी 150 गेले कुठे??? मग 50 रु ची भाजी, 70 रुपये रिक्षा , आणि उरलेले 30 रुपयांचं अजून काही घेतलं या गोष्टी मी विसरून जाते मग लिहिलेलं असेल तर गोंधळ उडत नाही...

म्हणजे माझा तरी हाच विचार सर्व काही नोट डाऊन करून ठेवायचा

हिशोब ठेवणे उत्तम सवय आहे.
मी आणि माझ्या गर्लफ्रेंडने हे लग्नानंतर पहिल्याच दिवसापासून करायचे ठरवले आहे. दर दिवशी होणारा खर्च, दर महिन्याचा होणारा खर्च, वर्षातून एकदाच होणारा खर्च. जीवनावश्यक गोष्टी, मौजमजा, कपडालत्ता वगैरे वर्गीकरण करून मजेत जगण्यासाठी किती पैश्याची गरज आहे तेवढेच कमवायचे. उगाच जास्त पैश्यासाठी जास्त मरमर करायची नाही Happy