तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग १

Submitted by कुमार१ on 1 March, 2018 - 01:53

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

प्रास्ताविक

माझी या आधीची आरोग्य-लेखमाला चालू असताना मित्रवर्य ‘अनिंद्य’ यांनी या विषयावर लिहिण्याची सूचना केली. मग मी त्यावर विचार केला. आधी वाटले, की ते म्हणताहेत तर लिहून काढू एक लेख लगेच. पण, जसा मी वाचन करीत या विषयाच्या अंतरंगात शिरलो तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली. या विषयाची व्याप्ती नक्कीच मोठी आहे. त्याला जाणूनबुजून एका लेखात कोंबून बसवणे हे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचा समग्र वृत्तांतच वाचकांसमोर मांडवा असे ठरवले व त्यातूनच या लेखमालेचा जन्म होत आहे. तेव्हा सर्वप्रथम मी अनिंद्य यांचे आभार मानतो.

एखाद्या व्यक्तीच्या ‘चाळणी चाचण्या’ (screening tests) करण्याचे प्रयोजन काय हा पहिला प्रश्न. वैद्यकीय विश्वात रुग्णाच्या ज्या अनेक चाचण्या केल्या जातात त्यांचे दोन गटात विभाजन करता येईल:
१. रोगनिदान चाचण्या (diagnostic tests) आणि
२. चाळणी चाचण्या

यापैकी पहिल्या गटातील चाचण्या या रुग्णावर केल्या जातात. म्हणजेच अशी व्यक्ती की जिला काहीतरी त्रास होतोय आणि म्हणून ती स्वतःहून डॉक्टरकडे आली आहे. याउलट चाळणी चाचण्या या आपण वरवर ‘निरोगी’ दिसणाऱ्या माणसावर करतो. त्यांच्या निष्कर्षावरून भविष्यात त्या माणसाला एखादा आजार होण्याची शक्याता कितपत आहे याचा अंदाज करता येतो.

चाचणीसाठी आजाराची निवड
आता अशा चाचण्या या नक्की कोणत्या आजारांसाठी करायच्या हा पुढचा प्रश्न. तो आजार निवडताना खालील मुद्दे विचारात घेतले जातात:
१. त्या आजाराचा समाजात प्रादुर्भाव मोठा असावा
२. त्या आजाराची पूर्वसूचना देणारी चाचणी ही करण्यास सोपी असावी आणि तिचा निष्कर्ष विश्वासार्ह असावा
३. नवजात बालकांच्या बाबतीत काही भावी आजार असे असतात की त्यांची बाह्य लक्षणे बऱ्याचदा दिसत नाहीत. तसेच यातील काही आजार पुढे झाल्यास त्यातून मेंदूस गंभीर इजा पोहोचते.
४. काही आजारांवर – विशेषतः जनुकीय – ठोस उपचार नसतात पण जर का चाचणीतून त्यांचा अंदाज आला तर त्यावर काही अंशी प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात.
५. काही आजार जर त्यांच्या पूर्व-प्राथमिक अवस्थेत कळले तर त्यांच्यावर प्रभावी उपचार करता येतात.

वरील विचारमंथनातून काही आजारांची निवड करण्यात येते. ही निवड करताना त्या व्यक्तीचे वंश, देश, लिंग आणि वय हे मुद्दे महत्वाचे ठरतात. त्यानुसार प्रत्येक देशाचे एक धोरण ठरलेले असते. प्रगत देशांत काही चाचण्या या प्रत्येक नवजात बालक आणि गरोदर स्त्री यांना सक्तीने कराव्या लागतात. सर्व सरकारी रुग्णालयात सुद्धा त्या उपलब्ध असतात. गरीब देशांच्या बाबतीत मात्र असे धोरण सर्रास राबवलेले दिसत नाही. त्यामुळे तिथे अर्थातच आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजाचे नुकसान होते.

चाळणी चाचण्यांची निवड करणे हे तसे जिकीरीचे काम असते. त्याबाबतीत सर्व तज्ञांचे एकमत बऱ्याचदा होत नाही. खालील मुद्द्यांवर वाद असू शकतो:
१. चाचणीवर होणारा खर्च आणि त्यातून होणारा खरोखर फायदा ( cost-effectiveness)
२. चाचणी करतानाचे संभाव्य धोके (विशेषतः नवजात बालकात) आणि
३. चाचणीची संवेदनक्षमता (sensitivity) आणि विशिष्टता (specificity)

चाळणी चाचण्या करण्याच्या पद्धती
१. रक्त, लघवी आदींवर केलेल्या प्रयोगशाळा चाचण्या
२. Imaging तंत्राने केलेया चाचण्या
३. शरीरातील काही विशिष्ट पेशींचा अभ्यास
४. जनुकीय चाचण्या आणि
५. निव्वळ शारीरिक तपासणीतून मिळालेली विशेष माहिती.

यावरून या विषयाचा आवाका लक्षात येईल. या लेखमालेत आपण फक्त रक्त, लघवी आदींवर केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांचाच विचार करणार आहोत. त्यातही शरीरातील रासायनिक घटकांच्या चाचण्यांवर माझा भर असेल. चाचणीचा प्रकार आणि संबंधित आजाराची थोडक्यात माहिती व त्याचे संभाव्य धोके, अशा पद्धतीचे हे लेखन असेल. प्रत्यक्ष चाचणी करण्याची तांत्रिक माहिती इथे लिहिण्याचे काही कारण नाही.
जेव्हा एखाद्या व्यक्तीत चाळणी चाचणीचा निष्कर्ष होकारार्थी(positive) येतो तेव्हा त्या आजाराची प्रत्यक्ष रोगनिदान चाचणी करणे ही पुढची पायरी असते. तर काही वेळेस खुद्द रोगनिदान चाचणीचाच वापर चाळणी चाचणी म्हणून केला जातो.

तर आपण पाहणार असलेल्या चाळणी चाचण्या नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटात आणि विशिष्ट परिस्थितीत केल्या जातात. त्यानुसार आता आपल्या तपशिलाचे पुढील गट पडतील:

१. वय ०-१ वर्षे
२. ,, २-१८
३. ,, १९-४९
४. ,, ५०चे पुढे आणि
५. गरोदर स्त्री

तेव्हा एकेक गटाच्या अनुषंगाने ही लेखमाला पुढे सरकेल. वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा करतो. शंकांचे स्वागत आहे.
भाग २ : https://www.maayboli.com/node/65494
(क्रमशः)
************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा:! मस्तं आरोग्य लेखमाला आहे. येउ द्या. वाचायला नक्कीच आवडेल.

चाळणी चाचण्यांची निवड करणे हे तसे जिकीरीचे काम असते. त्याबाबतीत सर्व तज्ञांचे एकमत बऱ्याचदा होत नाही. खालील मुद्द्यांवर वाद असू शकतो: >>> ह्यातील तीन मुद्द्यांवरचे अजून स्पष्टीकरण जेव्हा जमेल तसे दिलं तर तेसुद्धा वाचायला आवडेल. Happy

तुमचे लेख नेहमीच चांगले अन माहितीपुर्ण असतात, अन मुख्य म्हणजे सर्वांच्या प्रत्येक शंका- कुशंकेला त्वरीत ऊत्तर देता.

पुढिल लेखाच्या प्रतिक्षेत..

सचिन, साधना व VB आभार.
@ सचिन:
१.चाचणीवर होणारा खर्च आणि त्यातून होणारा खरोखर फायदा ( cost-effectiveness)>>>>>
समजा, चाचणीचा खर्च काही हजारात आहे मात्र त्याच्या निष्कर्षावरून आजराबद्दल चे ठोस मत देता येत नसेल तर.

२. चाचणी करतानाचे संभाव्य धोके (विशेषतः नवजात बालकात) >>>>>
काही वेळेस या तान्हुल्याचे जास्त रक्त काढणे तापदायक असते.

३. चाचणीची संवेदनक्षमता (sensitivity) आणि विशिष्टता (specificity) >>>>
संवेदनक्षमता म्हणजे रक्तातील एखादा घटक अगदी कमी असताना सुद्धा मोजता येणे आणि,
विशिष्टता म्हणजे तो घटक सापडला तर आजार १००%असणे.
मात्र बऱ्याचदा असे १०० % नसते.

लेखमालेची छान सुरुवात.
काही वेळेस या तान्हुल्याचे जास्त रक्त काढणे तापदायक असते.>>>>> Sad

तुमचे लेख नेहमीच चांगले अन माहितीपुर्ण असतात, अन मुख्य म्हणजे सर्वांच्या प्रत्येक शंका- कुशंकेला त्वरीत ऊत्तर देता.

पुढिल लेखाच्या प्रतिक्षेत..>>≥>+1

आपणा सर्वांचे उत्सुकता दाखवल्याबद्दल आभार.
योग्य कालावधीने पुढील भाग प्रकाशित करेन.

@ डॉ. कुमार१,

गप्पांच्या ओघात सहज सुचवलेल्या विषयावर ही अभ्यासपूर्ण दीर्घमालिका लिहिल्याबद्दल आपले आभार.
मला बळेच सुचवणीचे श्रेय दिल्याबद्दल _/\_

अनिंद्य