बिच्चारा कॅन्सर....... माझी विजय गाथा (अंतिम भाग)

Submitted by nimita on 25 February, 2018 - 11:18

बिच्चारा कॅन्सर....... माझी विजय गाथा (अंतिम भाग)
ही 'Intra Peritoneal केमो मी पहिल्यांदाच अनुभवणार होते. त्यामुळे त्याबद्दल बरीच उत्सुकता होती आणि मुख्य म्हणजे माझ्या कँसर विरुद्ध च्या लढ्यात हीच केमो माझं महत्त्वाचं हत्यार ठरणार होती. त्यामुळे एक प्रकारची अधीरता ही होती. माझ्या मेडिकल स्पेशालिस्ट नी मला सगळी प्रोसिजर आधीच समजावून सांगितली होती. देवदयेनी माझे सगळे डॉक्टर्स(मेडिकल स्पेशालिस्ट, ऑन्को सर्जन), नर्सिंग स्टाफ हे सगळेच खूपच कोऑपरेटीव्ह होते. माझ्या संपूर्ण ट्रीटमेंट च्या काळात मी त्यांना सतत वेगवेगळे प्रश्न, शंका विचारून भंडावून सोडलं होतं. In fact, मी त्यांना सुरुवातीलाच म्हणाले होते की," मला जेव्हा जेव्हा काही शंका किंवा प्रश्न असतील तेव्हा मी लगेचच तुम्हाला विचारून त्यांचं निरसन करून घेईन. You may find my queries stupid at times but for me.. they are very very important." आणि त्यांनीही नेहमी अगदी पेशंटली माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सगळ्यामुळे एक  मोट्ठा फायदा झाला- तो म्हणजे माझ्या मनात कधीही कुठल्याही प्रकारची uncertainty नव्हती. आणि म्हणूनच मी सगळी ट्रीटमेंट खूप सकारात्मकरीत्या अँक्सेप्ट करू शकले.

डॉक्टर जेव्हा नर्सला माझ्या ट्रीटमेंट बद्दल, औषधं आणि इंजेक्शन्स वगैरे बद्दल सूचना द्यायचे तेव्हा मीही सगळं लक्ष देऊन ऐकत असे. आणि नर्स जेव्हा मला औषधं द्यायची किंवा IV ड्रिप चालू करायची तेव्हा मी त्यांची नावं एक्सपायरी डेट वगैरे नीट क्रॉसचेक करून घेत असे. यामुळे मला खात्री असायची की माझी ट्रीटमेंट बरोबर चालू आहे. आणि थँकफुली, हॉस्पिटल च्या नर्सिंग स्टाफनी पण  माझा हा' भोचकपणा' नेहमी पॉझिटिव्हली घेतला. In fact, बऱ्याच वेळा  ड्यूटी संपवून जाणारी नर्स नवीन आलेल्या नर्सला माझी केस हिस्ट्री समजावून सांगून गमतीनी म्हणायची,"अजून काही शंका असल्या तर मँम ना विचार.. त्यांना सगळं माहिती आहे."

शेवटी एकदाची माझी IP केमो सुरू झाली. ही केमो साइकल दोन पार्ट्स मधे होणार होती. पहिल्या पार्टमधे IV सलाइन वाटे एक औषध माझ्या रक्तवाहिन्यांमधे सोडलं जात होतं. पण यावेळी ही IV ड्रिप सलग २४ तास चालणार होती. म्हणजे २४ तासांकरता मला पूर्ण वेळ झोपून राहावं लागणार होतं आणि एकीकडे अगदी हळूहळू औषध माझ्या रक्तात मिसळलं जाणार होतं.ह्या २४ तासांच्या ड्रिप नंतर लगेच Intra peritoneal ड्रिप सुरू होणार होती. त्यासाठी माझ्या abdominal cavity मधे उजव्या बाजूला रिब्ज वर जो केमोपोर्ट बसवला होता, त्याच्यामार्फत औषध माझ्या abdominal cavity मधे सोडण्यात येणार होतं- केमोपोर्टला खालच्या बाजूला एक रबरची नळी होती आणि तिच्या मार्फत हे औषध माझ्या पोटातल्या सगळ्या ऑर्गन्स वर त्यांच्या बाहेरच्या सरफेस वर मारा करणार होतं.थोडक्यात म्हणजे 'दुहेरी प्रघात'... IV केमोमुळे रक्तावाटे औषध प्रत्येक ऑर्गन च्या आतल्या पेशींपर्यंत पोचेल आणि IP केमोमुळे त्या ऑर्गन्सच्या बाहेरून औषधांचा परिणाम होईल. ही IP केमो साधारण ३-४ तास चालणार होती. त्यानंतर परत साधारण दोन तासांकरता IV ड्रिप नी या संपूर्ण IP केमो नावाच्या सोहळ्याची सांगता होणार होती. १३ आणि १४ फेब्रुवारी ला  माझी ही पहिली IP केमो साधारण ३० तासांत संपली. केमो तर यशस्वीरीत्या पार पडली पण शरीराच्या पोकळीत जे औषध होतं त्याच्या मुळे कायम पोटात 'तडस' लागल्यासारखा डिस्कम्फर्ट जाणवत होता. त्या औषधांचं diaphragm वर प्रेशर आल्यामुळे अधूनमधून धाप लागत होती, breathlessness जाणवत होता.

आणि मुख्य म्हणजे आधीच्या तिन्ही IV केमोज् च्या वेळी मला कधीही 'उलट्या होण्याचा' त्रास असा नव्हता, पण आता तोही त्रास सुरू झाला होता. कधी एखाद्या 'वासामुळे' तर कधी एखाद्या 'चवीमुळे' किंवा कधी काहीही कारण नसताना- पण आता हा 'उलट्या' होण्याचा सिलसिला सुरू झाला होता. आणि त्यामुळे मला अजूनच अशक्तपणा जाणवत होता.

IP केमो नंतर आठ दिवसांनी मी पुन्हा माझ्या रेग्युलर IV केमोकरता हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. त्या वेळी माझी दुसरी मोठी बहिण माझ्या बरोबर आली होती. ती कराड मधे स्थायिक आहे. तिच्या सासरी त्यांची joint family असल्यामुळे घरातल्या इतरही अनेक जबाबदाऱ्या, सांभाळत अनेक  आघाड्यांवर तिची रोजची लढाई चालू असते. पण तरीही माझ्या आजारपणाच्या त्या काळात ती जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा पुण्याला यायची.

त्या दिवशी जेव्हा आम्ही  वॉर्ड मधे गेलो तेव्हा माझ्या नेहमीच्या खोलीत कुणीतरी आधीच अँडमिट झाले होते म्हणून नर्सनी मला दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं. त्या खोलीत शेजारच्या कॉटवर एक स्त्री झोपली होती.सुरुवातीच्या काही मिनिटात 'हाय, हँलो' वगैरे होऊन ओळख झाली. तिच्या बोलण्यातून असं कळलं की साधारण दीड वर्षापूर्वी तिलाही ओव्हेरियन कँसर झाला होता आणि तिची ट्रीटमेंट ही माझ्यासारखीच होती( except for Intra peritoneal chemos). त्यावेळी ती पूर्णपणे बरी होऊन घरी गेली होती. पण आता दीड वर्षानंतर तिचा कँसर recur झाला होता आणि यावेळी त्याचं स्वरूप अजूनच रौद्र आणि भयानक होतं.

हे सगळं ऐकल्यावर माझी बहिण भावनिकरित्या खूप डिस्टर्ब झाली. मला म्हणाली,"त्या नर्सला इतकंही कसं नाही लक्षात आलं! तुला ह्या बाईंबरोबर ठेवलंय. तिचा कँसर परत आलाय हे बघून बाकीच्या कँसर पेशंट्स वर त्याचा काय परिणाम होईल हे त्या नर्सला कळायला पाहिजे." माझ्यावरचं तिचं प्रेम आणि त्यामुळे तिच्या मनाची होणारी ती घालमेल अगदी स्वाभाविक होती. मी तिला म्हणाले," हे बघ, तू अजिबात टेंशन घेऊ नकोस. मला त्यांच्या या बोलण्यामुळे अजिबात त्रास नाही झाला."आणि ते खरंच होतं. कारण आता माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेकडे बघण्याचा माझा द्रुष्टिकोणच बदलला होता. माझा असा पूर्ण विश्वास होता की - या प्रत्येक घटनेतून देव मला काहीतरी सांगतोय, शिकवतोय. त्यामुळे प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी काही ना काही सकारात्मक घेऊन येत होता... rather मी त्यात पॉझिटीव्हीटी शोधत होते.

या प्रसंगाकडेही मी माझा 'सकारात्मक' चश्मा लावून पाहिलं तेव्हा असं दिसलं की देव मला आत्ताच पुढच्या संभावित संकटाची जाणीव करून देतो आहे. कारण जेव्हा मी त्या शेजारच्या बाईंशी बोलत होते तेव्हा त्या म्हणाल्या होत्या-"माझी आधीची ट्रीटमेंट इथेच झालीए. हे डॉक्टर्स आणि इथला स्टाफ खूपच प्रोफेशनल आहेत. पण चूक माझ्याकडूनच झाली. मी ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर निर्धास्त झाले, गाफिल राहिले आणि माझे नंतरचे फॉलो-अप्स आणि स्क्रीनिंग टेस्ट्स नाही केल्या. त्यामुळे कँसरनी माझ्या शरीरात परत कधी प्रवेश केला ते मला कळलंच नाही. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता."

हाच महत्वाचा मुद्दा माझ्या पर्यंत पोचावा या हेतूनी कदाचित देवानी त्या बाईंना थोड्या वेळापुरतं का होईना पण माझ्या आयुष्यात आणलं होतं. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या या शिकवणीची मी लगेच उजळणी करून तिला मनात पक्कं करून टाकलं; आणि ते म्हणजे -'सगळी ट्रीटमेंट संपल्यानंतरही गाफिल राहायचं नाही. या रोगाबरोबरचा माझा हा लढा आता आयुष्यभरासाठी आहे आणि म्हणूनच डॉक्टर्स च्या सगळ्या सूचना आणि सल्ला ऐकायचा आणि त्याप्रमाणेच वागायचं.'

आणि माझ्या या निश्चयाला अनुसरुन मी शक्यतो सगळ्या इंस्ट्रक्शन्स पाळल्या. मला गर्दीच्या ठिकाणी जायला डॉक्टर नी मनाई केली होती; कारण अशा ठिकाणी आजूबाजूच्या लोकांमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. रोजचा व्यायाम आणि प्राणायामही करतच होते. एक दिवस माझी चुलत बहिण म्हणाली,"प्रिया, मला वाटतंय की तू Reiki पण शिकून घे. मला खात्री आहे तुला त्याचा खूप फायदा होईल." मग ती मला तिच्या ओळखीच्या Reiki master कडे घेऊन गेली. त्यांच्याकडून मी Reiki कशी घ्यायची ते शिकले. आणि खरंच मला त्याचा फायदा झाला तो असा.... माझ्या IP केमो मधे जेव्हा २४ तासांसाठी सलाइन ड्रिप चालायचं तेव्हा साधारण दर ८ तासांनी सलाइन ची रक्तवाहिनी चेंज करायला लागायची कारण इतका वेळ नीडल आत राहिल्यामुळे त्या भागावर सूज येऊन तिथे खूप दुखायचं. म्हणजे एका केमोमधे  ३ वेळा नीडल व्हेनमधे घुसवली जायची आणि सुरूवातीला नर्सनी म्हटल्याप्रमाणे माझ्या शरीरातल्या व्हेन्स आता खरंच खूप हार्ड झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांत सुई घुसवताना जीवघेण्या वेदना व्हायच्या. पण मी रेकी घ्यायला सुरुवात केल्यानंतर च्या केमोज् मधे माझ्या हातावर सूजही नाही आली आणि त्यामुळे व्हेन चेंज करायचीही गरज नाही भासली.

रोजचा व्यायाम, आहाराविषयीची काळजी, प्राणायाम, रेकी -या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय पण वेळोवेळी होणार्या माझ्या lab टेस्ट्स चे रिपोर्ट्स नॉर्मल येत होते. त्यामुळे मधे कुठलाही अडथळा न येता माझ्या केमो सायकल्स ठरल्याप्रमाणे त्या त्या दिवशी पार पडत होत्या.आणि कँसर सेल्स ना शरीरातून मुळापासून नष्ट करण्यासाठी दोन केमो सायकल्स मधलं अंतर खूप महत्त्वाचं असतं. एकही दिवस जरी पुढे मागे झाला तरी सगळं गणित चुकतं.

अशाच एका केमो सायकल करता जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा एका स्त्रीची भेट झाली. ती स्वतः डॉक्टर होती आणि आर्मीमधे 'मेजर' च्या हुद्दयावर काम करत होती. तिच्याशी बोलताना असं कळलं की तिला नुकताच ब्रेस्ट कँसर डिटेक्ट झाला होता आणि तिच्या पहिल्या केमोकरता ती अँडमिट झाली होती. थँकफुली कँसर अजून इनिशियल स्टेज मधे होता आणि त्यामुळे ट्रीटमेंट यशस्वी होण्याचे चान्सेस् खूप जास्त होते. पण तिच्याशी बोलताना  मला असं जाणवलं की ती खूप निराशावादी आहे. कारण तिचं पहिलंच वाक्य होतं," मी तर अजून फक्त ४४ वर्षांची च आहे. माझ्या मुली पण अजून सेटल नाही झाल्या त्यांच्या आयुष्यात... तरीही माझ्या च बाबतीत देवानी असं का केलं?" मी तिला म्हणाले,"तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात. मी तुम्हाला सांगायची गरज नाहीए. तुम्हाला माहिती च आहे - कँसर हा असा रोग आहे की जो कूणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. अहो, तान्ही बाळं पण नाही सुटत याच्या तावडीतून."

माझ्या डोळयांसमोर ऑपरेशन थिएटर मधलं ते तान्हुलं आलं!

पण माझं हे बोलणं ऐकून तिनी मला उलट प्रश्न केला," तुम्ही तर माझ्यापेक्षा लहान आहात आणि तुमचा आजारही जास्त सीरियस आहे. तरीही तुम्ही एवढ्या शांत कशा राहू शकता? तुम्हाला राग नाही येत?" तिचं हे बोलणं ऐकून तर मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. म्हणजे मी तिला परिस्थिती कडे पॉझिटिव्हली बघायला सुचवत होते तर ही बया स्वतः बरोबर मलाही निराशेच्या गर्तेत घेऊन चालली होती. पण तरीही मी माझा प्रयत्न चालू ठेवला. इतरांच्या तुलनेत ती किती नशीबवान आहे आणि जर तिनी मनात ठरवलं तर ती या रोगावर नक्की मात करेल,.वगैरे वगैरे....पण आमच्या या 'हरिदासाची ' कथा काही मूळ पद सोडेना ! मला म्हणाली," माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यानी मला अजून निदान दहा वर्षं तरी आयुष्य द्यावं.माझ्या मुलींना त्यांच्या आयुष्यात सेटल झालेलं बघायचं आहे मला. त्यामुळे अजून दहा वर्षं जरी मिळाली तरी मी देवाची आभारी राहीन." यावर मी तिला फक्त एवढंच म्हणाले की "तुम्ही स्वतःच आत्तापासून तुमचं पुढचं आयुष्य आणि त्याचा कालावधी ठरवताय. देवाच्या मनात जरी तुम्हाला दीर्घायुष्य द्यायचं असेल तरी तुम्ही स्वतःसाठी त्यातली फक्त दहा वर्षं निवडली आहेत. अशा परिस्थितीत देवही काही नाही करू शकणार." माझा 'सकारात्मक चश्मा' तिला घालायचा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला.

एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात मी माझी केमो सायकल घेऊन घरी आले होते पण यावेळी मला vomiting चा जरा जास्तच त्रास होत होता. ५ एप्रिल ला दुपार नंतर तर सारख्या उलट्या होत होत्या. अगदी एक घोट पाणी देखील टिकत नव्हतं पोटात. संध्याकाळ नंतर उलट्या होण्याची frequency पण वाढली आणि fluids ची quantity पण... शेवटी माझी बहिण म्हणाली, "आत्ताच्या आत्ता हिला हॉस्पिटलमधे घेऊन जायला पाहिजे. मला तरी वाटतंय की हिला dehydration झालंय." Luckily तेव्हा नितिन दहा दिवसांची सुट्टी घेऊन पुण्याला आला होता. आम्ही लगेचच माझ्या जिजाजी बरोबर त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमधे जायला निघालो. तेव्हा  रात्रीचे ९-९.३० वाजले होते. दोघी मुली ऑलरेडी झोपल्या होत्या. खरं तर त्यांना असं न सांगता जाणं मला पटत नव्हतं. कारण सकाळी उठल्यावर त्यांना जर कळलं असतं की 'आईला रात्री अचानक हॉस्पिटलमधे घेऊन गेले' तर त्यांना कदाचित टेन्शन आलं असतं. पण त्या वेळच्या माझ्या physical condition मधे प्रत्येक क्षण महत्वाचा होता. म्हणून मग मी माझ्या बहिणीच्या भरवशावर मुलींना सोडून निघाले। हॉस्पिटलमधे पोचल्यावर नितिन च्या सांगण्यावरुन जिजाजींनी गाडी सरळ 'इमर्जन्सी वॉर्ड' च्या समोर नेऊन उभी केली.

रात्रीची वेळ होती त्यामुळे MI Room(Medical Inspection Room) मधे फक्त ड्यूटी वर असलेले मेडिकल ऑफीसर आणि नर्सिंग स्टाफ यांच्या शिवाय अजून कुणीही नव्हते. मी कार मधून उतरून आत गेले. नितिन नी डॉक्टर ना माझ्या कंडिशन बद्दल थोडक्यात सांगितलं. त्यांनी एका नर्सिंग असिस्टंट ला अँडमिशन बद्दल चं सगळं पेपरवर्क पूर्ण करायला सांगितलं आणि माझ्या दिशेनी आपला मोर्चा वळवला. एकीकडे माझ्या रिपोर्ट्स वरून नजर फिरवत ते माझ्याशी बोलत होते. त्यांना हवी असलेली सगळी माहिती मिळाल्यावर त्यांनी नर्स ला सांगितलं," इमीजिएटली सलाइन ड्रिप सुरू करा", या सगळ्या घडामोडी अगदी पाच एक मिनिटात घडल्या.

एकीकडे डॉक्टर माझी पल्स बघायचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे ती नर्स सलाइन लावण्यासाठी माझ्या हातातली व्हेन शोधत होती.. पण dehydration मुळे माझ्या सगळ्या रक्तवाहिन्या  shrink होऊन इतक्या खोलवर गेल्या होत्या की त्यामुळे त्या दोघांनाही फील च नव्हत्या होत. तीन चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी सुई घुसवून ट्राय केल्यानंतर शेवटी एकदाची त्या नर्स ला एक व्हेन मिळाली पण त्यासाठी तिला ती नीडल पूर्णपणे माझ्या हातात घुसवावी लागली.

ते डॉक्टर मला म्हणाले, " मँम, तुम्ही अजून शुद्धीवर कशा काय याचंच आश्चर्य वाटतंय मला! अशा कंडिशन मधे मोस्टली पेशंट ला कसलीच शुद्ध नसते आणि तुम्ही तर स्वतः चालत आलात इथे" आणि त्यावर आम्ही दोघंही एकदमच बोलून गेलो,"देवाचीच क्रुपा !!"

आणि देवाच्या या क्रुपेचा प्रत्यय मला थोड्याच वेळात आला. सलाइन ची एक बाटली माझ्या शरीरात गेल्यानंतरही माझ्या कंडिशन मधे काही सुधारणा नव्हती. ते बघून मग डॉक्टर नितिन ला म्हणाले,"यांना वॉर्ड मधे शिफ्ट करावं लागेल.. आत्ता लगेच. तुम्ही यांना घेऊन जा. मी वॉर्ड मधल्या ड्यूटी नर्स ला फोन करून सगळी तयारी करायला सांगतो आणि यांच्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ला पण फोन करून बोलावून घेतो. तुम्ही ताबडतोब यांना वॉर्ड मधे घेऊन जा." त्यांच्या बोलण्यातली अर्जन्सी बघून आम्हांला अंदाज आलाच होता की आता परिस्थिती हळूहळू गंभीर होते आहे. नितिन च्या आणि जिजाजींच्या चेहऱ्यांवर काळजी जाणवत होती. मलाही परिस्थिती चं गांभिर्य लक्षात आलं होतं, पण का कोण जाणे... मला अजिबात टेन्शन नव्हतं आलं. मी एखाद्या त्रयस्थासारखी सगळं बघत होते... जणू काही कुणीतरी मला hypnotize केलं होतं... आम्ही वॉर्ड मधे पोचलो तेव्हा तिथली नर्स सगळ्या तयारीनिशी आमची वाटच बघत होती. तिनी मला अजून एक सलाइन ची ड्रिप सुरु केली. माझं ब्लड सँपल घेऊन नितिन कडे दिलं आणि त्याला ते लँबमधे नेऊन द्यायला सांगितलं.. तेवढ्यात माझे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ही येऊन पोचले. आता हळूहळू dehydration चे symptoms दिसायला लागले होते. माझ्या चेहऱ्याचे स्नायु वेडेवाकडे खेचले जात होते आणि ते मला जाणवत होतं. माझा चेहरा distort होत होता. नितिन नी मला विचारलंही ,"तू चेहरा असा वाकडा का करतिएस?" मी तेव्हा त्याला म्हणाले की "मी मुद्दाम नाही करत, ते आपलं आपणच होतंय अरे" एकीकडे नर्स माझ्या सलाइन ड्रिपवाटे वेगवेगळी इंजेक्शन्स देत होती. आणि डॉक्टर माझ्या तोंडात औषधाच्या गोळ्या टाकत होते. Severe dehydration मुळे माझ्या शरीरामधे सोडिअम,मँग्नेशिअम वगैरे चं प्रमाण असंतुलित झालं होतं. डॉक्टर एकीकडे हे सगळं नितिन ला आणि बरोबरीनी मलाही समजावून सांगत होते, पण त्याचबरोबर मी जागं राहावं म्हणून अधूनमधून मला अक्षरशः गदागदा हलवत होते, गालांवर हलकेच थपडा मारत होते.  पण या सगळ्या गदारोळात मी मात्र तिथे असूनही नसल्यासारखी होते. मला शारीरिक पातळीवर वेदना जाणवत होत्या , डॉक्टरांच्या बोलण्यावरून माझी कंडिशन किती सिरियस आहे तेही कळत होतं.. in fact, I had even heard the doctor telling Nitin that ," ट्रीटमेंट ला थोडा  जरी उशीर झाला असता तर या कोमा मधे जायची भीती होती." हे सगळं माझ्या कानांवाटे माझ्या मेंदूपर्यंत पोचत होतं पण का कोण जाणे माझ्या मनावर या सगळ्याचा काहीच परिणाम होत नव्हता. आत कुठेतरी खूप शांत वाटत होतं. एक कुठली तरी अद्रुश्य शक्ती माझ्या आसपास असल्याचं सतत जाणवत होतं. आणि बहुतेक ही जाणीवच मला विश्वास देत होती की ' सगळं ठीक होईल.'

पहाटे पर्यंत हळूहळू माझ्या तब्बेतीमधे सुधार दिसायला लागला. माझी कंडिशन आता स्टेबल झाली होती. मी ठीक असल्याची खात्री झाल्यावर मग डॉक्टर घरी गेले. नितिन आणि जिजाजी पण रात्र भर हॉस्पिटलमधे बसून होते, त्यामुळे मी त्यांना पण घरी जायला सांगितलं. नितिन दिवसा मुलींना घेऊन येणार होता. पण जायच्या आधी तो मला म्हणाला,"काळजी घे गं स्वतःची... तुझ्यासाठी नाही तर निदान आमच्या तिघांसाठी तरी !!" मी त्याला तसं प्रॉमिस केलं अगदी मनापासून.

पण तो गेल्यानंतर देखील त्याचं ते वाक्य माझ्या कानांत घुमत होतं. त्याचा तो चिंतातुर चेहरा आणि ती हळवी नजर वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होती. त्याचं हे असं रुप मी आजपर्यंत कधी नव्हतं बघितलं. त्या क्षणी मला  जाणीव झाली की 'आपलं आयुष्य हे फक्त आपलं नसतं. त्याच्यावर आपल्या माणसांचाही तेवढाच हक्क असतो. आणि म्हणूनच मी ठरवलं 'नितिन ला दिलेलं प्रॉमिस पाळायचं. आपल्या प्रक्रुतीची काळजी घ्यायची... आपल्यासाठी आणि त्याहीपेक्षा जास्त आपल्या माणसांसाठी..

खरं म्हणजे आधीच्या शेड्यूल प्रमाणे माझ्या सर्जरी नंतर माझ्या प्रत्येकी तीन केमो होणार होत्या- तीन IP आणि तीन IV. पण माझे मेडिकल स्पेशालिस्ट मला म्हणाले की "आत्तापर्यंत तुमच्या शरीरानी ट्रीटमेंट ला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. You are tolerating the treatment very well. तर मला वाटतंय की तुम्ही अजून एक (चौथी) केमो पण घ्यावी. To be on the safer side."

हे ऐकून क्षणभर मी हादरले. कारण जरी म्हणायला एक केमो होती तरी अँक्च्युअली होत्या दोन केमो.. .आधी IP  आणि त्यानंतर एक आठवड्यानंतर IV केमो. म्हणजे अजून एक्स्ट्रा एकवीस दिवसांचा शारीरिक त्रास. अचानक दोन्ही मुलीचा विचार मनात आला. त्या दोघीही गेल्या काही दिवसांपासून खूप खुश होत्या. 'आता लवकरच आईची ट्रीटमेंट संपणार आणि आपण परत बाबांकडे जाणार ' या नुसत्या कल्पनेनीच त्या जाम खुशीत होत्या. आणि आता जर त्यांना कळलं की त्यांचा हा प्लॅन तीन आठवड्यांनी पुढे ढकलला आहे तर त्या परत डिस्टर्ब होतील. पण मी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे अजून एक केमो घ्यायला तयार झाले. कारण त्यामुळे  भविष्यात  माझं आणि पर्यायानी माझ्या मुलींचं आयुष्य सुरक्षित राहणार होतं. त्याच्या तुलनेत हा एकवीस दिवसांचा त्रास काहीच नव्हता.

अशा प्रकारे मे २००६ मधे मी माझ्या अकराव्या (आणि शेवटच्या) केमोथेरपी साठी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. एकीकडे माझी केमो चालू होती आणि माझ्या मनात मात्र विचारांचा खो-खो चालला होता. गेल्या सहा-सात महिन्यांतला माझा प्रवास पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोरून सरकत होता- एखाद्या टीव्ही सिरियल चं रिपीट टेलिकास्ट बघितल्यासारखा. आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक टेलिकास्ट च्या वेळी मला काहीतरी नवीन अनुभूती होत होती.

हा सगळा प्रवास तसं म्हटलं तर माझ्या एकटीचाच; पण माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकानी  आपापल्या परीने तो प्रवास पूर्ण केला होता.

गेल्या सहा महिन्यांत मी खूप शारीरिक त्रास सहन केला. पण मला माझ्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि त्याचा क्षमतेबद्दल खात्री होती. मला नेहमी वाटायचं(आणि अजूनही वाटतं) की माझ्या शरीरात लाखो-करोडो पेशी आहेत आणि त्या एका सिस्टिम नी काम करतात. पण त्यातल्या काही पेशींनी ठरवलं की आपण आता आपल्याला हवं तसं, बेधुंदपणे वागायचं. अशा बंडखोर व्रुत्तीच्या पेशी एकत्र झाल्या आणि हळूहळू त्यांनी माझ्या शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली. पण  माझ्या शरीरातल्या इतर निरोगी पेशींच्या तुलनेत या बंडखोर पेशी तर खूप कमी होत्या; मग त्या माझ्या शरीराचा ताबा कशा घेऊ शकतील? मी त्यांना असं करूच देणार नाही. आमच्या या लढाईत विजय फक्त माझा आणि माझाच होणार अशी खात्री होती मला. म्हणून मी रोज सकाळी उठल्यावर 'कराग्रे वसते' आणि 'समुद्र वसने देवी' म्हणून झाल्यानंतर माझ्या शरीरातल्या निरोगी पेशींना आदेश द्यायची-" जा आणि सगळ्या बंडखोर पेशींना नेस्तनाबूत करा"

आणि माझ्या शरीरानी पण या लढाईत माझी पूर्ण साथ दिली. त्या काळात झालेल्या वेदना आणि त्रास सहन करत असताना कधीही माझ्या शरीरानी माझी साथ नाही सोडली. विविध स्ट्रॉंग औषधांचा मारा सहन करून देखील माझ्या शत्रूला पळता भुई थोडी केली. मला माझ्याच शारीरिक आणि मानसिक शक्तीची नव्याने ओळख झाली; आणि मी ठरवलं - 'जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा माझ्या या शरीरानी मला साथ दिली. It never let me down. आता यापुढे मी माझ्या या शरीराची काळजी घेईन. मागच्या काही महिन्यांत झालेली शारीरिक हानी मी लवकरच भरून काढीन.'

ट्रीटमेंट संपल्यानंतरही मला काही महिने काळजी घेणं आवश्यक होतं. पहिले तीन महिने मला आधी प्रमाणेच आहारात पथ्य पाळणं गरजेचं होतं- फक्त शिजलेलं अन्न आणि उकळलेलं पाणी, बाहेरचं खाणंं पूर्णपणे व्यर्ज, गर्दीच्या ठिकाणी जायची मनाई. त्यानंतर हळूहळू  नॉर्मल रूटीन सुरु करायचं. त्याचबरोबर पहिल्या वर्षी दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी आणि CA- 125 ही ब्लड टेस्ट करणं आवश्यक होतं दुसऱ्या वर्षी या टेस्ट्स दर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर मग वर्षातून एकदा  करायचा सल्ला दिला डॉक्टरांनी. आणि हे सगळं मी अगदी तंतोतंत पाळलं. शिवाय रोजचा प्राणायाम आणि योगाभ्यास....त्यामुळे काही महिन्यांतच माझ्या शरीराची झीज भरून निघाली आणि मी परत पहिल्यासारखं माझं आयुष्य भरभरून जगायला लागले.

माझ्या शेवटच्या केमो दरम्यान मी माझ्या मेडिकल स्पेशालिस्ट ना विचारलं," माझ्या कँसरचे recurrence चे चान्सेस् किती आहेत तुमच्या द्रुष्टीनी?" यावर ते म्हणाले," तुमचा कँसर खूप अँडव्हान्स्ड स्टेजचा होता त्यामुळे माझ्या मते recurrence  चे chances ४०% आहेत."

हाच प्रश्न जेव्हा मी माझ्या सर्जनला विचारला तेव्हा ते म्हणाले,"२५%". मग मी स्वतःच्या मनाला विचारलं, आणि उत्तर आलं ,"०.००००%" आणि मी माझ्या मनाचं ऐकायचं ठरवलं.त्या क्षणी मी स्वतःलाच एक वचन दिलं... 'Whenever I die.. I will not die because of cancer.." आणि हाच माझा या आजारावर मिळवलेला खरा विजय असेल.

माझ्या या आजारामुळे मला आयुष्याची नव्यानी ओळख झाली. खूप काही शिकले- माणसांबद्दल, नात्यांबद्दल! बरीचशी माणसं आणि काही नाती यांची नव्यानी व्याख्या समजली. मनात असलेले बरेचसे भ्रमाचे भोपळे फुटले...काही अनुभव दुःख देऊन गेले तर काहींमुळे खूप आनंदही मिळाला.

या सगळ्या अनुभवांतून एक मोठी शिकवण मिळाली आणि ती म्हणजे- आपल्याला हे जे आयुष्य मिळालंय ते 'जगायचं'. प्रत्येक क्षण अनुभवायचा. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद शोधायचा.

माझ्या ट्रीटमेंट च्या काळात nausea मुळे मला काहीही खायला किंवा साधं पाणी प्यायला ही जीवावर यायचं. पाणी पितानाही अगदी घोट-घोट प्यावं लागायचं. त्यामुळे ट्रीटमेंट संपल्यानंतर काही दिवसांनी एकदा जेव्हा मी पाण्याचा पूर्ण भरलेला ग्लास एका झटक्यात अगदी घटाघट पिऊन रिकामा केला तेव्हा मला अक्षरशः जग जिंकल्याचा आनंद झाला. आणि त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की

आपण आपल्या आयुष्यातल्या बर्याच गोष्टी ग्रुहीत धरतो- आपली माणसं, आपली प्रक्रुती, आपल्याला मिळणार्या सुख सुविधा- थोडक्यात काय तर आपण आपलं सगळं आयुष्यच ग्रुहीत धरतो. आणि म्हणूनच आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा हे सगळं आपल्या हातातून निसटायला लागतं तेव्हा त्याची खरी किंमत कळते. आणि म्हणूनच आपल्या ओंजळीतून हे सगळं निसटू न देता त्याचा आस्वाद घेणं जमलं पाहिजे. ज्याला हा आस्वाद घेणं जमलं, त्याला खरं आयुष्य जगता आलं.

हे असंच आयुष्य 'जगायचा' माझा प्रयत्न चालू आहे-सतत!

मी माझ्या ट्रीटमेंट च्या काळात खूप कँसर पेशंट्स बघितले... वेगवेगळ्या स्टेजेस् मधले..काही जण माझ्यासारखे होते.. त्यांची काहीही चूक नसतानाही या आजारानी पछाडलेले. पण बऱ्याच पेशंट्सनी स्वतःच या रोगाला आमंत्रण दिलं होतं. सिगरेट, तंबाखू, मशेरी, दारू अशा विविध मार्गांनी कँसर त्यांच्या शरीरात शिरला होता. थोडक्यात काय तर त्या सगळ्यांनी पैसे देऊन हा रोग विकत घेतला होता. पण आता कितीही प्रयत्न केला तरी तो कँसर त्यांच्या शरीरातून बाहेर जायला तयार नव्हता. हे सगळं बघितलं आहे मी जवळून आणि म्हणून माझी सगळ्यांना एकच विनंती आहे.. "देवानी तुम्हाला हे निरोगी शरीर दिलं आहे त्याची काळजी घ्या. त्याची हेळसांड नका करू. Health is wealth या वाक्यामागचा खरा अर्थ लक्षात घ्या. कारण जर आपलं हेल्थ च ठीक नसेल तर कितीही वेल्थ असलं तरी त्याचा काही उपयोग नाही.

काही जण मला म्हणतात," नको लक्षात ठेऊस ते दिवस. एक वाईट स्वप्न समजून विसरून जा सगळं." पण मला नाही विसरायचं काहीच. त्या कालावधीतला प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव मला अजूनही लक्षात आहे आणि आयुष्यभर मला ते सगळं लक्षात ठेवायचं आहे. कारण त्या अनुभवांमुळेच तर मला माझ्या सभोवतालचा चांगुलपणा दिसला. I have started valuing my body and my health even more.

माझ्या आजारपणाचा तो काळ माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य आणि तितकाच महत्त्वाचा घटक आहे. इतरांच्या म्हणण्याप्रमाणे जरी तो त्रासदायक असला तरी शेवटी आहे माझ्याच आयुष्यातला ना! It makes my life complete.

खैर... प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्वत वेगवेगळी असते. त्यामुळे मला जे योग्य वाटतंय ते काही लोकांना कदाचित नाही पटणार; आणि तसा माझा आग्रह ही नाही.

पण एक गोष्ट मात्र नक्की आहे - माझ्या शरीरात आणि पर्यायाने माझ्या आयुष्यात शिरलेला हा कँसर म्हणजे माझ्यासाठी 'blessing in disguise ' ठरला आहे...मला माझी आणि माझ्या आयुष्याची नव्यानी ओळख करून देणारा!

पण बस्स्... आता माझ्या यापुढच्या आयुष्यात या आगंतुकाला स्थान नाही ! कारण आता मी त्याच्यावर विजय मिळवला आहे - कायमचा!

मी एक 'cancer survivor' नाहीए; तर 'cancer  conqueror ' आहे.

आणि या माझ्या लढाईत ज्या दोन शस्त्रांनी माझा विजय निश्चित केला,  ती शस्त्रं म्हणजे माझी willpower आणि  positive thinking.

आज इतक्या वर्षानंतर हे सगळं कागदावर उतरवताना आणि सगळ्यांबरोबर शेअर करताना मनात एकच आशा आहे.... माझं हे मनोगत वाचणार्यांना त्यांच्या मनाच्या शक्तीची जाणीव होईल आणि आयुष्य कडे बघताना ते त्यांचा सकारात्मक चश्मा नक्की घालतील.
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निमिता, सर्व भाग वाचत होते पण वाचताना स्क्रीन धुसर व्हायची म्हणून प्रतिसाद देत नव्हते. Really Hats off to you. तुमच्याकडून जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन शिकले मी. देव न करो पण कधी जीवनात संकट समय आलाच तर तुमचा हा लेख वाचेन, नक्कीच त्यावर मात करण्याची ताकद मिळेल.

मी एक 'cancer survivor' नाहीए; तर 'cancer conqueror ' आहे.>>>

इंडीड यु आर!! अतिशय इन्स्पायरिंग मालिका झाली आहे ही. थँक्यू! Happy

मी सगळे भाग वाचले. जेव्हा तुम्ही cancer survivers च्या यादीत नाव नोंदवलत तिथेच तुम्ही विजयाचा पाया रोवलात. औषधांबरोबर तुमची इच्छाशक्ती तुमची ताकद बनली आणि finally विजय तुमचाच झाला. तुमच्या positive attitude ला सलाम.

ही इतकी प्रेरणादायी मालिका लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद! देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो!

प्रिया, मनापासून खूप खूप खूप आभार ही लेखमाला लिहिल्याबद्दल. You have no idea how many cancer patients you would be inspiring to be cancer conquerers! I love love love this word.
परत एकदा hats off to you and your family too.

एक नंबर !!
लिंक्ससहित ही मालिका सर्वांना फॉरवर्ड करणार.

धन्यवाद मायबोलीकर मित्र मैत्रिणीनो,
तुम्हां सर्वांना एक सांगायचं आहे- माझे हे लिखाण तुम्ही अगदी जरूर इतरांबरोबर share करा! माझ्या या लिखाणा मागचा उद्देश हाच आहे की माझ्या अनुभवांचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा. Happy

इतकी प्रेरणादायी मालिका लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद! देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो!-- +१११

hats off to you!
& thanks for sharing your story with us! Its inspiring!

मी एक 'cancer survivor' नाहीए; तर 'cancer conqueror ' आहे. >> वाह! क्या कही! निमिता यु आर ग्रेट.
तुमची ट्रिटमेंट आणि त्यातले अनुभव वाचून आपण डोळ्यासमोर हे सगळं पाहतोय असंच वाटत होतं.

सगळं पॉझिटिव्ह वाचताना अतिशय सुखद वाटलं.
पण असे काही क्षण कधी आले होते का जिथे तुम्ही ब्रेक डाऊन झालात किंवा हताश झालात? त्यावर मात कशी केलीत?

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

खूप खूप शुभेच्छा !!!! तुम्ही आमचेही डोळे उघडले आहेत हे लेख लिहून, खरचं फार गॄहीत धरतो आपण लहान लहान गोष्टी.

इतकी प्रेरणादायी मालिका लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद! देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो!-- +१११

दक्षिणा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. त्या पूर्ण कालावधीत माझ्या मुलींची ससेहोलपट बघून कधी कधी डोळे भरून यायचे. पण एक खात्री होती की 'देव आहे त्यांच्या पाठीशी. He has his own plans.'तो योग्य तेच करतो. आणि तोच सगळं काही ठीक करेल.'
या आणि अश्या विचारांनी हिम्मत मिळायची. Happy

खूपच प्रेरणादायी! डॉक्टरांनी कॅन्सर पेशंट वर उपचार करताना औषधांबरोबर उपचाराचा भाग म्हणून ह्या लेखमालेची प्रत आवर्जून पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचावयास द्यावी.

ही इतकी प्रेरणादायी मालिका लिहील्याबद्दल मनापासून धन्यवाद! देव तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो!>>+१००

तुमचा मनोनिग्रह कमालीचा आहे खरोखर ! हे नीट बैजवार लिहून काढल्याबद्दल मनःपूर्वक आभार. _/\_

खूपच प्रेरणादायी! डॉक्टरांनी कॅन्सर पेशंट वर उपचार करताना औषधांबरोबर उपचाराचा भाग म्हणून ह्या लेखमालेची प्रत आवर्जून पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचावयास द्यावी. >> +१

सगळे भाग वाचले. धन्य तुमचा सकारात्मक दृष्टीकोन!! हे सगळं लिहून शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद!

अतिशय प्रेरणादायी लेखमालिका!! आजारी असो वा निरोगी, प्रत्येक वाचकाला स्फूर्ती देतील हे लेख. >> वावेला अनुमोदन. फारच सुंदर मालिका.

Pages