'आदिल' शब्दाविषयी

Submitted by देवकी on 25 February, 2018 - 08:47

आशा बगे यांच्या' गोष्ट आदिलची' या कथेत आदिल म्हणजे पहिला असा अर्थ दिला आहे.
ज्ञानेश्वरीतल्या ओवीनुसार
जैसां दीपें दीप लाविजे। तेथ आदील कोण हे नोळखिजे।
तैसा सर्वस्वें जो मज भजे। तो मीचि होऊनि ठाकें।

तेव्हा आदिल शब्द ,संस्कृत आदि / आद्य या शब्दावरुन आला आहे का?
गुगलवर आदिल शब्द इस्लामिक मूळ दर्शवित आहे.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.आगाऊ धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ज्ञानेश्वरीतला आदिल वेगळा आणि अरेबिक आदिल वेगळा.
पहिला किंवा मूळ/ आद्य या अर्थाने ज्ञानेश्वरीतला आदिल येतो. आदल्या दिवशी - आधीच्या दिवशी म्हणतो ना तसे

कुमार्१,आंतरजालावर तुम्ही सांगितलेला अर्थ आहे.

स्वाती२, आद्य शब्दावरून आदिल आला असेल का? म्हणजे तो शब्द संस्कृतोद्भव आहे का?
(रच्याकने तुम्ही लिहिलेला, आद्य कॉपीपेस्ट केलाय.मी बराच वेळ लिहिण्याचा प्रयत्न केला.)

अदालत हा अरबी शब्द कोर्ट ह्या अर्थी वापरतात त्यातही न्याय ह्या शब्दाशी संबंधित अर्थ आहे. अरबी शब्द हे मूळ तीन व्यंजनांच्या धातूंना नियमबद्ध पद्धतीने बदलून बनवतात. आदिल आणि अदालत हे एकाच धातूपासून बनले आहेत. नौशेर्वान ए आदिल एक जुना हिंदी सिनेमा आहे त्याचा अर्थही न्यायप्रिय नौशेरवान असा आहे.

अर्थात ज्ञानेश्वरीतील आदिल हा वेगळ्या अर्थाचा आहे. त्याचा अरबीशी संबंध नसावा. एकंदरीतच संत साहित्यात अरबी वा फार्सी शब्द अत्यंत तुरळक आढळतात मग ते तुकाराम, रामदास असोत वा नामदेव ज्ञानेश्वर.

आधी आणि आधील हे शब्द मराठीत आहेतच. आधीची/चा/चे /च्या या अर्थाने 'आधील' अजूनही वापरला जातो. जसे,'आधील कामे उरका, नंतरच नवी हाती घ्या' वगैरे. पण अर्थात या 'आधील'चे मूळ 'आदि' असू शकेल. आणि 'आधी'चा अर्थही 'पहिला,पूर्वीचा' असाच आधी होता असेल.