अति लोभाचे फळ

Submitted by Pradipbhau on 20 February, 2018 - 08:25

अति लोभाचे फळ
राघव नावाचा एक गरीब कोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीकाठी रहात होता. त्याचे घर अगदी साधे होते. नदीत मासे पकडायचे व ते गावात नेऊन विकायचे हा त्याचा उद्योग होता. या व्यवसायावर तो स्वतःची व पत्नीची उपजीविका करीत असे. त्याची पत्नी धूर्त होती. तिला गरिबीत राहणे पसंत नव्हते. तिच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या.
एक दिवस राघव गावाबाहेर असलेल्या ओढयाजवळून जात होता. त्याला एक मासा ओढ्याच्या पाण्यात दिसला. तो मासा त्याला म्हणाला, “ अरे भल्या माणसा मला या ओढ्याच्या पाण्यातून बाहेर काढून नदीच्या पाण्यात सोड. तू मागशील ते मी तुला देईन. “ राघवला त्याची दया आली. त्याने त्या माशाला ओढ्याच्या पाण्यातून बाहेर काढून नदीच्या पाण्यात सोडले.
राघव कोळी घरी आला. त्याने आपल्या बायकोला ही घटना सांगितली. त्याची बायको त्यास म्हणाली,” तो मासा मागेल ते देणार आहे ना बरे झाले आपले नशीब आता बदलेल. तुम्ही उद्याच जाऊन त्याला आपल्या दोघांसाठी चांगले कपडे मागा. “
राघव नदीच्या काठाला गेला. त्याने स्वतःसाठी व बायकोसाठी कपडे मागितले. मासा म्हणाला तू घरी जा तुला कपडे मिळतील. राघव घरी जाऊन पाहतो तो काय घरात नवीन कपड्याचा ढीग लागलेला. तो व त्याची बायको एकदम खुश झाली.
दोन दिवस गेले. त्याच्या बायकोने दागिन्यांचा हट्ट धरला. राघव पुन्हा त्या माशाकडे गेला. त्याने दागिन्यांची मागणी केली. माशाने ती मान्य केली. घरी जाऊन बघतो तो त्याची बायको दागिन्यांनी मढलेली. त्याची बायको म्हणाली आता सगळे काही मिळाले. झोपडीवजा घरात रहायचा कंटाळा आलाय. त्या माशाला एक चांगले घर मागा. राघवला देखील ही कल्पना आवडली. त्याने एके दिवशी घराची मागणी केली. माशाने ती मान्य केली. राघव घराकडे निघाला. बघतो तो काय त्याची झोपडी गायब. तेथे एक टुमदार बंगला.
असेच आणखी काही दिवस गेले. त्याची बायको त्याला म्हणाली ,” एवढं वैभव आपल्याला मिळाले. त्याचा उपभोग घेण्यासाठी भरपूर आयुष्य हवे. एवढे शेवटचे मागणे त्याच्याकडे मागा. परत मग आपल्याला काहीही नको. “
बायकोचे ऐकून तो कोळी पुन्हा त्या माशाकडे गेला. त्याने त्याच्याकडे दीर्घायुष्याची मागणी केली. मासा खूप चिडला. तो म्हणाला,” अरे तुझ्या मागण्या तर वाढतच चालल्यात. तुझे समाधान तरी कधी होणार. तू लोभी आहेस. तुझ्या आजवर मान्य केलेल्या मागण्या मी परत घेत आहे. तू पूर्वीसारखाच राहशील.जा येथून अन परत काही येऊ नकोस. “
राघव घरी आला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सोन्याचे दागिने गायब, चांगले कपडे गायब, बंगला गायब. सारे सारे गायब झाले. उरली ती झोपडी, फाटके कपडे, नेहमीचे दारिद्र्य. हे सर्व त्याच्या अतिलोभीपणामुळे झाले. त्याने बायकोचा सल्ला ऐकला त्यामुळे झाले. जेवढे नशिबाने मिळाले त्यात सुख समाधान मानले असते तर त्याच्यावर आज ही वेळ आली नसती.
प्रदीप जोशी विटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults