चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

Submitted by निक्षिपा on 19 February, 2018 - 10:25

चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

चित्रपट परिक्षण म्हणजे नेमकं काय हे मला माहित नाही, कारण ते मी कधी केलेलं नाही. पण जे आवडतं, जे मनाला भावतं किंवा जे आतपर्यंत पोहोचतं ते मला कागदावर उमटवायला आवडतं. ‘गुलाबजाम’ चित्रपटाबाबतही नेमकं हेच झालंय.

चित्रपट सुरु होतो ते आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मुंबई-पुण्याच्या डेक्कन क्वीनच्या सीनने. सिद्धार्थ बरोबर आपणही त्याच्या वर्तमानाचा आणि भूतकाळाचा प्रवास सुरु करतो आणि बघता बघता या गाडीच्या वेगानेच हा चित्रपट वेग पकडत जातो.

‘लंडनस्थित आदित्यला पारंपरिक मराठी पदार्थ शिकून लंडनमध्ये रेस्टोरंट सुरु करायचं आहे त्यासाठी तो पुण्यात कोणा एका गुरूच्या शोधात येतो. तिथे अचानक त्याची मुलांचे डबे बनवून देणाऱ्या राधाशी भेट होते आणि तो तिच्याकडून जेवण बनवायला शिकतो.’ या तीन ओळींमध्ये या चित्रपटाची ढोबळ कथा सामावली आहे पण यात अजूनही बरंच काही आहे पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं.

चित्रपटाची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आपण टीव्हीवर पाहत असलेले बरेच छोटे छोटे सीन, ओळखीचे झालेले संवाद, दाखवलेले प्रसंग हे चित्रपट सुरु झाल्यावर केवळ अर्ध्या तासात येऊन जातात आणि क्षणभर वाटून जातं ‘अरे मग पुढे काय?’ पण या ‘पुढे काय’चं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं आहे हे उत्तम.

हा प्रवास जसा आदित्य आणि राधाचा आहे तसाच तो आपलाही आहे कारण आपण नकळत त्यांच्यात कधी आणि कसे गुंतत जातो हे आपल्याही समजत नाही. आदित्य नाईक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर म्हटलं तर तुमच्या आमच्या-सारखाच पण चित्रपटात त्याची विविध रूपं दिसतात आणि तो आणखीनच आवडून जातो. आदित्यचा राधाकडून जेवण बनवायला शिकण्याचा हट्ट, त्यात त्याला सुरुवातीला आलेले अपयश, त्यावर त्याने केलेली मात, राधाने त्याचा शिष्य म्हणून केलेला स्वीकार, त्यांचा गुरु-शिष्याच्या नात्याकडून मैत्रीच्या नात्याकडे झालेला समजूतदार प्रवास हे सगळेच यात सुरेखरित्या साकारले आहे.

या चित्रपटात छोटीशी भूमिका असलेली अनेक पात्रं आपला वेगळाच ठसा उमटवून जातात. मग तो ‘चिक्या’ असो किंवा फक्त ४ मिनिटांच्या रोलसाठी घेतलेली राधाची बहीण ‘विद्या’ (हे पात्र कोणी साकारलंय हे मी सांगू इच्छित नाही. नाही तर मजा निघून जाईल) चिन्मय उदगीरकर असो की मधुरा देशपांडे, डब्बा पोहोचवणारा ‘पोपट’ असो किंवा नुसतेच पायऱ्यांजवळ आरामखुर्चीत बसलेले पण एकही संवाद नसलेले आजोबा. “ती काय दार उघडायची नाही, लय खऊट आहे बघा” म्हणणारी कामवालीही चांगलीच लक्षात राहते.

या चित्रपटातील सगळ्यात महत्वाची पात्र म्हणजे राधा आणि आदित्य. खरं तर हा चित्रपट या दोघांचा. दोघांनीही तितक्याच ताकदीने भूमिका निभावल्या आहेत. त्यांचे कपडे, त्यांचे संवाद, त्यांच्यातील नाते, रूसवे-फुगवे हे सगळंच अद्वितीय. सोनाली कुलकर्णी यांनी अतिशय संयत भूमिका केली आहे आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी तेवढीच लाईव्हली.

नेहमीच्या चित्रपटांमधील आणि या चित्रपटामधील मुख्य फरक असा की चित्रपटातील नायिकांवर, त्यांच्या दिसण्यावर (लूक्सवर) खूप मेहनत घेतली जाते पण या चित्रपटामध्ये ‘हिरो’ जर कोणी ठरत असेल तर ना राधा ना आदित्य… या चित्रपटातील हिरो ठरतात ते यात दाखवण्यात आलेले विविध ‘खाद्यपदार्थ’! अतिशय सुंदररित्या तयार केले गेलेले, विविध रंगांचे, विविध चवींचे आणि आकारांचे पदार्थ संपूर्ण चित्रपटात स्वतःचा असा एक वेगळाच ठसा उमटवतात. मिलिंद जोग यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी कमाल आहे. मोदक, पुरणपोळी, वरणफळं, कुरडया, कांदाभजी, वरण-भात-तूप, काकडीची कोशिंबीर हे सगळंच डोळ्यांना सुखावतं.

मध्यंतरापर्यंत एक एक धक्के देत जाणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर काय वळण घेईल याचा आपण साधारण अंदाज बांधू शकतो पण त्यातही लेखक सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी एक वेगळाच ट्रॅक घेतला आहे. आपल्याला वाटणाऱ्या सगळ्या शक्यता ते मोडीत काढतात आणि आपल्याला एका वेगळ्याच पंगतीला नेऊन बसवतात.

या चित्रपटात एक संवाद आहे. “अनुभव आणि आठवण म्हणजे काय, ते एकच तर आहे. आजच्या अनुभवाची उद्या आठवण होणार” हा संवाद जसा मनात रेंगाळतो तसेच अनेक संवाद मध्ये मध्ये येतात आणि आठवणीत रहतात. आपल्याला विचार करायला भाग पडतात. “तू जा, नक्की जा. मला खात्री आहे की तू खूप छान जेवण बनवशील. खरं तर प्रमाण, मापं, हिशोब याच्या पलीकडे जाऊन मनापासून एखादा पदार्थ बनवला ना तर तो सुंदर बनतोच.” हा संवाद तर विशेष टाळ्या घेऊन जातो. हेच या चित्रपटाबाबतही झालं आहे. ठराविक साच्यात, ठोकळ्यात, कालावधीत आणि ठराविक सेटमध्ये न बनवल्यामुळे हा चित्रपट नेत्रसुखद ठरतो.

या चित्रपटात संगीताचे वैविध्य अप्रतिम आहे. ‘चव ही खमंग' हे फक्त एकच गाणं यात आहे तेही तोंडी लावण्यापुरतं. बाकीच्या निवडक सीनकरिता वापरलेली सिम्फनी असो किंवा एकसे बढकर एक राग यांचे कॉम्बिनेशन अफाट जुळून आले आहे.

शेवटची २० मिनिटे चित्रपट जरा रेंगाळतो असं वाटतं तरी पुढे काय होणार याची उत्सुकता लागते. राधाच्या चिडचिडी मागचे नेमके कारण काय?, आदित्य स्वयंपाक शिकतो का? दोघांच्या नात्याचा नेमका काय शेवट होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो तेव्हा समाधानी असतो. भरपेट आवडते जेवण जेवल्यावर शेवटचा गोड पदार्थ खाताना आपण अतीव समाधानाने डोळे मिटून त्याचा आनंद घेतो तशाच पद्धतीच्या भावना हा चित्रपट पाहून बाहेर पडताना येतात.

खरंच हा ‘गुलाबजाम’ म्हणजे एक मस्त जमून आलेली रेसिपी आहे. नक्की पहाच!

©स्मृती (निक्षिपा)
१६-२-२०१८
1st Day 1st Show Review

*गुलाबजाम #सचिनकुंडलकर #सोनालीकुलकर्णी #सिद्धार्थचांदेकर #फूडफिल्म #मराठीफूडफिल्म*

GULABJAAM-2-610x500.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन माहिती :: चाखायलाच हवा असा - गुलाबजाम

चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!
चित्रपट परिक्षण म्हणजे नेमकं काय हे मला माहित नाही, कारण ते मी कधी केलेलं नाही. पण जे आवडतं, जे मनाला भावतं किंवा जे आतपर्यंत पोहोचतं ते मला कागदावर उमटवायला आवडतं. ‘गुलाबजाम’ चित्रपटाबाबतही नेमकं हेच झालंय.
चित्रपट...

लेखक : इतर - आभार : बेधुंद लहरी
http://www.bedhundlahari.com/story?2370

- बेधुंद लहरी - मराठी अनुदिनी

Pages