चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

Submitted by निक्षिपा on 19 February, 2018 - 10:25

चाखायलाच हवा असा - गुलाबजाम!

चित्रपट परिक्षण म्हणजे नेमकं काय हे मला माहित नाही, कारण ते मी कधी केलेलं नाही. पण जे आवडतं, जे मनाला भावतं किंवा जे आतपर्यंत पोहोचतं ते मला कागदावर उमटवायला आवडतं. ‘गुलाबजाम’ चित्रपटाबाबतही नेमकं हेच झालंय.

चित्रपट सुरु होतो ते आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मुंबई-पुण्याच्या डेक्कन क्वीनच्या सीनने. सिद्धार्थ बरोबर आपणही त्याच्या वर्तमानाचा आणि भूतकाळाचा प्रवास सुरु करतो आणि बघता बघता या गाडीच्या वेगानेच हा चित्रपट वेग पकडत जातो.

‘लंडनस्थित आदित्यला पारंपरिक मराठी पदार्थ शिकून लंडनमध्ये रेस्टोरंट सुरु करायचं आहे त्यासाठी तो पुण्यात कोणा एका गुरूच्या शोधात येतो. तिथे अचानक त्याची मुलांचे डबे बनवून देणाऱ्या राधाशी भेट होते आणि तो तिच्याकडून जेवण बनवायला शिकतो.’ या तीन ओळींमध्ये या चित्रपटाची ढोबळ कथा सामावली आहे पण यात अजूनही बरंच काही आहे पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं.

चित्रपटाची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आपण टीव्हीवर पाहत असलेले बरेच छोटे छोटे सीन, ओळखीचे झालेले संवाद, दाखवलेले प्रसंग हे चित्रपट सुरु झाल्यावर केवळ अर्ध्या तासात येऊन जातात आणि क्षणभर वाटून जातं ‘अरे मग पुढे काय?’ पण या ‘पुढे काय’चं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं आहे हे उत्तम.

हा प्रवास जसा आदित्य आणि राधाचा आहे तसाच तो आपलाही आहे कारण आपण नकळत त्यांच्यात कधी आणि कसे गुंतत जातो हे आपल्याही समजत नाही. आदित्य नाईक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर म्हटलं तर तुमच्या आमच्या-सारखाच पण चित्रपटात त्याची विविध रूपं दिसतात आणि तो आणखीनच आवडून जातो. आदित्यचा राधाकडून जेवण बनवायला शिकण्याचा हट्ट, त्यात त्याला सुरुवातीला आलेले अपयश, त्यावर त्याने केलेली मात, राधाने त्याचा शिष्य म्हणून केलेला स्वीकार, त्यांचा गुरु-शिष्याच्या नात्याकडून मैत्रीच्या नात्याकडे झालेला समजूतदार प्रवास हे सगळेच यात सुरेखरित्या साकारले आहे.

या चित्रपटात छोटीशी भूमिका असलेली अनेक पात्रं आपला वेगळाच ठसा उमटवून जातात. मग तो ‘चिक्या’ असो किंवा फक्त ४ मिनिटांच्या रोलसाठी घेतलेली राधाची बहीण ‘विद्या’ (हे पात्र कोणी साकारलंय हे मी सांगू इच्छित नाही. नाही तर मजा निघून जाईल) चिन्मय उदगीरकर असो की मधुरा देशपांडे, डब्बा पोहोचवणारा ‘पोपट’ असो किंवा नुसतेच पायऱ्यांजवळ आरामखुर्चीत बसलेले पण एकही संवाद नसलेले आजोबा. “ती काय दार उघडायची नाही, लय खऊट आहे बघा” म्हणणारी कामवालीही चांगलीच लक्षात राहते.

या चित्रपटातील सगळ्यात महत्वाची पात्र म्हणजे राधा आणि आदित्य. खरं तर हा चित्रपट या दोघांचा. दोघांनीही तितक्याच ताकदीने भूमिका निभावल्या आहेत. त्यांचे कपडे, त्यांचे संवाद, त्यांच्यातील नाते, रूसवे-फुगवे हे सगळंच अद्वितीय. सोनाली कुलकर्णी यांनी अतिशय संयत भूमिका केली आहे आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी तेवढीच लाईव्हली.

नेहमीच्या चित्रपटांमधील आणि या चित्रपटामधील मुख्य फरक असा की चित्रपटातील नायिकांवर, त्यांच्या दिसण्यावर (लूक्सवर) खूप मेहनत घेतली जाते पण या चित्रपटामध्ये ‘हिरो’ जर कोणी ठरत असेल तर ना राधा ना आदित्य… या चित्रपटातील हिरो ठरतात ते यात दाखवण्यात आलेले विविध ‘खाद्यपदार्थ’! अतिशय सुंदररित्या तयार केले गेलेले, विविध रंगांचे, विविध चवींचे आणि आकारांचे पदार्थ संपूर्ण चित्रपटात स्वतःचा असा एक वेगळाच ठसा उमटवतात. मिलिंद जोग यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी कमाल आहे. मोदक, पुरणपोळी, वरणफळं, कुरडया, कांदाभजी, वरण-भात-तूप, काकडीची कोशिंबीर हे सगळंच डोळ्यांना सुखावतं.

मध्यंतरापर्यंत एक एक धक्के देत जाणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर काय वळण घेईल याचा आपण साधारण अंदाज बांधू शकतो पण त्यातही लेखक सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी एक वेगळाच ट्रॅक घेतला आहे. आपल्याला वाटणाऱ्या सगळ्या शक्यता ते मोडीत काढतात आणि आपल्याला एका वेगळ्याच पंगतीला नेऊन बसवतात.

या चित्रपटात एक संवाद आहे. “अनुभव आणि आठवण म्हणजे काय, ते एकच तर आहे. आजच्या अनुभवाची उद्या आठवण होणार” हा संवाद जसा मनात रेंगाळतो तसेच अनेक संवाद मध्ये मध्ये येतात आणि आठवणीत रहतात. आपल्याला विचार करायला भाग पडतात. “तू जा, नक्की जा. मला खात्री आहे की तू खूप छान जेवण बनवशील. खरं तर प्रमाण, मापं, हिशोब याच्या पलीकडे जाऊन मनापासून एखादा पदार्थ बनवला ना तर तो सुंदर बनतोच.” हा संवाद तर विशेष टाळ्या घेऊन जातो. हेच या चित्रपटाबाबतही झालं आहे. ठराविक साच्यात, ठोकळ्यात, कालावधीत आणि ठराविक सेटमध्ये न बनवल्यामुळे हा चित्रपट नेत्रसुखद ठरतो.

या चित्रपटात संगीताचे वैविध्य अप्रतिम आहे. ‘चव ही खमंग' हे फक्त एकच गाणं यात आहे तेही तोंडी लावण्यापुरतं. बाकीच्या निवडक सीनकरिता वापरलेली सिम्फनी असो किंवा एकसे बढकर एक राग यांचे कॉम्बिनेशन अफाट जुळून आले आहे.

शेवटची २० मिनिटे चित्रपट जरा रेंगाळतो असं वाटतं तरी पुढे काय होणार याची उत्सुकता लागते. राधाच्या चिडचिडी मागचे नेमके कारण काय?, आदित्य स्वयंपाक शिकतो का? दोघांच्या नात्याचा नेमका काय शेवट होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो तेव्हा समाधानी असतो. भरपेट आवडते जेवण जेवल्यावर शेवटचा गोड पदार्थ खाताना आपण अतीव समाधानाने डोळे मिटून त्याचा आनंद घेतो तशाच पद्धतीच्या भावना हा चित्रपट पाहून बाहेर पडताना येतात.

खरंच हा ‘गुलाबजाम’ म्हणजे एक मस्त जमून आलेली रेसिपी आहे. नक्की पहाच!

©स्मृती (निक्षिपा)
१६-२-२०१८
1st Day 1st Show Review

*गुलाबजाम #सचिनकुंडलकर #सोनालीकुलकर्णी #सिद्धार्थचांदेकर #फूडफिल्म #मराठीफूडफिल्म*

GULABJAAM-2-610x500.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पोस्ट आहे .. फेबूची.. किती ती मेहनत.. अस्सा आहे तर हा चित्रपट.. बघायला हवा, काहीतरी वेगळे आणि ईंटरेस्टींग

मला पण बघावासा वाटतो हा सिनेमा टीझर पाहिल्यापासून. परिक्षणही छान आहे. पण मला जेवण बनवणे हा शब्दप्रयोग जाम खटकतो.
स्वैपाक करणे हे आजकाल कोणी म्हणतच नाही का?
जेवन बनवणे हे खाना बनाना चं शब्दशः भाषांतर वाटतं.
असो..

वाह मजा आली वाचायला! पण एक नेहमी पडणारा प्रश्न पडला! पिझ्झाला आपण पिझ्झा म्हणूनच ओळखतो तसंच इतर संस्कृतीतल्या पदार्थांचं उदा. नाचोस, तॉम खा वगैरे. मग आपल्या पदार्थांना इंग्रजी नावं देण्याचा अट्टाहास का? पुरणपोळी should be पुरणपोळी and कटाची आमटी should be कटाची आमटी! नाही का?

पिझ्झाला आपण पिझ्झा म्हणूनच ओळखतो तसंच इतर संस्कृतीतल्या पदार्थांचं उदा. नाचोस, तॉम खा वगैरे. मग आपल्या पदार्थांना इंग्रजी नावं देण्याचा अट्टाहास का?
+१

गुलाबजाम बघणार.
सायली राजध्याक्षांची पोस्ट वाचली. किती मेहनत आहे सगळ्यामागे. हॅट्स ऑफ!

छान लिहिलंय.
मी धागा एक दोनदा पाहिला पण मला खरच कुठल्याशा गुलाबजाम बद्दल अथवा गुलाबजामच्या रेसिपी बद्दल आहे की काय असे वाटले होते सुरवातीला म्हणुन उघडला नव्हता. पण आज तो कथा/कादंबरीत आहे हे लक्षात आलं आणि उघडला.
बघेनच गुलाबजाम.

मला पण बघावासा वाटतो हा सिनेमा टीझर पाहिल्यापासून. परिक्षणही छान आहे. पण मला जेवण बनवणे हा शब्दप्रयोग जाम खटकतो.
स्वैपाक करणे हे आजकाल कोणी म्हणतच नाही का?
जेवन बनवणे हे खाना बनाना चं शब्दशः भाषांतर वाटतं.
असो..>>>>> + 1
परीक्षण आवडले।

हे ही परीक्षण आवडले. त्या पोस्टरवरच्या पोळपाटाचे लॉजिक कळाले नाही. गुलाबजाम करताना कोठे वापरतात पोळपाट. बहुधा ती जनरल शेफ असल्याने असेल.

परिक्षण आवडले.

मी धागा एक दोनदा पाहिला पण मला खरच कुठल्याशा गुलाबजाम बद्दल अथवा गुलाबजामच्या रेसिपी बद्दल आहे की काय असे वाटले होते सुरवातीला म्हणुन उघडला नव्हता. पण आज तो कथा/कादंबरीत आहे हे लक्षात आलं आणि उघडला.>>>>आता खूप गुलाबजाम आलेत मायबोलीवर. पाककृती आली तरी चित्रपटाचे परिक्षण आहे असे वाटेल. Happy

सगळीकडची परीक्षणे वाचून वाटतेय उपाशी पोटी बघायला जायचा सिनेमा आहे Happy

बघितलेल्यांना एक प्रश्न - मराठमोळे मांसाहारी पदार्थ यात दाखवले आहेत का?

मराठमोळे मांसाहारी पदार्थ यात दाखवले आहेत का?>>>>> हो ऋन्मेष.
मी सिनेमा बघितला नाहीये. पण सायली राजध्यक्षयांची फेबु पोस्ट वाचलीये. त्यात कोळंबीची आमटी, सुरमई पापलेट चे तुकडे वगेरे उल्लेख आहेत.

छान परिक्षण. पहावासा वाटतो आहे चित्रपट

स्वैपाक करणे हे आजकाल कोणी म्हणतच नाही का?
जेवन बनवणे हे खाना बनाना चं शब्दशः भाषांतर वाटतं. >>>> +१

पिझ्झाला आपण पिझ्झा म्हणूनच ओळखतो तसंच इतर संस्कृतीतल्या पदार्थांचं उदा. नाचोस, तॉम खा वगैरे. मग आपल्या पदार्थांना इंग्रजी नावं देण्याचा अट्टाहास का? >>>> शूम्पी आणि जिज्ञासाला अनुमोदन.

मागच्या शनिवारी पाहिला. आवडला.
सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी दोघांचीही कामं आवडली.
खाद्यपदार्थांचे चित्रण फारच देखणं आहे, बर्‍याचदा तोंपासु अवस्था झाली Happy

अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे सिनेमातल्या प्रमुख पात्रांचं घर.
राधाचं जुनाट मध्यमवयीन पेठेतलं घर. विशेष उल्लेख त्या निळ्या नायलॉनच्या बारीक वायर्स ने विणलेल्या गार्डन चेअरचा. आमच्या कडे अजूनही सेम-टू-सेम तश्या दोन खुर्च्या आहेत. पण त्या वायरी विणून देणारे आजकाल कोणी मिळत नाही, त्यामुळे जरा अवस्था झाली आहे.
आदित्यचं टिपीकल बॉइज हॉस्टेल छापाचं घर. टेरेस वर उघड्यावर असलेला त्याचा वॉर्डरॉब ! शेवटी बॅग भरताना तो दिसतो.
आणि तिसरं चिन्मय उद्गीरकरचं तीन बाजूने काचा असलेली सिटिंग रुम असलेलं, प्रशस्त किचन असलेलं आधुनिक घर !

मित,
तुम्ही पुण्यात असाल तर कमिन्सच्या नवसह्याद्रीजवळच्या जुन्या बिल्डिंगीच्या बाहेर पदपथावर एक काकू अश्या खुर्च्या विणून देतात.

अवांतराबद्दल क्षमस्व.

स्वैपाक करणे हे आजकाल कोणी म्हणतच नाही का?
जेवन बनवणे हे खाना बनाना चं शब्दशः भाषांतर वाटतं. >>>> +१>>>> +१.

पिझ्झाला आपण पिझ्झा म्हणूनच ओळखतो तसंच इतर संस्कृतीतल्या पदार्थांचं उदा. नाचोस, तॉम खा वगैरे. मग आपल्या पदार्थांना इंग्रजी नावं देण्याचा अट्टाहास का? >>>> शूम्पी आणि जिज्ञासाला अनुमोदन.>>>>>>>>>>>>>>>
+१.

वाह, बहारदार रसग्रहण ( म्हंजे मला तोंपासु चवग्रहण म्हणायचंय)
सुरेख, निक्षिपा !

सिनेमा दुसर्‍या/तिसर्‍या दिवशीच पाहिलाय. सुंदर आहे ! सिद्धार्थ चांदेकर जबरी छाप पाडून जातो.
सिनेमा खाण्यावरून जगण्यावर जातो हे अतिशय संवेदनाशील पद्धतीनं दाखवलंय !
मला सचिन कुंडलकरांचा रेस्टॉरंटही पाहिला होता, त्या पेक्षा गुलाबजाम उजवा वाटला मला.

पिझ्झाला आपण पिझ्झा म्हणूनच ओळखतो तसंच इतर संस्कृतीतल्या पदार्थांचं उदा. नाचोस, तॉम खा वगैरे. मग आपल्या पदार्थांना इंग्रजी नावं देण्याचा अट्टाहास का?>> मराठी पदार्थांना इंग्रजी नाव दिली नाहीत तरी त्या पदार्थाचे वर्णन आणि त्यातले प्रमुख घटकपदार्थ इंग्रजीमध्ये लिहायला/सांगायला हरकत नसावी. उदाहरणार्थः चिलीज ह्या चेन रेस्टॉरंटच्या online menu मधे पदार्थाचे नाव आणि वर्णन खालील पद्धतीने दिलेले दिसेलः
Black Bean & Veggie Fajitas
Black bean patty, asparagus, garlic roasted tomatoes, corn & black bean salsa, queso fresco, avocado, drizzled with spicy chile-lime sauce.

होहो
नक्कीच.ओरिजिनल नाव हवे आणि पुढे आकर्षित करणारे, कंटेंट बद्दल प्रामाणिक असलेले(म्हणजे अ‍ॅलर्जीज वाल्यांना पटकन हिंट मिळेल) वर्णन
वाक्य
ग्लुटेन फ्री,लेस कॉलेस्टेरॉल, एनरिच्ड विथ गुड फॅट्स, स्टिम्ड स्वीट राईस मोमोज विथ गुडनेस ऑफ फ्रेश कोकोनट, आयर्न रिच जॅगरी,इनतॉक्सिकेटिंग अ‍ॅरोमा ऑफ नटमेग अँड कार्डॅमम टु पँपर युवर टेस्ट बडस.

Pages