सावज

Submitted by अभिगंधशाली on 18 February, 2018 - 20:27

एक कुटुंब अनेक वर्षे राहत असलेले घर सोडून नव्या जागी रहायला गेले. सानिका त्यांचे एकुतले एक अपत्य. ना धड लहान ना खूप मोठी त्यामुळे इतरांपेक्षा लवकर नव्या जागी रमली.

नव्याने तयार होणारी वसाहत त्यामुळे फार थोडे लोक रहायला आलेले. सानिकाच्या घरासमोर त्याचे घर. नाव मोहित. तिच्यापेक्षा वयाने चार वर्षे मोठा त्यामुळे साहजिकच दादा म्हणून ओळख झाली.

ओळख कोणत्याही नात्यात न अडकता हळूहळू मैत्रीत मुरत गेली. त्यांच्या गप्पांना ना कोणते विषय लागायचे ना कोणती वेळ. दंगामस्ती तर अशी रंगायची की पाहणाऱ्याला हेवा वाटायचा.

बघता बघता तीन-चार वर्षे सरली. शाळेत जाणारी सानिकाची पाऊले महाविद्यालयाकडे वळली. ती म्हणजे रसरसते चैतन्य. वयात आलेली पण तरीही अल्लड. अजूनही शरीराने कोणतेही साद घातली नव्हती किंवा तिला ते समजत नव्हते अशी अगदी कोवळी.

मोहितला तिच्यापेक्षा जास्त अनुभव त्यामुळे महाविद्यालयीन वातावरणाचे धडे ती त्याच्याकडे गिरवू लागली. अगदी पॉकेटमनी कसा पुरवायचा पासून ते मागे कोणी मुलगा लागला तर काय करायचे इथपर्यंत.

त्याच्याशी काहीही बोलताना, सांगताना तिला अजिबात दडपण यायचे नाही. नव्याने होणाऱ्या ओळखी, मिळणारे मित्र, घडणारे किस्से यांची वरचेवर मैफिल रंगायची.
जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्याच्याकडून तिला सावधतेचे इशारे मिळायचे. ही मैत्री न केलेली बरी. यांच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे, जेवढ्यास तेवढे ठीक पण जास्त अडकू नकोस इत्यादी. असे असले तरी त्याने तिला कधीच परावलंबी केले नाही. तिचे प्रश्न तिला सोडवायला लावायचा. हा माझ्याकडे टक लावून बघतो, तो मागे येतो यावर मग बोल आणि विचार म्हणायचा पण तिथे जाऊन त्यांच्याशी मारामारी, अरेरावी त्याने कधीच केली नाही. त्यामुळे त्याच्याविषयी तिला वेगळी अशी भावना व्हायची नाही. पण त्यांचा दंगामस्ती, गप्पाष्टक हा मात्र तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग होता. या सगळ्यातून ती नव्या वातावरणात सरावत होती.

एक जिवलग मैत्रिण सोडली तर अजून फार कोणी तिला आपलेसे वाटले नव्हते.

हे सगळे इतके सहज सरळ असले तरी समाज तो समाजच. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे गाढवासोबत चाला, त्याच्यावर बसा किंवा त्याला डोक्यावर घ्या नावे ठेवणारच.

मग त्यांच्या नजरेतून सानिका आणि मोहितची मैत्री कशी सुटणार. खरं तर कुणालाही खटकावे असे काहीच नव्हते.

पण कुण्या एका सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असा तोरा मिरवणाऱ्या काकू सानिकाच्या घरी पोहचल्या. तिच्या आईशी गप्पा मारण्याचे निमित्त करुन सध्या ती मोहित बरोबर जरा जास्तच दिसते. बघा म्हणजे दोघेही नकळत्या वयात उगाच नको ते व्हायचे म्हणून मी आपलं सावध केले असे बोलून घेतले. बाकी इतरही विषय नाही म्हणायला निघाले, पण मुलीच्या आईचे मन नको ते व्हायचे या विषयात अडकून गेले.

शिकली सवरलेली आई पण समाज बोलू लागला की कावरीबावरी होते आणि चूक बरोबर ठरवायचेच विसरुन जाते.

फतवा निघाला त्याच्या घरी अजिबात जायचे नाही, बोलायचे नाही.

सानिकाला आईला मधेच काय झाले अजिबात समजेना, तिने विचारुनही पाहिले पण यावर मला चर्चा नको इथेच विषय थांबवला गेला.

दोन दिवस अतिशय अस्वस्थतेत गेले. तिसऱ्या दिवशी आई बाहेर गेलेली बघून तिने त्याच्या घरी धाव घेतली पण ठिणगी तिथेही पडली होती. त्याच्या मातोश्रींकडूनही हुकूम जारी झाला होता आणि त्याला त्याचे फार काही वाटले नव्हते. पुरुषी मन शेवटी सहज नवे मार्ग शोधते.

तिच्यासाठी मात्र हे सगळे भलतेच अवघड झाले होते. त्याच्याशी बोलणे, गप्पा, दंगामस्ती ही तिची त्या नाजूक वयातली भावनिक भूक होती. तिची ही तडफड तिच्या जिवलग मैत्रिणीने हेरली आणि तिला याला प्रेम म्हणतात असा सल्ला दिला.

प्रेम त्यानंतर येणारे लग्न, संसार या सगळ्याच्या खूप खूप खूप दूर असलेली ती याकडे फक्त झाली परिस्थिती बदलण्यासाठी उपाय म्हणून बघत होती. मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने त्याला so called propose ही केले.

अनुभवाने चार पावसाळे जास्त बघितलेल्या त्याने मात्र तिला तू समजतेस तसं हे नाही. ही वाटच खूप वेगळी आहे. तू अजून यावर चालण्यास तयारही झालेली नाही. आणि माझ्या मनात असे कधीच नव्हते आणि नसेल असे म्हणत तिला समजावले.

थोडक्यात परिस्थिती जैसे थे राहिली. याच दरम्यान तिची ओळख झाली ते रीमाशी. तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारी पण तिच्यापेक्षा दोन वर्षे मोठी असणारी.

रीमा अशा भावनिक आंदोलनात अडकलेल्या मुलींना अचूक हेरायची. त्यांच्याशी मैत्री करायची. सुरुवात त्यांना त्यातून बाहेर काढायचे उपाय करते असे दाखवत त्यांचा विश्वास जिंकायची आणि मग......

एकटी पडलेली सानिका सहज तिच्या जाळ्यात ओढली गेली.

तिची जिवलग मैत्रिणही सुरुवतीला तिच्या सोबत होती पण काहीतरी धोका आहे हे जाणवल्यावर ती सावध झाली. तिने सानिकालाही सावध करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. एकतर तिने सुचवलेला उपाय चालला नाही त्यामुळे तिच्यावर आता सानिकाचा विश्वास उरला नव्हता आणि मोहितची जागा आता रीमाने घेतली होती.

तिच्याशी गप्पा मारताना तिला खूप मोकळं वाटायचं, तिने सुचवलेले करुन बघावेसे वाटायचे. फिरायला जाणे, कॉलेज बुडवणे, नवीन पिच्चर बघणे याने सुरु झालेली गाडी नकळत एखादा सिगरेटचा झुरका, कधीतरी एखादा पेग अशी पुढे सरकू लागली.

या सगळ्यात घरी सगळे छान छान असायला हवे याचे धडे द्यायला रीमा विसरली नव्हती. त्यामुळे याची थोडीही कल्पना कुणाला आली नाही. मधले काही दिवस शांत झालेली, अस्वस्थ असलेली लेक पुन्हा पूर्वीसारखी झालेली बघून आईला बरे वाटले.

हे सगळे मोहितला समजले असते तर सदैव तिला अचूक सल्ले देणाऱ्या त्याने तिला चांगले खडसावले असते पण ते सगळे मार्गच बंद झाल्याने तो यापासून अनभिज्ञच राहिला. आपण तिला जे सांगितले, समजावले ते तिला कळले असेल असा समज त्याने करुन घेतला.

इकडे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. सानिकाला पॉकेटमनी पुरेना. सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून रीतसर मागणी झाली, पुरवलीही गेली. पण नंतर कारणे पटेना. मग नकळत आई बाबांच्या पर्समधून रक्कम गायब होऊ लागली. त्यावरुन वादविवाद होऊ लागले पण त्याच्या खोलाशी जाणे राहून गेले.

सानिका मधेच खूप आनंदी तर मधेच खूप शांत शांत असायची. आईला असे का घडते समजायचे नाही, प्रश्न पडायचे, विचारलेही जायचे पण ती जवळीक त्या एका चुकीने ती गमवून बसली होती.

रीमाचे हे सावज पुरते जाळ्यात ओढले गेले होते. आता तिला सानिका कायमसाठी हवी होती.

स्टडी टूरचे निमित्य करुन तिने एकदा सलग तीन दिवस घरापासून दूर राहायला लावले. त्या तीन दिवसात सिगारेटने पुढचा टप्पा आणि एका पेगने बेधुंद नशा सानिकाने अनुभवला होता. नशेत अनेक गोष्टी घडल्या पण नंतरही त्याविषयी घृणा न वाटण्याएवढे ब्रेनवॉश करण्याचे काम रीमाने अचूक केले होते.

तीन दिवस बाहेर राहून आलेली सानिका पार बदलून गेली आहे हे आईच्या हृदयाला जाणवले पण नेमके काय ते समजत नव्हते की सापडत नव्हते. बरं हे सगळं विचारणार कुणाला? तिच्या मैत्रिणी कोण? त्यांचे फोन नंबर असले काहीच तिच्याजवळ नव्हते.

काळजीने आईने हा विषय बाबांशी बोलला पण अगं हे वयच असं असत. लहान लहान गोष्टीही खूप सलतात. होईल काही दिवसांनी सगळे नीट. सहलीत काहीतरी वादावादी झाली असेल हवं तर विचारुन बघ असे सुचवून विषय तिथेच थांबला.

काही दिवस वाट बघू या म्हणून आई थांबली पण आतून अस्वस्थ होती.

त्या तीन दिवसांच्या गोष्टीनी सानिका आंतरबाह्य बदलून गेली होती. आता तिला त्याच जगात कायमसाठी जायचे होते आणि हेच हवे असलेली रीमा त्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करत होती.

पुढच्या चार दिवसातच खोलीत एक चिठ्ठी ठेऊन सानिका नाहीशी झाली.

आईबाबा,
कदाचित मी जे करते आहे ते योग्य नसेल. नाही मला माहिती आहे की अयोग्यच आहे पण मी त्यात खूप आनंदी आहे. माझे मन आता इथे रमत नाही म्हणून मी जात आहे. जिथे जाईन तिथे सुखच सुख आहे त्यामुळे मला शोधू नका.
सानिका...

सानिका घर सोडून गेली हे समजयलाही खूप तास लागले. त्यामुळे तिचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही. जशी काही हवेत वाफ विरुन जावी तशीच नाहीशी झाली. आजही शोध सुरुच आहे.

आई चिठ्ठी वाचून सतत रडत राहते. हीने नेमके काय निवडले हेही समजण्याचा मार्ग तिला सापडत नाही की आपण नेमके चुकलो कुठे हेही आठवत नाही.

मोहितला आपण याला जबाबदार आहोत का अशी रुखरुख वाटते पण पुढे काय याचे मार्गच दिसत नाहीत.

ज्या समाजमनाने हा घाला घातला ते तर समाजरीत म्हणून यावरही तोंडसुख घेत आहे.

आणि समाजातच लपलेले गुन्हेगारी जगत असे रोज नवे सावज शोधत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादासाठी खूप आभार .
पण अशा घटना आजूबाजूला घडताना दिसतात.
असे घडू नये हेच सुचवायचे आहे यातून .
संवाद वाढायला हवा हीच अपेक्षा

@अभिगंधशाली
तुम्ही या लेखनासाठी "वाहते पान" या प्रकारचे पान तयार करून लेखन करत आहात. अशा प्रकारच्या पानावरच्या प्रतिक्रिया (मूळ लेखन नाही) काही जास्त प्रतिक्रिया आल्यावर आपोआप डिलीट होतात. अणि ही पानेही कमी वाचकांपर्यंत पोहोचतात.
तुम्ही यापुढे कथा / कादंबरी या साठी "लेखनाचा धागा" हा प्रकार वापरला तर जास्त योग्य होईल.

आवडली.