प्रतीक्षा

Submitted by Pradipbhau on 15 February, 2018 - 07:36
ठिकाण/पत्ता: 
विटा

तालुक्याचे एक प्रमुख ठिकाण म्हणून अनंतनगरची फार पूर्वीपासूनची ओळख होती. गावचा उंबरा साडेतीन हजार घरांचा. हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला हा परिसर होता. शहरात प्रवेश केला की त्याचे सर्वानाच प्रत्यंतर येत असे. गावापासून काही अंतरावर विस्तारलेले नदीचे पात्र. नदी नेहमीच दुथडी भरून वाहणारी. सकाळी गावातील पोर व बापय पोहण्यासाठी नदीवर त्याचवेळी बायांची कापडं धुण्यासाठी गर्दी झालेली. थोडयाच अंतरावर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठी बाजारपेठ. शहराचे रूप पालटण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या कै. वसंतराव गोखले यांचा पूर्णाकृती पुतळा. त्यांच्या योगदानाचा विचार करून पुतळ्याचा परिसर पालिकेने सुशोभित केलेला होता.
पुतळ्याजवळ पालिकेने सार्वजनिक सभेसाठी एक कायमस्वरूपी तयार केलेले व्यासपीठ होते. त्याचा मुक्त वापर केला जात होता. निवडणूक सभा, श्रद्धांजली सभा, गौरव सभा, सारे एकाच ठिकांणी. गावात तमाशाचा फड आला तरी त्यांच्यातील जुगलबंदी येथेच चालत असे. भजनी मंडळाच्या भजनाचा ताल येथेच धरला जात असे. त्यामुळे या परिसरात नेहमीचीच धावपळ अन गडबड.
विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा घेण्याचे हे एकमेव ठिकाण होते. गावातली मंडळी शेतातच दिवसभर काबाडकष्ट करणारी त्यामुळे कार्यक्रमांची वेळ शक्यतो रात्रीचीच असे. सततचा वर्दळीचा भाग असल्याने पालिकेने मोठ्या दिव्यांची रचना केलेली होती. त्यामुळे रात्री देखील हा परिसर शांततेचा भंग करणारा ठरत होता. लोकांच्या चर्चेत असलेला भाग त्यामुळे येथे सतत काही न काही नवीन घडत असे.
पुतळ्याच्या एका बाजूला मोकळी जागा असल्याने सततची भटकंती करणाऱ्या लोकांच्या आसऱ्याचे जणू काही हे हक्काचे ठिकाणचं होते. दिवसभर वणवण भटकायचं अन रात्री निवाऱ्याला येथे यायचे हा जणू प्रघातच होता. भटक्या लोकांचा एक दोन दिवसांचा मुक्काम असल्याने त्यांना कोणी येथून हटकत नसे.
निवडणुकीचा हंगाम असला की येथील वातावरण आणखीनच बदलून जाई. रात्री जाहीर सभांच्या गराड्यात हा परिसर वेढलेला असे. लोकांचा हा करमणुकीचा जणू काही अड्डाच होता. गावात आज अशीच एका प्रमुख पक्षाची प्रचाराची जाहीर सभा होती. सकाळ पासूनच कार्यकर्ते ये जा करीत होते. एका मोठ्या मंत्र्याचे गावात आगमन होणार होते. मार्गदर्शनाची ती सभा होती. त्याची सर्वत्र पोस्टर झळकत होती. सभा रात्री असली तरी सकाळीच परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता.
त्याच दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहा जणांचा एक तांडा पुतळ्याजवळ आसरा घेण्यासाठी आला. सुरवातीला कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले. मात्र म्होरक्याने गयावया करून कशी तरी रात्री तेथे मुक्कामाची सोय करून घेतली. दहा माणसांची सभेला भर पडेल या अपेक्षेने त्यांना परवानगी देण्यात आली. त्या मंडळींनी पुतळ्याच्या आडोशालाच पाल उभी केली.
मोकळ्या जागेत त्यांनी आपले बस्तान बसवले. त्या ताड्यांत शिवाप्पा नावाचा 70 वर्षे वयाचा एक म्होरक्या होता. त्याचा शब्द हा प्रमाणभूत होता. त्याच्यासह सहा बापय व चार बाया तांड्यात होत्या. बायांनी तेथेच दगडाची चूल मांडून स्वयंपाकाची व्यवस्था केली. बापय गड्यानी गावात जाऊन सामान आणले. दुपारचे जेवण केलं अन समधी माणसं आपापल्या कामासाठी निघून गेली. शिवाप्पा वयोवृद्ध असल्याने तो एकटाच पुतळ्याच्या बगलला विश्रांती घेत पडला होता.
पाच वाजण्याच्या सुमारास ज्या पक्षाची जाहीर सभा होती त्या पक्षाचे कार्यकर्ते सभेची व्यवस्था करण्यासाठी तेथे आले. त्यांनी सभेचे व्यासपीठ सजवले. फुलांच्या माळा लावल्या. गुलाबाच्या फुलांची टोपली आणली. दोन्ही बाजूला दोन मोठे स्पीकर लावले. कटाऊट उभारले. खुर्च्या मांडल्या. सभा रात्री नऊ वाजता होती. ज्या जागेत कष्टकरी तांड्याने मुक्काम केला होता तेथे अंधाराचे साम्राज्य होते. उर्वरित भाग मात्र दिव्याच्या लक्खं प्रकाशाने उजळून निघाला होता.
कामासाठी गेलेली मंडळी आता परतली होती. त्यांना शिवाप्पाने येताना जेवणापूर्वीची व्यवस्था करून येण्यास बजावले होते. त्यामुळे सर्व तयारीनिशी बापय आले होते. त्यांना वातावरणातील बदल जाणवला. सभेला माणसं जमण्यासाठी स्पीकरवर त्या मंत्र्यांचे गेल्या निवडणुकीतले भाषण लावून ठेवले होते. ते ऐकत काही मंडळी तंबाखूचा बार भरत होती. त्या मंत्र्याच्या भाषणाला हसत हुती. दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले न्हवते. सभेचे भाषण म्हणजे करमणूक असल्याने बाप्यानी लवकर येऊन जागा धरल्या होत्या.
इकडे तांड्यातील बायांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. वीस एक भाकऱ्या बडवल्या. मोठं पातेले भातासाठी ठेवले. माशाच झणझणीत कालवण केले. शिवाप्पासह बापय गड्यानी पिण्याचा कार्यक्रम उरकला. जेवणापूर्वी खच्चून दारू ढोसली. दरम्यान स्पीकरवर गाणी सुरू झाली. गाण्यावर पोरांनी ताल धरला. इकडं दारूच्या नशेत त्यांनी देखील ताल धरला. माणसं लई जमा झाली तर आपल्याला हाकलून लावतील या भीतीने तांड्यातील मंडळींनी भराभर जेवून घेतले. झोपेचं सोंग घेऊन ती पडून राहिली. त्यांचं सारं लक्ष सभेकडे असल्याने झोप काही कोणाला येत न्हवती.
सभेला सुरवात झाली. हार तुरे झाले. गुलाबाची राहिलेली फुले एका कार्यकर्त्याने टोपलीत भरून ती कोपऱ्यात आणून ठेवली. एकेका वक्त्याला बोलायला जोर चढू लागला. सभेत काय थापाच मारायच्या होत्या अन त्यात ही मंडळी तरबेज होती. शिवाप्पा भाषण ऐकत ऐकत डोळ्याला डोळा लावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याला दारूची नशा चांगलीच चढली होती. कसतरी होऊ लागल्यानं म्हातार सर्वाना हाका मारू लागलं. आर ये मला काय पाजलय असे सारख म्हणू लागल. झोपा गप म्हणून त्यांला बायांनी दटावल. त्यांनी जी दारू ढोसली होती ती बनावट होती. म्हाताऱ्याला हृदय विकाराचा झटका आला होता. ते तडफडत हुतं.
मात्र बापय गडी समदेच पिले असल्याने त्याच ओरडणे कोणाला ऐकू गेलं नाही. बायांनी त्याची अवस्था पहिली पण गर्दीतून त्याला वाट काढत हॉस्पिटलला नेणें शक्य न्हवते. उपचाराआभावी म्हातार शिवाप्पा जागीच मरण पावला. कुटूंबातील प्रमुखच गेल्याने सर्वजण हताश झाले. बायका तर धाय मोकलून रडू लागल्या मात्र स्पीकरच्या आवाजात त्यांचा आवाज दबला गेला. त्यांनी बापय गडयाची झिंग उतरवली. दारूचा हा प्रकार काही त्यांना नवीन न्हवता. शिवाप्पाच्या मरणाची बातमी त्यांनी बाप्याना सांगितली. बाप्याना पण कळना अस कसं झालं. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सुरुवात केली. तिरडीचे साहित्य जमा केले. शिवाप्पाला शेवटची आंघोळ घालण्याची व्यवस्था केली. टोपलीतील राहिलेली गुलाबाची फुले कोणाचं लक्ष नाही असे पाहून काढून घेतली.
सभेसाठी तुडूंब गर्दी असल्याने सारेजण सभा संपण्याची वाट पहात बसले होते. म्हातारा कसा चांगला होता हे आठवत सारेजण बसले होते.
इकडे प्रमुख वक्ते असणाऱ्या मंत्री महोदयांचे आगमन झाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी तासभर उशीर केला. विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली. शाब्दिक कोट्या करून सर्वाना हसवून ठेवले. मंत्री म्हणाले, लोकहो काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी. गावाचा विकास साधला. तुमच्या हाताला काम दिले. जेष्ठ समाजसेवक वसंतराव यांच्या मागणीप्रमाणे गावात संपूर्ण दारूबंदी केली. बायकांचं कुंकू शाबूत राखले. पूर्वी या गावात दारू पिऊन माणसं मरत हुती. आता ते थांबलं.
पुतळ्याचा परिसर हास्यसागरात बुडून गेला. शिवाप्पाचे कुटूंबीय मात्र दुःख सागरात होते. त्यांना शोक आवरत न्हवता. मंत्री महोदय भाषण आटोपते घेईनात त्यामुळे त्यांना ते शिव्यांची लाखोली वहात होते. एकाने जाऊन संयोजकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याने ऐकले न एकल्यासारखे केले अन विषय सोडून दिला. डोळ्यात प्राण आणून सभा संपण्याची ते आतुरतेने वाट पहात होते. अखेर त्यांचे भाषण संपले.
सभा संपल्याने गाड्यांचा ताफा निघून गेला. कार्यकर्त्यांसह सर्वजण घराकडे जाण्याच्या गडबडीत होते. स्पीकर बंद झाला. मोठे लाईट बंद झाले. प्रकाश अंधुक झाला. विजेच्या दिव्यांची जागा आता चंद्राच्या प्रकाशाने घेतली. वातावरणात पूर्णतः बदल झाला होता. पौर्णिमेचा बदल अचानक अमावस्येत झाला.
हास्याची जागा आता आक्रोशाने घेतली. मंद प्रकाशात शिवाप्पाची डेड बॉडी रस्त्यावर आणण्यात आली. त्याला शेवटची आंघोळ घालण्यात आली. तिरडी बांधली गेली. जेथे काही वेळापूर्वी मंत्र्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्याच परिसरात एका मृतदेहाला फुले वाहून अखेरचा निरोप देण्यात आला. बाया बाप्यानी एकच आक्रोश केला. त्या आक्रोशाने समाजसेवी वसंतराव यांचे मन पुतळ्याच्या रूपाने हेलावून गेले. रामनाम सत्य है असे म्हणत तांड्यातील मोजक्याच लोकांनी शिवाप्पाला खांदा दिला. पहाट होताच दुःख सागरात लोटलेला तांडा सारे दुःख विसरण्याचा प्रयत्न करून पुढच्या प्रवासाला निघाला.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सभेची फोटोसह लांबलचक बातमी आली. मंत्री महोदयांनी केलेल्या शाब्दीक कोट्या त्याला मिळालेली दाद याच्या चौकटी होत्या. मात्र शिवाप्पाच्या मृत्यूची चौकट त्यात नव्हती. तांड्यातील मृताच्या बाबतीत एकाही ओळीचा उल्लेख न्हवता. माणसं वर्तमानपत्र वाचीत होती. आपण फोटोत कुठं दिसतो का पहात होती. सभा किती छान झाली याचे रसभरीत वर्णन केले जात होते. मात्र त्याच ठिकाणची दुसरी घटना मात्र सर्वजण विसरले होते. त्याची कल्पना देखील बहुतेक जणांना न्हवती. तांड्यातील लोक मात्र शिवाप्पाच्या मृत्यूचे दुःख मनाशी बाळगून पोट भरण्यासाठी फिरतच होते.
त्यांच्या दृष्टीने मंत्रयाची सभा गौण होती. शिवाप्पाच्या मृत्यू मात्र त्यांच्या मनाला चटका लावून जाणारा होता. बघता बघता म्हातारा मरण पावला होता. त्याच्या मृत्यूची ना कोणी पोलिसात वर्दी दिली ना कोणी त्याच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले. नेहमीप्रमाणे सामान्यांचा आवाज दबूनच गेला. फुले गुलाल रस्त्यावरच होता. तो मंत्र्यांचा स्वागताचा होता की शिवाप्पाच्या अंत्ययात्रेचा होता हे मात्र कोणालाही कळले नाही.

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, February 15, 2018 - 07:32
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांनी एकाच प्रकारची दारू प्यायली तर सगळ्यांना त्रास व्हायला हवा होता.
पण चांगली जमली आहे कथा. विरोधाभास चांगला उभा केला आहे.