व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

Submitted by अँड. हरिदास on 10 February, 2018 - 06:51

valentines-day-facts.jpg

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
सध्या जगात सर्वत्र प्रेमाला उधाण आलेलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या 'व्हॅलेंटाईन डे' ची तयारी जोरात सुरू असून दररोज वेगवेगळे दिवस त्यानिमित्ताने साजरे केले जात आहेत. दुकानं, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली असून प्रियजनांना भेटवस्तू घेण्याची लगबग सुरू आहे. प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईनडे च महत्व अनन्य साधारण आहे.. मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तीला प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा हा दिवस. तो का साजरा केला जातो, आणि भारतात तो साजरा करावा कि नाही याविषयी अनेक मतप्रवाह आहेत.
"असेल जर दोन हृदयांमध्ये प्रेमाची घट्ट वीण
तर खरे प्रेम व्यक्त करायला कशाला हवा प्रेमदिन?"
या ओळीप्रमाणे प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षातला कोणताही दिवस चांगला, तर मग व्हॅलेन्टाईन्स डे च कशाला? असे मानणारा एक मतप्रवाह आहे. तर आपल्या संस्कृतीनुसार असे दिवस साजरे करण्याची पद्दत नसल्याने व्हॅलेन्टाईन म्हणजे ' इंग्रजांचा दसरा' म्हणत त्याला विरोध करणाराही एक वर्ग आहे. या दिनाचा संदर्भ शोधायचा झाला तर, माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे, असा प्रचार करणारे ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा डे साजरा केला जात असल्याचा दाखला मिळतो. या व्यतिरिक्तही अनेक मिस्ट्री व्हॅलेंटाईन डे च्या बाबतीती वाचायला आणि ऐकायला मिळतात. व्हॅलेंटाईन च समर्थन करणाऱ्यांकडून आपले संदर्भ तर विरोध दर्शविणाऱ्यांकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं दरवर्षी पुढे केल्या जातात. वाद रंगतो, वादविवाद होतात, राढे होतात. आणि व्हॅलेंटाईन साजरा देखील होतो. तरुणाईला धमाल मस्ती करायला हवे असलेले निमित्य यामुळे मिळते, तर विरोधाचे निमित्य करून वेगळ्या प्रकारचा धिंगाणा घालण्यासाठी आसुसलेल्यांचा मनसुबाही याच निमित्ताने पूर्ण होतो. यंदाही नेहमीसारखेच वातावरण बघायला मिळतेय.. तरुणाई प्रेमात चिंब भिजण्यासाठी सज्ज आहे, तर विरोधक संस्कृतीचे डोस पाजण्यासाठी...अर्थात, या सगळ्या कल्लोळात ज्यासाठी हा दिन साजरा केला जातो ती 'प्रेमभावना' जपल्या जातेय का? हा खरा प्रश्न आहे.

'प्रेम' या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हडी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते... ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे.
" मराठीतून ‘ईश्श‘ म्हणून प्रेम करता येतं,
उर्दूमध्ये ‘इष्क‘ म्हणून प्रेम करता येतं,
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं,
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं..!
अस जर आहे, तर ते व्यक्त करण्यासाठी एकाद्या विशेष दिवसाचीच गरज आहे का? असा सहाजिक प्रश्न पडतो. व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी गिफ्ट देवून किंव्हा आपल्या जोडीदारा समोर अभिव्यक्त होवून प्रेम दिल्या-घेतल्या जात असेल तर त्याला विरोध करण्याचे कुठलेच कारण नाही. परंतु एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला अशा एखाद्या दिवसाची माध्यम म्हणून जर गरज भासत असेल तर हे प्रेम 'तकलादू' ? असा तर्क कुणी लावत असेल तर त्याला चुकीचेही म्हणता येणार नाही. "प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं..प्रेमाला उपमा नाही..." अस प्रेमाचं वर्णन कवींनी केल आहे. त्यामुळे, मनातील प्रीतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी व्हॅलेन्टाईन्स डे ची च गरज आहे, कि प्रेमभावना जपण्याची ?
11.jpg
अर्थात याचा अर्थ व्हॅलेन्टाईन्स डे ला विरोध करावा,असा मुळीच होत नाही. समाजात, आपापसात प्रेम भावना वाढीस लावणारा प्रत्येक 'डे' साजरा झाला पाहिजे. परंतु व्यक्त होण्याची पाऊलवाट असणाऱ्या
या दिनाच्या निमिताने प्रेमाचं हिडीस पणे प्रदर्शन केल जावू नये एव्हडीच अपेक्षा आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या काळात नाती फार उथळ झाली आहे. कुणालाही संस्कृतीची चाड उरली नाही. प्रेमामध्ये एकमेकांसोबत असतानाही एक भिंत जोडप्यांमध्ये दिसून येते. त्यामुळेच प्रेमप्रकरणातून होणारे गुन्हेही वाढलेले आहेत. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीलाच ऑनलाईन फसविणे, अश्लील एमएमएस बनवून ब्लॅकमेलिंग करणे, अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. जोडीदाराचा आपल्या जोडीदारावर किती विश्वास आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे. या व्हॅलेन्टाईन्स ला सोबत असलेला साथीदार पुढच्या व्हॅलेन्टाईन्सला सोबत असेलच याची शास्वती देता येत नाही. त्यामुळे आजचं प्रेम हे प्रेम आहे कि..आकर्षण आहे, कि वासना आहे हेच मुळी समजत नाही. आज तरुणाईला फेसबुक वर 'इन अ रिलेशनशिप' अस स्टेटस ठेवणं प्रतिष्ठेचं वाटू लागल आहे. नात्यात आणि प्रेमात समजदारीचे प्रमाण कमी झाल्याने आजची नाती टिकावू राहिली नाही. आपल्याला अजून प्रेम समजलाच नाही याचे हि उदाहरणं म्हणावी का? आता हेच बघाना आपल्या देशात साधरणतः दोन-तीन दशकांपासून व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्याची पध्दत सुरु झाली असावी. मग त्या आधीचे लोक प्रेम करत नव्हते का? कि आपलं प्रेम व्यक्त करण्याची आणि ते सिद्ध करून दाखविण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. मुळात प्रेम म्हणजे एक भावना आहे आज प्रेमात आणि उद्या कोमात जाणार्याची संख्या मोठी आहे 'तो' किंव्हा 'ती' मिळालीच पाहिजे यासाठी वाट्टेल त्या थराला जावून ते मिळविण्याचा प्रयत्न हि होताना दिसतो. टी व्ही वर गाजणाऱ्या सस्पेन्स मालीका मध्ये किंव्हा क्राईम रियालिटी मध्ये लव सेक्स अन धोका याचाच परीघ मांडलेला दिसतो. या प्राश्वभूमीवर आज प्रेमभावना वाढीस लागतेय का? असा प्रश्न कोणत्याही संवेदनशील मनात निर्माण होऊ शकेल.

प्रेम हि देण्याची गोष्ट आहे त्यागाच्या सर्वोच्च पातळीला त्या परमोच्च बिन्दुलाच प्रेम म्हणता येईल ज्यामध्ये दुसऱ्याचे सुख शोधण्याची भावना सहजरीत्या मनामध्ये यते. प्रसाद कुलकर्णी म्हणतात
"प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे, आपुलकीची उब मिळताच सहज उतू जाय रे."
ही भावना सहाजिकच प्रेमाचा खरा भाव दर्शवून जाते. निश्चितच हि भावना व्यक्त करण्याच्या ज्याच्या त्याच्या पद्धती असतात. त्यामुळे कुणी जर यासाठी व्हॅलेन्टाईन्स ला प्रेम व्यक्त करत असेल तर त्याने ते जरूर कराव. पण प्रेम हे विश्वासावर टिकत असत याची जान सुद्धा ठेवायला हवी. सोबतच या प्रेमदिनाला विरोध करणाऱयांनीही (करायचा असेलच तर ) हिंसक विरोध न करता याला प्रेमानेच उत्तर दिले पाहिजे. कारण ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ हा आपल्या संस्कृतीतला नसला..तो पाश्चात्त्यांचा जरी असला तरी प्रेम वाढविणारा दिवस आहे. त्यामुळे ज्या गोष्टीतून द्वेष कमी होत असेल आणि प्रेम वाढत असेल त्या गोष्टीचा विरोधही प्रेमानेच करावा, म्हणजे विरोधातूनही प्रेमभावना वाढीस लागेल.
प्रेमदिनाच्या निमित्ताने प्रेम दिन मानणाऱ्यांसाठी आणि न मानणाऱ्यांसाठीही कवी कुसुमाग्रज याच्या कवितेच्या चार ओळी....

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...!

Best-couple-retreats-and-activities-for-Valentine’s-Day.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख,
प्रेम कर भिल्लासारखं ही कविता फार सुंदर आहे

छान लिहीलयं

मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे कविता तर माझी सगळ्यात आवडती.

सर्वांचे मनस्वी धन्यवाद.. प्रेम ही भावनांचं इतकी सुंदर आहे की त्यावरील सर्व साहित्य हवेहवेसे वाटते.. धन्यवाद