री-युनियन -भाग ४ (अंतिम भाग)

Submitted by विद्या भुतकर on 6 February, 2018 - 20:27

रिक्षा तुळशीबागेजवळ थांबली आणि प्रज्ञाचा चेहरा लहान मुलांसारखा खुलला. दोघीही मग तिच्या खरेदीत गुंतल्या. सकाळची वेळ असल्याने गर्दी जास्त नव्हतीच. तिच्या क्लिप, साडीपीन, मुलीला केसांचे बेल्ट, रंगीत बेल्ट, आवडतील त्या सर्व प्रकारच्या चप्पल-सॅन्डल घेऊन झाल्या. गार्गी तिला एकेक गोष्ट आठवण करुन देत होती.

"ए तुला आठवतंय तू अशीच मला सोडून अजयबरोबर आली होतीस एकदा? हे असले झुमके घेतले होते दोघींसाठी?", प्रज्ञाने विचारलं.

"हो तुला किती राग आला होता. घेतलेच नाहीस ते. चल, घे आता एक. मी पैसे देते. ", गार्गी हसून म्हणाली.

"राग येणारच ना? माझी बेस्ट फ्रेंड तू. मला सोडून, न सांगता अशी त्याच्यासोबत फिरलीस. तेव्हापासूनच राग आहे मला त्याचा. काहीतरी खटकायचं त्याच्याबद्दल नेहमी. उगाच तुझ्याशी बोलायचं म्हणून माझ्याशीही चांगलं वागायचं प्रयत्न करायचा. मला अजिबात आवडायचं नाही ते. ", प्रज्ञा म्हणाली.

"हम्म, तुला राग येतो म्हणून तुला न सांगता जायचे गं. बाकी काही नाही.",गार्गी.

"माझी इतकी काळजी? उलट तुझ्या लग्नासाठी किती कष्ट घेतले मी. काका-काकूंकडे त्याचं किती खोटं कौतुक करावं लागलं माहितेय का? आणि तुझ्या लग्नात तुझ्या त्या जाऊ-दिरांचे किती नखरे सहन केले मी. जाऊ दे सोड. भैया ये कितने का?", म्हणत प्रज्ञाने ते कानातले दुकानदारासमोर धरले.

खरेदी काही संपत नव्हती. पुढं जेवायला परत हॉटेलवर जायचं होतं त्यामुळे घाई करायची होती. मुलींसाठी एक दोन ड्रेस, फ्रॉक घेत प्रज्ञा घाईने निघाली खरी पण तिला अजून खूप काही घ्यायची इच्छा होत होती. नाईलाजाने गार्गीने अनिरुद्धला फोन लावला.

"अन्या, आम्हाला उशीर होतोय रे जेवायला नाही येत, चालेल का?", तिने विचारलं.

"अगं असं काय करताय? फक्त आपल्यासाठी ठेवला होता ना हा वेळ? मग तुम्ही पर्सनल कामं का करत बसलाय?", त्याने चिडून विचारलं.

"अरे ती आलीय ना आपल्यासाठी इथे. मग तिची नको का मदत करायला? थोडी खरेदी करुन येतो आम्ही, संध्याकाळी आहेच ना डिनरला. ", गार्गीने त्याला समजावलं.

"बरं या मग लवकर.", तो म्हणाला.

अजून खरेदी म्हटल्यावर प्रज्ञा एकदम खुश झाली. दोघीही मग लक्ष्मी रोडवर साड्या, ड्रेस, दागिने बघत फिरल्या.

"आपल्या सारी-डे ला भारी मजा आली होती ना? तुला साडीत बघून शिट्ट्याच मारल्या होती वीरेनने. ",प्रज्ञा हसून म्हणाली.

"हो ना, आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली होती. सगळे जुनियर्स पण माझ्याकडेच बघत होते, भूत पाहिल्यासारखे. ", गार्गीला तो दिवस आठवला.

दोघींनी बोलता बोलता साड्या निवडल्या आणि खरेदी आटोपून हॉटेलच्या रस्त्याला लागल्या.
----------

अभ्या आणि दिपक परत आले फुंकून तर अजय तयार झालेला मस्तपैकी. आता फक्त ब्लेझर घातले की झालं. त्याच्याकडे बघून दोघेही थक्क झालेले.

"भारी दिसतोस की अज्या. कॉलेजमध्ये कधी टाय तरी बांधता येत होता का रे आपल्याला?", दिपक हसून म्हणाला.

"टाय जाऊ दे, त्या इंटरव्यूला पण हा माझी पॅन्ट घालून गेलेला", अभ्या बोलला.

"तेंव्हा तुझी पॅन्ट त्याला बसत होती ना, आता कुठली बसेल? ", दिपकने त्याला चिडवले.

"हो ना, जरा बघ स्वतःकडे? असं दुर्लक्ष करु नकोस.",अजय बोलला.

"अरे तो वीरेन बघ कसला फिट आहे अजून पण", दिपक.

"त्याचं कौतुक मला नको सांगुस. मला तर मघाशी कानाखाली द्यायची इच्छाच होत होती. फालतू चौकशा. म्हणे तुम्ही दोघे वेगळे राहताय का डिव्होर्स झालाय.", अभ्याला तो कधीच आवडला नव्हता.

"वीरेन तुला विचारत होता? मग तू काय सांगितलंस?", अजयने त्याला विचारलं.

"हो, मघाशी खाली गेलो तर भेटला होता. काय सांगणार? म्हटलं आपल्याला काय करायचंय? त्यांचं ते बघतील. म्हणे, हम उनके फ्रेंड्स है ना. अपनी रेस्पॉन्सिबिलिटी है उनकी हेल्प करना.",अभ्या त्याची नक्कल करत बोलला.

"हा कसली हेल्प करणार? मी तर म्हणतो वाटच बघत असेल ती एकटी भेटायची. तुझ्यावर किती खुन्नस खाऊन होता तो कॉलेजमध्ये.", आता दिपकलाही त्याचा राग आला होता.

अजयने पुन्हा एकदा तो विषय टाळला.

"चला, जेवायला. लेक्चर ऐकवतो तुम्हाला. बोअर करुन मारतो त्या वीरेनला.", अजय हसत बोलला.

"खरंच रे, दुपारी जेवण झाल्यावर किती त्रास व्हायचा लेक्चरला. आता आठवलं तरी झोपायची इच्छा होते.", अभ्या.

"तुझं आयुष्य झोपेतच जाणार आहे. उठ आता तरी.", अजयने त्याला सोफ्यातून उठवला.

तिघेही जेवायला गेले तेंव्हा बँक्वेट हॉल मध्ये फार कमी लोक होते. अन्या टेन्शनमध्ये लोकांना फोन करत होता.

"कुठे आहेत रे सगळे?", अजयने त्याला विचारलं.

"अरे हे लोक पर्सनल कामं काय काढतात रियुनियन मध्ये?", अनिरुद्ध चिडून बोलला.

"जाऊ दे ना, तू का असं घरचं लग्न असल्यासारखा टेन्शन घेतोय्स?", दिपकने त्याला विचारलं.

"अरे इथे पैसे दिलेले आहेत जेवणाचे वगैरे सगळे. मग का असे वाया घालवायचे?", त्याचंही म्हणणं बरोबर होतं.

"आपण एक काम करुया या? तुझा इव्हेंट रात्री डिनरला ठेवू. ", अनिरुध्धने अजयला विचारले.

"अरे हो, चालेल ना, तू त्याचं काय टेन्शन घेतोस. आपलेच लोक आहोत. मी काय तुझा क्लायंट नाहीये, इतकं टेन्शन घ्यायला. तू रिलॅक्स राहा.", अजयने त्याला समजावलं.

"चल आपण तरी जेऊन घेऊ. भारी जेवण होतं रे, दुपारचं. ", अनिरुद्धाने त्याला टेबलाकडे नेलं.

सगळे एकेक करुन जेवायला ताट घेऊन आले. वीरेनही दिसला तिथे अजयला आणि मघाचं रुममधलं बोलणं त्याला आठवलं. गार्गी कुठे दिसत नव्हती. त्याने तिचा विचार मनातून झटकला आणि पुन्हा मित्रांशी बोलू लागला.
---------

संध्याकाळ झाली तशी अनिरुद्धने पुन्हा एकदा सर्वाना घाई केली लॉनवर यायला. आजची शेवटची रात्र. सकाळी सगळे उठून घरी परत जाणार होते. आज एक मस्त स्टेज बांधलं होतं मध्ये. सातेक वाजता स्टेजवर लाईट लागले आणि समोरच्या खुर्च्याही भरुन गेल्या. मुली मस्त तयार होऊन आलेल्या होत्या. कुणाची साडी, तर कुणाचा इव्हनिंग गाऊन. पहिल्या दिवसाचं अवघडलेपण नव्हतं आज. प्रत्येकजण जणू वर्गातल्या आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसावा तसा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींजवळ जाऊन बसला.

अनिरुद्ध स्टेजवर आला आणि पुन्हा एकदा सर्वजण ओरडले, "मित्रहो!" आणि जोरात टाळ्या पडल्या.

"आता उगाच लाजवू नका तुम्ही लोक मला. अरे मी फक्त सांगतोय की कालच चर्चा करुन आरती आणि अर्चनाने एक डान्स बसवला आहे. त्या सादर करत आहेत,'ताल से ताल मिला'." अनिरुद्ध माईक बाजूला ठेवून खाली बसला.

त्या दोघेही कमालीच्या डान्स करायच्या. पुढे जाऊन नक्कीच त्या क्षेत्रात काहीतरी करतील असं सर्वाना वाटायचं. पण दोघीही संसाराला लागल्या आणि विसरुन गेल्या. त्या जुन्या स्टेप्स पुन्हा करायच्या या विचाराने एकदम उत्साहाने कामाला लागल्या होत्या. जणू मध्ये २० वर्ष गेलीच नाहीत इतक्या सहज दोघीनी तो डान्स केला. त्या काळातलं ते रेहमानचं फेमस गाणं, ऐश्वर्या, सगळं लोकांच्या डोळ्यासमोरुन एक क्षणभर तरळून गेलं. जोरात टाळ्यांनी सर्वांनी त्यांचा उत्साह वाढवलाही. एकूणच रात्र रंगणार होती.

डान्स नंतर अनिरुद्धने अजयला पुढे बोलावलं. तो अगदी ब्लेझर ,टाय सर्व घालून आला होता. "how to be successful in corporate life?", या विषयावर बोलणार होता.

तो स्टेजवर आल्यावर अनिरुद्धने त्याला कोपऱ्यात बोलावून सांगितलं,"सॉरी जरा बदल आहे कार्यक्रमात. हा कागद हातात ठेव." कागद हातात देऊन अनिरुद्ध स्टेजवर आला आणि म्हणाला, "अजय आज एका मोठ्या कंपनीत व्हीपी असेलही. पण आपल्यासाठी अजूनही तो शांत राहणारा, थोड्याच शब्दांत खूप काही व्यक्त करणारा कवी म्हणून आठवतो. अजय तुझं ते लेक्चर बाजूला ठेव, ती भरपूर मिळतील परत. पण तुझ्या हातातल्या कागदावर आहे ते परत मिळणार नाही. तर टाळ्यांनी स्वागत करु कवी अजय यांचं!", म्हणत अनिरुद्धने माईक अजयकडे दिला.

त्याने शेवटच्या वर्षी वाचलेली कविता होती ती. हा कागद त्याला कुठून मिळाला ते त्याला आठवत नव्हतं.

आता असं सर्वांसमोर आल्यावर दुसरा पर्यायच नव्हता.

त्याने वाचायला सुरुवात केली,

"मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला?

लोकांशी महत्वाचं बोलतानाही ,
माझा एखादा जोक आठवतो ना तुला?

आपण गर्दीत असतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला?

इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला?

कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला?

तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला?

तू शब्दांनी नाकारतानाही,
चेहराच सांगतो, मी आवडतो ना तुला?".

कविता संपली आणि २० वर्षांपूर्वी पडल्या तितक्याच टाळ्या आजही ऐकू येत होत्या. पण त्या गॅदरिंगच्या दिवशी सगळं कॉलेज कविता संपल्यावर,"गार्गी गार्गी" म्हणून ओरडत होतं. तीही मग बिनधास्तपणे उठून स्टेजवर जाऊन,टाळ्या वाजवून, "बहोत खूब , बहोत खूब" म्हणून आली होती.

आज मात्र आपल्या खुर्चीत बसून फक्त निरपेक्षपणे बघत होती. तिच्याकडे पाहून मग सर्व वातावरण मग थोडं शांत झालं. गिऱ्याने पुढे होऊन माईक हातात घेतला. अजय खाली उतरला.

"अजय द कवि! एनीवे, मला अनिरुद्धबद्दल चार शब्द बोलायचे होते. म्हणजे त्याचं नाव घेतलं तरी चार शब्द संपतील, म्हणून अजून थोडे बोलतो. त्यानं गेल्या काही दिवसांपासून हे सर्व इतकी मेहनत करुन जुळवून आणलं त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. आपल्या वर्गाचे मॉनिटर म्हणून मी पुन्हा २० वर्ष त्यांची निवड करत आहे. ", असं म्हणत गिऱ्या हसला. अनिरुद्धने मान हलवून 'हो' म्हणून सांगितलं. त्याला एक मिठी मारुन गिऱ्या खाली उतरला.

"आता वन लास्ट मील. पुढच्या २० वर्षापर्यंत", असं म्हणत अनिरुद्धने माईक बंद केला. मंडळी जेवायला पांगली.

---------

जेवण संपवून सगळे आता फक्त गप्पा मारण्यात गुंगले होते. जणू दोन दिवसांत पुन्हा नव्याने त्यांची मैत्री होत होती. जेवण संपवून, एकमेकांना मिठ्या मारुन सगळे परत झोपायला जाऊ लागले. प्रज्ञा आणि गार्गीला सोडायला वीरेन आणि गिऱ्या होतेच. ते लॉबीतून जात असताना अजयचा आवाज आला,"गार्गी".

तिने मागे पाहिलं. प्रज्ञा, वीरेनला 'तुम्ही जा पुढे' म्हणून ती त्याच्याकडे गेली. दोघेही चालत चालत परत लॉनकडे वळले.

"बाबा कसे आहेत?", त्यानं विचारलं.

"ठीक आहेत. अजून ट्रीटमेंट चालू आहे. ते दोघे?", ती बोलली. तिला मुलांचं नाव घेतलं तर पुन्हा रडू येईल असं वाटू लागलं होतं. इतके दिवस झाले होते दोघांना बघून.

"तुला घेऊन येणार का विचारत होते?", अजय बोलला. तसे गार्गीने वर पाहिलं.

"गार्गी, गेल्या दोन दिवसांत जाणवलं की वीस वर्षांपूर्वी तुला मिळवण्यासाठी किती धडपड केली होती मी. माझा स्वभाव बुजरा होता, तू इतकी मनस्वी, मनमोकळी, दिलखुलास वागणारी मुलगी. पण तरीही तू हवी होतीस. तुझ्या बाबांकडे यायला किती भीती वाटली होती. तो दिवस आठवला. त्यांनी त्या दिवशी लग्नाला नकार दिला असता तर? तुझ्या भावाने मला पसंत करावं म्हणून त्याला किती मस्का लावला होता. आज ते माझे नातेवाईक आहेत आणि मला त्यांच्याशी अनेक महिने बोलायचेही कष्ट घेता आले नाहीत.

वीरेनसोबत तुझे पहाटेचे फोटो पाहिले आणि 'तू खरंच त्याच्यासोबत गेलीस तर?' अशी तेव्हा मनात असलेली भीती क्षणभर पुन्हा मनात येऊन गेली. अभ्या तुला, वीरेनला नावं ठेवत होता तेंव्हा त्यांना सांगितलेली कारणं पुन्हा एकदा मनात येऊन गेली. तेव्हा तुला मिळवण्याचे इतके प्रयत्न केले आणि त्यात यश आलं नसतं तर आज कुठे असतो माहित नाही. फोटो पाहतांना तेव्हाची 'तू' आणि आज बदललेली 'तू' यातला फरक जाणवला. आपण सोबत राहूनही तुझ्यातली तू हरवत गेलीस आणि मी साधं शब्दानेही विचारलं नाही. खरंच मला आज क्षणभर का होईना तुला कायमचं हरवण्याची भीती वाटली आणि मी हादरलो. इतके दिवस रागाने, तुझ्या तिरस्काराने घेरलं होतं मला. आज ते सर्व जाऊन फक्त तू दिसत आहेस. ", बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला होता. तिने चटकन आजूबाजूला पाहिलं.

तिच्या डोळ्यांतून पाणी झरत होतं.

"कालपासून प्रज्ञाचंही तेच चालू आहे. तिलाही तू आवडायचा नाहीस अजिबात. आपण तिला सोडून खरेदीला गेलेलो ते अजून विसरली नाहीये ती. ",गार्गी रडता रडता हसत बोलली.

"आपण भेटायचो ते हॉटेल, त्या जागा, जुन्या आठवणी तिच्यासोबत फिरताना परत जाग्या झाल्या. आई-बाबा, मुलं या सगळ्यांना सोडून फक्त तू आणि मी आठवत राहिले. गेले कित्येक वर्षं असं झालं नसेल. किती वेगळे होतो ना आपण? फक्त तू आणि मी ! या बाकी सगळ्या संसाराचं किती ओझं घेऊन फिरत राहतो आपण, तू आणि मी कधी हरवून जातो कळतंच नाही. आता या क्षणाला तू हाक मारली नसतीस तर काय केलं असतं मी काय माहित? तुझी कविता वाचल्यावर वाटलं हा कुठे हरवून गेला काय माहित. आणि मीही त्याला शोधलं नाही परत.",म्हणून रडत तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

त्या दोघांना असं बघून मागे वीरेन, प्रज्ञा, अभ्या, गिऱ्या, दिपक आणि अनिरुद्ध एकमेकांकडे बघून हसत उभे होते. त्यांचा रियुनियनचा हेतू सफल झाला होता.

समाप्त.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या भागात सस्पेन्स उघड झाल्यानंतर आता प्रेडिक्टेबल झाली होती. विशेषतः नावामुळे! पण कदाचित उलटा धक्का द्याल की काय अशीही शंका होती Happy
किती वेगळे होतो ना आपण? फक्त तू आणि मी ! या बाकी सगळ्या संसाराचं किती ओझं घेऊन फिरत राहतो आपण, तू आणि मी कधी हरवून जातो कळतंच नाही>> हे आवडलं!
शादी के साईड इफेक्ट्स Happy

आवडली गोष्ट,
पण शेवट थोडा abrupt केल्या सारखा वाटतो.

रीयुनियन चे सगळे प्रसंग छान खुलले, अगदी रिअल वाटले. त्या मानाने शेवटचा सीन नाही खरा वाटला. म्हणजे १५ वर्षे लग्न झालेले नवरा बायको असे काही फिल्मी डायलॉग बोलतील असे नाही वाटले समहाऊ.

शेवट हाच होणार माहीत होतं पण तरीही ....>> हे ऍक्च्युली, हिरोला हिरोईन मिळणार हे माहित असतं तरीही प्रत्येक चित्रपट बघतो तसं आहे. Happy

ही कथा गेले ४-५ महिने डोक्यात होती. दोनेक महिन्यापूर्वी सुरुवात केली लिहायला आणि सोडून दिली होती. कारण एकच होतं की त्याचा शेवट अपेक्षितपणेच होणार. पण मागच्या आठवड्यात ती पूर्ण केल्याशिवाय चैन पडेना. वाटलं शेवट अपेक्षित आहे म्हणून लिहायचीच नाही, हे म्हणजे वाचकांना जे हवंय त्यानुसारच लिहिणं. ते तर अजिबात पटलं नाही. म्हणून मग सर्व विचार सोडून दिले आणि आधी सर्व भाग लिहून पूर्ण केले. कारण हेही लक्षात आलं की कथा पूर्ण नसताना पहिला भाग टाकणे हे चुकीचं आहे. आधी काही वेळा तसं मी केलं आहे. पण आता जमत नाहीये. ज्या दिवशी शेवटचा भाग लिहिला, खूप छान वाटलं. कारण, मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. एक लेखक म्हणून, ते जास्त महत्वाचं वाटत आहे.

आता जशी कथा अपेक्षित वळणांनी गेली असं वाटलं, तसेच कमेंटही येणार हे माहित होतं. या प्रकारचे प्रतिसाद अपेक्षित आहेत आणि त्यात काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. उलट, याची कल्पना असूनही ही इथे पोस्ट केली. याचं कारण असं की, एकूणच माझी प्रोसेस इथल्या वाचकांमुळे सुधारली आहे. कदाचित मी पूर्वी इतका विचार केला नसता, डोक्यात आलं, लिहिलं असं करुन टाकलं असतं. पणआता तसं होत नाही. मला नक्की काय उतरवायचं आहे शब्दांत त्यावर विचार केला जातो. एडिटिंग केलं जातं. आणि हेच कथाच नाही तर बाकी लिखाणाबाबतही उपयोगी पडतं. ते खूप आवडत आहे.

सर्व वाचकांचे मनापासून आभार. Happy

विद्या.

तिला रियुनियनला २ दिवस जायला वेळ आहे पण गेले कित्येक महीने ती मुलांना भेटलेली नाही हे काही पटलं नाही.
पण ओव्हरऑल छान वाटली गोष्ट वाचायला. हॅप्पी एन्डिंग गोष्टी आवडतात मला Happy

{एकूणच माझी प्रोसेस इथल्या वाचकांमुळे सुधारली आहे. कदाचित मी पूर्वी इतका विचार केला नसता, डोक्यात आलं, लिहिलं असं करुन टाकलं असतं. पणआता तसं होत नाही. मला नक्की काय उतरवायचं आहे शब्दांत त्यावर विचार केला जातो. एडिटिंग केलं जातं. आणि हेच कथाच नाही तर बाकी लिखाणाबाबतही उपयोगी पडतं. ते खूप आवडत आहे. }

हे फार आवडलं. लिहित रहा - आम्ही वाचत राहू. आवडलं की नाही ते ही सांगू

chan lihili aahe katha ..shevat jari apekshit asla tarisuddha chan hota ..Mala real vatla ..sometimes husband wife fight for long period of time ..but 1 minute is also enough for realisation of importance of relationship ..
@Vidya tumchya khup katha vachlya aahet mi ..khup chan lihita..shubheccha !!!

मस्त कथा. शेवट वाचून डोळे पाणावलेच.लग्न, मुलं बाळं, संसार यात बरेच प्रेमी हरवून त्यांच्या जागी त्यांच्यासारखी दिसणारी पण वेगळेच वागणारी कोणी वेगळीच माणसं सब्स्टिट्युट होतात.
माझा सुरुवातीला गोंधळ झाला होता अजय गार्गी आणी वीरेन च्या नात्याबद्दल. (उडत उडत वाचण्याची आणि शेवट आधी वाचण्याची घाणेरडी सवय)
आता सर्व भाग परत वाचते.

Thanks all. Happy

लग्न, मुलं बाळं, संसार यात बरेच प्रेमी हरवून त्यांच्या जागी त्यांच्यासारखी दिसणारी पण वेगळेच वागणारी कोणी वेगळीच माणसं सब्स्टिट्युट होतात.>> Exactly Anu.