री-युनियन- भाग २

Submitted by विद्या भुतकर on 5 February, 2018 - 00:09

भाग १- https://www.maayboli.com/node/65179

"बारीक झालीस किती?", प्रज्ञानं तिला विचारलं.

"हो नं? झुंबा लावलाय थोडे दिवस झाले. म्हटलं पूर्वीसारखं होऊन जायचं.", एकदम हसून गार्गी बोलली.

"बरं झालं आलीस, मला फार वाईट वाटलं असतं तुझी भेट झाली नसती तर.", प्रज्ञा.

"खरं तर तू इकडे येणार असं कळलं म्हणून आलें नाहीतर माझी यायची अजिबात इच्छा नव्हती. एकदा तू अमेरिकेत गेलीस की परत कधी भेटणार आम्हाला तू? ",गार्गी.

"तसं नाही गं, इकडे आलं तरी पुण्यात यायचं जमत नाही.माहेर-सासर करत सुट्टी संपून जाते. यावेळी तुम्ही सगळे भेटणार म्हणून का होईना ब्रेक मिळाला त्यातून. बरंय, सगळे एकत्रच भेटले ते. ", प्रज्ञा बोलली.

दोघी चालत रुमवर आल्या. बॅग टाकून गार्गीने रूमचं निरीक्षण केलं. छान होती.

"भारीय ना? मुद्दाम कॉर्नरची रुम द्या म्हणलं त्या माणसाला मी. मस्त मोठी आहे. मी आर्ची, प्राचीची जाऊन पाहून आले. त्यांच्यापेक्षा मोठी आहे. " प्रज्ञानं पुढची माहिती दिली होती.

"तू ना सुधारणार नाहीस. ", गार्गी म्हणाली.

"तुझ्याकडूनच शिकलेय ना? आठवतंय का तू हॉस्टेलला भांडून आपली बदलून घेतली होतीस. कसली चिडली होती ती मोनिका. तिच्या रुममेट पण मला खुन्नस द्यायच्या वर्षभर. कधी पटलं नाही ना आपलं त्यांच्याशी परत मग?", प्रज्ञा होस्टेलवरचं पहिलं वर्ष आठवत बोलली.

"हो ना, मला खूप राग येत होता की सिनियर म्हणून आपल्या मजल्यावरची मोठी रुम त्यांना द्यायची. गेल्या ना मुकाट्याने मग त्यांच्या मजल्यावर.", गार्गीला आठवलं होतं ते.

रुममध्ये बेडवर पडून तिला फार बरं वाटत होतं. एकदम निवांत.

कपडे बदलून प्रज्ञा बाहेर आली तशी तीही आवरुन पडली मग.

"हे घे" म्हणत प्रज्ञाने तिच्या हातात एक बॉक्स टेकवला.

"माझ्यासाठी ना? ", गार्गीने आनंदानं तो घेतला.

"मग काय प्राचीसाठी?", प्रज्ञा.

"ए मस्तय गं.", गार्गीला तिचं ते गिफ्ट मिळालेलं घड्याळ आवडलं होतं.

"आवडलं ना? माझ्यासाठी पण सेम आणलंय, आपण घालूया उद्या-सेम टू सेम.", प्रज्ञा.

"हां भारी आयडियाय. ए सचिन काय म्हणतोय? ", गार्गी म्हणाली.

"काही नाही आता दोन दिवस लेकीला एकट्याने बघायचं म्हणून वैतागला होता. पण करेल.", प्रज्ञा म्हणाली.

"ए तसं तो सगळं करतोच हां घरातही.", गार्गी.

"हो तसं करतो पण मग मधेच लहर आली की उगाच चिडचिड असते त्याची.", प्रज्ञा.

"जाऊ दे गं, तेव्हढं चालायचंच. ते मध्ये त्याला त्रास होत होता डोकेदुखीचा, कमी झाला का तो?", गार्गी.

"हो ना, खूप चेक अप केले पण काही कळत नव्हतं. त्याच्या आईचा आयुर्वेदावर खूप विश्वास, आता आलाय तर घेऊन जातील डॉक्टरकडे. म्हटलं जाऊन या, माय-लेक. ",प्रज्ञा.

"हम्म जाऊ दे. तू आलीस ना इकडे? मग ते काय का करेनात.", गार्गीनं तिला समजावलं.

"हो नं, मी सुटले दोन दिवस तरी. मध्ये खूप टेन्शन होतं पण त्याच्या आजाराचं आम्हाला. कमी होईल औषधाने तर चांगलंच आहे. ", प्रज्ञा विचार करत बोलली.

"तो अभ्या किती वेगळा दिसत होता ना ?", गार्गी मधेच बोलली.

"हो नं, मला तर कळलंच नाही, कोण आहे ते आधी. ", प्रज्ञा जोरात हसत म्हणाली.

"तू काय बावळटसारखं विचारतेस त्याच्यासमोरच, 'हा कोण म्हणून'?", गार्गीने तिला झापलं.

"अगं नाही आलं लक्षात तर काय करणार?", प्रज्ञा अजूनही त्यावरुन हसत होती.

"प्राची-अर्चूशी बोलणं नाही झालं माझं. उगाच परत ते प्रश्न नकोत.", गार्गी जणू लॉनवरच्या प्रत्येक माणसाचा परत आढावा घेत बोलत होती.

दोघी आपापल्या गाद्यांवर पडून, हातात डोकं टेकवून एकमेकींकडे तोंड करुन बोलत होत्या. मधेच गार्गीने कूस बसलली.

"एका बाजूला बघून मधेच मान अशी अवघडल्यासारखी होते बघ.", ती छताकडे बघत बोलली.

"ह्म्म्म मला पण त्रास सुरु झालाय हल्ली थोडा पाठदुखीचा. ", प्रज्ञाने तिला सांगितलं.

खूप वेळ मग प्रज्ञाच्या घर, सासर, माहेर, ऑफिसच्या गप्पा झाल्या. रात्रीचे दोन वाजले तसे त्यांना भूक लागू लागली.

"मला ना खूप इच्छा होतेय आपण रात्री बाहेर मॅगी खायला जायचो तसं जायची. ", प्रज्ञा म्हणाली.

"वेडी आहेस का? तेव्हा कसे जायचो काय माहित, आता मात्र माझी हिम्मत होणार नाही. "गार्गी म्हणाली.

"जाऊया ना. माझा असाही जेटलॅग चालूय. चल, एक काम करु वीरेनला बोलावू.

"वीरेनला काय? नाही नको, तो झोपला असेल. तो मात्र अजूनही तसाच दिसतोय ना? ", गार्गी म्हणाली.

"हो तसाच दिसतो अजूनही. बरं ते जाऊ दे, थांब मी त्याला फोन लावते.", म्हणत तिने त्याला फोन लावलाही.

वीरेन आणि त्याचा मित्र, गिऱ्या जागेच होते, गप्पा मारत. चौघेही मग हॉटेलमधून बाहेर पडून जवळच्या टपरीवर गेले. तिथे मॅगी मिळत नव्हती, पण चहा आणि भुर्जी-पाव होता. सगळ्यांनी खाऊन मस्त चहा घेतला आणि गप्पात दोन तास कसे उलटले कळलंही नाही. परीक्षेच्या वेळी केलेली गंमत, अभ्यासाच्या दिवसांत रात्री जागून केलेली तयारी, त्यात कुणी सकाळी उठणारा तर कुणी रात्री जागणारा. गप्पा संपतच नव्हत्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून त्यांचा ग्रुप होता. कॉलेजची चार वर्षं ते सोबतच होते. चार वाजता परत येऊन त्या दोघीना त्यांच्या रुमच्या दारापर्यंत सोडून ते दोघेही परतले.

"मजा आली ना? ", प्रज्ञा बोलली.

"हो ना, बरं झालं गेलो ते.", गार्गी म्हणाली.

"तुला एक विचारु?", प्रज्ञाच्या आवाजावरुन तिला माहित होतं ते प्रश्न आता येणार आहेत.

"मला नेहमी वाटायचं की तू आणि वीरेन कधी ना कधी एकत्र याल. पण ते कधीच झालं नाही. ", प्रज्ञा बोलली.

"जाऊ दे ना तो विषय. आता तर त्याचं लग्नही झालंय.", गार्गी बोलली.

"गार्गी, किती बदललीयस तू ! तुझं तुला तरी कळतंय का?", प्रज्ञाला मात्र ते कळत होतं, दिसत होती.

हसणारी, भांडणारी, हक्कानं सर्वांना घेऊन जाणारी गार्गी एकदम शांत होती.

"तुला मी सांगितलं होतं ना तू काही बोलणार नसशील तरच मी येते म्हणून. खूप त्रास होतो बोलताना मला. जाऊ दे, आज नको तो विषय. त्यात आणि उशीर झाला म्हणून आपले ऑर्गनाईझर ओरडतील. ", म्हणून गार्गीने तिला थांबवलं आणि ती झोपलीही.

"हो ना, किती सिरियसली करतो नाही हे सगळं, अनिरुद्ध?", प्रज्ञाला त्याची धडपड आठवली एकदम.

दोघी लवकरच झोपूनही गेल्या.

----------

तिकडे अजय, दीपक, अभ्या त्यांच्या रुमवर एकत्र आले होते. बाराही वाजले नव्हते इतक्यात अभ्याची झोप लागून गेली होती.

"इतकी चढलेली त्याला. " दिपक बोलला.

"हो ना, झेपत नाही तरी प्यायची सवय काही गेली नाहीये त्याची. ", अजय हसत बोलला.

"किती ओरडायचो त्याला आपण, हॉस्टेलवर हे असलं आणू नकोस म्हणून. मला तर जाम टेन्शन यायचं त्या रेक्टरचं.", दिपक बोलला.

"तू अजूनही तसाच आहेस बघ, ऑफिसमध्ये मॅनेजरला आणि घरी बायकोला घाबरुन राहात असणार.", अजय.

"रहावं लागतं बाबा. सुखी संसाराची गुरुकिल्ली, घरी आणि ऑफिसमध्येही. ते जाऊ दे, पण तुला प्यायची सवय कधीपासून लागली. ", दिपक हसत बोलला.

"अरे ऑफिसमध्ये अनेकदा नाही म्हणायचो सुरुवातीला. पण सारखंच नाही म्हणता येईना. शेवटी थोडी का होईना सुरु केली मग.", अजय बोलला.

"ह्म्म्म. मुलं कशी आहेत? ", दिपकने विचार करुन विचारलंच.

"ठीक आहेत. थोडी धावपळ होतेय, पण बाई आहे कामाला त्यांच्या. सर्व बघते त्यांचं. दादा, वहिनी पण आहेत. त्यांचीही मदत होते. बरं, चल झोपतो मी. इकडे यायचं म्हणून पहाटे उठून ऑफिसला गेलो होतो. ", अजय शांतपणे बोलला.

दिपकने 'हो' म्हणून लाईट बंद केला आणि अंगावर पांघरुण घेतलं. मधेच अभ्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता.

'तिने साधं विचारलंही नाही!', मनातल्या मनात बोलत अजय अस्वस्थपणे पडून राहिला. आपण आहोत त्याच हॉटेलमध्ये ती आहे या कल्पनेने त्याला अजिबात झोप येत नव्हती. पण विषय टाळण्यासाठी गप्पं राहणं भाग होतं त्याला. छताकडे एकटक बघत तो पडून राहिला.

क्रमश:

विद्या भुतकर
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users