फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रीनाथ.

Submitted by साधना on 4 February, 2018 - 11:57

मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65194

आता परतीचा रस्ता असल्याने सगळे लोक निवांत होते. आज पाऊस नव्हता. हवाही स्वच्छ कोरडी होती. पण रात्रभर पाऊस पडत होता त्यामुळे सगळीकडे ओले चिप्प झाले होते, हवेत प्रचंड गारवा होता. सगळे आवरून, काही मागे राहिले तर नाही ना हे चेक करून नाश्ता, डब्बा वगैरे घेऊन आम्ही निघालो. खाली नेहमीसारखे घोडेवाले, पोर्टर गोंधळ घालत होते. घाटी व हेमकुंड साहिबला जाणाऱ्यांची गडबड चाललेली. आम्ही फक्त सामान नेणारे घोडे मिळतात का पाहायला लागलो. आमच्या तिघींमध्ये फक्त दोन सॅकस होत्या, त्या दोन्ही मुलींच्या पाठीवर देऊन मी निवांत होते. हॉटेलच्या आजूबाजूला असलेले घोडे वर हेमकुंडला जाणारे होते, त्यांना खाली जाण्यात रस नव्हता. थोडे चालत खाली जाऊया, हेलिपॅडच्या इथे आपल्याला घोडे मिळतील म्हणत आमचा ग्रुप चालू लागला. आज उतरण असल्याने दोन्ही मुलींची पाठीवर सॅक घेऊन चालायची तयारी होती, पण घोडे मिळताहेत तर जाऊदे सामान त्यांच्यावरून असे माझे मत पडले. अर्धे उतरून गेल्यावर सामानाचे ओझे वाटले असते तर तिथून घोडा करावा लागलाच असता. घोडेवाले तसे प्रत्येक वळणावर हजर असतात. शहरातून येणाऱ्या माणसांची कुवत त्यांना माहीत असते.

हेलिपॅडच्या इथले एक दृश्य. ते तंबू दिसताहेत ते ट्रेक टू हिमालय कंपनीचे.

IMG_3194~01_0.jpg

तो पांढरा बोर्ड दिसतोय तो हेलिपॅडकडे जायचा रस्ता दाखवतोय. तिथून थोडे खाली गेले की हेलिपॅड. हेलिकॉप्टरने आलात तरी इथून वर गोविंदधामपर्यंत जायला दीडेक किमी चालावे लागते. तरी हा एक चांगला पर्याय आहे. स्वच्छ हवा असेल तर सकाळी सहाला जोशीमठहुन निघायचे व गोविंदघाटाला यायचे.साधारण तासभर लागतो पोचायला. गोविंदघाटात राहायची व्यवस्था बहुतेक नाही. तिथून कॉप्टरने पाच मिनिटात गोविंदधाम म्हणजेच घंगरिया. सामान हॉटेलात टाकून लगेच घाटीसाठी निघायचे. आपला एक दिवस वाचतो जो घाटीत घालवता येतो. जाताना पायी जायचे म्हणजे रस्त्यावरची शोभाही बघून होते. यायचे जायचे पायी करण्यात पॉईंट नाही. हेलिकॉप्टर माणशी 3200 घेत होते, आम्ही तिथे होतो तेव्हा. पाऊस असेल किंवा हवा खूप जास्त खराब असेल तर हेलिकॉप्टरसेवा बंद असते त्यामुळे जोशीमठवरून निघताना हवेचा अंदाज घेऊनच हा प्लॅन करावा.

हेलिपॅडपर्यंत जाईतो घोडेही मिळाले. घोड्यांवर सामान टाकून पुढे पाठवून दिले. सामान कुणी चोरून नेईल वगैरे काळजी करण्यात इथे काही अर्थ नसतो. कोणालाही तुमच्या सामानात रस नसतो. तरीही आपले किमती सामान आपल्यासोबत बाळगलेले बरे.

परत जाताना येतानाचीच वाट असली तरी आम्ही घोड्यावरून आलो असल्याने फारसे काही पाहता आले नव्हते. त्यामुळे आता रमत गमत रस्ता बघत निघालो. रात्रभरच्या पावसाने काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहात होते. पाण्यात पाय घातला तर बूट-मोजे ओले होऊन उगीच त्रास, त्यामुळे जिथे रस्त्यावर पाणी होते तिथे दगड टाकून पाणी ओलांडायची सोय केली होती.

IMG_3218~01.jpg

दुतर्फा तुफान फुले फुलली होती. यातली कित्येक वर घाटीत मी पाहिलेली, कित्येक मला नवी होती. फोटो काढत आरामात यात्रा सुरू होती.

ही आहेत ग्रेसफुल सेनेसीओ. खरेच खूप ग्रेसफुल दिसतात. शास्त्रीय नाव :Senecio graciliflorus

IMG_20170819_150759150~01~01_0.jpg

तीनही रंगात फुललेल्या बालसमसोबत निळी घंटीफुलेही चिक्कार होती. चारही दिशांना नुसती रंगांची उधळण.....

ह्या खालच्या फुलाचे नाव माहीत नाही. कदाचित पांढऱ्या पानाचे हॉगविड असू शकेल. किंवा त्या कुळातले कुणी.
शास्त्रीय नाव :Semenovia candicans

IMG_3216~01-1~01.jpg

ही एजवर्थस कॅम्पियन. शास्त्रीय नाव :
Silene indica var. edgeworthii

IMG_3246~01.jpg

ही खालची फुले खूप नाजूक होती. अगदीच लहान. नाव लिफी मिडो रुई. हिंदीत मामेरा. शास्त्रीय नाव :Thalictrum foliolosum

IMG_3260~01.jpg

पानांची रचना पहा.

IMG_3200~01.jpg

फ्लॉवर्स ऑफ इंडियावर ह्याला शोधत असताना , आयुष्य भरभराटीत जावे म्हणून नवजात शिशुना ह्या फुलांची उशी करून त्यावर निजवतात असे वाचायला मिळाले. Happy

IMG_3262~01.jpg

ही तिथली लोकल कंटोली. हिंदीत बन करेला म्हणतात.
शास्त्रीय नाव :
Herpetospermum pedunculosum

IMG_3240~01.jpg

ही फुले पाहिल्यावर ऐशूला आठवले की पहिल्या दिवशी घाटीवरची फिल्म पाहायला ती गेली होती तेव्हा या फुलांची काहीतरी आख्यायिका तिथे सांगितलेली. तिला अर्थातच ती आता आठवत नव्हती Sad Sad

IMG_3235~01.jpg

ही आहेत हिमालय टीसेल. हिंदीत फुली म्हणतात. शास्त्रीय नाव : Dipsacus inermis

खूप सुंदर दिसतो हा गुच्छ, खूप लहान आहे. फोटोत कल्पना येत नाही. 2 सेमी असेल फारतर.

IMG_4014~01.jpg

ही Wight's Myriactis असावीत असे वाटतेय, शास्त्रीय नाव : Myriactis wightii

IMG_3249~01.jpg

जवळून : खूपच लहान फुले.

IMG_3251~01.jpg

हे हिमालय ब्लु सो-थिसल असण्याची शक्यता आहे. मूळ पाकळी याहून गडद रंगाची आहे असे दिसतेय, मी पाहिलेली कदाचित पाण्यामुळे फिकट झाली असेल.
शास्त्रीय नाव: Lactuca brunoniana

IMG_3231_0.JPG

ही लायलॅक हिमालयन अष्टर

IMG_20170819_153709595~01.jpg

शोबाजी करणारे आयन्यूला Happy Happy . हे बऱ्यापैकी मोठे होते.

IMG_20170819_153705421.jpg

हे बहुतेक बार्बेड फॉरगेट मी नॉट असावे

IMG_20170819_153848845~01.jpg

थेंबात उतरलेले आकाश

IMG_3999~01.jpg

आम्ही जाईपर्यंत स्नेक लिली फुलून गेली होती, तिला फळे धरली होती.

IMG_3298~01.jpg

एक मधला मोठा पूल क्रॉस केल्यावर छोटी छोटी गावे लागायला लागली. ह्या पुलाच्या ठिकाणी 2013 मध्ये महापूर येऊन सगळे वाहून गेले. आता तिथे संरक्षक बंधारे घालायचे काम सुरू आहे. घाटीत असताना पोर्टर सांगत होता की ढगफुटी झाली तेव्हा तो आणि अजून खूप जण घंगरियात अडकून पडले. खाली येणे अशक्य होते. शेवटी लष्कराने सुटका केली.

या वाटेवर खूप टपऱ्या भेटतात. आलू प्रॉठा वगैरे शहरी जिन्नस मिळायला लागतात. एका स्टॉलवर आम्ही फ्रुट चाट घेतला.

शेवटी चालून चालुन खूप वैताग आला. कधी एकदा वाट संपतेय असे झाले. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता, नाहीतर हाल झाले असते. चढताना जो चढ श्वास लावणारा ठरतो तोच उतरताना पावले व गुढग्याची वाट लावणारा ठरतो.

असे अनेक चढउतार करत शेवटी एकदाचे पुलना गाव आले. तिथे आमच्या बॅगा एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या. त्याचे पैसे वगैरे देऊन झाल्यावर तिथे वाट बघत असलेल्या ट्रॅक्समध्ये सगळे जाऊन बसायला लागले. प्रत्येक गाडीत दहाजन कोंबायचेच हा नियम असल्याने आमची दहा पंधरा मिनिटे गाड्यांमध्ये फिट होण्यातच गेली. पण कोणीही पुलना ते गोविंदघाट चालत जायचे नाव काढले नाही. Happy सगळे आत कोंबले गेल्यावर गाडी एकदाची सुरू झाली व अर्ध्या तासात लक्ष्मण सेतुला पोचली. रस्ता वळणाचा जरी असला तरी साधा होता. आणि अशा साध्या रस्त्यावरही एक गाडी चारी चाके वर करून रस्त्याच्या बाजूला पडलेली. तिला काढायचे काम सुरू होते. इथे एकूणच अनिश्चितता फार आहे.

लक्ष्मणसेतू पार करून गाडी आल्यावर इथेच उतरायचे की गोविंदघाटापर्यंत जायचे हा प्रश्न उभा राहिला. इथे उतरायचे तर पस्तीस रुपये, शेवटपर्यंत जायचे पन्नास रुपये. मला व सुरेशरमेशला शेवटपर्यंत जायचे होते पण काहीही कारण नसताना एक उतरतोय म्हणून दुसरा करत बाकीचे लोक भराभर गाडीतून उतरले. मुली उतरल्यावर मला उतरावे लागले. इथून जवळच तर आहे हे मुलींचे मत पडले. तीन दिवसांपूर्वी इथे यायला किती मोठी पदयात्रा केली होती हे विसरून गेल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.. जाताना जिथे पराठे खाल्ले तिथेच मुलींनी परत पराठे व मॅगी खाल्ली आणि आम्ही निघालो. मी एका म्हाताऱ्याला गोविंदघाट किती दूर आहे म्हणून विचारले तर तो म्हणाला एक किमी. त्याला बहुतेक नीट मोजणी येत नव्हती.

आम्ही तिथल्या बाजारातून म्हणजे दोन्ही बाजूला लावलेल्या स्टॉलमधून पदयात्रा करत निघालो. मुली प्रत्येक स्टॉलसमोर थांबून उगीच टाईमपास करत होत्या. सरदार घालतात तसली कडीसुद्धा तिथे विकत घेतली बहुतेक. पुढे गुरूद्वारा दिसल्यावर ग्रुपमधले दोघे तिघे आत गेले. मलाही जायचे होते, पण पोरी कसल्या जायला देताहेत?

ते स्टॉल्स अखेर संपले व आम्ही मोकळ्या जागी आलो. तिथे आल्यावर समोर किती चढण आपली वाट पाहतेय हे मला दिसले. तो रस्ता दिसल्यावर येताना बसमधून उतरून खाली किती उतरत आलो होतो ते मला आठवले आणि लक्ष्मणसेतुला गाडीतून उतरल्याचा भयंकर पश्चाताप झाला. हॉटेलात मला काहीच खायचे नव्हते, ना काही शॉपिंग करायची होती. गुरुद्वारात जाऊन लंगरही हाणता आला नाही आणि फुकट पदयात्रा मात्र गळ्यात पडली. अजून पंधरा रुपये देऊन मी एवढ्यात आरामात बसपर्यंत पोचले असते. मुलींना याचे काहीही सोयरेसुतक नव्हते. त्या दोघीही ठणठणीत होत्या व पाठीला सॅक लावून मजेत जात होत्या. मला मात्र एकेक पाऊल उचलताना ब्रह्मांड आठवत होते. त्यात वाटेत रस्त्यावर पाणी आलेले. दगडांवरून तोल सावरत जाणे एरवी सोपे असते पण मला खूप कठीण गेले. पुढे उभा चढ होता. प्रत्येक पावलाला दोन दोन मिनिटे थांबत मी कशीबशी एकदाची हमरस्त्यावर आले. शामली व ऐशु न कंटाळता माझ्यासोबत थांबत होत्या ते नशीब.

बस आमची वाट पाहात उभी होती. मुलींनी सामान डिकीत वगैरे टाकले व आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. मला कधी एकदा बद्रीनाथला पोहोचतो असे झाले होते. बद्रीनाथ तिथून फक्त पंचवीस किमी दूर होते, पण हिमालयाचे पंचवीस किमी म्हणजे आपले 250 किमी असे धरून चालायचे. सगळी मंडळी पोचल्यावर बस एकदाची सुरू झाली. जोशीमठवरून आम्ही पुढे निघालो. नकाशावर अंतर पंचवीस किमी असले तरी चार हजार फूट चढायचे होते, त्यामुळे सरळ रस्ता असा नव्हताच. नुसती वळणे, वळणे आणि अजून वळणे. बस आपली गोल गोल फिरत जाते. दिसणारा निसर्ग अर्थातच प्रेक्षणीय आहे.

वाटेत शिरस्त्याप्रमाणे दोन तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे खोळंबा झाला. तिथले रस्ते एकदम लहान असतात. समोरून दुसरी गाडी आली तर दोघेही संभाळून चालवतात एवढे लहान. मोठ्या बसेस तिथे पाहिल्या नाहीत. बहुतेक नसाव्यात, तेवढी जागाच नाहीये. जिथे लॅन्डस्लाईड होते तिथला रस्ता नष्ट होतो. जे काही खडकाळ शिल्लक राहते त्यावरून बस जाते तेव्हा आपण बोटीत आहोत असा भास होतो व जर ती बोट उलटली तर रस्त्याला चिकटून असलेल्या हजार फूट खोल दरीत रोरावत वाहणाऱ्या बर्फ़ाळ पाण्यात मोक्षप्राप्ती निश्चित.

माझ्या शेजारी बंगलोर मंडळाचे मामा बसले होते. त्यांची ही दुसरी बद्रीनाथवारी. इधर आनेके पहले सब कुछ घरवालोंके नामपे लिख देनेका हा सल्ला न विचारता त्यांनी दिला. आप लिखके आये क्या म्हणून मी विचारल्यावर हसत हो म्हणाले. चार दिवसांपूर्वी जोशीमठला असताना माझ्या डोक्यात पुढे कधीतरी केदारनाथही करुया असे आले होते. पण या प्रवासाचा अनुभव घेतल्यावर डोक्यातले धाडसी विचार आपोआप अस्तंगत पावले. (आता ते परत आलेत डोक्यात. परत घाटीत तर जायचेच पण सोबत छोटी चारधाम यात्राही करायची असे काहीसे फिरतेय डोक्यात. उबदार घरात सोफ्याच्या मऊशार सिंहासनावर बसलेला माणूस शूर, धाडसी व. व. असतो.

रच्याकने, केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री-बद्रीनाथ ही छोटी चारधाम यात्रा. बद्रीनाथ-रामेश्वरम-द्वारका-जगन्नाथपुरी ही बडी चारधाम यात्रा.)

तर अशी कोट्यवधी गोल गोल वळणे घेतल्यावर आम्ही साडेतीन चारच्या सुमारास एकदाचे बद्रीनाथला पोचलो. बद्रीनाथला युथ हॉस्टेलची स्वतःची जागा आहे. मोठ्या प्रशस्त जागी स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळ्या निवासात मोठ्या डॉर्मिटरीज, जेवणाचा वेगळा हॉल, मॅनेजरसाठी वेगळा बंगला कम ऑफिस वगैरे सगळे बांधले आहे.

इथे आम्ही दोन रात्री राहणार होतो. आमचा आजवर सुरू असलेला, युथ हॉस्टेलच्या भाषेतला फाईव्ह स्टार ट्रेक संपून आमचे पाय आता हळूहळू जमिनीला लागणार याची चुणून इथल्या वास्तव्यात आली. आजवर आम्ही हॉटेलात राहात होतो जे युथ हॉस्टेलच्या नियमांना धरून नव्हते. पण आज व उद्या डॉर्मिटरीत राहणार होतो व कॉमन टॉयलेट्स वापरणार होतो. हे युथ हॉस्टेलच्या नियमांशी सुसंगत होते.

गेल्या गेल्या डोर्ममध्ये आपापल्या जागा पकडून झाल्या. मी जो बेड निवडला त्याच्या शेजारी अजून एकच बेड खाली होता, तो ऐशूने पकडला. शामलीला समोरचा बेड मिळाला. बेड वगैरे सगळे व्यवस्थित होते, उशी, पांघरुणे होती. काकडून जायला होईल इतकी थंडी बाहेर होती. पावसाची बारीकमोठी भुरभुर सुरू होती. बेड पकडून सामान टाकल्यावर लगेच चहापानासाठी डायनिंग हॉलमध्ये बोलावले. तिथे चहा पिऊन झाल्यावर बद्रीनाथाचे दर्शन घ्यायला त्वरित निघायचे की उद्या संध्याकाळी दर्शन घ्यायचे याची चर्चा सुरू झाली. उद्या सकाळी उठून 5 किमी ट्रेक करून मानाला जायचे होते. माझ्यासारखे काही मेम्बर्स जे पार गठाळून गेले होते त्यांना कसल्याही चर्चेत रस नव्हता. पण इतर उत्साही मेम्बर्सनी आता लगेच जाणे योग्य हा मुद्दा मांडला. उद्या येताना उशीर वगैरे झाला तर मंदिर भेट चुकण्याची भीती होती. आता सहाच वाजत आले होते व मंदिर आठ की नऊ पर्यंत उघडे असल्याने आरामात दर्शन होणार होते.

माझा चेहरा आदल्या दिवसापासून सुजायला लागला होता व आतापावेतो सुजून भोपळ्यासारखा टम्म झाला होता. प्रचंड थकवा जाणवत होता. 'तुम्ही आता काहीही हालचाल न करता गुपचुप पडून राहा' असे ग्रुपलीडरने बजावले. तशीही कुठे ताकद राहिली होती माझ्या अंगात?

बद्रीनाथला गेल्यावर आपापले टॉवेल्स उचलून मंदिरात जायचे व तिथल्या तप्तकुंडात अंघोळ करून ट्रेकचा सगळा शीण घालवायचा असा सल्ला ऋषीकेशला मिळाला होता. तप्तकुंडात अंघोळ करायचेही एक टेक्निक आहे. एकदम पाण्यात शिरलात तर अंग भाजेल. म्हणून आधी फक्त पहिल्या पायरीवर बसायचे व पाय पाण्यात सोडायचे. पायांना गरम पाणी सोसायला लागले की दुसऱ्या पायरीवर सरकायचे. असे करत एकेक पायरी खाली सरकत गळ्यापर्यंत पाण्यात बसायचे. तुमचा सगळा शीण निघून ताजेतवाने वाटायला लागते. हे ज्ञान ऋषीकेशला टूर मॅनेजरसाहेबांनी दिले होते.

आजच मंदिरात जायचे ठरल्यावर सगळ्याजणी डॉर्ममध्ये कपडे घ्यायला परतल्या. ऐशु व शामली कपडे घेऊन इतरांबरोबर मंदिरात गेल्या व मी बेडवर पडले.

रात्री साडेआठच्या सुमारास भाविक परतले. ऐशूला विचारले तर ती म्हणाली की पाणी इतके प्रचंड गरम होते की पहिल्या पायरीवर बसणेही शक्य नव्हते. तिथे कुणाचीतरी बादली व मग त्यांना मिळाला, बादलीने कुंडातून पाणी आणून त्यांनी मगाने कुंडस्नानाचा आनंद घेतला. चिप्प ओले झालेले कपडे घेऊन मुली आल्या होत्या. निवासाबाहेर दोऱ्या बांधलेल्या होत्या कपडे वाळत घालायला. त्यावर कपडे दोन दिवस होते तसेच चिप्प राहिले. शेवटी हरिद्वारला एका रात्रीत वाळले.

रात्री जेवण करून परतलो तेव्हा डोर्ममध्ये असंतोषाचे वारे वाहत असल्याचे आढळले. आज दोन ग्रुप वस्तीला होते. आमच्या बिल्डिंगीत दोन हॉल होते. प्रत्येकात सोळा सतरा बेड होते. म्हणजे एकूण जवळ जवळ 30-35 बेड होते. आणि यांना मिळून सामायिक 4 टॉयलेट्स आणि 2 बाथरूम होते. असंतोष यावरून सुरू होता. इतक्या लोकांसाठी हे टॉयलेट बाथरूम पुरेसे नाहीत अशी बडबड आमच्या ग्रुपमधल्या काहीजणी करत होत्या. सर्व संबंधितांना शक्य तितकी दूषणेही देऊन झाली. दुसऱ्या ग्रुपचे काय मत होते देव जाणे. त्यांचे दर्शन फक्त जेवणाच्या वेळेस झाले होते. त्यांच्या ग्रुपमध्ये १०-१२ बायका होत्या, आम्ही १६ जणी होतो.

माझ्या मतेतरी काही प्रॉब्लेम नव्हता. युथ हॉस्टेल कित्येक वर्षे हा ट्रेक करतेय, काही प्रॉब्लेम असता तर त्यांनी काहीतरी उपाय केले असतेच.

बडबड करणारे सदस्य शेवटी कंटाळून झोपायच्या तयारीला लागले तेव्हा दुसरे संकट उभे राहिले. आधीच्या भागात लिहिलंय तसं बंगलोरकर ग्रुप जरा सॉफीसटीकेटेड होता व गुजराती ग्रुप नॉर्मल गुजराती होता :). ट्रेक सुरू झाल्यापासून बस मधला प्रवास सोडता कोणी कोणाच्या अध्यातमध्यात नव्हते, थेट संपर्क नव्हता. पण एका हॉल मध्ये सगळे राहणार म्हटल्यावर भांड्याला भांडे लागायला लागले. बंगलोरकर मुलींनी सगळे फटाफट आटपून बेड पकडले. त्यांना आता दिवे बंद करायचे होते. पण गुजराती मुलींची बडबड संपेना. त्यात आपले आवाज किती मोठे आहेत हेही त्यांना माहीत नव्हते. त्यांची आवराआवर संपेना. आम्ही बाकीचे लोक वैतागलो. इतर लोकांना झोपायचे आहे हे त्यांच्या गावीच नव्हते. तोंडाने बडबड, हाताने सामान आवरणे व एका मागोमाग एक मुलगी उठून टॉयलेटला जात होती. जाताना हॉलचा दरवाजा तसाच उघडा. त्यातून गार वारा आत येई, मग कुणी उठून तो बंद करी. मला तर शेवटी हसायला यायला लागले. एकजण सतत प्लास्टिकच्या पिशवीतून सामान काढघाल करत बसलेली, ती पिशवी इतका चुरचुर आवाज करत होती की शेवटी एक बंगलोरकरीन ओरडलीच. तास दीड तासभर हा गोंधळ चालू होता. शेवटी सगळे झोपले एकदाचे.

मला सवयीने सकाळी चारला जाग आली. मी आज कुठेही जायचे नाही असे ठरवले होते. पण जाग आल्यावर बाकीची पलटण उठायच्या आधीच मी उठून माझे आवरून घेतले. बाथरूममध्ये मोठा स्टोरेज गिझर होता. त्याचे गरम पाणी काढून अंघोळही करून घेतली. अंगदुखी थोडी कमी होईल म्हणून.

हळूहळू एकेकजण उठली. सगळ्यांचे व्यवस्थित आवरून झाले. काल रात्री प्रॉब्लेम्स होतील होतील म्हणून इतकी चर्चा झालेली, पण सकाळी काहीही प्रॉब्लेम झालेला दिसला नाही.

नाश्ता झाल्यावर डबा घेऊन बसने माना गावापर्यंत जायचे व तिथून 5 किमी ट्रेक करून वसुधारा धबधबा पाहायचा असा कार्यक्रम होता. माना हे त्या बाजूने भारतातील शेवटचे खेडे. पूढे काही किमी गेल्यावर चिनी बॉर्डर लागते. पांडव वनवासात असताना मानात राहिले होते. भीमाने नदीवरील पूल म्हणून टाकलेली शिळा याच भागात आहे.

मला थोडा ताप आल्यासारखे वाटत होते व तसेही आज ट्रेक अजिबात जमला नसता म्हणून मी बेडवर पडून राहायचे ठरवले. माझ्याकडे लक्ष द्यायला कोण नसणार म्हणून ऐशुने माझ्यासोबत राहायचे ठरवले. शामली ट्रेकला जाणार होती. बंगलोरकर ग्रुपने त्या येत नाहीत म्हणून ग्रुप लिडरला थेट सांगितले होते बहुतेक. कारण इथे त्या कोणाला काही बोलल्या नाहीत पण तयारीही करत नव्हत्या. गुजराती मुलींचा कर्कश आवाजात गोंधळ सुरू होता. मेकअप वगैरे सगळे आटोपल्यावर त्या सगळ्या गेल्या आणि त्यातल्या दोघी परत आल्या. तिकडे गाडीचा ड्राइव्हर हॉर्न वाजवत होता आणि इकडे एकजण बॅगेतून एकेक टॉप काढून तो अंगाला लावून कसा दिसतोय हे दुसरीला विचारत होती. फोटोत टॉप चांगला दिसायला हवा ही तिची काळजी तिच्या बडबडीवरून इतरांच्या लक्षात आली. पूर्ण ग्रुपला बाहेर खोळंबत ठेऊन फोटोत टॉप चांगला दिसायला हवा ही काळजी करणाऱ्या दिव्य मुलीला शेवटी मनासारखा टॉप सापडला व तो चढवून ती मैत्रिणीबरोबर गेली.

ती खोलीबाहेर पडताच बंगलोर ग्रुपने तिच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली. त्यांनी नंतर आरामात तयारी केली. त्यांच्या बोलण्यावरून जिथे ग्रुप गेला तिथेच त्याही निघाल्या हे माझ्या लक्षात आले. बसमधून जाता आले असते, पण गुजराती संसर्ग टाळायचा असणार. शेवटी तो ग्रुपही निघाला. त्यांच्यातली एक, जी नंतर लेहला महिनाभरासाठी जाणार होती, तिची तब्येत माझ्यासारखीच बिघडलेली. ती बिछान्यात पडून राहिली. तिचा नवराही गेला नाही. तिने भारी नाचवले त्याला दिवसभर. आणि बंगलोरकर दुसरे जोडपे, कुणाशीही न बोलणारे, तेही गेले नाही. ऐशूने अंघोळ आटपली व माझ्यासाठी गोळ्या आणायला म्हणून गावात गेली. ती आता इतकी फिट झालेली की बाहेर इतक्या थंडीतही ती टी शर्ट व शॉर्टस घालून फिरत होती. अशा तऱ्हेने सगळे गेल्यावर आमचा हॉल एकदम शांत झाला आणि मी निवांत झोपले.

बऱ्याच वेळाने जाग आल्यावर बघितले तर कुणाशीही न बोलणारी बेंगलोरी मॅडम चक्क शेजारणीशी बोलत होती. तिला युथ होस्टेलच्या ट्रेकबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे जेवल्यावर भांडी घासणे वगैरे प्रकारांना ती खूप वैतागली होती. परत कद्धी कद्धी म्हणून युथ हॉस्टेलच्या ट्रेकला येणार नाही हेही तिने जाहीर करून टाकले.

दुपार झाल्यावर मी माझा डब्बा खाऊन घेतला. आम्हाला दुपारचे जेवण मिळणार नव्हते, न जाणाऱ्यांनी आपापले डब्बे भरून घ्यावेत असे सकाळी सांगण्यात आले होते. ऐशु मस्त गाव फिरून, डोसा वगैरे चापुन आली होती. तिला बद्रीनाथ गाव खूप आवडले.

संध्याकाळी बऱ्याच उशिरा ट्रेकर्स परतले. शामलीने ट्रेकच्या गमती जमती सांगितल्या, गुजराती ग्रुपचे गॉसिप केले. सगळ्यात भारी म्हणजे बेंगलोरी ग्रुप त्यांच्या मागूनच फिरत होता, प्रायव्हेट टॅक्सी करून ते आले होते. आणि त्यांनी तिकडे ग्रुपच्या कुणाला साधी ओळखही दाखवली नाही, मग बोलणे तर दूरच.

दुपारी ऐशुने येताना एक डिप्रेसिंग बातमी आणली होती. आम्ही ज्या रस्त्यावरून काल आलो होतो त्या रस्त्यावर रात्री भली मोठी दरड कोसळली होती, जवळजवळ दोन किमी इतका रस्ता पूर्ण नाहीसा झाला होता व त्यामुळे आज सकाळी ऋषिकेशला निघालेला आमच्या आधीचा ग्रुप बद्रीनाथलाच अडकून पडलेला. ग्रुपमधली एक मुलगी ऐशूला गावात भेटली. ती म्हणाली की ज्यांची दुसऱ्या दिवशी फ्लाईट किंवा रेल्वेची तिकिटे होती ते लोक पुढे निघून गेले, जे वाहन मिळेल त्याने जाऊ म्हणत. बाकीचे मागे राहिले.

आता शामली म्हणाली की आधीच्या ग्रुपची बस यांच्या बसबरोबर परत आली. हे सगळे ऐकल्यावर परत कधी इथे चुकून आलोच तर बॅक टू बॅक तिकिटे बुक करायची नाहीत हे ठरवले. मध्ये एक दिवस जाऊ द्यायचा. इथे कसलाच भरोसा देता येत नाही. सगळे दैवाधिन. तशी आमची तिकिटे अजून दोन दिवसानंतरची होती, त्यामुळे तेवढे टेंशन नव्हते.

संध्याकाळपर्यंत मला थोडे हिंडता फिरता यायला लागले. देवळात जाऊन यायचे मनात होते पण ऐशूने नको म्हटले. पूर्ण आराम करच म्हणून ती ओरडायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी जे हाल झाले ते पाहता आराम केला ते बरेच झाले म्हणायचे.

जेवताना लोक जरा अस्वस्थ होते. रस्ता क्लीअर होण्यावर दोन्ही ग्रुपचे ऋषिकेश पोचणे अवलंबून होते. जोशीमठचे उत्साही कॅम्प लीडर इथे कालच आमच्या आधी पोचले होते. ते बिनदास्त सगळ्यांना रस्ता क्लीअर झाला म्हणून सांगत होते. उद्या आम्ही तुम्हा सगळ्यांना धाडून देणार आहोत, रस्ता क्लिअर आहे. काही जण हुज्जत घालत होते, 2 दिवस तरी काही होत नाही अशी बातमी आहे आणि तुम्ही म्हणताय क्लीअर झाला. मला ह्या सगळ्या प्रकरणात युथ हॉस्टेलने अशी भूमिका का घेतली व कॅम्प लीडर खोटे का बोलत होते हे शेवटपर्यंत कळले नाही. सगळ्यांची परतीची तिकिटे होती, कुणालाही बद्रीनाथमध्ये राहण्यात रस नव्हता, चार दिवस मुक्काम करण्यासारखे तिथे काहीही नाहीय. तुम्ही अगदीच कट्टर भाविक असाल तर गोष्ट वेगळी. अशा वेळेस जे खरे आहे ते सांगायला पाहिजे होते.

ट्रेकवरून आलेली मंडळी संध्याकाळी गावात गेली. हिंडून फिरून रात्री उशिरा परतली, येताना हादडूनही आली. त्यामुळे वातावरण परत थोडे गरम झाले. कारण आमचे जेवण बनवू नका हे कुणी सांगितले नव्हते. येताना आकाशगंगा दिसल्याचे शामलीने सांगितल्यावर मला थोडे वाईट वाटले. मी गेटबाहेर जाऊन काही दिसते का बघायचा प्रयत्न केला पण गार्डने बाहेर जाऊ दिले नाही. आत सर्वत्र दिवे होते त्यामुळे आकाश नीट दिसत नव्हते.

दुसऱ्या दिवशी साडेसहाला निघायचे असा फतवा निघाला. मी बॅगा भरून झोपले. नेहमीप्रमाणे उठून आन्हिके आवरून सहा वाजता नाश्ता घेतला, डबे भरून घेतले व निघण्यासाठी बाहेर आलो. कॅम्प लीडर आताही रस्ता क्लीअर झाला ही रेकॉर्ड वाजवत होते. त्यावरून दुसऱ्या ग्रुपमधल्या काही जणांचे त्यांच्याशी खूप जोरात वाजले. गुजराती मंडळाने सुद्धा त्यांच्याशी या विषयावरून भांडण करून घेतले. शेवटी सगळे आपापल्या बसमध्ये बसले व आम्ही निघालो.

बाहेर येऊन दोन तीनशे मीटर जात नाही तेवढ्यात रस्ता लाकडे टाकून अडवल्याचे दिसले. याचा अर्थ कोसळलेली दरड साफ केली नव्हती व बसला पुढे जायची परवानगी नव्हती. मग युथ हॉस्टेलने फक्त 300 मीटर जाण्यासाठी आम्हाला का बस मधून धाडले? त्यांचा एकूण एटीट्युड काहीही करा पण आमच्या हद्दीतून बाहेर पडा असा होता. असे वागणे असोसिएशनला अजिबात शोभत नाही खरे तर...

आम्ही बस मधून उतरून सामान घेईपर्यंत आमच्या ग्रुपने ट्रॅक्स ठरवल्या. बस न्यायला परवानगी नसली तरी ट्रॅक्सने दरडीच्या जागी जाता येत होते. तिथे ट्रॅक्सने जाऊन कोसळलेली दरड पायी क्रॉस करून पलीकडे जायचे व तिथून दुसरे वाहन करून ऋषीकेशला जायचे असा प्लॅन बनवला.

मला हा प्लॅन सोप्पा वाटला. कोसळलेली दरड क्रॉस करणे म्हणजे आपल्याइथे रस्त्याच्या कामासाठी ओतून ठेवलेली वाळू क्रॉस करण्यासारखे आहे असा समज मी का करून घेतला माहीत नाही. मला तेव्हा खरेच तसे वाटले. पुढे काय वाढून ठेवले होते याचा अजिबात अंदाज न येता मी ट्रॅक्समध्ये चढले.

पुढचा भाग: https://www.maayboli.com/node/65287

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो... मस्तम मस्त भाग..
एकही फोटो नसुन पूर्ण चित्र समोर उभ राहिलं डोळ्यासमोर..
आणि शेवटही कसला केलायस यार साधना तू.. लवकर सांग ना पुढ काय झालं ते..
या सार्‍यात ऐशु आणि श्यामलीचं खुप कौतुक वाटतय मात्र मला.. ऐशु अधे मधे घाटीचे फोटो शेअर करत असते इंस्टावर ते बघायला मज्जा येते..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..ए लवकर लिही गं.. उगा दरडीमुळे माझापन जीव टांगणीला लागलाय आता..

मस्त झाली सफर. तिथे असं दरडी वगैरे कोसळून जो खोळंबा होतो त्याने फक्त आपणच पॅनिक होतो असं माझं निरीक्षण आहे. तिथल्या स्थानिक लोकांना हे सगळं सवयीचं असल्याने ती कूल असतात.

केदारनाथच्या चढाईपुढे ही चढाई किस झाड की पत्ती आहे. घोड्यावरून जायचं म्हटलं तरी तसे हालच होतात (वेगळ्या प्रकारचे), त्यामुळे व्यवस्थित फीटनेस वाढवून जा.

हे ही छान लिहिलंय...
मी पुन्हा पुन्हा वास्तवदर्शी लिखाण म्हणतोय पण त्याच कारण हेच कि अशा प्रामाणिक लिखाणामुळे एखाद्या ठिकाणी जाण्याचा आपला पिंड आहे की नाही ते कळतं आणि त्या प्रमाणे जाण्याचा/न जाण्याचा निर्णयही घेता येतो.
जरी पिंड नसेल तरी ह्यातही मजा वाटली तर वस्तुस्थिती आणि सर्व Pros and Cons लक्षात घेउन जायचे ठरवू शकतो..
@ साधना, एका अतिशय प्रामाणिक लेखमालेबद्दल मनापासून तुमचे आभार..

मस्त लिहिलंस .
एकंदरीत तब्येतीने सगळं आखून राखून करायचा प्रवास आहे हा .

मस्त!
निरुंचा प्रतिसाद आवडला.

धन्यवाद मंडळी Happy

मी पुन्हा पुन्हा वास्तवदर्शी लिखाण म्हणतोय पण त्याच कारण हेच कि अशा प्रामाणिक लिखाणामुळे एखाद्या ठिकाणी जाण्याचा आपला पिंड आहे की नाही ते कळतं आणि त्या प्रमाणे जाण्याचा/न जाण्याचा निर्णयही घेता येतो.
जरी पिंड नसेल तरी ह्यातही मजा वाटली तर वस्तुस्थिती आणि सर्व Pros and Cons लक्षात घेउन जायचे ठरवू शकतो..
>>>>>>>

निरु, हे इतके शब्दबंबाळ लिहिण्यामागे हेतू हाच आहे.

जाणाऱ्यांना नेमकी वस्तुस्थिती कळावी व त्यांनी तेवढी तयारी करून जावे. जायच्या आधी valley बद्दल मी खूप कमी वाचलेलं कारण तेवढा वेळ नव्हता. पण जाणे येणे कितपत सोपे/कठीण आहे याबद्दल फारसे लिहिलेले आढळले नाही. मुद्दाम विकीवर शोधले नाही तर घाटी फ्लॅट जमिनीवर आहे की डोंगरावर हेही कळत नाही.

आज सगळी सिरिज पुन्हा वाचून काढतेय. हाही भाग आवडला. 'थेंबात उतरलेले आकाश' फोटो फार भारी आलाय. आणि तू जे घडलं तसं लिहिलं आहेस हे बरं केलंस. आपण एव्हढं सगळं झेलून जाऊ शकतो का हा विचार त्यामुळे प्रत्येक वाचक करेल. चेहेरा सुजण्यामागे काय कारण आहे ते कळलं नाही. अतिउंचीवरचा प्रवास का थंडी?