बिर्यानी

Submitted by द्वादशांगुला on 2 February, 2018 - 11:04

●○●○ बिर्यानी○●○●

रात्रीची कातरवेळ. सगळीकडे भयाण शांतता. मिट्ट काळोख. हाडं गोठवणारा गारठा. सगळीकडे सामसुम झालेलं. एक सुनसान काळोखा रस्ता. सावल्यांचा खेळ खेळून आतासा दमलेला. बस्स बर्याच वेळानं एखादा झिंगलेला बेवडा आपल्या अंगाचा उग्र दारुचा दर्प पसरवत पाय खेचत चालताना दिसत होता. काही मोकाट कुत्री रस्त्यावर एकमेकांशी भांडण्यात गुंतलेली होती. त्याच रस्त्याच्या एका कडेच्या खांबावरचा बल्ब मिणमिणत होता.त्या दिव्याखालच्या अंधारात ती अंगाचं मुटकुळं करून झोपली होती. ती इथं दोनेक वर्षं राहत होती, तिला घरातून हाकलवल्यापासून. ती सर्वांसमोर तोंड वेंगाडायची. कोणी जे देईल ते निमुटपणे खायची. आज ती अशी झोपली होती की कोणालाही वाटावं की ती गाढ साखरझोपेत आहे. पण हे खरं नव्हतं. ती टक्क जागी होती. तिनं झोपेचं सोंग हुबेहुब वठवलं होतं. ती डोळे मिटून बकध्यानस्त होती.

होय, ती आजूबाजूचा अंदाज घेत होती. कान टवकारून भोवताली येणार्या- जाणार्यांकडे लक्ष देत होती. सूक्ष्म आवाज, वास आपल्या मेंदूत नोंदवून आपल्या आपल्या ओळखीच्या बाबींशी त्यांची सांगड घालत होती. आपल्या जवळून कोणी येताना - जाताना जाणवलं की , आपल्या डाव्या डोळ्याची पापणी हलकेच वर करून आजूबाजूला चोरटा कटाक्ष टाकत होती. आपल्याला हवी ती व्यक्ती न आल्याचं पाहून चरफडत होती.

तिचं हे असं जवळजवळ दीड- दोन तास सुरू होतं. पण ना तिच्या कपाळावर आठ्या होत्या, ना चेहर्यावर वैतागाची पुसटशी रेषा. कारण ती आज कोणाचीतरी आत्यंतिक आतुरतेने वाट हघत होती. तिला हवी ती व्यक्ती अजून यायची होती. तिची इच्छा पूर्ण करू शकेल अशी ती व्यक्ती अद्याप आली नव्हती. ती सैरभैर झाली होती. आजुबाजूच्या इतर घटना तिच्याखाती अस्तित्वातच नव्हत्या. तिच्या मेंदूत होत्या फक्त तिच्यातल्या तिनं दडवलेल्या अन् हल्लीच कारंज्याच्या पाण्यासारख्या उफाळून आलेल्या सुप्त इच्छा आणि त्यांना जाज्ज्वल्य पाठबळ पुरवणारं तिचं दुहेरी मन...

तिच्या इच्छा आज भलत्याच विकोपाला पेटल्या होत्या. तिचं मन , तिचा मेंदू तिच्या इच्छेच्या ताबेदारीत होतं. तिच्या इच्छांनी आज तिच्या अंतर्मनाच्या मूल्यरूपी भिंतीची पडझड केली होती. तिच्या विवेकरूपी पडद्याची चिरफाड केली होती. तरी ती आनंदाच्या स्वप्नात मग्न होती. तिनं विवेकाचं गाठोडं जरा बाजूलाच सारून दिलं होतं., मुद्दामच. तिनं सारासार विचार करणं सोडून दिलं होतं. तिच्या इच्छा आज विवेकाहून वरचढ ठरल्या होत्या. का, याचं उत्तर तर तिलाही माहीत नव्हतं. बस्स इच्छांचा मागोवा घेत मन शमवायचं हेच तिच्या हाती होतं.

एव्हाना गस्तीचे पोलिस कधीच येऊन गेले होते. रात्र अधिक गडद झाली होती. रात्रीनं आपलं रूपडं बदललं होतं. ती मात्र यापासून अनभिज्ञ होती. जसाजसा वेळ सशाच्या गतीनं धावत होता , तसतशी तिच्या अंगीची हुरहुर वाढत होती. तिचं मन कुठंतरी कच खाऊ लागलं होतं. निश्चयाबद्दल तिचं मन अधिकाधिक साशंक होत होतं, अवचितपणे. निरभ्र वातावरण अचानक गढूळ होऊन जावं , असं काहीसं घडत होतं तिच्या मनात. तिचं चित्त थार्यावर नव्हतं. भरकटत चाललं होतं ते एखाद्या दोर तुटलेल्या पतंगासारखं. .......... कुठंही.....

तिचं एक मन तिला पूर्वायुष्याची आठवण करून देत होतं. हे जे ती करणारेय ते योग्य असेल का ? तिच्या तत्त्वांना अनुसरून हे मुळीच नव्हतं.कुठंतरी तिच्या मूलयांची पडझड नक्कीच होत होती. तिचं दुसरं मन तिला बजावत होतं, अगं, या भिकारड्या आयुष्यात कसली मसणाची आलीयंत तत्त्वं? आणि मूल्याचा पाठपुरावा करायला काय आपण राजा हरिश्चंद्राचे वंशज नाही. दुसरा कोणता उपाय आहे का तुझ्याकडे?....... अं...... नाही ना. . ..... अगं जेव्हा बुद्धीला पढवलेली मूल्यं जगण्याला उपयोगी नसतात नं, तेव्हा मनाचं ऐकावं. मनाच्या कंगोर्यात दडलेलं नं फक्त आपलं असतं. आपणहून समजलेलं, उमजलेलं अन गवसलेलं असतं. इतरांच्या अनुभवावरून, मतमतांतरावरून आलेलं नसतं ते.....

हो की ..... हे बरीक खरंय. तिला जगण्याची निराळी रीत सापडली होती. फक्त एकाच गोष्टीमागे धावायचं- इच्छा. आजही ती हेच करणार होती. तिचं ठरलं होतं अखेर. तिच्या मनातलं द्वंद्व अखेर थांबलं होतं. तिच्या इच्छेला भक्कम पाया मिळाला होता.

तिच्या मनात हे सारं सुरू होतं, इतक्यात तिला कोणाचीतरी चाहूल लागली. होय, ती व्यक्ती आली होती. तो सलीम होता. रात्रपाळीवरून तो लवकर परतत होता. त्याच्या हातात कसलीशी पिशवी होती. तिनं आपले कान टवकारले. अंग सरसावलं. आता ती वेळ आली होती. करायच्या कृतींची तिनं एकवार खात्री केली. तिनं अंदाज लावला, वेळ साधली अन् त्याच्या हातातल्या पिशवीवर झडप मारली. काहीच कल्पना नसलेला तो, दोन हात लांब भेलकांडला. हीच ती संधी साधत ती पिशवी तोंडात घेऊन तिनं पळ काढला. तो तिचा पाठलाग करेपर्यंत ती ठरवलेल्या जागी येऊन पोहोचली होती. तिला स्वतःचा अभिमान वाटत होता. मनातलं वादळ नाहीसं झालं होतं. तिनं एकवार तो घमघमाट नाकात भरून घेतला. रस्त्यावरच्या कुत्र्याचं जगणं जगत असलेली ती आज जवळजवळ दोन वर्षांनी बिर्यानी खाणार होती. .......

☆समाप्त☆

तळटीप-

खरंतर एका पाळीव कुत्रीला काही कारणास्तव रस्त्यावरचं जीवन जगावं लागतं, आधी मालकानं न चोरून, पळवून खायला शिकवलेलं असतं, पण बिर्यानी खायच्या प्रबळ इच्छेने ती वाटसरूच्या हातातली बिर्यानीची पिशवी पळवते, ही छोटी कथा. मात्र तिच्यावरच मानवी भावभावनांचे संस्कार करावेसे वाटले , अन् ही कथा आकाराला आली. थोडक्यात रूपककथेचा प्रकार. काही चुकले असल्यास दिलगिरी व्यक्त करते. Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद अभिषेक. Happy
मागच्या वेळी तुमची कथा वाचुन कॉफीची तल्लफ झाली होती यावेळी बिर्याणीची एकंदरीत तुमच्या कथा वाचने महागात पडतय. >>>>>>> Wink हा हा..... आणि हो, तुम्हाला काॅफीची तलफ आलेली तेव्हा मी काॅफी पित होते नि तुम्हाला बिर्यानीची तलफ आलीये तेव्हा मी बिर्यानीच खातीये....... Happy काय हा योगायोग............

मला खुप त्रास झालाय या कुत्र्यांचा. एक किस्से लिहायला घेतली तर कथा मस्त जमतील. माझ आणि त्यांच काय वैर आहे कुणास ठाऊक. एकेक वेळेला तर मी ऑफीस च्या गेस्ट हाऊस मध्ये रात्र काढतो. पण घरी जात नाही या भटक्या कुत्र्यांच्या भितीने.>>>>>>> बापरे.. एक अॅडवाईस देऊ का, तुम्ही एकदा दिवसा या कुत्र्यांना दहाचा पार्लेजी घेऊन खायला घाला. घाबरणं सोडून द्या. एकदाच घाला पण बिस्कीटं. नाहीतर घरपर्यंत पाठलाग करतील नि भल्या माणसाला माझ्या सल्ल्याने त्रास झाल्याचं पाप लागेल मला. .... Happy आणि जर काॅन्फिडंट होऊन त्यांना हाकललंत,, तर परत वाटेला येणार नाहीत.

त्या कुत्र्यांची पिल्लंही होती का आसपास. ? नाही म्हणजे येता जाता सहज चुचकारलं असाल नि पिल्लांच्या प्रोटेक्शनसाठी ती आक्रमक झाली असणार. असाच मलाही अनुभव आहे. एका रविवारी दुकानातून काहीतरी आणून चालत घरी परतत होते, तेव्हा सहज रस्त्यावरच्या गोंडस पिल्लाला कुरवाळलं, तेव्हा अचानक त्याची आई कुठूनशी अवतरली नि माझ्यावर भुंकायला लागली. मला जाऊनही देईना. मग थोड्या वेळाने लोकांचं रक्षण करायला प्रभु राम अवतरले, तशी माझं रक्षण करायला एक कोळीण अवतरली नि तिनं कुत्रीला हाकलवून मला वाचवलं. नंतरही ती कुत्री मला खुन्नस द्यायची ते वेगळं.

असो, पण माझे उपाय आजमावून बघा. न जाणो तुम्हाला सुखाचा प्रवास देऊ शकतील.

बिस्कीट ने नाही ऐकायची, चिकन किंवा मत्तन चा एकच पीस टाकायचा .. आपापसात भांडत बसतील, तुम्ही सुरक्षित.>>>>>> Happy Happy Happy
आणि मग तो पीस कुठल्या कुत्र्याने गटकावला नि त्यांची भांडणं संपली, की समोर कोंबडी वा बोकड पाहिल्यासारखं मागे लागतील ... आणि चिकनचा पीस कसा कॅरी करणार हो........... Happy Happy Wink

तरी सफल होऊ शकतो हा उपाय.

मला खुप भीती वाटते कुत्र्यांची

लहाणपणी चावलं होतं
पायला
तेव्हापासुन एखाद कुत्र माझ्याकडे बघुण गुरगुरलना तरी छातीत धडधडायला लागत

लहाणपणची ती भीती तो प्रसंग अजुनही जिवंत आहे

मनात कुठेतरी

अक्की, कुत्र्यांना घाबरणं सोडून द्या. रस्त्यावरच्या कुत्र्यांना जेव्हा दिसतं की तुम्ही घाबरताहात, तेव्हा ते अधिक आक्रमक होतात, आणि चवताळून चावतात वगैरे. एक आॅब्जर्व्ह करा हं , रस्त्यावरून नाॅर्मली जाणार्या , कुत्र्यांनी भुंकल्यास लक्ष न देणार्या माणसांना ते चावत नाहीत. त्रास देत नाहीत.

लहाणपणी चावलं होतं पायला>>>>>> अरेरे, इंजेक्शन्स घ्यावे लागले असणार. म्हणूनच भीती वाटते होय तुम्हाला. एखादा कुत्रा पाळून जाऊ शकते तुमची भीती. अथवा सोसायटीत येणार्या , वा घराजवळ भटकणार्या कुत्र्याशी दोस्तीही करू शकता.

Pages