डियर सँटा ... १०१ सेंट निकोलस ड्राईव्ह, नॉर्थ पोल, अलास्का

Submitted by rar on 29 January, 2018 - 11:51

मागच्याच रविवारची गोष्ट. मस्त हलकसं ऊन पडलं होतं. डिसेंबर महिना असल्यानं जितका असायला हवा तितका हवेत गारवाही होता. आणि निवांत दुपारी मी एका कॉफीशॉपमधे खिडकीच्या शेजारची जागा पटकावून, गरम गरम कॉफी पित, चित्र काढत बसले होते. ख्रीसमस अवघ्या आठवड्यावर आलाय हे सूचित करणारं जादुई वातावरण. एकदम हॉलीडे माहोल.

नोव्हेंबर मधे थँक्स गिव्हींग झाला की अजून शिजवलेली निम्मी टर्की पोटात आणि निम्मी फ्रीज मधे असतानाच ख्रीसमसचे वेध लागतात. उन्हाळ्यात गाड्यांच्या टपावर सायकली, कयाक जशा बांधलेल्या दिसतात त्या जागी आता दोर्‍यांनी ख्रीसमस ट्री बांधलेल्या गाड्या गावात दिसायला लागतात. मॉल, कॉफी शॉप, रोजच्या ग्रोसरीची दुकानं ते जिम सगळीकडे 'ख्रीसमस कॅरोल्स' चे सूर कानावर पडायला लागतात. एकूणच 'इट्स द मोस्ट वंडरफूल टाइम ऑफ द ईयर' च्या खुणा जागोजागी.

मी ज्या कॉफी शॉप मधे बसलीये, त्याच्या समोरच खास हिवाळ्यासाठी 'बर्फावरचं स्केटींग' करण्यासाठी 'आईस रिंक' तयार केलंय. महिन्याभरापूर्वी ह्या जागेत लोकं कॉफी पित बाहेर बसायचे, योगा करायचे किंवा गेम खेळायचे ह्यावर विश्वासही बसणार नाही, इतक्या बेमालूमपणे आता तिथे 'आईस रिंक' तयार केलंय. लहान पोरं, कधी त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील, काका मावश्या सगळे एकत्र येऊन स्केटींग करताहेत. आजी-आजोबा बाजूला उभं राहून नातवंडांकडे कौतुकानं पाहताहेत, फोटो काढताहेत. तरूण पोरं, पोरी मित्रमैत्रीणींबरोबर येऊन मस्त दंगामस्ती करत स्केटींग करताहेत, सेल्फी काढताहेत असा सगळा मस्त माहोल मी एकीकडे चित्र काढता काढता बघत होते.

तितक्यात पाच सहा वर्षाची एक लहान मुलगी गुबगुबीत जॅकेट, गुलाबी रंगाची बाजूला दोन वेण्या आणि गोंडा असलेली कानटोपी आणि हातात थंडीचे मोजे घालून कॉफी शॉप मधे आली. ती तिच्या आईवर खूप चिडली होती. थंडीनं किंवा रागानं तिचे गुबगुबीत गाल लाल लाल झाले होते.
'तिच्या मोठ्या बहिणीला एकटीलाच स्केटींग का करू दिलं आणि तिला का जाऊ दिलं नाही' यावरून ती आईवर रूसली होती. आणि तिची आई तिला 'तू अजून लहान आहेस, तुझ्या मापाचे लहान स्केट्स त्यांच्याकडे नाहीयेत. तू पुढच्या वर्षी मोठी झालीस की तूला पण स्केटींग करता येईल' असं सांगून तिची समजूत काढत होती.

मग तिच्या आईनं तिला बॅगमधून काढून एक कागद आणि कलरींग करायला स्केचपेनचा सेट दिला. ती मुलगी आता एका जागी बसून काहीतरी चित्र काढायला लागली, आणि आई तिच्यासाठी केक, आणि स्वतःसाठी कॉफी आणायला रांगेत उभी राहिली.
थोड्यावेळानं त्या छोट्या मुलीला काय वाटलं काय माहित. ती तिचा हातातला कागद घेऊन माझ्याशेजारी येउन बसली.
मी देखील मधून मधून स्केटींग करणार्‍या लोकांना बघत होते आणि चित्र काढत होते. कदाचित तिच्यासारखंच कोणी आहे, जिला स्केटींग करायला जाऊ न देता चित्र काढायला बसंवलंय असं त्या मुलीला वाटलं असणार.
तिनं मला चित्र काढलेला तो कागद दाखवला. त्यावर तिनं एक छोटासा ख्रीसमस ट्री, त्याच्या शेजारी स्केटींग शूज सारखं दिसणारं काहीतरी, आणि सँटाची लाल टोपी काढली होती. आणि तिनं तिच्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत, सुट्या सुट्या अक्षरात सँटाला पत्र लिहिलं होतं -
डीयर सँटा, माय विश लिस्ट - १. मला माझ्या बहिणीसारखं लवकर मोठं कर
२. स्केटींग शूज. 
असं काहीसं ते पत्र होतं .
ते चित्र आणि पत्र वाचून मी तिला 'व्हेरी नाईस' असं म्हणले आणि पुढे अगदी सहज म्हणून गेले की ' तुला माहितीये का, या उन्हाळ्यात मी सँटाच्या घरी गेले होते'.
मी ते वाक्य म्हणता क्षणी एखाद्या बाहुलीचे डोळे उघडावेत, तसे तिचे निळे डोळे कमालीचे चकाकले. आणि आश्चर्ययुक्त नजरेनं, विस्फारलेल्या डोळ्यांनी ती 'ह्या सँटाच्या घरी गेलेल्या व्यक्तीकडे म्हणजे माझ्याकडे' बघतच राहिली. मग मी तिला सँटाचं घर कुठे आहे, कसं आहे ते सांगीतलं. हे ऐकताना तिनं उगाचच बोटानं माझ्या हाताला हात लावून ' मी खरीखुरी व्यक्ती आहे ना' असं चाचपून बघितलं असावं असं मला वाटलं.
तिनं प्रचंड निरागसपणे 'माझं पत्र सँटा वाचेल का?" असा मला प्रश्न विचारला आणि मी ही 'हो, नक्की वाचेल की' असं म्हणून गेले. तिच्या डोळ्यातला आनंद मला जाणवला. 
...... तिचं पत्र सँटा वाचेल की नाही याबद्दल खरं तर मला खात्री नव्हती. पण 'सँटाला आलेली अशी अनेक पत्र' सँटाच्या घरी गेल्यावर मी मात्र नक्की वाचली होती त्याची मला आठवण झाली. 

जुलै २०१७ मधे अलास्काला गेले असताना असताना, नॉर्थ पोल ला जायचा प्लॅन ठरला. हे 'नॉर्थ पोल' म्हणजे सँटा राहतो ते गाव. अलास्का मधल्या फेअरबॅकस जवळ असलेल्या या गावात " १०१, सेंट निकोलस ड्राईव्ह, नॉर्थ पोल, अलास्का " हा सँटाच्या घराच्या पत्ता शोधत शोधत आम्ही पोचलो. गावं एकदम छोटंस, टुमदार. आणि सँटाचं घर हीच या गावाची महत्त्वाची ओळख.

घराचा लाकडी दरवाजा उघडला आणि नार्निया वगैरे सिनेमात दाखवतात तसा 'हे दार उघडल्यावर एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश होतो" तसं काहीसं फीलींग आलं. दरवाज्याच्या अलिकडे बाहेर जुलै महिना होता आणि जणू काही पलिकडे डिसेंबर. वेगवेगळ्या साईझेसचे ख्रीसमस ट्री. त्यांना सजवण्यासाठी प्रचंड विविधता असलेले, कलाकुसर केलेले डेकोरेशन ऑरनामेंट्स, झुंबरं, ख्रीसमस कँडी केन, रेनडियरच्या टोप्या, गिफ्ट्स.... आणि गंमत म्हणजे विविध आकाराचे, नानाविध भूमिकेतले सँटा. अगदी सगळ्यांना परिचित असलेला आठ रेनडियरच्या गाडीवर बसून येणारा सँटा ते पुस्तक वाचणारा सँटा, हायकिंग करणारा सँटा, नदीकिनारी निवांतपणे मासे पकडणारा सँटा किंवा ब्लॅक सँटा! आपल्याकडे गणपतीच्या दिवसात विविध भूमिकेतल्या, विविध पोषाख केलेल्या गणपतीच्या मूर्ती असतात त्याची पटकन आठवण आली.

ह्या विविध रूपातल्या सँटाइतकीच मी तिथे अजून एक गोष्ट खूप एंजॉय केली ती म्हणजे जगभरातून मुलांनी सँटाला पाठवलेली पत्र. त्या पत्रातल्या इच्छा, त्यातला निरागसपणा, क्वचित घरातल्या किंवा आजूबाजूच्या कोणा मित्रमैत्रिणीविषयी केलेल्या तक्रारी आणि सँटानं गिफ्ट दिलं तर चांगलं वागण्याचं त्याला दिलेलें प्रॉमिस. हे सगळं वाचताना मला कुठेतरी त्या लहान वयातला 'सँटा नावाच्या एका प्रेमळ आजोबांवर' असलेला विश्वास जाणवत होता. सँटा काय किंवा टूथ फेअरी काय ... हा असा काही काही दंतकथांवर किंवा कॅरॅक्टरवर इतका निरागस विश्वास ठेवणं केवळ लहानपणीच, त्या त्या वयातच शक्य असतं अस वाटलं. 

माझ्या लहानपणी सँटानं अजून पुण्यातला लकडी पूल ओलांडला नव्हता, आणि तो डेक्कन जिमखाना, प्रभात रोड किंवा कोथरूडपर्यंत आला नव्हता. त्याला पहायला आम्हाला पुणे शहराच्या दुसर्‍या टोकाला म्हणजे कँप पर्यंत जावं लागायचं. अगदी लहानपणी आई-बाबा जसे गणपती पहायला, विसर्जन मिरवणूक पहायला घेऊन जायचे, तसंच २४ डिसेंबरला रात्री ख्रीसमसचं वातावरण पहायला कँपमधे घेऊन जायचे. चालून पाय दुखायला लागले की बाबांच्या खांद्यावर बसून इस्ट स्ट्रीट वरची रोषणाई पाहणं, चौका चौकात उभे असलेले वेल्वेटी लाल ड्रेस घातलेले, डोक्यावर पांढर्‍या गोंड्याची लाल निमुळती टोपी घातलेले सँटा पाहणं आणि रस्त्याच्या मध्यभागी टांगलेली भलीमोठी चांदणी पाहणं हा तेव्हाचा ख्रीसमसचा अपूर्व आनंद असायचा. त्या काळी ड्रेस किंवा फ्रॉक घातलेल्या आईच्या वयाच्या स्रीया फक्त सिनेमात तरी पहायला मिळायच्या किंवा कँप मधे ! पुढे आई-बाबांच्या ऐवजी ख्रीसमसमधे मित्रमैत्रीणींबरोबर कँप मधे जाणं चालू झालं, कधी कोथरूड पासून मजल दरमजल सायकल मारत तर नंतर दुचाकी वाहनावरून. कॉलेजच्या वयात कँपमधे ख्रीसमस पहायला, धमाल करायला जाणं म्हणजे त्या निमित्तानं मला मित्रांच्या कावासाकी, यामाहा किंवा राजदूत ह्या बाईक्स चालवायला मिळायच्या. माझ्यासाठी हा आनंद सँटानी दिलेल्या प्रेझेंटइतकाच अपूर्व होता.

जोपर्यंत कँपमधला सँटा लक्ष्मी रोड वर आणि त्याही पुढे जाऊन पुण्यातल्या अनेक नातेवाईंकांच्या घरात येऊन पोचला, तोवर मी पुण्यातून अमेरीकेला आले होते. विद्यार्थी असण्याच्या फेज मधे असताना, कशीबशी दोनच चॅनेल दिसणार्‍या जुन्या टीव्ही वर, हवामान चॅनेल किंवा बातम्या चॅनेल वर २४ डिसेंबरला संध्याकाळपासून 'नॉर्थ पोल वरच्या त्याच्या घरातून निघालेल्या सँटाचा प्रवास कुठवर आला आहे' ह्याबद्दल दर दोन तासाने अपडेट ऐकण्याचा अनुभव चमत्कारीक रित्या मजेशीर वाटणारा होता. गेल्या दहा वर्षात त्याची जागा आता 'फोनवरच्या अ‍ॅप्सनी किंवा गुगलच्या 'सँटा ट्रॅकर' ने घेतली आहे' सँटा नॉर्थ पोल हून कधी निघाला, कुठवर आला, तो तुमच्या गावापासून किती दूर आहे, तुमच्या गावात कधी पोचेल अशी लाइव्ह माहिती आता ह्या अ‍ॅप्सद्वारा मिळते.

माझ्या लहानपणी जरी मी सँटाला पत्र लिहून त्याच्या नॉर्थ पोलच्या पत्त्यावर पोस्ट केलं नसलं, तरी एकूणच 'नॉर्थ पोल म्हणजे सँटाचं घर' हे समीकरण मनात कुठेतरी पक्कं होत गेलं. त्यामुळेच अलास्का मधे असताना, वाकडी वाट करून का होईना पण 'दर वर्षी नेमानं आपल्या सगळ्यांच्या घरी येऊन, आपल्या इच्छा पूर्ण करणार्‍या सँटा आजोबांना एकदातरी त्यांच्या घरी जाऊन भेटावं' असा एक विचार मनात आला आणि आनंदाबरोबर एक वेगळंच समाधानही देऊन गेला !

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

पूर्वप्रकाशित (डिसेंबर, २०१७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aha,
छान लिहिले आहात,
मला सुद्धा santa प्रकार खूप आवडतो,
ख्रिसमस ला बांद्रा किंवा पुण्यात कॅम्प मध्ये एक चक्कर हमखास असतेच Happy
टीपीकल ख्रिसमस magic चे movies असतात ते सुद्धा खूप आवडतात,
शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

मस्त! आवडले

लहानपणी सांता व ती तारेवरची मोठी चांदणी फक्त खडकीबझार ला बघितले, कारण तेव्हा एमजी रोड/इस्ट स्ट्रीट वगैरे वर जायचो नाही.

हे नॉर्थ पोल नावाचे एक गावच अलास्कात आहे हे माहीत नव्हते.