काही चित्रपटीय व्याख्या

Submitted by फारएण्ड on 28 January, 2018 - 23:10

संशोधनातील पुढचा भाग, खास लोकाग्रहास्तव. आधीच्या संशोधनाची लिन्क इथे आहे. गाणी वगैरे ऐकताना तेरी मैफिल मे वगैरे ऐकल्यावर लोकांना म्हणजे नक्की कोठे असे प्रश्न पडतात. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.

तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या.

फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्‍याकडे नसते. घेणार्‍याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट. लोक एकतर फूटी कौडीही देत नाहीत, नाहीतर सगळी जायदाद देतात. पण जायदाद पैकी फूटी कौडीही न दिल्याने गेली अनेक द्शके पिक्चर्स मधे झालेला झालेला हिंसाचार केवळ एखादी फुटकी का होईना कवडी देऊन थांबवता आला असता का यावर संशोधन व्हावे. म्हणजे जाउ दे त्याच्या/तिच्या बापाने किमान एक फुटी कौडी तरी दिली आहे तेव्हा आपण जायदाद हस्तगत करण्याचे प्रयत्न शांततामय/संवैधानिक मार्गाने करू असे ते चित्रपटातील व्हिलन-मामा वगैरे म्हंटले असते का वगैरे. त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला कोणी चिडलेला चेहरा घेउन भेटायला आला तर जरा त्याला आधीच ४-५ फूटी कौडियाँ देउन मगच आत पाठव अशी एक जनरल प्रोसेस सेट करून ठेवली असती, तर तो त्या भारी सीन ला अमिताभची 'आज मै आपसे पाँच लाख का सौदा कर रहा हूँ, और मेरे जेब मे पाँच फूटी कौडियाँ भी नहीं है' वगैरे डॉयलॉगबाजी टोटली नलीफाय करू शकला असता. तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे.

मौला:
हे लोक प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात."ती" ने एकदा हसून बघितल्यावर जर पुढच्या वेळी तिने बघितले नाही तर डायरेक्ट एकदम "मेरे मौला मेरे मौला, देदे कोई जान..." वगैरे विव्हळणारे प्रेमी जीव असतात त्यांच्यासाठी फॅमिली मौला नावाची संस्था आस्तित्वात येणे आवश्यक आहे अशा प्रसंगी कन्सल्ट करायला. प्रत्येक जण "मेरे मौला" म्हणत असल्याने प्रत्येकाचा एक स्वतंत्र मौला असावा. फॅमिली डॉक्टर, टॅक्स कन्सल्टंट, लीगल अॅडव्हायजर असतात तसे. मग लग्नाच्या आदल्या दिवशी याचा मामा तिच्या मामाला भेटून ओळख करून घेतात तशी दोघांकडचे मौला एकमेकांना भेटवत असतील. तसेच सगळे मौला या कामाला लागले तर जागतिक शांतताही होउ शकते हा दुसरा फायदा. मात्र यांनी अनेक शतके धर्माच्या बाबतीत जे केले त्यावरून आता प्रेम ही संस्था धोक्यात आहे हे नक्की

सजदे:
अस्सल मराठी लोक प्रेमात पडले की "ती"ला मिळवण्याकरिता हे करतात. उदा: 'खट्टा मीठा' मधे टिचकुले आडनावाचा मुलगा व गणपुले आडनावाची मुलगी प्रेमात पडतात तेव्हा सजदे करतात, दुवाँ मागतात. मात्र प्रदक्षिणा जशी एखादी घालून चालते तसे याचे नाही. हे एखाद्या किंमत कोसळलेल्या चलनाप्रमाणे एकदम लाखो मधे करावे लागतात.

दुनियावाले:
सरकारच्या 'वजने व मापे' विभागाकरता प्रेम मोजण्याचे काम हे लोक करतात. कसे कोणास ठाउक पण जगात सर्वात जास्त प्रेम कोणी केले हे यांना कळते. एरव्ही हे प्रेमी लोकांना विरोध करणे, त्यांच्यावर जळणे, त्यांची अनावश्यक खाजगी चौकशी करणे ई. कामे करतात. गजलयुक्त गाण्यांमधे 'वो'/'उनको' वगैरे उल्लेख आले आणि ते लीड पेअर पैकी कोणाला चपखल बसले नाहीत, तर नक्कीच यांच्याबद्दल असतात.

बाजा:
राजा लोकांचे अत्यंत नावडते वाद्य.

प्रेमाच्या तीन लेव्हल्सः
या लेव्हलच्या नावात जितके "जा" व "ने/ना" येतील तितक्या जास्त असतात. जा चा उच्चार ज्या सारखा.
उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना
अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.

पुस्तकः
बापाने 'जी ले अपनी जिंदगी' म्हंटल्यावर ट्रेन ने फिरायला निघाल्यावर गाडी पकडल्या पकडल्या जराही खिडकीबाहेर सुद्धा न पाहता पहिल्यांदा उघडतात ती वस्तू. किंवा कोणाला आपले शहर दाखवायला नेताना सुद्धा बाजूला वाचत बसतात - लहान मुलाला पार्क मधे घसरगुंडी वर सोडून आपण बाकड्यावर वाचत बसावे तसे. जज किंवा प्रोफेसर चे घर असेल तर जितकी पुस्तके असतील तितकी सर्वांना सारखे कव्हर घालून मागच्या शेल्फ मधे बरोब्बर बसली पाहिजेत. पुस्तके कशाचीही असू शकतात. हीरो इंजिनिअरिंग करत असेल तर 'इंजिनिअरिंग' चे पुस्तक असते. तो शेर मारत असेल तर त्याच्या शायरीचे असते. जरा आणखी गहन काहीतरी असेल तर उपन्यास असतो. हीरो चा "कारोबार" असेल तर एकाच शेल्फ वर Principles of Physiology, Thesaurus आणि Advertising Management शेजारी शेजारी असावीत.

पियानो:
कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य

मैफिल:
मैफिल हे साधेसुधे काम नव्हे. सर्वसाधारण मराठी स्त्रियांचे मंगळागौर, हळदीकुंकू जशा रिच्युअल असतात तशा बडे खानदान की लडकीयोंकी अशी एक रिच्युअल असते. उसकी मैफिल. "तेरी मैफिल मे..." असे स्पष्ट उल्लेख असलेली अनेक गाणी अभ्यासून हेच लक्षात येते.

लोकेशनः एक मोठा हॉल. मागे दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असतील तर उत्तम, नाहीतर किमान मधे एक मोठा जिना असावा. हॉल च्या मध्यभागी एक पियानो.

पात्रयोजना अशी हवी:

हीरॉइनः कालानुसार मेकअप, किंवा विसंगतही चालेल. गाणार्‍या व्यक्तीच्या समोर गाणे कळत असल्याची अॅक्टिंग करावी लागते. तसे दिग्गज गीतलेखक कधीकधी फेल-सेफ ओळी लिहीतात, म्हणजे "न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" यात अभिनय करू शकणारी हीरॉइन ते बरोबर दाखवेल, तर न करू शकणार्‍या हीरॉइनला या ओळीला वेगळे काही करावेच लागणार नाही. त्यामुळे एक साधारण रडका चेहरा इतपत तयारी पुरते. दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आधी कसमे वगैरे खाउन मग लाथाडलेल्या गरीब हीरोला स्वतःच्या मंगनीच्या मैफिलीत बोलावून त्यालाच गायला सांगणे इतकी "आ बैल" गिरी करता यायला हवी.

गरीब हीरो: हा गरीब असल्याने हीरॉइन त्याला पूर्वी दिलेल्या शपथा वगैरे विसरून दुसर्‍याबरोबर लग्न करणार आहे, असा त्याचा समज असतो. हा रोल करायचा असेल तर तीन गुण अत्यावश्यकः १. गरीब असणे २. पियानो फिल्मी स्टाईलने वाजवता येणे (वरती पियानोची व्याख्या पाहा) व ३. एक रडके गाणे अचानक म्हणता येणे. मैफिलीत अचानक गाण्याची ऑर्डर मिळून सुद्धा एक विरहगीत एकदम तयार असायला हवे. पेपरवाले जसे कोणी आजारी पडले की एक श्रद्धांजलीपर लेख तयार ठेवतात तसे मैफिल चे आमंत्रण आले की विरहगीत खिशात ठेवूनच निघावे. दुसरे म्हणजे "Dude, this occasion is not about you" याची अजिबात फिकीर न करता हिरॉइन चा वाढदिवस असेल किंवा मंगनी किंवा लग्न, तेथे आपली रडकथा सादर करता यायला हवी. ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी.

हीरॉइनचा बापः या मैफिलीचा निर्माता. कारण ही अवस्था त्याच्यामुळेच निर्माण झालेली असते. चिरूट ओढत इकडेइकडे गर्वाने बघत फिरणे हे मुख्य काम

श्रीमंत बकरा: तो श्रीमंत आहे हे दाखवायला सूट घातला की झाले. अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्‍या हालचाली करणे. चालू असलेले गाणे कोणाबद्दल आहे कोणास ठाऊक असे एक्स्प्रेशन्स पाहिजेत. हीरॉइनच्या व याच्या अगदी in your face येउन बेवफाई, मेरे आँसू, गरिबी, चाँदी सोना विरूद्ध प्यार भरा दिल वगैरे गाणारा हा हिचा नक्की कोण आहे. इतक्या चांगल्या प्रसंगात हा हे काय गातोय वगैरे प्रश्न डोक्यात जराही आलेले दिसलेले चालणार नाहीत.

मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्‍यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक.

बाकी उपस्थित जनता: पूर्वीच्या डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सारखे जागा मिळेल तेथे बसलेले किंवा उभे. दोन बोटांत वाईन किंवा इतर दारूचे ग्लास धरलेले, मठ्ठपणा हा मुख्य गुण. म्हणजे गरीब हीरो ने "तेरी बेवफाई का शिकवा करू तो..." हे हॉल च्या मध्यावर रडका चेहरा करून उभ्या असलेल्या हीरॉइनकडे बघत म्हण्टले तरी त्याला "कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?" असे विचारण्याइतके अज्ञान पाहिजे. येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला?

तसेच आपल्या मागच्या तीन पिढ्यांमधले टोटल उर्दू नॉलेज हे पुलं म्हणतात तसे "हमारे बगीचे मे पैदा हुआ फुलदणाणा" च्या पुढे गेलेले नसेल तरी "खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया", किंवा " एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है" सारखी डबल-ए बॅटरी पॉवर्ड उर्दू वाक्ये आपल्याला समजली आहेत अशा थाटात माना डोलावता आल्या पाहिजेत.

यातली कोणतीही गोष्ट जमणार नसेल तर मैफिलीच्या नादी लागू नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त Rofl

असा व्यासंग करायची इच्छा आहे Happy

ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी
>>>
यातली प्रत्येक लिंक जबरदस्त. मुळात ही गाणी लक्षात येणे हीच महान गोष्ट आहे.

परवा एक अक्षय कुमारचा सिनेमा ओझरता पाहिला. त्यात पन्नाशीतला अक्षय कुमार विद्यार्थी आहे. तो एकदम ऑक्स्फर्ड वा केंब्रिज सारख्या दिसणार्‍या कालेजात क्लासरूममध्ये पळत पळत निघालेला असतो. तो पोचतो तर क्लासरूमचा दरवाजा बंद व त्यावर 'कॅल्कुलस' अशी पाटी Proud

लिंक्स अशक्य भारी आहेत. मेरी भीगी भीगी सी पण चाललं असतं ' थेट आणि सभ्य' मधे. थेट आणि अपमानास्पद फारच अपमानास्पद आहे Lol हे गाणं मला माहितच नव्हतं.

Lol मस्त लिहिलंय.

बहुतांश वेळा मैफिलीत रडकी गाणी हिरो लोक हिरॉईनला उद्देशून, पियानो बडवून गात आहेत, हे पाहून वहिदा रेहमानने च्यालेंज घेतले व 'रंगीला रे' हे डान्सयुक्त प्रेमभंगगीत सादर केले. त्यात बाकी जनता ती जणू काही 'डान्स इंडिया डान्स'ची ऑडिशन देतेय अशा थाटात हातात ड्रिंक घेऊन तिचा नाच बघत राहते, शिवाय ती नाचत नाचत आपल्या बाजूला आली की तत्परतेने जागा मोकळीदेखील करून देते. https://youtu.be/EPYXZUFs8cc

Happy जबरदस्त... लोकेशनमध्ये भव्य लटकते झुंबर राहिले आहे , क्वचित एखादे कारंजेपण..

व्हायोलिनची पण व्याख्या हवी, गरीब हिरो ह्यात पण तरबेज असतो बरेचवेळा Happy

त्या वरच्या गाण्यांच्या कॅटेगरीत उप-कॅटेगर्‍या करता येतील.
थेट हिरवीनला उद्देशून: तेरी गलियों मे ना रखेंगे कदम आज के बाद
हिरवीन या ऑब्जेक्टच्या भोवती : उदा. तू पसंद है किसी और की, तुझे चाहता कोई और है. या गाण्यात पुजा भट्टला काय वाटते, कोण आवडते हे गौण आहे.
स्वतःला शिव्या घालणारी गाणी (हिरॉइनला वा नशीबाला क्लिन चिट): या दिल की सुनो दुनियावांलो
स्वतःच्या नशीबाला शिव्या देणारे: जाने वो कैसे, लोग थे जिनके, प्यार को प्या मिला
तिसरच कुणीतरी गातं वा नाचतं: यात हेलन, बिंदू वगैरे कामाल येत असत. नवीन जमान्यात साइडला पडलेल्या हिरविणी. धडकनमधले 'अक्सर इस दुनिया में, अंजाने मिलते है' वगैरे वगैरे
डोन्ट गिव अप कॅटेगरी: अगदी मैफिल गाणे नसले तरी वर्च्युअल मैफिलीत सुनिल शेट्टी "दिल ने ये कहा है दिल से" या गाण्यात शिल्पा शेट्टीला मी तुला मिळवूनच राहीन याचे साभिनय प्रात्यक्षिक देतो. "तेरी बांहोसे तेरी रांहोसे, युं न जाउंगा मै. ये इरादा है, मेरा वादा है, लौट आउंगा मै" यात सुनिल शेट्टी हाताकडे बघून जे काही करतो ते तोच करू जाणे.

अजून एक कॅटेगरी म्हणजे पियानो वाजवतो हिरवीनवर प्रेम करणारा हिरो नं.२ (वा विलन) पण गाणं म्हणतो मेन हिरो. अर्थात हिरवीन इकडे तिकडे बघत भंजाळलेली. उदा. मोहरातले "ऐ काश कही ऐसा होता, के दो दिल होते सीने में"
यात नसिर पियानो वाजवतो, अक्षय कुमार गातो व रवीन भंजाळते.

एपिक कन्फुजन आणि युनिवर्सल लिरिक्स (म्हणजे कुठलेही कडवे त्रिकोणातल्या कुणीही म्हणावे): ओ मेरे सनम, ओ मेरे सनम. दो जिस्म मगर इक जान है हम

खल्लास !!
डबल-ए बॅटरी Rofl
कणेकरांची फिल्लमबाजी आठवली. त्यांच्या 'हैसियत', 'खैरियत', "खानदान की इज्जत", "बाप", "आई" (.. मुलापेक्षा निदान आठवड्याने मोठी दाखवा) वगैरे व्याख्या चटकन आठवल्या !

जबदस्त धम्माल.
लिंका भारी.
अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी>>>> इथे मला थेट किंवा अपमानास्पद मधे तेरी गलियोमे असेल असं वाटलेलें. पण राम अवतारचं विस्मरणात गेलेलं गाणं पाहुन आनंद झाला. एकदम फिट गाणं. Happy
तेरी गलियोमे नंतर आलेलं पण आवडलं. अगदी चपखल गाणं आहे हिरवीणीच्या मैफिलीत दिल टुटलेल्या गरीब हिरोने गायलेलं.

भयंकर लेख, बर्‍याच दिवसांनी आला. सर्व पंचेस पटले.
ऐसे लेख बार बार आये इसलिये हम मौला के दर पर इन्फायनाइट सजदे करते है.

मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्‍यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक.>> दिल के झरोके में मधे या हुशार स्त्री चे कर्तव्य प्राणने बजावले आहे https://youtu.be/qFl8Xsmyjmw
पण त्यामुळे तो श्रीमंत बकरा या कॅटेगरीतून डिस्क्वालिफाय होतो Lol

अजून एक कॅटेगरी म्हणजे पियानो वाजवतो हिरवीनवर प्रेम करणारा हिरो नं.२ (वा विलन) पण गाणं म्हणतो मेन हिरो. अर्थात हिरवीन इकडे तिकडे बघत भंजाळलेली. उदा. मोहरातले "ऐ काश कही ऐसा होता, के दो दिल होते सीने में"
यात नसिर पियानो वाजवतो, अक्षय कुमार गातो व रवीन भंजाळते.

मोहरा हाही एक अति पी एच डी योग्य चित्रपट आहे. Happy

महान लिहिलंय! _/\_ असा अभ्यास गेल्या दहा हज्जार वर्षात कोणी केला नसावा आणि पुढच्या दहा हज्जार वर्षात कोणी करणार नाही. Lol

कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य >> Rofl

सजदें >>
गणितामध्ये अ‍ॅनॅलिसिस नावाचा प्रकार असतो. यात सर्वसाधारणपणे काही अशी फंक्शन्स असतात ज्यांची एक सोपी व्याख्या काही संख्यांनाच लागू पडत असते आणि अ‍ॅनॅलिसिस वापरून त्या फंक्शन्सना इतर संख्यांकरिता एक्स्टेंड केले जाते. उदा. फॅक्टोरिअलचे अपूर्णांकासाठी केलेले एक्सटेन्शन. त्या धर्तीवर सजदेंची व्याख्या इतर प्रेमीगणांसाठी वाढवण्याचा हा अ‍ॅनॅलिटिकल प्रयत्न

सजदें हे सर्वप्रथम गठ्ठ्याने येणारी गोष्ट असते. मराठी लोकांचे प्रेम सरळ साधे असल्याने ते काही विशिष्ट प्रक्रिया न करता सजदें करून मोकळे होतात. भाषाशास्त्रानुसार उर्दू/अरबी सजदें मध्ये नतमस्तक होणे गरजेचे असते. मराठी लोक असल्या चिल्लर गोष्टींना महत्त्व देत नसल्याने इतर कॉम्प्लिकेशन्स बाजूला सरून आपल्याला फारएण्डची सोपी व्याख्या मिळते. इतर प्रेमाच्या कहाण्या इतक्या सोप्या नसतात.

जर तुम्ही गँगस्टर असाल आणि तुमची एक्झोटिक स्वप्ने पाहण्याची ऐपत असेल तर तुम्ही सजदें पसरवू/बिछावू पण शकता. यामध्ये पुन्हा सजदें गठ्ठ्याने येत असल्याने एक सजदा पसरवणे पुरेसे नाही. तुमची प्रेमिका राहत असलेल्या शहरात गल्लोगल्ली सजदें पसरवावे लागतात. ऐपतीप्रमाणे खर्च दुसरे काय!

अ‍ॅनॅलिटिकल पार्शिअल जनरलायझेशन: हिंदी सिनेमात दोन जीव प्रेमात पडल्यानंतर जेव्हा त्यांना घटकाभर विरंगुळा म्हणून गाणे म्हणत त्यावर नाचण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा त्यातील प्रियकराला सजदें नामक वस्तु प्राप्त होते जिचा तो गाण्यात सकर्मक वाक्ये भरायला उपयोग करू शकतो. या वस्तुचा प्रयोग केवळ बहुवचनात होऊ शकतो आणि क्रियापदाचा संबंध प्रेमिकेशी असलाच पाहिजे. प्रयोगात किती भव्यता आणायची हे आपापल्या स्वप्ने पाहण्याच्या ऐपतीवर ठरते.

अनु, संगममधलं हर दिल जो प्यार करेगा हे गाणं थोडं त्या कॅटेगरीत बसेल. त्यात दोन्ही हिरो आणि हिरोईन असे सगळेच गाणं म्हणतात. शिवाय एक सोडून दोन- दोन वाद्यं आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यक्तीला उद्देशून म्हणत असल्यामुळे आपण नक्की कुणाला उद्देशून म्हणतोय हे कळावं ( आणि आपल्याही लक्षात रहावं ) म्हणून मुखड्याच्या शेवटी त्याच्याकडे/ तिच्याकडे बघून 'दीवाना....' असं म्हणणं कंपल्सरी आहे .

वावे... Happy अगदी अगदी..... राज कपूर चं अनुनासिक स्वरात दीवा ss ना म्हणत वैजयंतीमाला कडे पाहणं आठवलं! मस्त लेख फा.....!!

"न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" ... हे खूपच आवडलं! आणि बाकीच्य अनभिज्ञ जनते बद्दल - येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला?.. हे एकदम मस्त!

धन्य !! Biggrin Biggrin
काय काय वाक्यं कोट करायची!

मस्त लिहिला आहे हा लेख. ___/\___

मैफीलमध्ये हिरो गाणे म्हणत असताना उगीचच पियानोवर रेलणारी स्त्री हे ही कॅरॅक्टर हवे (विशेषतः ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात)

एकंदर सजदे हा प्रकार ज्या प्रमाणात लागतो त्या प्रमाणात वापरायचा झाल्यास दुकानातून बीन बॅग सारखी सजदा बॅग विकत घेऊन त्यातून ढिग ढिग सजदे काढून लागेल तसे वापरणे किंवा गाद्यांप्रमाणे पसरणे योग्य ठरेल. Happy

फुटी कौडी वाचूनच मी लोळले. Lol
लेख एक नंबर झालाय नेहमीप्रमाणे.
तरि पण परदेस, मोहब्बते - गुरू नॉट कूल आणि ठोकळेबाज उपमांच्या विरूद्ध चळवळ ला तोड नाही.
तिन्ही लेख माझे ऑल टाईम फेव्हरिट आहेत.

यात अगदी क्लियरली हिरॉईन कडे पॉइंट करुन तिला 'दिल चीरके देख तेराही नाम होता, आज भरी मेहफिल मे कोई बदनाम होगा'(जुनून) आणि 'जैसे तूने तोडा मेरा दिल तेरा दिल टूटेगा, मेरे बाद अब किसको बरबाद करेगी'(प्यार इश्क और मोहब्बत) वगैरे जाहीर अक्युजेशन्स करणेही सामिल करा.

'दिल चीरके देख तेराही नाम होता, आज भरी मेहफिल मे कोई बदनाम होगा'(जुनून) > अनु, तो रंग. कमल सदान्हा आणि दिव्याभारती.

आणि
खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी
बेवफ़ा ही सही, दिलरुबा है मेरी
तर कहर. एकदम डायरेक्ट डायरेक्टच. नो आडपडदा.
लग्नात जाउन लोकांच्या आग्रहास्तव हे असं काही गाणं गायला काय जिगर लागत असेल.

पियानोच्यासाथीनेप्रेमभंगगीत प्रकारातले एक अजून माईलस्टोन गाणं म्हणजे 'जान तेरे नाम'मधलं

रोने ना दिजीयेगा, तो गाया ना जायेगा
ऐसे तो हाल दिल का सुनाया ना जायेगा

https://youtu.be/ArvImF2OSmI

कर्ता, कर्म काहीच नाही. त्यामुळे तो एक जनरल सिद्धांत मांडतोय असंच वाटतं. '(प्रेमभंग झालेल्या अवस्थेत) रडू न दिल्यास गाता आणि दिलका हाल ऐकवता येत नाही.' The more you sing personal, the more it becomes universal' चे उदाहरण!

मला हे गाणं आजवर
रोने ना दिजीयेगा, रुलाया ना जायेगा
आहे असं वाटत होतं :आओ: Lol

मस्त मस्त. ह्यात ओ मेरे शाहे खुबा गाण्या त छुप के रहते हो तुम रहेजामें हे अगदी हिरो रहेजा टावर्स ए विंग मध्ये सोळाव्या मजल्या वर लपून बसला आहे. व हिरवीण सोसाय टी च्या सेक्रेट री सारखी नोटीस द्यायला येते आहे असे वाट्टॅ.

तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे. >>>>>>>>>>>>>>>> काय च्या काय..... जाम हसले.

Pages