वलय (कादंबरी) - प्रकरण ४

Submitted by निमिष_सोनार on 19 January, 2018 - 01:52

प्रकरण ३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65012

---
प्रकरण 4

एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.

पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?”

तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.

“क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली.

“अरे वा! ठिक पहचान लिया तूने! लेकीन पहचानने में इतना समय लगा कमिनी तुझे? सहर में जाकर भूल गयी तेरे अशिक को?”, तो आवाज उद्धट वाटत होता.

“सबसे बडा कमिना तो तू है नालायक! मेरा नंबर कहाँ से मिला तुझे?” रागिणीही काही कमी नव्हती.

“वो सब छोड और सुन! मुझे पचास हजार रूपिया दे दे, नही तो मै तेरा नंबर तेरे हजबंड को दे दूँगा और तेरे बारे में सबकुछ बता दूँगा!”

रागिणी आता घाबरली. फोन तिच्या मूळ शहरातून म्हणजे दिल्लीहून होता. या माणसाला आता पैसे देण्यावाचून पर्याय नव्हता. नंतर त्याला बघता येईल. आता त्याच्याशी उलझण्याइतका तिच्याकडे वेळ, मानसिकता आणि उत्साह नव्हता. मात्र या माणसाची मजल पैसे मागण्यापर्यंत जाईल असे तिला वाटले नव्हते. पण सध्या त्याला चूप करणे तिला आवश्यक होते. पोलिसांकडे जायचे की नाही तसेच सुप्रिया आणि सोनीला हे सांगायचे की नाही किंवा तिचा मुंबईतील बॉयफ्रेंड सूरजला याबाबत सांगायचे की नाही हे ती नंतर ठरवणार होती. आता आवश्यक होते या माणसाला पैसे देऊन चूप करणे!

“बता साले हरामी तेरा अकाउंट नंबर!! आधे घंटे मे भेजती हूँ पैसा, लेकीन तेरा सडा हुआ मूँह बंद रखना!” ती ओरडली.

“अब आ गयी छोरी लाईन पे!” तो जिंकल्याच्या आविर्भावात म्हणाला.

फोन ठेवल्यानंतर ती स्वत:वर चिडली. पूर्वी केलेल्या काही चूका आता तिच्यासमोर अडथळे बनून येत होत्या. तिला भूतकाळाची ती आठवण नकोशी होती पण, काही ना काही कारणाने तो भूतकाळ तिच्या वर्तमानकाळात परत परत शिरून भविष्यकाळाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्या भविष्यकाळातील स्वप्नांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. आता लगेच त्या गोष्टीवर विचार करून दिवस खराब करायची गरज नाही असे तिने ठरवले. टेबलावरचा राजमा चावल थंड झाला होता. तिने राजमा पुन्हा ओव्हन मध्ये गरम केला, तो पुन्हा भातावर टाकला आणि शांततेने जेवण केले. आज रात्री तिच्या नंतर हॉरर सिरीयलचे शूटिंग होते. आता दुपारी झोप घेणे आवश्यक होते. रागिणीला आपली मुंबईतील मैत्रीण आणि पूर्वीची रुम पार्टनर गौरी हिची आठवण आली, जी सध्या कॅनडात होती आणि तेथेच सेटल झाली होती. तिच्याशी थोडावेळ ती फोनवर बोलली आणि मग बेडवर गेली. तिच्याशी बोलल्यावर तिला हायसे वाटले आणि ताण हलका झाला.

मग रात्रीच्या शुटिंगसाठी तिला मिळालेली स्क्रिप्ट ती वाचत बसली. ती ज्या हॉरर सिरियलमध्ये काम करत होती त्याची थोडक्यात कथा अशी होती – “एका खेडेगावातील मैत्रिणीकडे शहरातील तीन मैत्रिणी येतात आणि त्या चौघी दोन स्कूटीवरून गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जवळच्या छोट्या जंगलात सहलीसाठी जातात. तेथे जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्या जेवण बनवणार असतात आणि दिवसभर मजा करणार असतात. सोबत त्या ब्लूटूथ स्पीकर घेऊन आलेल्या असतात. मोबाईलमधली गाणी त्या स्पीकरवर लावली जातात. जवळच एक नदी आणि छोटीशी जुन्या काळातील पडीक गुहा असते. गम्मत म्हणून एक जणी त्या गुहेत शिरते आणि बराच वेळ झाला तरी परत येत नाही म्हणून एकेक करून तिला शोधायला गुहेत शिरतात. शेवटी चौथी एकटीच गुहेच्या बाहेर उरलेली असते. ती सुद्धा हिम्मत करून आतमध्ये जाते आणि?”

या पुढची कथा अजून रागिणीला सुद्धा माहिती नव्हती. आजकाल इन्टरनेटच्या जमान्यात कथांची चोरी होत असल्याने आणि कथाबीज किंवा कथेचा शेवट चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने एका ठराविक मर्यादेपर्यंतच आणि टप्प्या टप्प्याने कथा कलाकारांना माहित होत होती. हेच सिनेमा बनवतांना सुद्धा पाळले जाऊ लागले होते.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

पण खुप छोटा भाग होता, सुरू होईस्तो संपला पण!