स्फुट - नतमस्तक

Submitted by बेफ़िकीर on 13 January, 2018 - 09:28

स्फुट - नतमस्तक

एक चिरंतन उद्वेग
एक प्राचीन आकांत
एक अखंड अपेक्षांचा स्रोत

ऐहिक त्यागाच्या
डोळे पाणावणाऱ्या
वेष्टनात कशीबशी झाकलेली
एक तीव्र आत्ममग्नता

कैक आपले, दुसऱ्यांचे
दुर्गंध मुरवत
स्व प्रतिष्ठेसाठी दरवळणारा
अवयवांचा गुच्छ

कायिक भान
स्वतः अधिक ठेवणारा
पण दुसऱ्याने ठेवण्यावर
गुरकावणारा
अविवेकी वैचारिक स्तर

प्रतारणेची जननी
मत्सराची भगिनी
अतृप्तीची कन्या
आणि
चारित्र्याचा स्वयंघोषित मापदंड

न दिसणारे दाखवणारी
दिसणारे लपवणारी
गोंधळलेली तिलोत्तमा

वाटते तशी नसणारी
अन त्याच वेळी
वाटते तशी असणारी
मायावी प्रतीक्षा

काचोळीच्या गाठीत
अब्जावधी स्वप्ने
बंदिस्त करणारी
एक नाजूक, जहाल, वास्तविकता

गुलामीच्या अभिनयाने
साम्राज्ञीपद लपवणारी
एक तद्दन नवकोट नारायण
भिकारीण

जुने शील घेऊन
त्या बदल्यात
नवी चाचपड
देऊ करणारी
बोहारिण

एका काठीवर
एकेका बाजूला
सासर आणि माहेर
तोलत
लीलया दोरीवरून चालणारी
डोंबारीण

जिच्या आक्रोशात
खरे ममत्व असते
आणि
जिच्या उबदार मिठीत
खरा कांगावा असतो

त्या 'स्त्री'पुढे

मी नतमस्तक आहे

========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users