गर्लफ्रेंड ट्वेन्टी-ट्वेन्टी - भाग ३ - अंतिम

Submitted by मी_किशोरी on 12 January, 2018 - 05:15

भाग ३

भाग १ ची लिंक
https://www.maayboli.com/node/64941

भाग २ ची लिंक
https://www.maayboli.com/node/64948

रिसेप्शनिस्टने गणपतकडे आपादमस्तक कटाक्ष टाकला. त्या दोघांना ती म्हणाली, "ही गर्लफ्रेंड एक रोबो असेल हे माहित आहे ना तुम्हाला?"
"व्हय, माहित हाय. जाहिरात वाचलीय आमी." - रम्या.
"हे पहा. या जाहिरातीबाबत कंपनीने माझ्यावर ही जबाबदारी टाकली आहे, की असे गर्लफ्रेंड पाहिजे म्हणून जे लोक येतील, त्यांना काही प्रश्न विचारायचे. हे प्रश्न, आपल्याला या सगळ्या प्रोसेस मधली पहिली स्टेप पार करायला मदत करतील. चालेल ना? मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते ना?"
"हां, इचारा की. आमाला काय प्रॉब्लेम न्हाई." - रम्या.
"तुम्हाला नाही, तुमच्या मित्राला उत्तर द्यायची आहेत. त्यांना पाहिजे ना गर्लफ्रेंड?" - रिसेप्शनिस्ट.

मग तिने गणपतला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपली आर्थिक क्षमता चाचपणी चालली आहे, हे गणपतीच्या लगेच लक्षात आले. त्याने साखरकारखान्याचा चेअरमन असल्याचे सांगताच तिचे प्रश्न संपले. त्यानंतर पाचव्या मिनिटाला ते दोघे एका मोठ्या कॉन्फरन्स रुम मध्ये होते. 'भारी' चे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे हेड अग्रवाल साहेब, स्वतः त्यांच्या टिम मधल्या काही महत्वाच्या तज्ञ लोकांबरोबर गणपत सांगावकरांना अटेंड करत होते. सेल्स अँड मार्केटिंगचा एक रिप्रेझेन्टेटिव्ह मिश्रा पण हजर होता. त्याच्या त्या कमवलेल्या सेल्स स्पेशल स्मितहास्यामुळे आणि एकंदर आपण स्वयंप्रकाशित असल्यासारख्या देहबोलीमुळे, रम्या आणि गणपत दोघेही त्याच्याकडेच पाहत होते.

"हं, बोला सांगावकर-पाटील साहेब, कशी वाटली आमची गर्लफ्रेंड तुम्हाला?" - अग्रवाल.
मिश्राच्या चेहऱ्यावर अजून एक सूक्ष्म छदमी हास्यरेषा उठल्याची अग्रवाल साहेबांनी नोंद घेतली.
आपल्या मागच्या टिम मध्येही जरा खसखस पिकली आहे हे लक्षात येताच त्यांनी प्रश्न बदलला.

"आय मिन, आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट - गर्लफ्रेंड कसं वाटलं तुम्हाला?" - अग्रवाल.
"आवडलं खरंच. म्हणून तर आलो हिथं." - गणपत.
"पन त्येचा काय डेमोबिमो बगायला मिळंल काय?" - रम्या.
या प्रश्नावर अग्रवाल आणि मिश्रांमध्ये सूक्ष्म नेत्रपल्लवी झाली. आता मिश्रा पुढे सरसावला.
"देखिये पटेल साहब, डेमो तो हम दिखा देंगे ...." - मिश्रा.
पटेल म्हटल्यावर गणपतने एकवेळ मागे कुणी बसलंय का पाहून घेतले.

"पटेल न्हाई वो पाटील." - गणपत.
"हां हां, पाटील साहब. देखिये, बात ये है कि आप अपने मन में कुछ सोचके आये होंगे, है ना? आपके मन कि बात अगर हम लोग समझ ले, तो हम आपको जो डेमो दिखायेंगे, वो आपकी खुद कि गर्लफ्रेंडकाही दिखायेंगे. क्या आप नहीं चाहेंगे कि आपके सपनेसे निकलकर वो एकदम आपके सामने आके खडी रहे?" - मिश्रा.

मिश्राने गणपतकडे उत्तराच्या अपेक्षेने पहिले आणि मग अग्रवाल साहेबांना नजरेनेच खुणावले. गणपत आत्ता या क्षणी त्या कॉन्फरन्स रुममध्ये नव्हता. तो शाळेतल्या दहावीच्या वर्गात पोहचला होता. उजव्या बाजूला मुलींच्या रांगेत, हळूच त्याच्या नजरेला नजर देऊन चटकन दुसरीकडे पहाणारी संगिता अवतीर्ण झाली होती.
" पटेल साहब .... " - मिश्रा. गणपतचे विमान परत कॉन्फरन्स रुममध्ये लँड झाले.
धुंद तंद्रीचा भंग झाल्यामुळे गणपत वैतागून म्हणाला, "पटेल न्हाई वो पाटील."
"पाटील साहब, हमे वही बताइये जो अभी आप देख रहे थे." - मिश्रा.
"काय पन काय साहेब. हम किदर कूच देख रहे है. तुमी बोला पुढं." - गणपत.
चोरून डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी गणपतची अवस्था झाली.

"देखिये शरमाने कि कोई बात नही... आप आये तो यहाँ गर्लफ्रेंडसे मिलने के लिये ना? ये सारे अपने लोग है. आपकी मदत करनेके लिए हम सब यहाँ बैठे है. आप बताते जाईये...और पनद्रह दिनोके बाद खुद आके मिलीये उनसे. फोटो तो होगा आपके पास उनका?" - मिश्रा.
"किस्का?" - गणपत.
"अभी आप जिनको देख रहे थे ...?" - मिश्रा.
आता रम्याने गणपतला कोपराने ढोसलंले. गणपतने नजरेनंच त्याला दटावले.
"सांगावकर साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि लाजू तर अजिबातच नका. या कॉन्फरन्स रुमच्या बाहेर काहीही जाणार नाही. तुम्ही आम्हाला जी माहिती द्याल ती एकदम कॉन्फिडेन्शियल असेल. आणि तुम्ही जितक्या डिटेल मध्ये सांगाल तेवढ्या डिटेल्समध्ये तुमची अपेक्षापूर्ती होईल." - अग्रवाल.

मागच्या गावच्या जत्रेत संगीला त्याने परत पाहिले होते. आपल्या दोन चिल्यापिल्यांना घेऊन जत्रेची मजा दाखवत होती. गणपत समोर येताच एकच क्षण ती थबकली. त्या एका क्षणात तिच्या चेहऱ्यावर असंख्य भाव गणपत वाचू शकला होता. विसरायचे ठरवलेल्या स्वप्नपूर्तीची आस गणपतच्या मनात परत जागली. "साहेब एक मिनिटं थांबा." असे म्हणून मोबाईल वरचे जत्रेतले फोटो शोधायला सुरुवात केली.

"तुम्ही फोटो मिळतोय का पहा. आणि तुम्हाला एकमेकांशी काही बोलायचं असेल तर बोलाही.आम्ही सगळेजण थोडा वेळ बाहेर जातो. म्हणजे तुम्हाला निवांत विचार करून ठरवता येईल. चालेल ना?" - अग्रवाल.
अग्रवाल साहेबांनी फोन करून दोन चहा आत पाठवायला सांगितले आणि आपल्या टिमला इशारा केला.

सगळे जाताच रम्या गणपतवर उचकला,"ये लेका , काय चाललंय तुज? ही कोन तुला दिसाय लागलिया? ह्या मिश्राला म्हाईत हाय आनि मला म्हाईत न्हाई?"
"आरे आपली संगी रे. तुला म्हाईत न्हाई व्हय आता?" - गणपत.
"हां ती व्हय. आनी तिचा फोटू कुटनं आला तूज्याकडं?" - रम्या.
गणपतने त्याला जत्रेतले फोटो दाखवले. चर्चेअंती त्या दोघांचं ठरलं की संगिता सारखी गर्लफ्रेंड पाहिजे असं सांगायचं.
"ये रम्या, सगळ्यात म्हत्वाचं पयलं बोलायचं आता आपून. लग्नाचं काय ते इचारायच." - गणपत.
"आनी एमबीए?..." - रम्या

तेवढ्यात 'भारी' ची सगळी टिम आत आली.
"झालंय तुमचं बोलून की अजून वेळ पाहिजे तुम्हाला?" - अग्रवाल.
"न्हाई या या. आपन बोलूयात." - गणपत. सगळे आपल्या जागी स्थानापन्न झाले.
"साहेब, दोन म्हत्वाच्या गोष्टी इचारायच्या हाईत" - गणपत.
"बोला ना." - अग्रवाल.
"एक तर आमाला आमची गर्लफ्रेंड एमबीए शिकलेली पाहिजे. म्हंजे आमी निवडणुकीला हुबारलो की मस्त जोमदार भाष्ण तिला करायला यायला पायजेत. " - गणपत.

अग्रवाल आणि मिश्रांचं एकमेकांकडे पाहून झालं. मागच्या टिम मधल्या काहींनी एकमेकांशी कुजबुजत डिस्कशन करून घेतलं. अग्रवालनी त्यांच्या 'गर्लफ्रेंड' प्रोजेक्ट हेडशी नजर मिळवली. प्रोजेक्ट हेडने टिम लिड्सकडे पाहिले. टिम लीड्स च्य माना होकारार्थी हलल्या. तशी त्याने अग्रवाल साहेबांकडे पाहून होकारार्थी मान डोलावली.
"ओके. देऊ आम्ही तुम्हाला एमबीए शिकलेली गर्लफ्रेंड" - अग्रवाल.
"दुसरी महत्वाची गोष्ट म्हंजे आमाला नुस्ती गर्लफ्रेंड नकोय. आमाला तिच्याशी लगीन करायचं आहे." - गणपत.
थोडा वेळ कॉन्फरन्स रुममध्ये शांतता पसरली.

"पाटील साहब, हमे हमारे कंपनीके लिगल डिपार्टमेन्टसे बात करनी पडेगी." मिश्रा शांतता भंग करत म्हणाला.
काही फोन झाले आणि थोड्याच वेळात लिगल ऍडव्हायझर कामत हजर झाले. मिश्रांनी ओळख करून दिली. फोनवर त्यांना इनपुट्स मिळालेच होते. त्यांनी आल्याआल्या सूत्रे हातात घेतली.
"हं तर पाटील साहेब, तुम्हाला आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट्सही म्हणजे गर्लफ्रेंडशी लग्न करायचं आहे?" - कामत.
"व्हय साहेब. असं गर्लफ्रेंड असून आमच्या गावाकडं चालणार न्हाई बघा. रीतसर लग्न झालं म्हंजे कुनाची काय बोलायची टाप रहानार न्हाई." - गणपत.
"लग्न करायला तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या देशात माणसांनी गाढवांशी लग्न केल्याची पण उदाहरण आहेत. जोपर्यंत कोणी काही तक्रार करत नाही तुमच्या विरुद्ध, तोपर्यंत कुणी येणार नाही. आणि हे लग्न करायचं असं जर ठरलं तर तुम्ही भारतातली अशी पहिली केस असाल. त्यामुळे आमची कंपनी तुम्हाला फुल्ल सपोर्ट करेल. काही प्रॉब्लेम आलाच तर तुम्हाला त्यातून सहीसलामत बाहेर काढण्याची जबाबदारी आमची." - कामत.
"पन प्रॉब्लेम येईल म्हंता?" - गणपत.
"अहो काय घाबरता पाटील साहेब. आपल्याकडे केसेस कशा चालतात तुम्हाला माहित आहे ना? आणि आम्ही तुम्हाला लिगल सपोर्ट देऊ ना. " - कामत.
पुढच्या पाच मिनिटांमध्ये कामतांनी त्या दोघांनाही पूर्णपणे गुंडाळून ठेवले.

आता हे सावज जाळ्यात आलंय असं झाल्यावर ते मिश्रांकडे वळून म्हणाले, "मिश्राजी, एक्सपेकटेशन्स तो क्लिअरली सेट किये है ना ?"
"अब तक बात तो गर्लफ्रेंड कि चल रही थी. हम लोग गर्लफ्रेंड एक्सपेक्टेशन्स पे काम कर रहे थे. पटेल साहबने शादी कि बात की, तो हमने सबसे पहले आपको बुलाना उचित समजा. अब कामतजी, शादीवाले एक्सपेक्टेशन्स तो अलग होंगे ना? गर्लफ्रेंड और वाइफ एक जैंसी कितने लोग चाहते है? और अभी आप पाटील साहबको जान भी गये है. तो आप ही बन जाईये लडकी के बाप. हाहाहा...." - मिश्रा.
कामतांच्या कपाळावरच्या आठ्या बघून मिश्राने हसणे आवरते घेतले.
"देखिये, मेरे कहने का मतलब है कि शादी का मामला है. टेक्निकल एक्सपेक्टेशन्स मिस्टर अग्रवाल विल टेक केअर. कस्टमर इज हिअर मिन्स माय डिपार्टमेंट हॅज ऑलरेडी परफॉर्मड टू मोअर दॅन सिक्सटी पर्सेंट. बस ये कन्व्हर्जन हो जाना चाहिये कामतजी. अब शादीवाले एक्सपेक्टेशन्स आपही सेट किजीये." असे म्हणून तो कामतांच्या कानाशी लागला, कुजबुजत म्हणाला,"फर्स्ट ऑर्डर इम्पॉर्टन्ट है सर जी. ये हो गया तो मै खुद आपको एमडी के पास लेके जाऊंगा. एमडीने लास्ट वीक सेल्स मिट मे क्या बोला है आपको बाद मे बताता हूँ."

अग्रवाल आणि टिमने कितीही कान टवकारले तरी त्यांना काही कळले नाही. पण कामतांच्या चेहऱ्यावरची चमक मात्र सगळ्यांच्या लक्षात आली.
कामत परत गणपतकडे वळले.
"पाटील साहेब, घरी कोण कोण असतं तुमच्या?" - कामत.
"आई आनी मि दोगच हाये साहेब घरी. हां, नोकर मान्स भरपूर हायेत." गणपत हसून पुढे म्हणाला,"तुमी काय काळजी करू नका सायेब. कामबीम काय करावं लागनार न्हाई त्यास्नी. पाटलीन बाईस्नी फक्त देखरेख करावी लागल बगा."
"पण तुम्ही चांगली गावाकडची मुलगी बघायची सोडून इथे कसे काय पोहचला. तुम्हाला तर कोण पण हसत मुलगी देईल. तुम्ही एवढे चेअरमन आहात." - कामत.
"तुमचं सगळं खरं हाये पन आमाला एमबीए झालेली मुलगीच पायजे. अशी मुलगी आमाला पसंत करत न्हाई सायेब. आनी हे तुमचे लोकं तर अगदी आमाला पायजे तशी बनवून देत्यात." - गणपत.
"लग्न म्हंटल की किती गोष्टी कशा महत्वाच्या होतात, हे तुम्हाला कळलंय तर!” गणपतने मान डोलवली तसे कामत पुढे म्हणाले, "पाटील साहेब, आमच्या मुलीशी म्हणजे या गर्लफ्रेंडशी लग्न करून तुम्हाला तुमच्या इस्टेटीला वारस नाही मिळणार. तुम्हाला मुलबाळ होऊ नाही शकणार. चालेल तुम्हाला?"
रम्याने आणि गणपतने चमकून एकमेकांकडे बघितले.
कामत पुढे बोलू लागले, " पुढे कधी तरी, टेक्नॉलॉजी तेवढी प्रगत होईलही. पण आतातरी ही गर्लफ्रेंड तुमच्या मुलाची आई होऊ शकणार नाही."
कॉन्फरन्स रुममध्ये पूर्ण सन्नाटा पसरला.
कामत गणपतला म्हणाले,"तुम्ही घरी जा, तुमच्या आईशी बोला. आणि त्यानंतर जर तुमचे आमच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायचे ठरले तर नक्की परत या. पण मला तुमच्या आईचीही सहमती लागेल, हे लग्न होण्यासाठी. "
गणपत जड पावलाने रम्याबरोबर कॉन्फरन्स रुममधून बाहेर पडला.

-------------------------------

त्यानंतर पंधराच दिवसात गणपत बोहल्यावर चढला. मुलगी त्याच्या आईने पसंत केली असली तरी दिसायला बरीचशी संगितासारखी होती. आणि गणपतच्या लग्नाला संगिता आपल्या दोन्ही चिल्यापिल्यांसहित उपस्थित होती.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथे प्रतिसाद देणाऱ्या आणि न देणाऱ्या अशा सर्व वाचकांचे खूप धन्यवाद.
लेखन कसे झाले आहे हे जरूर सांगा. तुमचे इनपुट्स पुढील लेखनासाठी महत्वाचे आहेत.
ही माझी पहिलीच कथा असल्याने तर प्रतिसाद खूपच महत्वाचे आहेत.

धन्यवाद.

छान आहे पण लवकर संपलं.
रोबो गर्लफ्रेंड ची मजेदार गोष्ट असेल असं वाटलं होतं.

विनिता, सस्मित, दक्षिणा - तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
रसभंग करायचा नव्हता. या विषयाच्या विस्ताराच्या खूप विविध शक्यता होत्या.
पण पहिल्याच कथेत मी घेतलेला विषय - लेखकाला हव्या असलेल्या मर्यादेत ठेवायला अवघड असा होता.
प्रतिसादांमधून हा विषय खूप वाहवत नेण्याची शक्यता होती.

जरी इथे असे झाले नाही.... तरी lesson learnt - लेखकाने खंबीर आणि लेखाच्या उद्देशाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.
धन्यवाद.

अरे मस्त!
मलाही वर विनिताताई, सस्मित आणि दक्षिणाताईंनी म्हटल्याप्रमाणेच (अपेक्षा केल्याप्रमाणे) वाटलेलं..असो.
अजून यापुढे भन्नाट लिहीता येईलच जर आपण मनावर घेतलंत तर...
लेखनशैली छान आहे आपली किशोरीजी.
पुलेशु. Happy

मलाही शेवट गुंडाळल्यासारखा वाटला. पण छान झाली.. कधी मूड आला तर हवी तेव्हा वाढवू शकता.. नाहीतर नवीन घ्या लिहायला Happy

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. एक सुचवतो किशोरीजी. ईच्छा असेल तर हा तिसरा भाग वेगळ्या पध्दतीने नवीन लिहा (ऑन पब्लिक डिमांड ) + अजून भविष्यातील भाग.

आणि हा धागा वेमांकडून उडवून टाका. Lol

धन्यवाद अजय चव्हाण, अ।नंद, कुसुमिता१, ऋन्मेऽऽष, च्रप्स, पाथफाईंडर.
च्रप्स, लग्न खऱ्या मुलीशी केले गणपतने Happy

पण पहिल्याच कथेत मी घेतलेला विषय - लेखकाला हव्या असलेल्या मर्यादेत ठेवायला अवघड असा होता. >> तुम्ही कुठल्या मर्यादेबद्दल बोलताय कळले नाही. विनोदी लेखनात थोडी लिबर्टी लेख्क घेवू शकतो. ही काही विज्ञानकथा नाही.
प्रतिसादांमधून हा विषय खूप वाहवत नेण्याची शक्यता होती. >> तुम्ही लिहीता ते स्वतःला आनंद देणारे असले पाहिजे. अर्थात विषयाचा अभ्यास नसेल तरी वाचक ती नाकारतो. आणि लिहीतांना लेखकाला आनंद देणारी कथा निश्चीतच वाचकाला पण आनंद देते. हेमावैम.

धन्यवाद किशोरी.. प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्धल.
मला असे वाटले की त्याने संगीतासारखी दिसणारी रोबो मुलगी बनवून घेतली आणि आईने सममती दिली.

वरील सगळ्यांशी सहमत! रोबो बायकुच्या गमतीजमती असलेले पुढचे भाग येऊद्या.

भाषेचा लहेजा फारच 'भारी' जमलाय तुम्हाला.