गर्लफ्रेंड ट्वेन्टी-ट्वेन्टी - भाग १

Submitted by मी_किशोरी on 10 January, 2018 - 00:21

गणप्या आपला जिवलग दोस्त रम्याबरोबर 'भारी (B. H. A. R. I . ) रोबोटिक्स लिमिटेड' च्या पुण्यातल्या हेडऑफिसमध्ये शिरला. रम्या त्याचा बालमित्र आणि आता त्याचा टेक्नॉलॉजी सल्लागार होता. दोघेजण एसीमुळे गारेगार झालेल्या रिसेप्शनमध्ये घाम पुसत, हाय हिल्सवर आपला इवलासा देह सांभाळत टॉक टॉक करत फिरणाऱ्या रिसेप्शनिस्टकडे बावचळून पहात बसले. तिने या दोघांनाही त्यांच्या एन्ट्रीलाच नोट केलं होतं. तिच्या वर चढलेल्या भुवया आणि कपाळावरच्या आठ्या गणप्याला नसल्या तरी रम्याला जाणवल्या होत्या. यथावकाश ती त्यांच्याकडे आली, "हाऊ कॅन आय हेल्प यु, सर?" तिच्या प्रश्नावर ते दोघेही अजून गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. मग रम्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला बोलावं लागेल. त्यानं आपल्या खिशातून नीट घडी करून ठेवलेलं कालच्या पेपरचे पान काढले. आणि परत गोंधळून एकदा तिच्याकडे, एकदा गणप्याकडे आणि एकदा हातातल्या कागदाकडे बघत राहिला.

आख्ख्या पानभर आलेली 'भारी रोबोटिक्स"ची लई भारी जाहिरात होती ती. जाहिरातीत एक चिकना हँडसम तरुण आणि त्याच्यापेक्षा हजारपट चिकनी मदनिका दाखवले होते. 'भारी'च्या ब्रँड न्यू प्रॉडक्टची, लेडी रोबोटची जाहिरात होती ती. 'भारी'ने ग्राहकाच्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे हुमनॉइड गर्लफ्रेंड पुरवण्याचा वायदा केला होता. इ.स. २०२०च वर्ष होतं ते. गेल्यावर्षीच सरकारने मानव आणि यंत्रमानवाच्या लिव्ह इन रिलेशनला कायदेशीर मान्यता दिली होती.

आपला गणप्या उर्फ गणपतराव हणमंतराव सांगावकर-पाटील. कोल्हापूरजवळच्या एका गावाहून मोठ्या आशेने तो आला होता. त्याचे वडील हणमंतराव सांगावकर तालुक्यातल्या साखर कारखान्याचे वर्षानुवर्षे चेअरमन, त्यामुळे आजूबाजूच्या चारपाच गावात गडगंज प्रॉपर्टी त्यांनी करून ठेवली होती. त्यांच्या आजोबा-पणजोबानी कधीतरी गावची पाटीलकी केली म्हणून मग लोक त्यांना सांगावकर-पाटील म्हणू लागले. हणमंतरावांचे एकुलत्या गणप्यावर खूप प्रेम होते. गणप्याने खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. कारण एवढा साखरकारखाना हातात असूनही, तालुकाभर मान मरातब असूनही त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात फारसा वाव मिळाला नव्हता. मोठे मोठे नेते जेंव्हा व्यासपीठ हलवून सोडत तेंव्हा हणमंतराव अचंबित होऊन पहात असत. ते खूप प्रयत्न करत पण त्यांची भाषणं त्या मोठया नेत्यांच्या तुलनेत त्यांना स्वतःलाच अळणी वाटत. त्यांची अशी खात्री झाली होती की शिक्षणानेच हे शक्य आहे. म्हणून गणप्याला शिकवणीसाठी स्पेशल मास्तर त्यांनी ठेवला होता. पण वळचणीचं पाणी वळचणीलाच जातं म्हणतात तसा हणमंतरावांच्या सर्व प्रयन्तानंतरही गणप्या दहावीच्या परीक्षेत ना-पा-स-च झाला आणि त्याने शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचा.

गणप्याच्या शिकण्याच्या सर्व आशा मावळल्यावर हणमंतरावांनी दुसरा एक वेगळाच संकल्प सोडला. काही झालं तरी शिकलेली, तेही एम. बी. ए. झालेली सून करून आणायची. अशी शिकलेली सून मिळाली तर आपली नाही तर आपल्या घराण्याची, आपल्या पोराची तरी राजकारणात प्रगती होऊ शकेल, असा त्यांचा होरा होता. स्त्रियांसाठी राखीव होणाऱ्या जागांचा फायदा उठवण्याचाही दूरदर्शी विचार त्यामागे होता. गणप्याला दिवसातून दोन-तीन वेळा तरी आपल्या या बेताबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या कळावे आणि त्याने काही वेगळा घोळ करून ठेवू नये याची पुरेपूर काळजी ते घेत असत. त्यामुळे गणपतबाळ आपसूकच गावातल्या पोरीबाळींपासून लांबच राहू लागलं. यथावकाश लग्नाचे वय झाल्यावर गणप्यासाठी मुली बघायलाही त्यांनी सुरवातही केली. सर्व पंचक्रोशीतल्या मध्यस्थ लोकांकडे गणप्याचा सुटाबुटातला राजबिंडा फोटो असलेला बायोडाटा पाठवण्यात आला. अपेक्षा एकदम स्पष्ट कळवण्यात आल्या. जिल्ह्यांपर्यंतच्या मोजून सगळ्या विवाहमंडळातही गणपतरावांचे नाव नोंदवण्यात आले. गणपतराव रोज नवनवीन स्वप्नात दंग होऊ लागले. त्यांना ढग गुलाबी, गुलाब शराबी आणि असलंच काय काय वाटू अन पटू लागलं. असेच सहा महिने गेले पण एकही स्थळ आले नाही. पिताश्रींच्या समोर विषय कसा काढावा? एवढे धाडस गणपतरावांच्यात कुठले? गणपतरावांनी मग मातोश्रींना हाताशी धरून काही पानं हलवली आणि विषय योग्य ठिकाणी पोहचवला.

हणमंतरावांनी मग एकेक मध्यस्थाला फोन करून फैलावर घ्यायला सुरवात केली. सकाळपासून ते एकामागोमाग एक फोन करत होते. आणि या सगळ्या संभाषणादरम्यान त्यांनी माय-लेकराला आपल्यासमोर खुर्चीत बसवून ठेवले होते. मातोश्री चुळबुळत स्वयंपाकघरात शिरण्यासाठी कारणे शोधत होत्या तर गणपतराव मात्र हे सगळं आपल्याच भल्यासाठी चाललं आहे हे उमजून, अलीकडच्या बोलण्यावरून पलीकडची पार्टी काय म्हणत असावी याचा अंदाज लावत, डोकं खाजवत बसले होते. तब्बल दोन तासांनी, हणमंतरावांनी फोन ठेवून टाकला. दोन्ही हात मागे बांधून, चिंताग्रस्त मुद्रेने ते दिवाणखान्यात फेऱ्या मारू लागले. आता त्यांना नेमकं काय झालं हे विचारण्याची प्राज्ञा ना गणपतरावांची ना त्यांच्या मोतोश्रींची होती. काही वेळ असाच गेल्यावर आपोआप बांध फूटलाच.

"हजारवेळा सांगितलं, पण बापाचं ऐकतोय कोण? रडत धडपडत तरी बी. ए. झाला अस्तास तर ही वेळ आली नस्ती ."
"आवं, पन मी काय म्हन्ते ...."
"तुम्ही तर बोलूच नका. तुमचीच सगळी फूस असती तेला. नुसता गुळाचा गणपती करून ठेवलाय. नाव पण तेच ठेवलंय, म्हणल्यावर कुनी बोलायचं?"
सहसा लाडक्या लेकावर कधी न उखडणारे हणमंतराव आज एकदम पेटलेच होते.
"आवं, पन काय झालंय ते तरी सांगशीला का न्हाई? का आम्ही दोघं आपलं गावलोय म्हणून उगाच तोंड सोडलंय ते?"
"कुठलीच एम. बी. ए. झालेली मुलगी ह्यांचं स्थळ बघायला सुद्धा तयार न्हाई. मुलगा काय शिकलाय तर दहावी नापास. लाज आनली अगदी."
"तर तर, लै शहाण्याच की एम्बीए वाल्या. शिकून शिकून काय करतील तर कुणाची तरी चाकरीच नव्ह? एकादी जरी शानी अस्ती तर माझ्या लेकाला नाकारला नसता. आपल्या घरी पडली तर राज्य करील पन ह्या शिकलेल्या पोरींची सगळी अक्कल नुस्ती पुस्तकात."

आता मातोश्रींचा आवाज टिपेला पोहचला. गणप्याला पोरी नाकारताहेत हे ऐकून त्यांना अगदी मिरच्या झोम्बल्या होत्या.
" माज्या पोरासाठी मी लाईन लावीन हिथं पोरींची. कशाला पायजे ते एम्बीए आन फिम्बीए? माझ्या गावच्या जाधवांची पोरगी हाय. मी विजूच्या लग्नात बगितली तवाच मला पसंत पडली. पर तुमचं आपलं काय एम्बीए एम्बीए चाललंय म्हणून मी गप्प बसले हुते. आणि ही पोरगी बी चांगली शिकलेलीच हाय. बिकाम का काय ते शिकलीया. तुमी आजच्या आज कुनाला तरी पाटवून द्या तेंच्याकड."

त्यानंतर तासभर परत परत ते दोघं याच सगळ्या गोष्टी बोलत राहिले. गणपतराव खाली मन घालून बसून राहिले. गणपतरावाचा पडलेला चेहरा बघून त्यांच्या आईलाच काय तर हणमंतरावांनाही भडभडून आले. शेवटी सर्वानुमते जाधवांच्या पोरगीच स्थळ बघू असं ठरलं. ताबडतोब हणमंतरावांनी त्यांच्या एका वयस्कर विश्वासू कार्यकर्त्याला स्थळाची माहिती घेऊन जाधवांकडे धाडले. संध्याकाळपर्यंत तो माणूस हात हलवत परत आला. जाधवांच्या पोरगीच लग्न नुकतंच ठरलं होतं आणि दोन दिवसांनी साखरपुडा होता.

त्यानंतर जवळजवळ वर्षभरात मोजून छत्तीस स्थळं झाली पण पण दोन-तीन स्थळ सोडल्यास गाडी कांदेपोह्यापर्यंतही पोहचू शकली नाही. अगदी बारावी पास मुलीलाही दहावी नापास मुलगा नको होता. हणमंतरावांनी मात्र आपली शिकलेल्या सुनेची अट काही सोडली नाही. या सगळ्यात गणपत मात्र निराशेच्या गर्तेत सापडला. तो एकटा एकटा राहू लागला. घरापेक्षा जास्त शेतावर वेळ काढू लागला. रम्या त्याचा बालमित्र या काळात त्याचा आधार बनला. रम्या नेहमी वर्गात पहिला येणारा पण बारावीनंतर इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतली आणि पहिल्याच वर्षी एटीकेटीच्या चक्रात अडकला. नीट मार्गदर्शन न मिळाल्यामुळे गटांगळ्या खात राहिला आणि शेवटी त्याने तो नाद सोडून दिला. एका रम्यामुळेच गणपत कुठल्या व्यसनाच्या जाळ्यात न अडकता काही चांगल्या गोष्टी करायला प्रवृत्त झाला. रम्याच्या प्रभावामुळे गणपतने मनावर घेऊन बाहेरून परीक्षा देऊन दहावी आणि बारावीपण केली. दोघा मित्रांनी एकत्र अभ्यास करून पुढचे कॉलेजचे शिक्षणही पूर्ण करायचे ठरवले. दोघांनीही बी. ए. ला ऍडमिशन घेतले.

एका रात्री अचानक हणमंतरावांच्या छातीत दुखायला लागले. किरकोळ दुखतंय म्हणता म्हणता हार्ट अटॅक येऊन दवाखान्यात पोहचेपर्यंत सगळा खेळ संपला. हणमंतरावांच्या मागे सगळी जबाबदारी गणपतवर येऊन पडली आणि त्यानेही ती समर्थपणे उचलली. इतकी की एक वर्षाच्या आतच साखरकारखान्याच्या चेअरमनपदी तो स्थानापन्न झाला. रम्यालाही त्याने कारखान्यात स्टोअर ऍडमिनिस्ट्रेटरची नोकरी लावली. लग्नाचा विषय जरी बाजूला पडला असला तरी सल तसाच खुपत होता. गणपतच्या अनुभवामुळे रम्यानेही धसका घेतला होता. त्यांच्या या बाबतीतल्या शामळू स्वभावामुळे गाडी अगदीच अडून बसली होती.

रविवारच्या एका सकाळी गणपत आपल्या भव्य दिवाणखान्यात चहाचे घोट घेत पेपर वाचत होता. हणमंतरावांची जागा आता त्याने घेतली होती आणि हणमंतराव भिंतीवर फोटोच्या चोकटीत चंदनाच्या हारासहित दिमाखात स्थानापन्न झाले होते. इतक्यात रम्या गडबडीत आत शिरला. 'अरे ये ये' असे म्हणून त्याचे स्वागत करून गणपतीने रम्यासाठी चहा टाकायला सांगितला. रम्या मात्र दबक्या पावलाने आजूबाजूला कोणी नाहीय याची खात्री करून घेत, गणपतच्या एकदम जवळ जाऊन दबक्या आवाजातच त्याला म्हणाला,
"गणपत, अरे ती जाहिरात बघितलिस काय?"
"कुठली रे?"
"अरे एकदम मागच्या पानावर बघ."
गणपतने पेपरचे मागचे पान समोर पसरून धरले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झराझर बदलत गेले. आश्चर्य, गम्मत, सुक्ष्म आनंद आणि मग त्याची जागा थोड्याशा विषन्नतेने आणि वैतागाने घेतली. पेपर झटकन बाजूला ठेवून त्याने रम्याला विचारले, "मग? आपल्याला काय त्याचं ?"

क्रमशः .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधी, सहज भाषा...
उत्कंठावर्धक आहे.
पुढिल भागाच्या प्रतीक्षेत ...

छान....

छान लिहिलं आहे.
बादवे, अलरेदी 2017 मधेच आर्टिफिसल इंटेलिजन्स वाले सेक्स डॉल मार्केट मध्ये आले आहेत.

छान किशोरी जी. लिखते रहो. पु भा प्र
>>
लेखात "हाय हिल्सवर आपला इवलासा देह सांभाळत टॉक टॉक करत फिरणाऱ्या रिसेप्शनिस्टकडे " या जागी "इवल्याश्या हाय हिलवर "असे पाहीजे होते का?

च्रप्स, भारतात त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात अजून खेड्यातल्या पेपर्समध्ये अशी जाहिरात यायला २०२० येईल. कदाचित २०१८ मध्ये पण येऊ शकेल. बिटकॉइनच्या बाबतीत आपल्याकडे जो घोळ सुरु आहे, तो पहाता काय सांगता येते?
राजकारणी, तथाकथित समाजकारणी या सगळ्यात किती आणि कसा गोंधळ घालतील, कुणास ठाऊक.
असेही होऊ शकेल की कुणीतरी काही शक्कल लढवेल, आणि सगळे जलद ऍडॉप्ट होईल.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.