पंधरा दिवसांपूर्वी एक मैत्रीण भारतात चालली होती,म्हणाली काही हवं असेल तर सांग आणते. खरंतर पूर्वी अशी खूप मोठी यादी असे आणायची, पण हळूहळू ती यादी छोटी होत गेली. आता फक्त गरजेची वस्तू असेल तरच आणायला सांगते कुणाला. आधी म्हणाले, नाहीये काही विशेष. दुसऱ्या दिवशी आठवण झाली, म्हटलं, "अगं, कॅलेंडर घेऊन येशील का? तेही कालनिर्णय, मराठीच हां!". ती जाणार होती बँगलोरला, त्यामुळे उगाच हिंदी वगैरे काही नको होतं. नव्या वर्षाच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ती घेऊन आली होती.
मी आजकाल अशा जास्त अपेक्षा ठेवत नाही. उगाच कुणी विसरलं, किंवा नाही मिळालं, नाही वेळ झाला, अशी अनेक कारणं असू शकतात. पण, तिने एका दिवसाच्या मुंबई ट्रीपमध्ये ते आठवणीने घेतलं आणि घेऊनही आली. खूप मस्त वाटलं, तिने आठवणीने आणलं याबद्दल. संध्याकाळी नवऱ्याला सांगितलं,"बरं झालं ना वेळेत मिळालं.". तो म्हणे,"मिळतं इथे पण." म्हटलं,"मला मराठी कालनिर्णयच हवं होतं.". त्यावर त्याने पुढे युक्तिवाद केला, की प्रिंटआउट काढली असती. ऑनलाईन मिळतं सर्व.".
या अशा कारणांनी अजिबात काही फरक पडत नव्हता मला. मला, मूळ प्रतीचं छापील कॅलेंडरच हवं होतं. आता याला हट्ट म्हणा किंवा आणि काही. पण त्या कॅलेंडरने घराला एक शोभा येते असं मला वाटतं. किचनच्या त्या कोपऱ्यातल्या भिंतीवर तेव्हढ्याच तुकड्यात ते बरोबर बसतं. ते तिथं असण्याची इतकी सवय झालेली आहे की तिथे दुसरं काही आवडलंही नसतं. घरी ती सुरळी आली की नवऱ्याने आवर्जून लावून त्याला खाली पेपर क्लिप लावल्या, म्हणजे सरळ होईल ना. किती बारीक सारीक गोष्टी असतात ना?
पूर्वी नवीन कॅलेंडर आलं की त्याचंही अप्रूप असायचं. कॅलेंडरची कुणी जाहिरात करु शकतं? यावर आता विश्वास बसणार नाही, पण दूरदूर्शन वर रेणुका शहाणेची तीन-चार भाषांमध्ये कालनिर्णयची जाहिरात यायची, ती आजही पाठ आहे. जाहिरात ती पाहिली तरीही, प्रत्येक घरात वेगळं कॅलेंडर असतं, म्हणजे आईकडे नेहमी भाग्योदय असतं तर सासरी दुसरं.ते त्यांचं पूर्वीपासून चालत आलेलं. आईकडे तर अनेक वर्षांची जुनी कॅलेंडर ठेवलेली आहेत. आता ती पाहायला कसं वाटेल? एकदा बघायला लागतील. मलाही माझ्याकडची सर्व मराठी कॅलेंडर अशीच जपून ठेवायची खूप इच्छा आहे, अशीच, आठवण म्हणून.
मी लहानपणी अगदी कॉलेजपर्यंत, कॅलेंडर आलं की,आपला वाढदिवस, दिवाळी, सर्व सुट्ट्या कधी येतात ये बघून घ्यायचे. महिना पालटला की त्या महिन्यातल्या शुभ-अशुभ दिवसांची यादीही पाहिली जायची. मागच्या पानावर आपल्या राशीसाठी हा महिना कसा जाणार हे पाहायचे. परीक्षा असेल तर अजूनच काळजी त्या भविष्याची. एखादी रेसिपी, एखादा लेख किंवा सणासुदिच्या दिवसांत एखादी पुराणातली कथा असेल तर ती वाचायचे. आई दादा अजूनहीकॅलेंडर घेऊन बसतात एखादं काम पार पाडायचं असेल तर, कुठे जायचं असेल, काही काम असेल तर. दुधाचं बिल, पेपर बिल, फोन नंबर अशा अनेक गोष्टी त्या कॅलेंडरवर यायच्या किंवा अजूनही येतात.
आमचा सध्याचा भारतीय कॅलेंडरचा वापर त्यामानाने कमीच. एकतर अमेरिकेतल्या सुट्ट्या निराळ्या, त्यात उपवास नाहीत त्यामुळे तसं फार काही पाहिलं जात नाही. शिवाय आजकाल वर्ष सुरु व्हायच्या आधीच व्हॅट्सऍपवर पुढच्या वर्षी कुठल्या सुट्ट्या कधी येत आहेत आणि मोठा वीकेंड कधी मिळेल याची मिळून जाते. ऑफिसचं कॅलेंडर तर बोलायलाच नको. रोज सकाळी किंवा आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच्या मिटिंग कोणत्या हे पाहून घेतलं जातं. वाढदिवस, ट्रिप, भारतवारी प्लॅन करण्यासाठी महिनोंमहिने सर्व आधी ठरवलं जातं. मुलांची कॅलेंडर अजून वेगळी. रोज कुणाचा कुठला किती वाजता क्लास, कुणाची पार्टी कधी किती वाजता कुठे हे सर्व कुठे ना कुठे ठेवावं लागतं, त्यामुळे त्यांचं कॅलेंडर वेगळं.
या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांसाठी, धावत्या जगासाठी आपलं ते छापील मराठी कॅलेंडर कुठे पुरणार? तरीही ते घरात असणं एक घराचा भाग झालेला आहे. मोठे सण, त्यांची तारिख वार, मुहूर्त अजूनही पाहिलं जातंच. थोड्या दिवसांपूर्वी मुलाने त्यातले मराठी अंक बघून ते कसे म्हणायचे हे विचारलं, इतकं मस्त वाटलं. निदान मराठी अंक आणि अक्षरं शिकवण्यासाठी त्याचा उपयोग नक्की होईल असं वाटलं. दरवर्षी कुणी ना कुणी आठवणीने कॅलेंडर आणून द्यायचं. या वेळी विसरले म्हणून हुरहूर वाटत होती. यावर्षीही ते वेळेत मिळालं आणि त्याच्या ठरलेल्या जागेवर लावता आलं हाही आनंद नसे थोडका.
तुमचंही असेलच असं एखादं ठराविक कॅलेंडर, तुमच्याही असतील अश्याच काही भावना अजूनही गुंतलेल्या, होय ना?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मस्तच. आवडलं
मस्तच. आवडलं
मस्त!
मस्त!
छान विद्या.
छान विद्या.
Ditto
Ditto
छान लेख,
छान लेख,
बरीच वाक्ये वाचताना अगदी अगदी वाटले.
म्हणजे आईकडे नेहमी भाग्योदय असतं >>>>> आमच्याकडेही. आमच्यासाठी कॅलेंडर म्हणजे फक्त आणी फक्त भाग्योदय
आता भाग्योदय सगळीकडे मीळते, पण काही वर्षांपुर्वी नाही.
मग आम्ही अगदी नोव्हेंबर लाच आणुन ठेवायचो बेळगावातुन, कारण ईकडे ठाण्याला विक्रीला अगदीच लिमीटेड स्टॉक यायचा अन समजा ऊशीर झाला तर मग मिळायचेच नाही.
मस्त लेख!
मस्त लेख!
कॅलेन्डर च्या भरपुर आठ्वणि आहेत, इथे येताना आठवणिने बॅगेत आणलेल, सगळ्याचे वाढदिवस लिहुन ठेवण, पटकन बोलताना एखादा फोन नबर लिहला जायचा,घरी त्यावर दुधाचे हिशोब लिहले जायचे, अर्धा कधी घेतला कधी जास्त घेतल किवा घ्यायच असल की २ दिवस आधिच त्यावर मार्क केल जायच , लग्ना-मुन्जिच्या तारखा, नवरात्रीला उपास सुरु वैगरे सुद्धा लिहल जायच, दादाच्या कपनिच खास कॅलेडर असायच भलमोठ गुळगुळित पानाच त्यावर उत्तोमउत्तम अॅवार्ड विनिन्ग फोटो असायची, त्याला हॉल मधे मान मिळायचा... मग वर्ष सपल तरी टाकायच नसल्याने त्यावरच नविन कॅलेडर लावल जायच.
माझ्यासाठी कॅलेडर म्हणजे कालनिर्णय च!
मस्तच
मस्तच
मराठी दिनदर्शिकेच्या खूप
मराठी दिनदर्शिकेच्या खूप आठवणी आहेत. भारताबाहेर असल्याने त्या कदाचित जास्तच जाणवतात.
लहानपणीची एक लख्ख आठवण म्हणजे , दिनदर्शिकेवर लिहिलेल्या दूधाच्या आणि पेपरच्या रतिबाचा हिशोब कोण करणार यावर बहिणीबरोबर होणारी भांडाभांडी !.... मग नंतर सामंजस्याने महिने वाटले गेले आणि भांडणं संपली. अशीच भांडणं शब्दकोडी सोडवण्यावरुन पण होत असत.. ती ही मग दिवसांची वाटणी करुन सोडवली गेली
लेखात लिहिल्याप्रमाणे दरवर्षी कालनिर्णय/महालक्ष्मी स्वतः किंवा भारतातून कोणी येणार असलं तर त्यांच्या बरोबर आवर्जुन मागवले जाते.
लेख आवडला हेवेसांन !
khup chann athvan , ata tar
khup chann athvan , ata tar khup calender yetat pan Kalnirnay tar havach asto , mi tar birthday kadhi yeto manje veg , nonveg cha day aahe ka te adhi check karte.
कालनिर्णय मी पण आणते दर वर्षी
कालनिर्णय मी पण आणते दर वर्षी. आधीची गुंडाळी पण ठेवलीत. खरं त्याचं काय करायचं प्रश्नच आहे पण ठेवलीत खरी.
मलापण भिंतीवर कालनिर्णय हवेच
मलापण भिंतीवर कालनिर्णय हवेच असते. माझी मुलगी ( वयः७) सुद्धा आता कालनिर्णयची फॅन झाली आहे. ती सुद्धा त्यातले मराठी आकडे वाचायचा प्रयत्न करते. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी कधी आहे ते बघते. जानेवारी महिन्यात blue moon day आहे हा शोध आम्हाला कालनिर्णय मुळेच लागला.
एखाद्या महीन्यात चतुर्थीला उपास करूया असा आग्रह पण धरते. (चतुर्थीला उपास करतात हे तिला आजी-आजोबांकडून कळलं आहे. आणि साबुदाण्याची खिचडी तिला फार आवडते.) त्यामुळे मला आणि नवर्याला पण सक्तीने उपास घडतो. नवरा म्हणतो तेवढेच पुण्य पदरात.
अमेरिकेत रहाताना मुलांना भारतीय सण-वारांची ओळख रहावी यासाठी तरी 'भिंतीवरी कालनिर्णय असावे'.
कालनिर्णय मी पण आणते दर वर्षी
कालनिर्णय मी पण आणते दर वर्षी. आधीची गुंडाळी पण ठेवलीत. खरं त्याचं काय करायचं प्रश्नच आहे पण ठेवलीत खरी.
>>> रद्दीत घाला की राव.
माझ्याकरता तरी मराठी
माझ्याकरता तरी मराठी कालनिर्णय किंवा तत्सम कॅलेंडर हवंच असं वाटायचे दिवस संपले. कुणी अगदी आठवणीने आणलं किंवा पाठवलं तरी ते भिंतीवर लागत नाही. मायबोलीवर किंवा इतर गृप्सवर आज अमकं उद्या तमकं हे कळतं तेच पुरतं.
मला कालनिर्णयच आवडतं. तेच
मला कालनिर्णयच आवडतं. तेच असतं घरी. इतर कॅलेंडर तेवढी देखणी नाही दिसत भिंतीवर
<<<<<<कॅलेंडर आलं की,आपला वाढदिवस, दिवाळी, सर्व सुट्ट्या कधी येतात ये बघून घ्यायचे. महिना पालटला की त्या महिन्यातल्या शुभ-अशुभ दिवसांची यादीही पाहिली जायची. मागच्या पानावर आपल्या राशीसाठी हा महिना कसा जाणार हे पाहायचे. परीक्षा असेल तर अजूनच काळजी त्या भविष्याची.>>> अगदी. आताही असंच करते मी.
मस्त
मस्त
आम्ही कॅलेंडर आलं की पहिले १२ माहिन्यांचं भविष्य एकत्र हावरट सारखं पहिला महिना चालू होण्या पूर्वी वाचून टाकतो आणि विसरुन जातो.
कालनिर्णय ची पूर्ण जाहीरात
काल निर्णय द्या ना अहो कालनिर्णय घ्या ना
काल निर्णय आपो नि काल निर्णय लो नि
काल निर्णय दिजीये काल निर्णय लिजीये
काल निर्णय मराठीत
काल निर्णय गुजरातीमा
काल निर्णय हिंदीमे
भिंतीवरी कालनिर्णय असावे
भविष्य मेनू आरोग्य ज्ञान उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचांग सोपे सुमंगल सुभावे भिंतीवरी काल निर्णय असावे
आम्ही महालक्ष्मी वर स्विच झालोय
तिथी माहिती जास्त चांगली आणि डिटेल असते
पण कालनिर्णय ची आठवण येतेच.
निवडणूका जवळ आल्या की नगर सेवक उमेदवाराची ३ कॅलेंडर येतात
लहानपणी आमच्याकडे श्री
लहानपणी आमच्याकडे श्री महालक्ष्मी दिनदर्शिका असे. त्यात प्रत्येक पानामागे उपयुक्त माहिती असे. उदा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आला की आरोग्याची काय काळजी घ्यावी, बेसिक आजाराचे प्रथमोपचार, सुर्यनमस्कार कसे घालावे, दिवाळीच्या पदार्थांची रेसिपी, मुहुर्त, भविष्य इ. ते वाचायला मला प्रचंड आवडे. मला तर तेव्हा कालनिर्णय माहित सुद्धा नव्हते.
कालनिर्णयची जाहिरात फक्त आधीचं वर्ष संपताना काही दिवस आणि नविन वर्ष सुरू झाल्यावर काही दिवस लागायची, पण तेव्हा पाठ झालेली अजून पाठच आहे.
अनु ने लिहिली नसती तर मी लिहिणार होते. रेणुका शहाणे होती त्यात.
रसा सुधीर जोशी ची अॅसिडीटी
रसा सुधीर जोशी ची अॅसिडीटी वाली लिहून टाका मग
आताही स्वाती चिटणीसची
आताही स्वाती चिटणीसची कालनिर्णयची जाहिरात लागते ना!
रसा सुधीर जोशी ची अॅसिडीटी
रसा सुधीर जोशी ची अॅसिडीटी वाली लिहून टाका मग Happy

Submitted by mi_anu on 9 January, 2018 - 16:51
>>
किंवा मग सराफ मामांची वैद्य पाटणकर काढा ची.
एसिडिटी ची कालनिर्णय
एसिडिटी ची कालनिर्णय वालयांचीच आहे हो
वैद्य पाटणकर आणले तर अहो कैलास जीवन म्हणून उचम्बळून येणारे आबा आणि आजच रात्रि घ्या सकाळी ओक्के वाले टॉयलेट मागे लपणारे बाबाजी पण आणावे लागतील
कालनिर्णय लोकप्रिय व्हायच्या
कालनिर्णय लोकप्रिय व्हायच्या पूर्वी पंचांग आणणे हाही असाच एक सोहळा असे. त्यातले अवकहडा चक्र व घबाड ( हे आपल्याला कधी मिळेल असे होत असे) इश्नान्येकडून वायव्येकडे जाणारी व पश्चिमेकडे पहात असलेली संक्रंत, कोणत्या गोत्राचे कोणाशी जुळते ही माहिती, सोयर सुतकाचे नियम...
छान लेख. लेखिकेने अशा छोट्या स्फूट लेखांचा एक संग्रहच प्रसिद्ध करावा.
छान लिहिले आहे. आवडले.
छान लिहिले आहे. आवडले.
छान लेख. लेखिकेने अशा छोट्या स्फूट लेखांचा एक संग्रहच प्रसिद्ध करावा.>>>+१
आमच्या कडचे मराठी मंडळ
आमच्या कडचे मराठी मंडळ संक्रांतीच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व सभासदांना एक (ह्या वर्षी तर दोन!) कालनिर्णय देते. बाकि सगळ्या कार्यक्रमा पेक्षा कालनिर्णयासाठी जाणारे बरेच लोक आहेत
माझा मित्र अवी पुण्यात
माझा मित्र अवी पुण्यात रस्त्यावर कालनिर्णय विकत असे मला हे ठाऊक नव्हते. मी पुण्याला गेलो असता मला तो दिसला मी त्याच्याकडून ३ कालनिणय विकत घेतले आणि एकडच्या तिकडच्या गप्प मरु लगलो. तेव्हड्यात तेथे एक जण आले व त्यानी दोन कालनिर्णय घेतले त्याना अवीने माझ्यापेक्षा प्रत्येकी अर्धे पैसे सन्गितले. मी विचरले अरे तु मला एवढी किम्मत सन्गितलीस आणि याना अगदी स्वस्तात विकतोयस. तर तो म्हणाला तुम्ही परदेशात राहणारे तुम्हाला परवडेल किम्मत याना कशी परवडेल. म्हणुन मी याना नेहमीची किम्मत सान्गितली आणि तुम्हाला दुसरी परदेशची सान्गितली. ते ग्रुहस्थ पहातच राहिले. मला काय म्हणावे ते समजेना.
भारतात असताना १०-१५ वर्षांची
भारतात असताना १०-१५ वर्षांची अशीच कालनिर्णय साठवून ठेवलेली. नंतर इकडे आल्यावर दरवर्षी येताना आणायचो. मग डिसेंबर आला तरी आमचा आपला मार्चच चालू... असं होऊ लागलं. मग त्याची गुंडाळी तशीच राहू लागली. आता आणणंच बंद केलं. गरज वाटत नाही आणि भावना गुंतवण्या इतका मी काय म्हातारा झालो नाहीये.
काही अडत नाही की मिस करत नाही.